Thursday, July 31, 2008

यश आणि अपयश

" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला
शांतीची गरज होती. "

प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला म्हणाले,
" थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या.
गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मी तिला शुभेच्छा दिल्या.
तेव्हा मी खोटं बोलत होतो.खरं म्हणजे मी तिला अयशस्वी हो अशीच इच्छा मनात करीत होतो.अपयशात काय क्षमता असते
त्यावर माझा विश्वास आहे.

यशस्वी होणं म्हणजे कंटाळवाणी प्रकार आहे.यश सिद्ध करून दाखवतं की तुम्ही असं काही करणार आहात की जे तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते करूं शकता,किंवा काही तरी पहिल्यावेळी नचुकता करणार आहात,आणि जे कदाचित बहूचर्चीत यश होणार असावं.
पहिल्याचवेळी मिळालेलं यश हा एक नशिबाचा भाग असतो.पण पहिल्यावेळचं अपयश मात्र अपेक्षीत असतं.आणि ते स्वाभावीक असावं.

अपयशातून आपण शिकतो.एक म्हण आहे की ती चांगली सुग्रण की जिने बरीच घरची भांडी फोडली असावीत. तुम्ही जर का
स्वयंपाक घरात जास्त वेळ घालवलात तरच कदाचित तुम्हाला चांगलं शिजवायला येत असावं.
मला एकदा गंमत म्हणून एका स्वयंपाकी समुहा बरोबर उशिरा जेवण घेण्याची संधी मिळाली होती.कुणाला किती स्वयंपाक
करताना जळलं किंवा कुणाचे हात किंवा बोटं किती ठिकाणी कातरली ह्याचीच जेवण करताना त्यांची बातचीत होत होती.त्यामुळे स्वयंपाक करण्याच्या प्रोसेस मधे अपघाताच्या अपयशाने स्वयंपाकात किती क्रेडिबिलिटी मिळते ह्याच मोजमाप होत होतं.

मी कॉलेजमधे प्रोफेसर होण्याआधी वर्तमानपत्रात लेख लिहित होतो. प्रत्येक आठवड्यातला एखादा लेख त्या आठवड्यातला इतर लेखाच्या तुलनेत सर्वात कमी महत्वाचा निघावा ह्याची मला जाणीव असायची.एखादा लेख कमी महत्वाचा व्हावा असं वाटून मी काही लिहित नव्हतो. रोज मी चांगला लेख लिहिण्याचा प्रयत्नात असायचो. तरी पण एक लेख दुसर्‍या लेखापेक्षा कमी दर्जाचा व्हायचा. आणि हे काही वेळां प्रकर्शानं व्हायचं.

कमी महत्वाचा लेख मला आवडू लागला.माझ्या यशस्वी लेखाबद्दल असं दिसून आलं की तो यशस्वी होण्यासाठी मी नेहमीच्या ट्रिक्स वापरत होतो. उदा.लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन त्यांना काळजाला भिडेल असं काहीतरी निरनीराळ्या तर्‍हेने लिहायचं. किंवा एखाद्दा गाण्यात कसं तेच शब्द निरनीराळ्या आवडणार्‍या चालीत गातात तसंच तेच शब्द निरनीराळ्या पद्धतीत लिहायचो. बरेच वेळा माझा न आवडलेला लेख लिहिताना मी आता पर्यंत परिचीत असलेल्या ट्रिक्स न वापरता लिहायचो. नव्हे तर नवी ट्रिक वापरल्यावर मला खात्री पण नसायची की ही ट्रिक उपयोगी होईल की नाही.

माझी मधली मुलगी नाटकात काम करायची.तिच भुमिका ती बरेच वेळा करायची.आणि त्यात ती चांगली यशस्वी पण झाली
होती.त्या भुमिकेतून बदल करण्याची तिला आवश्यकता नव्हती.तरीपण तिने तसं केलं.ती म्हणाली मला ह्या भुमिकेतून नवं
असं काही शिकायला मिळत नव्हतं.आणि त्यामुळे ती कंटाळली होती.आणि असं कंटाळून काम करून तिला स्ट्रेस यायला
लागला.त्यामुळे त्यात काही अर्थ राहिला नव्हता.
आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती.

