Friday, June 29, 2012

आई! थोर तुझे उपकार.





एकदा श्रीधर पानसरे आपल्या आईच्या वर्ष-श्राद्धासाठी अमेरिकेहून आला होता. मला आठवतं ज्यावेळी श्रीधर तरूण होता, त्या दिवसात अमेरिकेत जाण्याची तरूण मुलांत खूपच चूरस लागली होती.श्रीधरचे चुलत भाऊ बहिणी अमेरिकेत स्थाईक झाल्या होत्या.चार्टर्ड अंकौन्टची परिक्षा देऊन झाल्यावर अमेरिकेत जाऊन वॉलस्ट्रीटवर चांगला जॉब करण्याची श्रीधरची तीव्र इच्छा होती.कधी माझ्या घरी गप्पा मारायला आल्यावर बरेच वेळा मला हे तो बोलून दाखवायचा.मी म्हणायचो,
"जाशील रे तू कधी तरी.होप्स मात्र सोडू नकोस."
मला श्रीधर म्हणायचा,
"माझ्या बाबांचा मला अमेरिकेत जायला विरोध आहे.पण आई मात्र मला प्रोत्साहन देते.तिने आपले  सगळे दागिने विकून मला मदत करायचं एकदा बोलूनपण दाखवलं होतं."



श्रीधरच्या आईचं आणि बाबांचं कधी पटत नव्हतं.तसं पाहिलंत तर त्यांचा त्यावेळच्या युगातला प्रेमविवाह होता.
श्रीधर हा त्यांचा एकूलता मुलगा.त्याच्या जन्मानंतर त्यांचा संबंध विकोपाला गेला.श्रीधर आपल्या आजी-आजोबांकडे वाढला.तो वयात आल्यावर आपल्या आईवडीलांमधले बखेडे त्याला उघड दिसायचे.कंटाळला होता.अधुनमधून मला भेटल्यावर त्यांच्या कंपलेन्ट्स करायचा.



मी एकदा श्रीधरच्या आईकडे विषय काढला होता.तिचं श्रीधरवर खूपच प्रेम होतं.कुणा आईचं आपल्या मुलावर प्रेम नसणार?तिला वाटायचं इकडच्या कटकटीतून सुटून तो परदेशी गेल्यावर सुखी होईल.मला एकदा म्हणाली,
"श्रीधरसाठी मी खूप खस्ता काढला आहे.श्रीधरचं संगोपन नीट व्हावं म्हणून मला खूप दुःखं सोसावी लागली.मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूतीतून त्याची सुटका व्हावी म्हणून मी त्याच्याबद्दल नेहमीच विचारात असायची."



त्या भेटीनंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.श्रीधर अमेरिकेत स्थाईक झाला.एका श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटूंबातल्या मुलीशी त्याचं लग्न होऊन एक मुलगीपण झाली होती.त्याची सासू त्याच्या आईची मैत्रीण होती. श्रीधर एकदा आईला अमेरिकेत घेऊनही गेला होता.जास्त दिवस ती राहिली नाही. 

श्रीधरच्या बाबांच्या आजाराची बातमी ऐकून ती परत आली होती.काही दिवस सोडल्यानंतर श्रीधरचे आणि त्याच्या आईचे संबंध कमी झाले होते.
अधुनमधून तो आपल्या आईला फोन करायचा.बाबांशी त्याचा संवाद तुटला होता.नंतर बाबा गेल्याच्या वार्तेनंतर एकदा तो आपल्या आईला भेटून गेला होता.त्याच्या आईची आर्थीक परिस्थिती बरी होती.तिला पेन्शन मिळायची आणि त्यात तिचं भागायचं.



नंतर तिची प्रक्रुती बरीच खालावली.मी तिला कधीतरी घरी भेटून यायचो.मला म्हणाली होती,
"श्रीधरने माझ्यासाठी एक बाई ठेवली आहे.घरीच रहा म्हणून सांगतो.वृद्धाश्रमात जाऊ नये असं त्याला वाटतं.आठवड्यातून एकदा फोन करून माझी जाग घेतो."



