Saturday, February 28, 2009

अक्षराची किमया.

“माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं.”

आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख होता होता निघून जायची.तिला दोन तिन मुली होत्या.त्यातली धाकटी चमेली तिच्याबरोबर नेहमीच असायची.ती जशी शाळेत शिकायच्या वयाची झाली तेव्हा तिला मी नेहमीच म्हणायचो,
” चमेली तू खूप शिक.शिकलीस का तुला जगायला मजा येणार.आणि तुझ्या आईसारखी कामं करावी लागणार नाहित.”
पण त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिचं लहानपणातच लग्न झालं.नवर्‍याच्या घरी गेल्यावर शिक्षण कसलं होणार?
माझा कानमंत्र तिने जपून ठेवला असं वाटतं.कारण आता बरेच वर्षानी ती भेटल्यावर मला तिला ओळखताच आलं नाही.अठरा एकोणीस वर्षावर ती प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन चांगलं शिकली.मुलांना आणि भावंडानापण तिने शिकवलं. मला भेटल्यावर ती म्हणाली,
“मी तुमचे शब्द खोल मनात जपून ठेवले होते.आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला.”
मी तिला म्हणालो,
“चमेली तू मात्र मला आश्चर्य चकित केलंस.तू एव्हडं मनावर घेशील अशी मला त्यावेळी नव्हेतर आता सुद्धा अपेक्षीत नव्हतं. हे सर्व कसं काय झालं?”
त्यावर तिने मला असं सुनावलं की ऐकतच राहिलो.
चमेली म्हणाली,
“मी अक्षरावर विश्चास ठेवते.कारण जीवन बदलण्याचा त्या अक्षरात क्षमता असते.अक्षरात छपून राहिलीली क्षमता मला ज्यावेळी पहिल्याच दिवशी मी शाळेत गेले तेव्हांच लक्षात आलं.माझ्या नांवात असलेली अक्षरं काय आहेत ह्याचा मला पहिल्यांदा धडा माझ्या बाईने दिला.मला चमीली म्हणायचे पण खरा माझ्या नांवाचा उच्चार चमेली असा आहे.”म” वर मात्रा आणि “म” ला काना-वेलांटीने काय पण फरक होतो.नांवाचा उच्चारच बदलू शकतो.
माझ्या मनात आलं,जर का मात्रा आणि वेलांटीने माझ्या नांवाचा उच्चार बद्लू शकतो तर मग सर्वच अक्षरं मी शिकले तर माझ्या आयुष्यात किती बदल होऊं शकेल?तो सबंध दिवस मी माझं नांव परत परत लिहिण्यात घालवला.नंतर मी अंकलपटी -बारिक बारिक कामं करीत असताना- घेऊन फिरायची.अगदी चांगलं लिहिता येई तो पर्यंत.लिहायला शिकण्यापूर्वी माझं जीवन अगदी त्या ओढ्यातल्या गतिहीन पाण्यासारखं होतं.अगदी लहान वयात माझं लग्न झाल्याने ही व्यथा माझ्या मनात घर करून होती.माझ्या पतीने मला शिकायला कधीच मदत केली नाही.दयनीय गरीबी ही माझ्या जीवनाची वाटचाल होती.आणि त्याऊप्पर माझ्या अंगात कसली कला नव्हती ना धैर्य होतं.पण बरीच माणसं लिहीण्या- वाचण्याच्या प्रयत्नात लागली होती.अर्थात त्यांच जीवनमान सुधारत होतं.
माझ्या नंतर लक्षात आल की, सौंदर्याची नाही, नाही संपत्तीची माझ्या जवळ उणीव होती.उणीव होती ती फक्त अक्षरांची.
माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं.
तत्काळ अडचण होती ती करली नदीची.पावसाळ्यात नदी पार करून गेल्या शिवाय नदीपलिकडच्या शाळेत शिकायला जाणं अशक्य होतं.जास्त करून मोसमी पावसात.
मला त्या नदीवर पूल बांधून घ्यायचा होता.सुरवातीला गांवातल्या लोकानी मदत केली नाही.उलट माझी मजाच उडवली.तो पूल फक्त माझ्यासाठीच हवा आहे आणि त्याचं नांव पण “चमेली पूल” म्हणून देऊन पण ठेवलं.पण नंतर मात्र मला मदत मिळायला लागली.पूलाचं सामान आणलं गेलं,कामगार मिळाले आणि सरतेशेवटी पूल बांधला गेला.
आतां मात्र मुलांना त्या पूलावरून शाळेला धांवत जाताना पाहून डोळ्यांच पारणं फिटतं.तो पूल लोखंडाचा होता,समुदायाचा होता,अक्षरांचा होता.सर्वांच्या सहकारा शिवाय सफलता मिळणं नेहमीच कठीण असतं.
हे सर्व माझ्या अक्षर ओळखीमुळे झालं.जरी मी थोडं उशीरा शिकले तरी.अक्षरांत प्रचंड शक्ति आहे.त्यात जादू आहे.जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षरं.असं मी तरी मानते.”
हा तिचा सर्व खुलासा ऐकून मी पुर्ण अचंबीत झालो.
मी तिला म्हणालो,
“चमेली,तू एका प्रोफेसरला पण मागे टाकशील असं सुंदर लेक्चर मला दिलंस.पण काही असो,गोपिकाबाई मला नेहमी म्हणायची,
“माझी चमेली जात्याच हुशार आहे.”
“माझी आई जीवंत असती तर तिने माझी नक्कीच पाठ थोपटली असती”…चमेली डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुटपुटली.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 26, 2009

वेंगुर्ल्याचो भावडो.

“काय झालां तेतेबाय?”

“अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झाला.”

“भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या?
मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते.”

“कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.बायजाचा आत्ताच लगिन झाला मां?.मी आपलो त्येंका चहाचो आग्रहकेलंय.होती नव्हती ती चहाची पूड घालून चहा केलंय.मग चहाची पूड संपतली नाय?
सकाळी हो उच्छाद.
“मी साखरपाणी पिंवचंय नाय.”
आता माकां सांग आपल्या पुरतो हे चहाची पूड आणतत.आम्ही सगळ्यांनी साखरपाणी पिऊक व्होयां.
एकदिवस हेंनी पिलांतर काय झालां?”

“अगे तेतेबाय,तू माझ्याकडून चहाचीपूड न्हेवची होतंस.”

“कित्याक?रोज रोज तुझ्याकडे कायनाकाय तरी मागूग लाज वाटतां.
गो कमळ्या,तो तेच्यापुरतीच पूड आणतां.आम्ही सगळे साखरपाणी सदीना पितो.”

“मोठो कंजूष आसा भावडो.”

“कंजूष? अगो महाकंजूष.
न्हाताना लाईफबॉयची खापटी आम्ही आंगाक चोळूची.आणि हो लक्स लावतलो.”

“मेल्याच्या आंगांक घाण येत असतली.”

“तसां नाय आपण छंदीफंदी र्‍हवतलो आणि बायकापोरा मरेनात.”

“आता सहा पोरा झाली भावड्याक अक्कल कधी येतली.?”

“अगो कमळ्या,पोरां होवची काय आपल्या हातात असतां? देवाची करणी आणि नारळात पाणी.”

“कसल्यो तेतेबाय तुझ्यो जुनाट समजुती?.अगे ह्या सगळां माणसाच्या हातात असता नाय तर कोणाच्या?”

“अगो कमळ्या,माकां “माणसाच्या हातात नाय” म्हणजे बायलमाणसाच्या हातात नाय असां म्हणूचा आसां.नाय तरी पुरूषाची आणि कुत्र्याची जात एक असां म्हणतंत तां काय चुकीचा नाय.कुत्रे तरी निदान फक्त मार्गशिर्षातच येतंत कांडावर. पुरूष मेलो दिवस नाय रात्र नाय.सदाचा आपला तांच.दुसरो धंदोच नाय.
तुझ्या मात्र घोवांक कमळ्या मी म्हणूचंय नाय हां! माका पाप लागात त्या देवपुरुषाक काय मी नांवां ठेवलंय तर.
तुझ्या घोवांसारखे आसत काही नायम्हटलां तरी पुरूष देवमाणासारखे.”

“अगे तेतेबाय,माकां नेहमीच विचार येतां,रोजचे तुम्ही भांडतात.बारा महिने तेरा काळ तुमचा आपला तूं,तूं मी,मी चालूंच असतां, भावडो साळसूद कसो बाहेरच्या पडवीत झोपतां आणि तूं पोरांक घेऊन माजघरात झोपतंय तरी पण दर दोन दोन वर्षांक आपला तुझा चालूच आसां.?”

“काय सांगतंलय कमळ्या,माझी कर्मदशा! दुसरां काय?
घासत्याल बुदलीत घालून दिवो पेटतो ठेव्न माजघरात मी झोपतंय.ही सहाही पोरां आजूबाजूक लोळत असतंत.एकमेकाक लाथो मारीत असतंत झोपेत.ह्या आता दोन वर्षाचा कुसधुणा तेचां नांव शेवटचा समजून “सरला” म्हणून ठेवलंय.पण माका खात्री नाय तुझ्या भावड्याची.तालात इलो की रात्री माझघरात येव्न बुदली मालवतां, काम झाला की वाघासारखो घोरत पडता मग आंगा खाली मुलगी चिरडात हेंचो आगो नाय पिछो ठेवणा. सकाळ झाली की उठून जातां.
सकाळी साखरपाणी पितानां हो बारा वर्षाचो दाजी माका कसो सांगता,
“आये रात्री माझघरात वाघ खैसून येतां?माका रात्रभर झोप लागणा नाय.”
ऐकून शरम वाटतां माकां.आता तेका मी काय सांगू माझा कर्म.?
कमळ्या,आतां तुमच्याकडे साधना इलीत.गोळ्यो काय?निरोध काय? काय काय सांगूक नको.
आमच्या वेळेक फक्त साधना नावाची नटी होती.आणि काय नाय.”

“तेतेबाय,इतक्या होवून सुद्धा तुका विनोद बरे सुचतंत.
ह्या तुझ्याकडून शिकण्यासारख्या आसां हां!”

“वशाडपडो,गजालीन घो खाल्लो.अगो तांबे भटजी इलेतसां वाटता.ह्या रोजच्या क्लेषातून शांती मिळूची म्हणून भटजीक मी एकादशण्यो करूक सांगितलंय.
बरां जातंय मी.
बाकी तांबेळेश्वराक काळजी. “


श्रीकृष्ण सामंत.(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 24, 2009

जीवनातल्या येणार्‍या कसोटीमधून अस्तीत्व कसं टिकवायचं.

“स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं,माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्‍हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला “

काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं हे लक्षात येत नव्हतं.आता नलू एक मुलाची आई झाली असून आता ती एका कॉलेजमधे लेक्चरर म्हणून काम करते.
एकदा मी बसच्या लाईनमधे उभा होतो.माझ्या मागे नलू आपल्या मुलाला घेऊन उभी होती.चूळ्बूळ करणार्‍या आपल्या मुलाला ती काही तरी उपदेश करीत होती. ती तिची बोलण्याची ढब आणि तो तिचा आवाज मला जरा परिचयाचा वाटला.कुतूहल म्हणून मी तिला विचारलं,
“तुझं आडनांव काणे कां?”
ती पटकन तिच्या त्या स्टाईलमधे म्हणाली,
“हो माझं आडनांव काणे पण ते माहेरचं होतं,आता मी नलिनी भावे झाले.”
मी क्षणभर विचार केला म्हणजे ही आता भावे जरी झाली तरी नलू हे नांव तेच आहे.
मी म्हणालो,
“म्हणजे तू पूर्वीची नलू काणे ना?”
तिने होय म्हणताच,मला तिला माझी ओळख करून द्दायला जास्त प्रयास लागला नाही.
तेव्हड्यात बस आली,आणि माझा रूट तो नव्हता पण नलूला त्या रूटने जायचं असल्याने ती लगबगीने बसमधे चढली आणि पटकन तीने आपल्या पर्समधून तिचं कार्ड माझ्या अंगावर भिरकावलं आणि मोठ्यानी म्हणाली,
“मला फोन करा”