माझी नात त्याबाबतीत खूपच दर्जा ठेऊन काम करणार्‍यापैकी होती.कदाचित ह्या बाबतीत जरा जादाच होती.ती अपयशाने खूपच नाराज व्हायची.मग मला तिची समजूत घालावी लागायची. परंतु मी तिला आठवण करून द्दायचो की त्यातून काय ती शिकली ,आणि पुढच्या खेपेला ती आणखी चांगलं कसं करू ही शकेल.मी तिला निश्चितच अपयश कसं चांगल असत हे
सांगण्याच्या भानगडीत पडायला मागत नव्हतो. कारण एव्हड्या लहानपणी तसा धडा शिकायचं तिचं वय नव्हतं. पण मी
तिला नक्कीच सांगू शकलो की अपयशामुळे जगबुडती तरी येणार नाही. खरंच,मी तर म्हणेन नशिबाने ती सुरवातच असेल."

डिसेंबरचे दिवस असल्याने काळोख जरा लवकरच व्हायचा त्यामुळे भाऊसाहेबांशी जास्त चरवीचरण नकरता मी निरोप घेतला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 30, 2008

का झाला कठिण मार्ग जीवनाचा

का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा

असे नसावे की जीवनी प्रेम नसावे
किंतू जीवनात कसलेही जीवन नसावे
का सुचले जावे मनी निर्णय घेण्याचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा

मिळवूनी तुला रे सजणा जाशी तू रूसूनी
खूष मी माझ्या मनी जाशी मला तू रडवूनी
पापण्यातील स्वप्न देईल का मंत्र जगण्याचा
का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 28, 2008

नव्हतो ग! मी सजणे असा

नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा
दोष तुही दिलास थोडासा
गमविला मी जगाचा भरवंसा
नव्हतो ग! मी सजणे असा

असेल खरे जे दिसले नयनाला
सजणे! धोका मिळाला नजरेला
किती किती म्हणूनी वाद घातला
होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा

ठोकरूनी तू माझ्या मनाला
सजणे! तोडून गेलीस प्रीतिला
इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला
नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा

सजणे! नको विचारू ह्या दुखापतीला
दोष जखमेचा तुझ्याच आहे हाताला
नको विचारू कसले दुःख मनाला
दिला ग! इतरानी छ्ळवाद अपुल्याला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

“बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं”

मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला,
“ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही.”
ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला,
“ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर”
माझ्या चटकन लक्षात आलं की हा आपला आजगावचा गुरू तर नसेल, म्हणून मी माझं कार्ड देऊन त्या माणसाला सांगितलं की,
” एव्हडं माझं कार्ड देऊन ये तुझ्या मालकाला आणि मला भेटायचं आहे म्हणून सांग.”
लगेचंच ते कार्ड वाचून तो मालक बाहेर आला आणि मला बघून त्याने मला ओळखलं.मला त्याच्या कॅबिनमधे हात धरून घेऊन गेला.लंचची वेळ होती मला म्हणाला,
“मस्तपैकी मासे आणि चिकनचं जेवण अनंताश्रमातून मागवतो आपण जेवूया आणि बोलूया.”
इकडचे तिकडचे विषय झाल्यावर मी जुन्या आठवणी काढून त्याच्याशी बोलायला सुरवात केली.बरीच वर्ष झाली मी त्याला भेटलो नव्हतो.पण लहानपणाच्या त्याच्या काही विक्षीप्त संवयी मी विसरलो नव्हतो.गुरू बरेच वेळा घराबाहेर पडतच नव्हता.त्याला नेहमी कसली तरी भिती वाटायची.हे लक्षात येऊन मी त्याला म्हणालो,
“तू त्या संवयीतून बाहेर कसा पडलास?”
गुरू पण अगदी अंतःकरणा पासून माझ्याशी बोलू लागला,