मी कधीही तिला भेटायला गेलो की श्रीधरच्या लहानपणापासूनच्या गोष्टी रंगवून मला सांगायची.श्रीधरची आई एका विख्यात शिक्षण तज्ञाची मुलगी. आणि स्वतः एका शाळेतून व्हाईस प्रिन्सिपल होऊन निवृत्त झाली.तिचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ असल्याने ती गोष्टी वर्णनकरून सांगायची ते ऐकायला मला मजा यायची.मी घरी गेल्यावर तिने सांगीतलेलं सर्व काही एका वहित लिहून ठेवायचो.हे संदर्भ वापरून एखादी कविता लिहायला मजा येईल असं वाटून मी हे करायचो.कविता लिहिण्याचा प्रयत्नही करायचो.



ती गेली त्यानंतर मी ती सर्व कडवी त्याच वहित एकत्र करून लिहिली.आणि तशीच ती वही माझ्या पुस्तकाच्या संग्रहात मी ठेवून दिली होती.आई गेल्यानंतर बरीच वर्ष श्रीधर काही इकडे आला नाही.अलीकडेच तो आपल्या मुलीला आणि पत्नीला घेऊन परत थोड्या दिवसाठी आला होता.श्रीधरची मुलगी आता सोळा वर्षाची झाली होती.मला तरी ती तिच्या आजीसारखी झालेली वाटली.



परत जाण्यापू्र्वी श्रीधर मला भेटायला आला होता.त्याच्या आईच्या आठवणी निघाल्या होत्या.चटकन मला त्या वहीची आठवण आली.मी ती वही श्रीधरकडे वाचायला म्हणून दिली.घरी गेल्यावर वाचीन असं सांगून ती वही श्रीधर घरी घेऊन गेला.
कविता अशी होती.


पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

मातेने व्यथा कौतुके सांगीतली
ऐकून ती मी कविता लिहिली


तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी


वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी


शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी


गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले


शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला


मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला


शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी


सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने


म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”


नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी


एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली


परत जाण्यापूर्वी श्रीधर ती वही आपण घेऊन जाऊ का? म्हणून विचारायला आला होता.मी त्याला ती वही दिली.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, June 25, 2012

प्रीति कशी करावी एकमेकावरी




"स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ति
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली"


आज मस्तच हवा पडली आहे.मस्त म्हणण्य़ाचं कारण काल तोबा उकडत होतं.ह्या दिवसातलं हे हवेचं लहरी वागणं माझ्यासारख्यालाही लहरी बनवतं.बाहेर फिरायला जाण्याची मलाही लहर आली.आणि ती माझी लहर फायद्याची ठरली.


त्याचं असं झालं,मी नेहमीप्रमाणे तळ्यावर फिरायला जायचं सोडून द्राक्षाच्या मळ्यात हिंडावं असं ठरवून तिकडे जाण्यासाठी गाडी काढली.आमच्या घरापासून मळा तसा बराच लांब आहे.पण ह्या दिवसात द्राक्षांच्या वेलीवरून सुटून लोंबत रहाणारे द्राक्षाचे घोस बघायला मजा येते.तरी अजून चार ते पाच महिने लागतील ज्यावेळी द्राक्षं पूर्ण पिकून मळेवाले ते घोस खुडायला देतील आणि जमवू तेव्हडे द्राक्षाचे घोस अगदी कमी किंमतीत घरी घेऊन जायला मिळतील.