मी ते व्हिझीटिंग कार्ड वाचताना विचार करू लागलो, तीच समयसुचकता,तोच धीटपणा ह्या मुलीने अजून जोपासून ठेवलाय.
मुंबई युनिव्हर्सिटीच्या कॅम्पच्या परिसरात- कालिनाला- ती राहत होती.
त्या पत्यावर मी एकदिवशी तिच्या घरी गेलो.गेल्या गेल्या आमच्या गप्पा सूरू झाल्या.
मी तिला म्हणालो,
“नलू तू आहे तशीच आहेस.त्या बसस्टॉपवर तुला पाहून माझी स्मृती तुझ्या लहानपणाच्या दिवसांची आठवण देत होती.”
“अगदी बरोबर.आणि त्याचं कारण माझे बाबा…..नलू पटकन म्हणाली.
मी धीट राहणं,खंबीर राहणं आणि आपमतलबी राहण्यावर विश्वास ठेवते.ही विशेषता मी माझ्या बाबांकडून शिकले.धीटपणा हा प्रथम येतो.मी माझ्या बाबांची एकूलती एक मुलगी.मी व्यायाम करायची.मी धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या पूढे असायची. पायाला दुखापत झाली तरी मी लंगडत का होईना खेळायची.माझे बाबा मला सर्वांत धीट वाटायचे.आणि मला अगदी त्यांच्या सारखं व्हायला आवडायचं. त्यांनी कधीही शाळा चूकवली नाही.त्यांच्या कॉलेजचा खर्च त्यांनी मोलमजुरी करून संभाळला.अर्धवेळ एका कचेरीत हिशोबनीस म्हणून काम करून रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतलं.माझ्या बाबांनी मला खंबीर कसं राहायचं ते शिकवलं. शरण जायला अनिच्छुक कसं राहायचं ते शिकवलं.खंबीर राहिल्याने मी एकदा बलात्काराच्या प्रसंगातून वाचली.मी त्या नालायकाला झूंज दिली.माझ्या हातात असलेल्या वस्तूने त्याचा चेहरा काळामोरा केला.त्याचा चेहरा आणि त्याचे कपडे कसे होत ते माझ्या स्मृतित ठेवलं.इतर मुलींना त्याच्यापासून उपद्रव होऊं नये म्हणून निश्चय केला.मी त्याची कोर्टात ओळख पटवून त्याला तुरूंगात घालण्याची तजवीज केली.

कधीकधी धीटपणा आणि खंबीरपणा असणं पूरं नसतं.आप्पलपोटेपणावरही माझा विश्वास आहे.
मी काही भलीमोठी बाई नाही.तसा माझा कद लहानसाच आहे.खरं सांगू तर माझी हजेरी आणि माझा कद पाहून माझ्या मला मी कुणाचं ध्यान ओढून घेण्यापैकी नाही.एका लहानश्या संध्याकाळच्या कॉलेजमधे मी इंग्रजी हा विषय शिकवते. शिक्षणाची भारी उत्सुकता नसलेल्याना मी शिकवते. तशी मी मतलबी आहे.मी माझ्या विद्दार्थ्याच्या मागे लागत असते.काहीना माझी हीवागणूक आवडतही नसावी.पण नंतर ते माझी कदर करताना पाहिलंय.
“आता अनादर करा नंतर कदर करा” हे माझं ध्येय आहे.
मी माझ्या स्वतःशीसुद्धा कधीकधी मतलबी राहते.त्यामुळे जरी आदल्या रात्रीचं जागरण झालं तरी मी माझ्या मलाच सकाळी बिछान्यातून उठवते. मी माझ्याशीच चांगली वागत नाही.घरात वेळ काढत राहायला मी माझ्या मला परवानगी देत नाही.
माझ्या स्वतःच्या बेशिस्त राहाण्याच्या संवयीला मी विरोधात असल्याने माझ्या विद्दार्थ्यांची ससेहोलपट होण्याला मी कारणीभूत होत नाही.आणि तेच दिवस माझे विशेष मनोरंजनाने शिकवायचे दिवस असतात.
माझ्यातल्या आपमतलबीपणाला अशी मी उत्तरदायी ठरते.

ती धीट आणि खंबीर राहाण्याची माझ्यातली इच्छा जी माझ्या बाबांकडून मला मिळाली ती इच्छाचा मला अशा तर्‍हेने नुकसान न होण्यापासून उचित उपयोग होतो.माझ्या बाबांना अर्धांगवायू होऊन निर्वतताना मी पाहिलंय.पण त्यांनी जगण्याची इच्छाशक्ति कधी सोडली नाही.कदाचीत त्यांना आणि आम्हा सगळ्यांना त्यांच लवकर निर्वतनं जास्त सोपं गेलं असतं जर का त्यानी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मृत्युशी लढत दिली नसती तर.
जरी ते माझ्या जीवनात आता नसले तरी त्यावेळी ते त्यांचा शेवट येई पर्यंत स्वतःचेच राहिले.कुणा एका कविने आपल्या वडीलांशी अनुरोध करीत म्हटलं आहे,
“करा हो क्रोध त्या विजत्या वातीचा”

स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं,माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्‍हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला “
तिचा निरोप घेताना मी तिला म्हणालो,
“नलू तू धीट,खंबीर आणि आपमतलबी आहेसच आणि त्याशिवाय विनम्रपण आहेस.हे मी तुला सांगितलं तर त्यात काही चूकीचं होणार नाही. कारण स्त्रीया जात्याच विनम्र असतात.”
नलूने हे ऐकल्यावर जो चेहरा केला तो अजून माझ्या लक्षात आहे.
ती विनम्र दिसलीच आणि लाजलेली दिसली.तिला काहीही न सांगता मी माझ्याशी पूटपूटलो.
“लाजणं हा तर स्त्रीयांचा उपजत गूण आहे”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Friday, February 20, 2009

मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.