“मला नंतर असं वाटू लागलंय,की संधी येण्याची वाट न पहाता ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत रहावं.
हे शिकायला मिळालं मला माझ्या पुर्वीच्या भित,भित राहण्याच्या वृत्तिने.
मी अगदी लहान असताना सर्व गोष्टीची मला नेहमी भितीच वाटायची.उंच जिन्याच्या वर जाऊन चढून बसणं,छोट्या,छोट्या झुरळांना पहाणं वगैरे.आठ वर्षाचा असताना,मला माझ्या मोठ्या भावाबरोबर सार्वजनीक गणपति पहाण्यासाठी सुद्धा जायला भिती वाटायची.एका वर्षी एका मोठ्या सार्वजनीक गणपतिच्या विसर्जनाच्यावेळी माझा मोठा भाऊ अगदी समुद्रावर गेला होता.पण मी मात्र घरीच बसून होतो. मला भिती वाटायची की मी कदाचित त्या गर्दीत हरवून जाईन,कदाचित दंगा होऊन पोलिसांचा लाठिमार होईल,मलाच पकडतील वगैरे.
विसर्जनाच्या मजेचा आनंद घेण्याऐवजी मी माझा आत्मविश्वास गमवून बसलो होतो.

ह्या भितीमुळे मी सुरक्षित मार्ग जास्त अंगिकारला तो म्हणजे माझं शाळेत जाण्याचा मार्ग,त्यानंतर पुढे टेकनिकल संस्थेमधे पुढचं शिक्षण घेण्याचा मार्ग आणि त्यानंतर एका मोटार तयार करण्याच्या कारखान्यात मिळालेली नोकरी करण्याचा मार्ग हे सर्व मार्ग मला जरा सुरक्षित वाटत.सहा एक वर्ष या व्यवसायात राहून नंतर कंटाळा येऊ लागला.त्यातून माझी एक नविन भिती जन्माला आली. कारखानातल्या इतर कामगारासारखं आपण पण थकलेला,करपलेला आणि वेळेपूर्वीच म्हातरपण आलेला होऊ की काय असं सारखं वाटू लागलं.

मी ह्यातून बाहेर पडायचं ठरवलं.नाहितर पुन्हा जिन्याच्या वर चढून जाण्याच्या भितीची पुन्हा आठवण आणून खालच्याच पायरीवर बसून राहण्याची पाळी आणावी लागेल,गणपतिच्या विसर्जनाला जाण्याची भिती पुन्हा येईल.
त्यासाठी मी एक मोटरपार्टस विकण्याचं दुकान काढायाचं ठरवलं.त्याकरता यशस्वी बिझीनेस कसा करावा यावर पुस्तकं वाचायला सुरवात केली.हे करत असताना मला आयुष्यात कोणत्या अतिदुःखद प्रसंगाला तोंड द्दावं लागलं याचे विचार मनात येऊ लागले.आपल्या अठेठेचाळीस वर्षावर माझी आई अतिदुर्धर आजाराने मला कशी सोडून गेली हा प्रसंग आठवून त्या प्रसंगाची आणि माझ्या नव्या बिझिनेसमधे मी ठोकर खाल्ली तर त्या प्रसंगाची मी तुलना करून किती दुःख होईल याचा विचार करू लागलो.
हजार रुपये खिशात ठेऊन मी एका घाऊक मोटरपार्टस विकणार्‍या दुकानाच्या मालकाला फोन करून पाहिलं.माझं आश्चर्य म्हणजे त्याने मला सहकार्य द्दायचं कबूल केलं.आणि तिथून सुरवात झाली.

धंद्याच्या प्रगतीचा जिना चढून जाणं तितकं सोपं नव्हतं.एकदा मी चांगली मोठी ऑर्डर घालवून बसलो.जुनी भिती पुन्हा प्रवेश करू लागली.पण माझ्या आईच्या प्रसंगाची आठवण आणि त्या कारखान्यातल्या नोकरीची आठवण काढून त्या प्रगतीच्या जिनाच्या पायर्‍यावर चढून जाण्याची मनस्थिती आणू शकलो.
काही मिळवून दाखवणं हे काही यश मिळवणं असं नाही.प्रत्येक वेळी मी भितीच्या चकरातून बाहेर पडत असे त्या त्या वेळी जिंको न जिंको मी यशस्वी होत असे.इकडे तिकडे थोडीफर नुकसानी होतही असेल पण म्हणून मी नव्वद वर्षाच्या वृद्धाला शेवटी वाटावं की आपण तसं काहीच आयुष्यात केलं नाही म्हणून त्याने हताश व्हायच्या स्थितीला जावं तसा मी गेलो नाही.
बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं”