वाटेत मात्र माझा विचार बदलला.मळा येण्यापूर्वी एका गडद रानातून रस्ता जातो.अजून संध्याकाळ व्हायला वेळ होता.ह्या दिवसात सूर्य जरा वेळानेच अस्ताला जातो. पण पक्षांना मात्र संध्याकाळ होत येत आहे हे कळतं.
रानात एका मोठ्या निलगीरीच्या झाडाखाली मी माझी गाडी पार्क करून पक्षांचा होत असलेला किलीबीलाट ऐकत होतो.मधून एखादा पक्षी आपल्या प्रेयसीला साद घालतोय असं त्याच्या गाण्यावरून वाटायचं.निरनीराळ्या पक्षांची गाणी ऐकायला मजा येत होती.


गम्मत पहा,कवी गीत लिहितो मग संगीतकार त्यावर चाल लावतो आणि त्यानंतर एखादी गायिका किंवा एखादा गायक ते गाणं आपल्या गोड आवाजातून गातात.किती कष्ट पडत असतील हे सर्व करायला?.


कवन,म्हणजे सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना आणि काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे.


कोकीळेसारखा एखादा पक्षी गुंजन  - कर्णमधुर आवाज करण्याची क्रिया- करीत असतो.त्यालाही किती कष्ट होत असतील असं हे गुंजन करायला?

आणि आता तर हे अनेक पक्षी आपआपल्या लहरीनुसार गुंजन करीत आहेत. हा काय चत्मकार आहे?ही समस्या माझ्या मनात सदैव येत असते. आणि गम्मत म्हणजे त्या पक्षांचं शब्दावीना निर्मीलेलं गीत कोण लिहीत असेल बरं.?असाही एक विचार मनात आला.मला कविता सुचली आणि तिथेच गाडीच्या मागच्या ट्रंकवर बसून ती कागदावर लिहून काढावी असं वाटू लागलं.मी काही पंक्ति लिहिण्याचा प्रयत्न केला.नंतर द्राक्षाच्या मळ्याला भेट देऊन घरी आलो.जेवण वगैरे झाल्यावर बिछान्यावर पहूडलो.आणि गीताच्या शेवटच्या पंक्ति झोपण्यापूर्वी आठवल्या त्या तशाच लिहून काढल्या.




गुंजन करण्या कष्ट का विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण असे विहंगाचा कवी
सूर जुळवूनी कोण त्या गाण्या लावी
अपुले कवन सहजपणे विहंग गाई


प्रीति कशी करावी एकमेकावरी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजपणे व्हावी
हीच कल्पना कवनातूनी मिळावी



विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे निघालो होतो द्राक्षाच्या मळयात जायला आणि वेळ घालवला रानात.का तर त्या चार ओळीच्या कवितेची निर्मिती माझ्याकडून व्हायची होती.
एकदा मला प्रो.देसाई म्हणाल्याचं आठवतं.
"कविता लिहावी म्हणून लिहिली जात नाही.कविता होते"
आता पुन्हा तळ्यावर भेटलो की भाऊसाहेबांना ही कविता वाचून दाखवणार.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 20, 2012

स्त्रीचा अवमान टाळणार नाही.




सध्या ऊन्हाळ्याला जोर आला आहे.फारच गरम होतं.नव्वद आणि वरचं फॅरेनेट तपमान जीवाची कालवाकालव करतं.पण सूर्य एकदाचा खाली गेला की मग मात्र मस्तच वाटतं.तशात एखादी गार वार्‍याची झुळूक येऊन गेली तर विचारूच नका.


प्रो.देसाय़ाना सकाळीच फोन करून विचारलं याल का तळ्यावर?.कबूल झाले आणि आम्ही संध्याकाळी तळ्यावर भेटलो.
"माझा एक जवळचा स्नेही गेला.सुटला बिचारा वय खूप झालं होतं."
भेटल्याभेटल्या भाऊसाहेब मला म्हणाले.
"गुणाजी पवार.एका फार्मसीत कामाला होता.नाकासमोर बघून चालणारा माणूस.कुणाच्या आ्ध्यात ना मध्यात पण भारीच तत्वनीष्ट होता.पाच मुलं होती.दोन मुलगे तीन मुली.पण बायको धरून कुणाशीच घरी पटायचं नाही."
मला भाऊसाहेबांनी पुढे सांगून टाकलं.
"नाव गुणाजी पण अंगात चांगले गुण नव्हते असं म्हणायला हरकत नाही."
मी म्हणालो.