आज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला,
“तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो? त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल काय?”
“सांगाल काय? अहो त्यासाठीच मी ह्यांना तळ्यावर घेऊन आलोय.ते आनंदाने तुम्हाला सांगतील.”…….प्रो.देसाई मला म्हणाले.
प्रो.तेंडूलकर सांगू लागले,
“लहान मुलं खेळ खेळताना असा एक खेळ करतात.एकाएकी अंगुलीनिदर्शन करून कुणालाही “तुम्ही कोण ?” असं विचारायचं. आणि काही लोक उत्तर देताना सांगतात, “मी मनुष्य आहे” किंवा काही आपली प्रांतियता सांगतात किंवा कुठच्या धर्माचा ते सांगतात.
जेव्हा हा प्रश्न मला विचारला गेला तेव्हा मी म्हणालो “मी मानव वैज्ञानीक” (ऍनथ्रुपोलॉजीस्ट) आहे.मानव-विज्ञान म्हणजे मानवी जीवनातल्या सर्व क्षेत्रातला म्हणजे मानवाचा उगम,त्याचं चलनवळण,त्याचा शारिरीक,सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा विकास ह्या गोष्टींचा अभ्यास. आणि हे करण्यासाठी सर्व तर्‍हेने आणि सदासर्वकाळ वचनबद्ध राहून झाल्यावर, जेव्हा मी एक व्यक्ति म्हणून जो मला समजतो आणि त्याबद्दल बोलतो, जेव्हा मी मानव-वैज्ञानीक पण आहे हे विसरून जाऊन मला मी निराळा करूं शकत नाही तेव्हा मी मानव-वैज्ञानीक होतो.

मनुष्याला समजून घेताना तो मनुष्य इतर प्राणी मात्रातला एक आवश्यक भाग आहे असा विचार झाला पाहिजे.
आपली मानव जात जटिल जैविक संरचनेवरच -जी युगायुगातून अगदी सामान्य राहून विकसीत झाली आहे-त्यावर अवलंबून आहे असं नसून उलट महान सामाजीक अविष्कार जे मानवानेच निर्माण केले जे कधीही विस्मरणावस्थेत जाऊ नये म्हणून मानवाने काळजी घेतली आणि त्याउप्पर जावून विकसीत करणारा, विचारवंत,राजनीती-विशारद,कलाकार, भविष्यद्रष्टा म्हणवून घेण्यासाठी मानवानेच मानवाला महत्ता दिली त्यावर ही अवलंबून आहे.

मला वाटतं,हे महान शोध,भाषा,कुटूंबव्यवस्था, उपकरणांचा उपयोग, शासनप्रणाली, विज्ञान,कला आणि तत्वज्ञान ह्यांच्या अंगी अशी गुणवत्ता आहे की ती प्रत्येक मानवाच्या स्वभावाच्या क्षमतेला संमिश्र करू शकते.आणि ही प्रत्येक गोष्ट शिकून तशीच्या तशी राखून ठेवायला कुठचाही मानवी समुह तयार असतो.मग ज्यात त्यांचे जनक राहिले ती जात, संस्कृती कुठलीही का असेना.आणि एखादं नवजातबालक एखाद्दा मागासलेल्या जमातीतलं असलं जरी तरी ते मूलभूत दृष्ट्या एखाद्दा नावाजलेल्या विश्वविद्दालयातून पदवीधर व्हायला,एखादा कवितासंग्रह लिहायला,किंवा एखादा मूलभूत शोध लावायला सक्षम असू शकतं.

तरी पण मला वाटतं,की एखाद्दा मुलाचं कुठल्याही देशात पालन-पोषण झालं, तरी ते त्या देशातले संस्कार अंगिकारतं,आणि ते संस्कार दुसर्‍या देशातल्या अशाच पालन-पोषण केलेल्या मुलाच्या संस्कारापेक्षा इतके वेगळे असतात की त्यातले भेदभाव समजून घेऊनच मग आपल्याला फरक कळतो.आणि त्यातूनच आपल्याला मानवाच्या विधीलिखीतावर नवीन नियंत्रण आणता येतं.

मला वाटतं मनुष्याचा स्वभाव तात्विक रुपाने चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. परंतु,व्यक्तिरूपाने पाहिल्यास जो जन्माला येतो तो संमिश्र क्षमता घेऊन येतो.आणि हा स्वभाव त्या व्यक्तिंच्या पालनपोषणाने - प्रेम आणि विश्वास कसा वाढवतात, परिक्षण,निर्मीती कशी करतात,किंवा शंकीत राहून,द्वेष करून ,किंवा कुणाच्या अनुसराने कसे वागतात- ते कसे माणूस बनतात हे ठरतं.