हे ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग आता तुझं कसं चाललं आहे?”
ह्या धंद्दावर तुझा चांगलाच जम बसलेला दिसतो मला.”
गुरूनाथ म्हणाला,
“आता मी पुर्वीचा राहिलो नाही.माझ्या वाचनात एक पुस्तक आलं,विषय होता,
“माणसाच्या अंगात उपजत कला असतात”
त्या पुस्तकात त्या कला एखाद्दाने कशा वापरायच्या- ज्या त्याला मुळात माहितही नसतील-ह्याची सुंदर माहिती दिली होती.ते पुस्तक वाचून मी माझं स्वतःचं आत्मपरिक्षण केलं.मला स्वतःला खूपच आत्मविश्वास वाढल्या सारखं वाटूं लागलं.आणि नंतर मी मागे वळून कधीच बघीतलं नाही.”
मला हवं असलेलं सामान गुरुनाथने त्याच्या नोकराच्याकरवी त्या कारखान्यात अगोदरच पाठवून दिलं होतं.आणि त्यामुळे मला त्याची ही कथा ऐकायला वेळ मिळाला.
त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात विचार आला.की एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 25, 2008

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

“हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली “मला माझा जॉब आवडतो म्हणून.”

आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं. त्यांच्या कुटुंबातली शंतनु आणि शर्मिला ही पहिल्यापासून स्मार्ट वाटायची.इकडच्या शाळेत सुद्धा त्यांचा वरचा नंबर असायचा.त्या पैकी शर्मिला जरा जास्त हुषार होती.पण कमनशिबाने तिला कॉलेज मधे त्यावर्षी चांगले मार्कस न मिळाल्याने तिचा मेडिकलला जाण्याचा चान्स हूकला.पण ती डगमगली नाही.तिला लोकांची सेवा करण्याचं प्रथम पासून वेड होतं.डॉक्टर नाही तर नाही निदान नर्स होऊन आपली इच्छा पुरी करायची तिने जिद्द ठेवली आणि कलकत्याच्या एका नावाजलेल्या नर्सिंग इनस्टीट्युट मधून चागलेमार्कस घेऊन उतीर्ण झाली.आणि नंतर खासगीत नर्सिंगचं कामं घेऊ लागली.
असाच मी एकदा ऑफिसच्या कामासाठी कलकत्याला गेलो असतां मला रस्त्यातच भेटली.मला आपल्या अपार्टमेंट मधे घेऊन गेली.जेवायचा आग्रह करीत होती पण मी काही जेवायला राहिलो नाही.पण म्हणालो चहाच्या कपावर आपण गप्पा मारूया.तुझं सेवावृत्तीचं काम कसं चाललंय असा मी तिला प्रश्न केल्यावर ती सांगू लागली,

“बर्‍याच अशा माझ्य मैत्रिणी अलिकडेच कॉलेज मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्या आहेत.कोण ना कोण तरी मला एखाद दिवशी फोन करून आपल्या नविन जॉब बद्दल कुरकुर करून बोलत असते.सांगतात की त्यांच मन कसं रमत नाही त्या जॉबवर,त्याना हवं असलेलं काम कसं मिळत नाही. किंवा हव असलेलं यश त्यांना कसं मिळू शकत नाही. त्यांच भाषण ऐकून माझ मनोरंजन होत.मला वाटतं मैत्रिणी अशा साठीच असतात.

पण ह्या मुळे मला सुद्धा माझ्या कामाचा आढावा घेता येतो.मी नर्स असल्याने दोन मतिमंद असलेल्या बायकांची सेवा करण्याचं काम करते.बोलताना त्या ओरडून बोलतात.आणि कधी कधी संतापी होऊन त्याचे परिणाम न समजण्यासारखे वागतात.
स्वतः आंघोळ करू शकत नाहित.त्याना अन्न स्वतः शिजवता येत नाही.कधी कधी त्यांची वागणूक अशी असते की त्यानाएकदम हलता येत नसल्याने जाग्यावरून आरडाओरड करतात तर कधीकधी उठून एकदम मारायाला येतात.
रोज मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या कामात मदत करीत असते.आंघोळ घालणं,त्याना कपडे घालणं, त्याच्या साठी जेवण करून त्यांना भरवणं,त्यांना साफ करणं,त्याना बाथरूम मधे नेणं सकाळी त्या उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत हीसर्व कामं करावी लागतात.कधी कधी काही कारण नसतानाही -त्यांचे मी कपडे बदलत असताना- माझे केस उपटण्याचा प्रयत्न करतात.कधी कधी समोर ठवलेलं जेवण भिरकावून देतात.कधी कधी तर काही कारण नसतानाही अंगावर थुंकतात.