"अहो काय सांगू?मोठा मुलगा जेव्हा अमेरिकीत जायला निघाला त्यावेळी तो मला भेटायला आला होता.मला म्हणाला,
"बाबांची कसली नुकसानी होणार आहे मी जाऊन?महिन्याचा माझा पगार त्यांच्या हातात पडणार नाही एव्हडंच.नाहिपेक्षा माझ्याबद्दल त्यांना तेव्हडंच वाटतं."


मला त्या मुलाची कीव आली.मी त्याला म्हणालो,
"हे ही दिवस जातील. तू काळजी करू नकोस."
बिचार्‍याला तेव्हडाच माझ्याकडून दिलासा मिळाला असं वाटलं.
प्रो.देसाई खजील चेहरा करून मला म्हणाले.


"गुणाजीचे रोज घरात वाद व्हायचे.कुणाचीही बाजू ऐकायला ते तयार नसायचे.आपलं तेच खरं.हळू हळू मुलं स्वतःच्या पायावर जगायला शिकल्याबरोबर काही तरी निमित्त काढून त्यांच्या पासून दूर जायला लागली. मोठी मुलगी भावाची मद्त घेऊन अमेरिकेत गेली.तिकडेच तिने आपलं लग्न केलं.भावानेही आपलंही तसंच तिकडे लग्न केलं.एका मुलीने गुजराथ्याशी लग्न करून बडोद्याला रहायला गेली.गुणाजीने धाकट्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीने एका व्यापार्‍याच्या मुलाशी करून दिलं. ती पण ऑस्ट्रेलियात नवर्‍याबरोबर रहायला गेली.आणखी सगळ्यात धाकटा मुलगा बहिणीच्या मदतीने ऑस्ट्रेलियात स्थाईक झाला.
शेवटी गुणाजी आणि त्याची बायको होत्या त्या जागेत स्थाईक झाली."


हा सगळा गुणाजी पवारांचा इतिहास भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकून मला दिलीप प्रभावळकरांची "श्री.गंगाधर टिपरे" ह्या टीव्ही सिर्यलची आठवण आली.त्यात एक प्रसंग असा होता की टिपरे आजोबा आपल्या मुलासह आणि नातवासह एका वयोवृद्ध गृहास्थाच्या अंतीम यात्रेला त्याच्या घरी गेले असताना त्या गृहस्थाच्या नातवासमोर टिपरे औपचारीक होऊन त्याच्या आजोबांचे गुण गात होते.पण त्या गृहस्थाचा नातुच त्यांना म्हणाला,
"आमचे अजोबा गेल्याने घरात कुणालाही वाईट वाटलं नाही.शेवट पर्यंत सर्वांना भांडावून सोडलं होतं.हट्टीपणा मुळीच गेला नव्हता."
मी हे भाऊसाहेबांना सांगीतल्यावर त्यांना अचंबा वाटला.


"म्हणजे, आपलं तत्व न सोडणारे असे बरेच लोक जगात असतात तर"
घरी जाण्यासाठी उठता उठता प्रो.देसाई मला म्हणाले.

मीसुद्धा घरी जाताना "तत्व माझे सोडणार नाही" ही ओळ माझ्या मनात गुणगुणायला लागलो.आणि झालं एक कविता सुचली.घरी गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि नंतर जेवायला बसलो.