मला वाटतं,अजून आपण मानवाच्या क्षमतेला चाचपडायलाही सुरवात केली नाही.आणि म्हणून नम्र राहून,सतत माणसाच्या चालचालवणूकीचा अभ्यास करून जागरूत राहून संपन्न समाज निर्मीती करून जगत असताना वाढत्या प्रमाणात लोकाना त्यांच्यात कोणत्या पूर्ततेचा आभाव आहे याची जाणीव व्हायला सुरवात होईल.
मला वाटतं,माणसाच्या जीवनाला अर्थ तेव्हा येतो की जेव्हा तो त्याचं नातं, व्यक्तिगत ध्येय, संपन्न समाज,काल आणि कोणत्या देशात राहतो ह्याच्याशी तो निगडीत असतो.आज त्याचा अर्थ असा होईल की आपण आपल्यावर ह्या जगाच्या निर्मीतीच्या कामाचा भार अशा तर्‍हेने घेतला पाहिजे की आपलं भविष्य सुरक्षित आणि मुक्त राहिलं गेलं पाहिजे.”
हे सर्व सांगून झाल्यावर प्रो.तेंडूलकरानी आपल्या हातातलं पुस्तक वाचायला मला दिलं.
नांव होतं.
“मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.”
लेखक- प्रो.गंगाधर तेंडूलकर.
मी ते आता वाचायला घेतलंय.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 18, 2009

शून्याची महती

नेहमी प्रमाणे मी आणि तानुली तिच्या स्कूलबसची वाट बघत ड्राईव्ह्वेवर येरझारया घालीत होतो.सहजच मी तानुला म्हणालो,

तानुली,”दोन” “एका”पेक्षा मोठा,” तीन ” “दोना ” पेक्षा मोठा असे करत करत “नऊ”सगळ्यांपेक्षा मोठा मग “शून्याचं” काय?
तानुला “शून्याचं”खूप वाईट वाटलं.ते मला तिच्या चेहरयावरून दिसलं.ती म्हणालीच “पुअर झीरो” मी म्हणालो,

“तानु,”झीरोच” खरा “हिरो” आहे.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर “झीरोवर”एक कविता करतो.ती वाचल्यावर तुला कळेल“शून्याची”महती.

एकदां “दोन” म्हणे “एकाला”
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे “तीनाला”
माहीत नाही का “एक” आणि “दोनाला”
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला

दोन शिंगी “चार” होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकलं का रे “एक” “दोन” आणि “तिना”
“पांच” “सहा” “सात” “आठ”आणि मीना
कबूल झालो आहो “नऊना”
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

“शून्य” बिचारा कोपरयात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
वृद्धि होईल त्याची तुरंत

सूर्य,चन्द्र,तार्‍यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधिकार

नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

“एकाने” केली तक्रार “शून्याकडे”
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
“शून्य”म्हणाला त्याला
करशील तूं वृद्धि बेरीज करताना
नंतर
“शून्य”विचारतो “एकाला”
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे “शून्य”इतर आकड्यांना
कमी लेखूं नका कुणा
वेळ आली असताना
“शून्यसम”आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 14, 2009

कालाय तसमै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Thursday, February 12, 2009

भिंगरी

आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले,
“मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे”
मला म्हणाले,
“भिंगरी,भोंवरा”ज्याला इंग्रजीत “स्पायरल” म्हणतात.”
“म्हणजे,भाऊसाहेब तुम्ही गेले काही दिवस ह्याच विषयावर चिंतन करीत होता की काय?कारण त्यादिवशी लायब्ररीतून येताना मी तुमच्या हातात दोन तीन पुस्तकं बघीतली,एकावर चक्क “स्पायरल” लिहिलं होतं.मी हा काय विषय आहे म्हणून विचारणार होतो पण बोलताना दुसराच विषय निघाल्याने राहून गेलं.” असं मी म्हणालो.
त्यावर भाऊसाहेब म्हणाले,
“आता जे काय जगात चालंय,ते पूर्वी पासून जवळपास असंच होतं की काय?की जसजसा माणूस सुधारू लागला तसतसा तो आजच्या परिस्थितीला आला.ह्यावर माहिती काढण्यासाठी ही तीन पुस्तकं मी वाचली.त्या तिन्ही पुस्तकात तात्पर्य हेच होतं की हे सर्व जीवन भिंगरी सारखं आहे.आपल्याच भोवती गोल गोल फिरत आहे.”
भौतिकवादी लोक जन्माला येण्यापूर्वी मनुष्याची ईश्वरावर श्रद्धा होती. देव मानायचे. आणि आजूबाजूला देवाचंच चैतन्य आहेअसं मानित.त्यात हवा, पाणी,वनस्पती, प्राणीमात्र, धरती,आकाश आणि समुद्र ह्यांची गणना होती.आणि त्यामुळे हे सर्व पवित्र आहे अशी समज असायची.पूर्वज आजूबाजूच्या पर्यावरणाबरोबर समानता ठेवून राहायचे. आणि नंतर आपण हे सर्व विसरलो.असंतोषामुळे आणि विवादामुळे आपण कृर बनलो.कृरतेच्या भूकेला सीमा नव्हती.कितीही पोषण केलं तरी त्यांची समाधानी होत नव्हती.ही धरती दुर्लक्षीत झाल्याने एकाकी राहिली आणि उजाड झाली.वनस्पती,प्राणी आणि धरतीची ताकद नाहीशी झाली.कारण कुणीच लक्ष देईना. पूर,भीषण आगी,वादळं,आणि भूकंपामुळे जवळ जवळ सर्व नष्ट झालं.धरती हादरली. आणि ह्या र्‍हासातून नवं जग प्रकट झालं.