पण गंमत म्हणजे मला हा जॉब आवाडतो.मला माहित आहे की मी अजून तरूण असून मला खूप काही शिकायचं आहे. पण मी माणसात असलेल्या हतबलते वर विश्वास ठेवते. त्याचाच अर्थ असा होईल की आपल्याला दुसर्‍या माणसांची आवश्यकता आहे.
मला वाटतं असं काही जरूरीचं नाही की समाजाने ज्या गोष्टीला यशस्वी म्हटलं आहे त्याच गोष्टी यशस्वी आहेत. आपल्याला खरं काय हवं असतं की आपल्या सभोवताली जे लोक आहेत त्यानी भाग घेण्यात,हतबलांची उर्जितावस्था करण्यात,ऐकून घेण्यात,लक्ष देऊन आपली वेळ आणि उदिष्टे वापरली पाहिजेत.कुणी एखाद्दा मोठ्या कंपनीचा सि.ई.ओ असो किंवा एखादी पाच मुलांची आई असो.मला त्यात काहिही फरक पडत नाही.कुणीही परिस्थितीने संपुर्ण नसतो,त्या दृष्टीने काहीसा हतबलच असतो.एकमेकासाठीही तसाच असतो.

मी ज्या बायकांची सेवा करीत असते,त्यांच एक बरं आहे की त्यांच्या गरजा त्यानी पुर्णपणे विशद केल्या आहेत.कपडे घालायला ज्या ठिकाणी पांच मिनीटे घ्यावीत त्या ठिकाणी त्याना तासन तास लागतात.पण त्यांची ही कमतरता उदाहरण म्हणून ठिक आहे.तेवढं काही ते हतबल नसतात.त्यांच्या बरोबर राहून “कपडे काढा,कपडे घाला”हा उपदव्याप जरी दिसला तरी त्यांना त्यात काय पर्याय आहे ते दिसून येण्यात फायदा होतो.
जेव्हडे म्हणून माझे माहितीतले लोक आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतं की त्याना जे काम जमत नाही ते पाहून त्यांनाच खूप लाजल्या सारखं होतं.त्याना ती एक कमतरता वाटते आणि जड अंतःकरण करून ते गोंधळलेले दिसतात. पण आमच्या ह्या पिढीत प्रचार केलेला असतो की यश संपादणं म्हणजेच तृप्ति मिळवणं आणि हे सतत आमच्या मेदूवर आघात केल्यासारखं केलेलं असतं.तसंच दुसरा आघात म्हणजे जर का तुम्ही स्वतःहून काम करू शकला नाही किंवा तुम्ही स्वतः तेव्हडे स्मार्ट नसाल किंवा तुम्ही स्वतः काम करायला समर्थ नसाल तर मग तुम्ही नालायक ठरता.
आता पर्यंत माझ्या जीवनात जे लक्षात ठेवण्यासारखे क्षण आले ते मी किती वेळां यशस्वी झालो हे नसून उलट ज्या ज्या वेळी मी माझ्याच मनात म्हणाले असेन
”मी मेले” ,”मला मदत करील का कुणी”
किंवा
“मला एखाद्दा मैत्रिणीची जरूरी आहे”
अशा प्रकारच्या क्षणाच्या वेळी मी माझीहून मला आधार घेते,मी माझ्याहून मला एक आकार आणण्याचा प्रयत्न करते, तेचक्षण जे मला मदतीची अपेक्षा करायला लावतात ते मला एक देणगी वाटू लागतात.
मला ह्या मतिमंद बायकांचे आभार मानले पाहिजेत. मदत करणं आणि मदतीची अपेक्षा पण करणं ह्यातला आनंद आम्हीशोधून काढला.मला वाटतं कधी कधी आमचा कमकुवतपणा ही पण आमची एक प्रकारची शक्तिच आहे.
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली

“मला माझा जॉब आवडतो.”