तत्व माझे सोडणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दारु पिऊनही झिंगणार नाही
 झोप घेऊनही पेंगणार नाही
 कसल्या कोणत्या आल्या भावना
 शिस्ती शिवाय मला रहावेना


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 दुःखाची नाही कसली खंत
 परिणामाची नाही मुळीच भ्रांत
 पुरूषगीरी सोडणार नाही
 स्त्रीचा अवमान टाळणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 करून करून भागले
 देवपूजेला लागले
 नैवेद्या शिवाय पूजा होणार नाही
 पुजेपूर्वी प्रसाद मागुनही देणार नाही


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही
 वय झाले तरी आढ्य रहाणार
 आपले तेच खरे म्हणणार
 लाकडे स्मशानात गेली तरी
 वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.


मोडेन पण वाकणार नाही
 तत्व माझे सोडणार नाही


दुसर्‍या दिवशी प्रो.देसायांच्या हातात हा कवितेचा कागद मी दिला.कविता वाचून झाल्यावर ते मला म्हणाले,
"गेलेल्या माणसाच्या मागे त्याच्याबद्दल वाईट काही बोलू नये असं म्हणतात.कारण त्याला आपली बाजू मांडता येत नाही.पण कवितेतून भावना तरी प्रकट करता येतात."




  श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
 shrikrishnas@gmail.com

Saturday, June 16, 2012

अविच्या बाबांची खंत



अरगेड्यांचा छोटा अविनाश,त्याच्या बाल्कनीत उभा होता.खाली रस्त्यावरून त्याने त्याच्या बाबांना येताना पाहिलं.चटकन त्याच्या लक्षात आलं की आज फादर्स डे आहे.आपल्या बाबांना फुलं देऊन त्यांना हॅपी फादर्स डे म्हणावं असं मनात आणून तो मागच्या बागेतून फुलं काढून त्या फुलांचा गुच्छ बनवून बाबांना सरप्राईझ करावं असं मनात आणून खाली जायला निघाला.
नंतर काय रामायण झालं ते मला एकदा अरगडे सांगत होते.मला म्हणाले,
"आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही."
असं सांगून फादर्स डे दिवशी आपल्या मुलाबरोबर झालेला प्रकार त्यांनी मला वर्णन करून सांगीतला.ते आठवून मला कविता सुचली.आज फादर्स डे असल्याने ती कविता आज आठवली,

वाटेत एका अनोळख्याला
 जवळ जवळ आपटलो
 “माफ करा”असे म्हणून मी
 त्याच्या पासून सटकलो


“करा माफ”मला पण
 म्हणत थांबला तो क्षणभर
 औचित्याच्या वागण्याने
 सुखावलो आम्ही दोघे वरवर


आपल्या घरी
 स्थिती  असते निराळी
 लहान थोरासी चटकन
 आपण वागतो फटकून


झाली त्यादिवशी एक गम्मत
 होतो कामात मी दंग
 चिमुकल्या माझ्या मुलाने
 केला माझ्या एकाग्रतेचा भंग


“हो बाजूला”
 म्हणालो मी वैतागून
 गेला तो निघून
 हिरमुसला होऊन
 रात्री पडलो
 असता बिछान्यात
 आला विचार
 माझ्या मनात
 औचित्याच्या भारा खाली
 अमुची रदबदली झाली
 वागलो चांगले अनोळख्याशी
 अशी समजूत करून
 मी घेतली मनाशी


पाहता फुलांच्या पाकळ्या
 पडल्या होत्या दाराशी
 लाल, पिवळी अन निळी
 खुडली होती
 फूले त्याने सकाळी
 आला होता घेऊन ती हातात
 टाकण्या मला आश्चर्यात
 आठवून तो प्रसंग पून्हा
 वाटे मजकडून झाला गून्हा
 जाऊन त्याच्या बिछान्याशी
 जवळ घेतले मी त्या उराशी


पुसता  फुलांच्या पाकळ्या विषयी
 हसला तो मला बिलगूनी
 बोले तो मज भारावूनी
 “घेऊनी ती सर्व फूले
 आलो होतो मी तुमच्याकडे
 कारण आजच आहे “फादर्स डे”