आता लोकाना ऐकू यायला लागलं,दिसूं लागलं आणि खरोखर आपण कोण आहोत हे लक्षात यायला लागलं.आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत सर्व मिळून, हे पण लक्षात यायला लागलं.ह्या परिस्थितीत आपण त्या सुंदर स्मृतीत टिकून राहिलो.आणि ज्याला कायमचा विश्राम दिला पाहिजे होता ते परत प्रकट झालं.मग तो तिरस्कार करणारा प्रेमी असेल,भावाभावातली भाऊबंदकी असेल,मित्रा मित्रातली ईर्ष्या असेल,किंवा एखादा लोभी शासक असेल.मनोभावातली ही एकच भिषण चिरफाड होती आणि राहिलेलो आपण त्याचं अनुकरण करीत गेलो.नाहीतरी मनुष्यप्राणी तसा कमजोर असल्याने कधी तो जंगली असतो आणि कधी प्रेमळही असतो.
त्यामुळे पुनःच्छ तिच कहाणी निर्माण झाली.गांभिर्य,व्यसनाधीनता,प्रेम आणि आवश्यकता हे सर्व त्याच सामुग्रीमधून परत निर्माण झालं.आणि पुन्हा आपण त्याच परिस्थितीत शिरलो आहो. आणि स्मृतिभ्रष्ट झाल्या सारखं करून दाखवित आहो.स्वच्छ आणि ताजं पाणी असतं हे आता फक्त आठवण म्हणून ठेवलं पाहिजे. धरतीमातेची स्तुतीसुमनं गाणारे थोडकेच रहिले आहेत.जन्म-मृत्यूच्या घटना, ज्या आयुष्यात स्थित्यंतर आणतात, ज्या आपल्याला एकमेकाच्या बंधनात जखडून ठेवतात त्यावर आता संघठित धंदेवाईकांच्या व्यवस्थेत धातू,धन आणि यंत्र यानी आपल्याला जखडून ठेवलं आहे.असा जेव्हा दूवाच तुटतो तेव्हा आपली बुद्धिमत्ता आपण हरवून बसतो.सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करायचा हेच विसरायला झालंय.हे दैत्य आता शासकांचं,पुढार्‍यांचं,दफ्तरशाहांचं,आणि ख्यातीवंतांचं वेषांतर करून जगत आहेत.लोकांना उत्पादन वाढवण्यासाठी गुलामगिरीत जखडून ठेवलं आहे.आणि ह्या दैत्यांच्या बॅन्का संपत्तिने भरल्या जात आहेत.पैशेवाल्याना सन्मान दिला जात आहे.मग त्यानी तो पैसा कुठल्याही मार्गाने कमवला असला तरी हरकत नाही.
काय म्हणावं ह्या जगाला?मला एकच वाटतं की ईश्वरावरच्या श्रद्धेच्या प्रकाशाची झोत मनुष्याच्या चुकांमधूनच त्याला मार्ग दाखवते. “
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त जवळ जवळ रात्री नऊ वाजता होतो.नऊ वाजले हे घडाळाकडे पाहिल्यावरच कळाले.
प्रो.देसायांचं चिंतन ऐकता ऐकता वेळ कसा निघून गेला हे दोघांनाही कळलं नाही.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 10, 2009

असंच एक स्वप्न.

मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती.सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.हिरवी गार बेडकांची डोकी आजूबाजूला प्रकट होत होती.काही सूर्यस्नान घ्यायला डोकं वरकरून राहायची तर काही कुणाची चाहूल लागल्याचा भास होऊन झटकन डबक्यात डुबकी मारीत होती.
एक तरतरीत आणि अक्कलमंद बेडूक काळसर खडकाचा आधार घेऊन वर बसून रात्रीचं जागरण विसरून पेंगत बसला होता.
मी त्या बेडकाच्या अंमळ जवळ बसून कुतहलाने त्याच्याकडून शिकायला बघत होतो.हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत.हा बेडूक आणि ह्याचे भाऊबंद बरेच वर्षात एकत्रीत मी पाहिले.आम्ही दोघे एकमेकाशी काही न बोलता निळ्या आकाशाच्या क्षीताजाकडे बघत असता मधूनच डबक्यातल्या माशांची पाण्यातली धक्काबूक्की बघत होतो.शेवटी तो चाणाक्ष्य बेडूक माझ्याशी बोलायला लागला,
“माणसं ह्या ओढ्याकडे येत जात असतात.”
पुन्हा एक बगळ्यांची रांग आवाज करीत आमच्या डोक्यावरून निळ्या क्षितीजाकडे झुकली.
सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत ह्याचा विचार येऊन आम्ही दोघे दुःखी आणि हताश झालो.
“प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे.काहीना त्यांची वाट अजून ध्यान्यात आहे.”
असं मी बेडकाला म्हणालो.
“मी जिथे जिथे जातो तेव्हा ह्या लोकाना हूडकून काढायाला प्रयत्न करतो.”असं मी म्हणालो.
त्याने मान हलवून संमत्ती दिली.
दिवस उतरंडीला जात होता.परत भेटायचं ठरवून आम्ही वेगळे झालो.एकमेकाचे आभार मानले.मी मागे वळून पाहिल्यावर तो अजून त्या खडकावर होता.मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.आणि तो बेडूक ते पहात होता.
पण हे असंच एक स्वप्न होतं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, February 8, 2009

शिरोड्याचं हवामान.

बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो. आता ह्या क्षणी मी शिरोड्या गावात आहे तिथे असाधारण गरम, ह्युमीड आणि स्थीर अशी हवा आहे.जमिनीकडून समुद्रावर आणि उलट जाणारे वारे हे आपले नैसर्गिक एअरकंडिशनर आहेत.
शिरोड्याचं हवामान प्रसिद्ध आहे.तुम्हाला ते हवामान आवडत नसेल तर एक मिनीट थांबा,ते लागलीच बदलेल.एकाएकी वावटळ येऊन आकाश ढगानी भरून जाऊन पावसाचे शिंतोडे पडायला वेळ लागणार नाही. कधीही तुम्ही पेपरात इकडचं हवामान बघीतलंत तर ते नेहमी गरम,ह्युमीड असंच लिहिलेलं असेल.आणि ते पण दिवसभर.सदाची इकडे हिटवेव्ह असते.
माझे मित्र नेहमीच मला सांगतात की पृथ्वीवरचं हवामान कसं बदलत राहिलंय ते.धृवावरचं बर्फ वितळायला लागल्या पासून तिकडची अस्वलं पाण्यात डुबत आहेत.आणि कुठे प्रचंड दुष्काळ पडतोय तर कुठे वाळवंटं तयार झाली आहेत. वाटतं जरा आपल्याच आजूबाजूला न्याहाळून ह्या धरतीची काळजी घेण्याची वेळ आली आहे.वनस्पती,प्राणी,वारे,पाऊस,सूर्य आणि चंद्राचे आभार मानले पाहिजेत.ह्या सर्वानी आपली इतकी वर्ष काळजी घेतली आहे आणि आपली जोपासना केली आहे.आणि त्या विधात्याचे पण आभार मानले पाहिजेत.आपण इतकं सगळं सहजगत्या स्विकारलं असंच करतो.बरेच आपल्यातले आपण ह्या धरतीवर खरोखर कोण आहोत हे विसरून गेलो आहोत.
माझा एक ह्या विषयावर अभ्यास केलेला मित्र सांगतो,
“हे एका टोकाला गेलं तर?-आणि ते जाणारही-जर का आपण आपल्याच वागणुकीत बदल केला नाही तर.?
आपल्याला परत आदिवासी व्हावं लागेल.” वनस्पती,प्राणी आणि वार्‍यांची स्तुतीसुमनं गावी लागतील,की ज्यांच्यामुळे आपण जगलो आहो.मला वाटतं,आताच सुरवात केली पाहिजे.हवामान अनुकूल आहे आणि ते आपल्या विचारांचं आणि क्रियेचं समापन आहे.
काल शिरोडे गावात खेळाचे सामने झाले.खो खो,हुतुतू,आट्यापाट्या,आणि कुस्तिचे खेळ.हे खेळ कौशल्याचा आधारावर आहेत.एक तरी भिडू शेवट पर्यंत टिकण्यावर त्याचं कौशल्य दिसून येतं. कुस्तिच्या खेळातून आपल्याला रोजच्या आयुष्यात शक्तिमान बनयाला मदत होते.त्यामुळे घरातली जड वजनं उचलायला मदत होईल.बाजारातून जड पिशव्या घरी आणायला सोपं जाईल.आणि चालायचा व्यायाम केला किंवा धावायचा व्यायाम केला तर कदाचीत जवळपास पायी जायला सोपं जाईल.आणि गाडीत इंधन कमी घातलं जाईल.आणि त्यामुळे प्रदुषण कमी होईल.आणि चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील.
आपण प्रत्येकजण असेच जीवनातल्या खेळात सामिल झालेलो आहोत.आणि ही धरती आपलं खेळाचं मैदान आहे.जन्माला येऊन जीवन कंठताना आपलं चैतन्य घेऊनच आपण जगणार आहोत.आपल्याला आव्हान असं आहे की,आपल्या यशापयशाची एक चमकदार कहाणी आपल्याकडून निर्माण झाली पाहिजे. आपलं हताशपण आणि आपली प्रसन्नता याचा उपयोग- आपल्या एकमेकाची आणि एकमेकाच्या योग्यतेची- काळजी घेण्यात झाला पाहिजे.
कधी अगदीच कंटाळा आला की मग मी रेडीच्या समुद्रावर जाऊन एखाध्या काळ्या खडकावर बसून पाडगांवकरांच्या कविता वाचत बसतो.खडकावर आपटणार्‍या लहान लहान लाटा परत जाताना फेसाळपणा सोडून जातात.त्या फेसात जमलेली हवा पुन्हा लाट येई पर्यंत बाहेर पडताना आवाज करतात.तो आवाज ऐकून ग्लासात सोडावाटर ओतल्यावर फेसाळ पाण्याला आवाज येतो तसाच काहीसा वाटतो.क्रिया एक असल्याने परणिम सारखेच असणार.हेच तर पदार्थ-शास्त्राचं तत्व आहे.रेडीच्या किनार्‍यावरून -आकाश स्वच्छ असेल तर- दूरवर वेंगुर्ल्याच्या बंदराचा भाग दिसतो.दुपारची वेळ असेल तर शुभ्र स्पटिकासारखी वाळू तापल्यानंतर चमकते आणि कधी कधी किनार्‍याच्या पाण्याचं प्रतिबिंब दिसतं.ते विलोभनीय असतं. बंदरावर येणार्‍या बोटीना रात्रीचा मार्ग दाखवायला भर समुद्रात लाईट हाऊस असतात.त्या रात्रीच्यावेळी रेडीच्या समुद्रावरून स्पष्ट दिसतात.
शिरोडा सोडून परत जायला खूप वाईट वाटतं.पण काय करणार.?


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, February 6, 2009

"हो ना गं आई....."

अंधाराची भीति मज वाटे
तरी मी ते कुणा न सांगे
तुला ही मी ते सांगत नाही
कदर तुझी करीतो मी आई
माहित आहे तुला सर्व काही
हो ना गं आई........

गर्दीमधे मला नको सोडून जाऊं
घराकडे आई कसा मी परत येऊं
दूर दूर मला नको असा पाठवूं
सांग कसा मी तुला मग आठवूं
एव्हडा व्रात्य असेन का मी
हो का गं आई.........

बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी
गं आई
नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी
गं आई
नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई
गं आई
चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी
गं आई
ठाऊक आहे तुला सर्व काही
हो ना गं आई......

नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई
नसती कसल्या वेदना नाही राहिल्या भावना
ठाऊक आहे तुला सर्व काही
हो ना गं आई......
एव्हडा व्रात्य असेन का मी
हो का गं आई.........



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 4, 2009

आजार्‍याकडून डॉक्टरने ऐकणं हेच उपचाराचं प्रभावी औषध आहे.

मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्‍याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना.
तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी. झाल्यावर वडीलांच्याच दवाखान्यात प्रॅक्टीस करू लागला.
दुरदैवाने भाईला वयाच्या एकेचाळीशीवर कसला तरी स्नायुचा आजार झाला.
हे मला पण माहित नव्हतं.बर्‍याच वर्षानी मी गावाला गेलो असताना त्याला व्हिलचेअरवर बसून रोग्यांवर उपचार करताना पाहून मी अचंबीत झालो.
एकदिवस वेळ काढून मी त्याच्याकडे गेलो होतो.तो रविवारचा दिवस होता. त्याच्याही दवाखान्याला सुट्टी होती.

गप्पा करताना भाई सांगू लागला,

” आमच्या डॉक्टरी पेशाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आजारी काय सांगतोय ते ऐकायला लागणारी किंमत, ही त्या आजार्‍याच्या रोगाचं निदान करण्यासाठी लागणार्‍या माहागड्या किंमतीपेक्षा नक्कीच कमी असते.परंतु, ते ऐकणं हे रोगाच्या निदानासाठी आणि तो रोग बरा होण्यासाठी एक चांगलाच उपाय होऊ शकतो.
म्हणून मला वाटतं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे. “
अभ्यासू लोक सांगतात की,आजारी बोलू लागल्यावर त्याला मधेच बोलण्यापासून रोखायला फक्त अठरा सेकंद लागतात.
तुला एक गंमतीची गोष्ट सांगतो.ही मी आजारी पडण्यापूर्वीची गोष्ट आहे.
तो रविवार होता.मी शेवटचा आजारी तपासत होतो.मी तिच्या खोलीत घाईत गेलो आणि दरवाज्याजवळ उभा राहिलो.ती एक वयस्कर बाई होती.तिच्या बिछान्यावर एका कडेवर बसून ती सुजलेल्या पायावर मोजे चढवत होती.मी उंबरठा ओलांडून नर्सबरोबर पटकन बोलून घेतलं,तिच्या चार्ट मधून नजर टाकली.तिची प्रकृती स्थिर आहे हे पाहिलं.सर्व काही ठीक होतं.
मी तिच्या बिछानाच्या कडेवर जरा वाकून तिच्याजवळ बघत राहिलो.ते मोजे तिच्या पायावर चढवायला ती मला मदत करायला सांगत होती.ते करीत असताना मी स्वगत बोलू लागलो ते असं होतं,
” तुम्हाला आता कसं वाटतं?.तुमची रक्तातली साखर आणि ब्ल्डप्रेशर उंचावलं होतं पण आज ते ठीक आहे.नर्स सांगत होती की तुम्हाला तुमच्या मुलाला भेटण्याची उत्सुक्ता वाढली आहे.आज तो तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणे.कुणी तरी नात्यातला भेटायला आल्यावर नक्कीच बरं वाटतं.मला नक्कीच खात्री आहे त्याची तुम्ही वाट पहात असाल.”
मधेच ती अधिकारपूर्ण आवाज काढून मला थांबवीत म्हणाली,
“बसा डॉक्टर,ही माझी बाब आहे, तुमची नाही.”
मला जरा आश्चर्यच वाटलं आणि तिने मला अडचणीत टाकलं.मी खाली बसून तिला मोजे चढवले.ती मला सांगायला लागली,की तिचा एकूलता एक मुलगा जवळच राहतो.पण तिने त्याला गेली पाच वर्ष पाहिलं पण नाही.तिच्या प्रकृती अस्वास्थाच्या अनेक कारणात तणाव आणण्यात हे पण एक कारण आहे.तिचं सर्व ऐकून आणि तिच्या पायावर मोजे चढवून झाल्यावर मी आणखी काही तिच्यासाठी करू शकतो कां? म्हणून विचारलं.तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं आणि माझ्याशी स्मित केलं.मी तिचं ऐकावं हेच तिला हवं होतं.

प्रत्येक कहाणी निराळी असते.काही पूर्ण स्पष्ट असतात तर काही अस्पष्ट असतात. काही कहाण्याना सुरवात,मध्य आणि अंत असतो.काही कहाण्या एकडे तिकडे भटकत निष्कर्षाशिवाय राहातात. काही खर्‍या असतात,काही नसतात.पण हे सर्व काही फरक पाडत नाही.मात्र सांगणार्‍याला फरक पाडत असेल तर त्याची कहाणी रुकावट न आणता,तसंच कोणतंच अनुमान न काढता,आणि निर्णय न घेता ऐकली जावी एव्हडंच.
त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो.

आणि त्यानंतर बराच काळ काही गेला नाही.जीवनात आलेल्या एका अनपेक्षीत वळणाने मी स्वतः आजारी झालो.माझ्या एकेचाळीस वर्षी मला स्नायुंचा रोग झाला.आता दहा वर्षानंतर मी कायमचा बसून असतो एका व्हिलचेअरवर.
जेव्हडं मला जमतं तेव्हडं मी ह्या खूर्चीवर बसून आजार्‍याना तपासत असायचो.पण जेव्हा माझ्या हातानाही ह्या रोगाकडून जखडलं गेलं तेव्हा हे तपासणं सोडून द्दावं लागलं.अजून मी मेडिकल स्टूडंटना आणि इतर सुशृषा करणार्‍या व्यवसायी लोकाना शिकवीत असतो.पण हे सर्व चिकित्सक आणि आजारी अशा दृष्टीकोनातून असतं.
मी त्याना सांगतो की मला वाटतं आजार्‍याचं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे.मी त्याना सांगतो की मला प्रत्यक्ष माहित झालंय की माझ्यावरच जे मी सांगतो ते इतराकडून ऐकून घेण्याच्या प्रक्रियेने अपरिमित उपचार होत राहिलाय, मात्र जेव्हा कुणी थांबून,माझ्या जवळ बसून मी काय सांगतो ते माझं शांतपणे ऐकलं जातं तेव्हा.
जसा तू आता माझ्या जवळ बसून ऐकत आहेस तसा.”

भाई नेरूरकरने त्या व्हिलचेअरवर बसून मला हे त्याच्या मनातलं चिंतन सांगितलं ते मी कधीच विसरणार नाही.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Monday, February 2, 2009

कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी

गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई

प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हीच कामना कवनातूनी मिळावी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com