मागूनी त्याची माफी
 पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
 चूक केली मी सकाळी तुझ्याशी


पुसून अश्रू माझे त्याने
 हसून बोलला तो पून्हा एकदा
 करतो प्रेम मी
 तुमच्यावर सदासर्वदा


रहावे ना मला ते ऐकून
 म्हणालो मी ही भारावून


आवडशी तू मला अन
 मुकलो मी तुझ्या
 आश्चर्याच्या आनंदाला
 दिसलास सुंदर तू फुलांमुळे
 होते सुंदर तुझे ते फूल निळे



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 12, 2012

मागे वळून मी पाहिले





"माझेच मरण मला पाहून हंसले."


त्या दिवशी एक गम्मतच झाली.जवळकरांच्या जीममधे मी गेलो होतो.बरीच तरूण मंडळी एकाग्र चित्ताने व्यायाम करताना दिसली.
जवळकरानी मला मुद्दामच त्यांच्या जीममधे बोलावलं होतं.
मागे मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा सुधृढ प्रकृती विषयी आमची चर्चा चालली होती.ते मला म्हणाले की,अलीकडे तरूणाना आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल बरीच दिलचस्पी वाढली आहे.हवं तर तुम्ही माझ्या जीममधे येऊन बघा.किती तन्मयतेने लोक व्यायाम करीत असताना तुम्हाला दिसतील.
जवळकरांचे ते शब्द मला जास्त परिणामकारक वाटले,
ते म्हणाले होते,
"जगणं आणि मरणं हे निसर्गाच्या नियमात बसत असतं.पण आयुमर्यादा वाढवायची असेल तर मात्र आपल्या जीवनाची आपणच काळजी घ्यायला हवी.
खरोखरच ते दृश्य बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.आमच्या शाळेत मल्लखांबावर व्यायाम घेण्याची सोय होती.ह्या आधूनीक जीममधली बरीचशी उपकरणं पाहिल्यानंतर एका मल्लखांबामधे किती गोष्टी सामवल्या आहेत ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मला एक कविता सुचली,

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय  कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता


असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून त्याला गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील


खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम


जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य



 श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 5, 2012

देवबाप्पाचा चिमुकला तलाव.



"हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल"


एखादा, कोणत्या विषायवर अथवा कोणत्या गोष्टीवर भावनाप्रधान होईल हे सांगणं जरा कठीणच आहे.हेमंत माहात्म्याच्या नातवाबद्दल असंच काहिसं झालं.

त्याचं असं झालं,हेमंत माहात्मे काल मला बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
"डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरीरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते दुखः प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं."
असं सद्गदीत होऊन हेमंत आपल्या नातवाला वाटणार्‍या चिंतेबद्दल मला सांगत होता.


"रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी निकामी किंवा कुचकामी पिशवी असून ती फेकून देण्यालायक असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.अर्थात पेशंटला वाचवण्यासाठी तो निर्णय त्या डॉक्टरना घ्यावा लागतो हे उघडच आहे म्हणा.
पण ज्या माऊलीचा तो अवयव, ज्यातून तिने निसर्ग उत्पति केलेली असते त्या अवयवाबद्दलच्या तिच्या भावना तिलाच ठाऊक असणार."
असं नातू त्याच्या आजोबांना म्हणाला.


आणि नंतर आपल्या आजोबांना पुढे म्हणाला,
"मी सुद्धा आईच्या शरीराचा एक हिस्सा होतो.आईच्या उदरात नऊ महिने राहून,तिच्या कष्टाला जो मी कारण झालो,त्याबद्दल मलाही अशावेळी विशेष वाटणं स्वाभाविक आहे.पण काय करणार? निसर्गाचे नियम पाळावेच लागतात ना? एखादी गोष्ट कुचकामी झाली,निकामी झाली,हानीदायक झाली,की निसर्गच तिची विल्हेवाट लावतो.पण हे आईला समजावून कसं सांगायचं.?"
डोळ्यातून ओघळणार अश्रू पुशीत तो आपल्या आजोबांना सांगत होता.


"माझा नातू मला नेहमीच लहान वाटाणार.पण ह्या वयातही तो पोक्त विचाराचा आहे.आणि त्याच्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम आहे."
असं म्हणत,
"डॉक्टरांची चूक नाही म्हणा.त्यांच्या संवयीचा परिणाम."
असं आपलं मत देणार्‍या हेमूकडून हे ऐकून त्यांच्या नातवाच्या मनात आलेली भावना कवितेतून जास्त परिणामकारक प्रकट करता येईल असा विचार करून मला ही कविता सुचली होती.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरीर
अमुच्या चिमुकल्या गादीवर
पोषण केलेस अमुचे किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे
सांगू कसे मी तुला ते

रीत असे निसर्गाचीही
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावे तो झडकर
म्हणूनच,
द्या टाकून झाला वापर
असेच म्हणत असेल तो डॉक्टर.


माझी ही कविता मी हेमंतला त्याच्या नातवासमोर वाचून दाखवली तेव्हा दोघानीही मला मिठीत घेतलं.
"माझ्या आईची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आणि ती पुर्ण बरी झाल्यावर मी तिला ही तुमची कविता वाचून दाखवणार असं मी म्हणतो."
असं त्याने म्हटल्यावर,माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही की,पुढे येणारी प्रत्येक पिढी किती प्रगल्भ विचाराची होत असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 1, 2012

होकाल( नवरी)




मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.
स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.
जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून उर्जितावस्था होत असते हे मानायला त्यावेळचे ते लोक तयार नसायचे.

"सावंताचो बाबलो म्हुम्हंयेक जातासा म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली.हंय़ वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसा.थंय म्हुम्ह्यंत जावून कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत दिवस काढतलो.फाट-फाआटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नकद पैसो हातात मिळता.
ह्याका अवलक्षण म्हणुचा नाय तर काय?"

अशी सावंताच्या बाबल्याबद्दल चर्चा, इतर लोक,पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या, देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथुर्‍यावर बसून, शिळोपाच्या गप्पातला विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गुल व्ह्यायचे.

त्यातलाच एक विषय म्हणून कधी कधी,
"कामतांच्या इंदूक मुंबईत दिला म्हणे.नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसा.हल्लीच तो इंदूक बघून गेलो.पसंत केल्यान.येत्या मे महिन्यात इंदू बोटीन मुंबईक जाताला."
अशीही इंदूची चर्चा व्ह्यायची.


पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
बाई गं!,पडावातून आगबोटीत चढताना जरा जपून चढ.आणि त्यानंतर तिचा बाप तिला मुंबईची तिच्या दृष्टीने लागणारी आवश्यक ती माहिती-उपदेश-द्यायचा.

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्‍हवतां शिमीटाच्या चाळीत
तेका गो कसला घोपान?
असं एक मालवणीत गीत लिहिलं गेलं.
म्हणजेच,
बाळे,पडावातून आगबोटीत बसताना जरा जपून बस.तुझा नवरा वरळीला सिमेंटच्या चाळीत रहातो.वगैरे,वगैरे..)
पण आता वीसाव्या शकताच्या उत्तरार्धात आणि एकवीसाव्या शतकात हीच होकाल मुंबईहून अमेरिकेत जायला निघते.कारण जग सुधारत चाललं आहे.बदल होत राहिला आहे.आणि तो झालाच पाहिजे.

तेव्हा मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल बोटीने प्रवास करण्याऐवजी, पडावातून आगबोटीत बसण्याऐवजी, मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर नव्या परिस्थिती काय म्हणेल,ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला "घो" पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com