तिची रजा घेऊन मी खाली उतरलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 23, 2008

कुणी करील का प्रीति मजवरती

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे

कुणी करील का प्रीति मजवरती
देऊनी वचने करिल का ती पुरी
अशीच स्वप्ने ठेऊनी नयनी
भटकंती करीतो मी रानीवनी
काय म्हणावे ह्या नशिबाला
प्रीत देईना ती सुंदर बाला

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे

नसे पाहिला मी पाऊस नयनातून
नसे सोडिला मी हात हातातून
नेईल का कुणी मला त्याठिकाणी
भेटेल सुंदर बाला ज्याठिकाणी
काय म्हणावे ह्या नशिबाला
पत्ता देईना ती सुंदर बाला

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 22, 2008

आमचे मित्र श्रीयुत “मी,माझं,मला”

“मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचंअसावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. “
हे गृहस्थ मला खूप दिवसानी दादरच्या टिळक पूलावर अचानक भेटले.त्यांच नाव जरी चटकन लक्षात आलं नाही तरी त्यांना आम्ही आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमधे राहत असताना आमचे शेजारी म्हणून टोपण नांवाने ओळखायचो.त्याना आम्ही गंमतीत
”मी,माझं,मला”
ह्या तिन शब्दानी संबोधायचो.
आणि अशा टोपण नांवाचं कारण म्हणजे त्यांची- स्वतःचे मनातले विचार सांगत असताना- एखादं तत्वज्ञान पण सांगूनजाण्याची वृत्ति.

मी फक्त त्यांना म्हणालो,
“कसं काय चाललं आहे?”
ते ऐकून मला म्हणाले,
“चला आपण खाली मामा काणेंच्या हॉटेल मधे बसू या थोडा वेळ”
मला चला म्हणावंच लागलं.
दोन प्लेट बटाटे वडे आणि दोन कप गरम गरम चहाची ऑर्डर देउन त्यानी सुरवातच केली सांगायला,
” मी अलीकडे आध्यात्मावर बरीच पुस्तकं वाचतोय.वय होत राहिलं की विचारांचा कल अशा गोष्टीवर जास्त जातो.आणि खरं खोटं माहिती करण्यासाठी विचाराला चालना मिळते.परत परत गंध उगाळून अर्थहीन झालेल्या वहिवाटीतल्या गोष्टी बद्दल-अशा गोष्टीवर सर्वानुमते विश्वास दाखविला गेला असल्याने- त्याबद्दल आपण खूप प्रामाणिक आहो असं दाखवायला जरा मलाकठीणच होतं.
आपण ज्या गोष्टीचं महत्व मानतो त्यावर आपला विश्वास जास्त असतो.
हे अपरंपार विश्व उंच आकाशात पाहिल्यावर जे डोळ्याचं पारणं फेडतं,ते निर्माण करणार्‍या त्या नजाणत्या आणि सर्वांवरसारखीच नजर ठेवणार्‍या अघात शक्तिवर माझा विश्वास आहे.
मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. मनुष्याची उर्जितावस्था- उघड उघड प्रचारात असलेल्या गोष्टीवर सरळ सरळ गैरविश्वास दाखवून -नंतर त्याचा शोध घेण्यात वेळ खर्च केल्यावर होत असते. उच्च विचारसरणीच्या व्यक्तिं चिंतन करून,गुणगान करून,जगले आणि निर्वतले आणि असं करताना वेळोवेळी आलेल्या समाजातल्या समजूती हळू हळू पुढे ढकलत त्यांना पुर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात राहिले.माझा एव्होल्युशन वरचा विश्वास वृद्धिंगत होत गेला.जीवन जगण्याचा मतितार्थ काय ते बुद्धिपुर्रसर विचार करून पृथ्वीवर हळू हळू होणार्‍या स्थित्यंतराच्या विचारसरणीची आणि दुसरं म्हणजे, एव्होल्युशन न मानणार्‍यांच्या विचारसरणीची सांगड घालून तो माझा विश्वास तसाच वाढत गेला.
चांगुलपणा,बुद्धिमत्ता,आणि नितीमत्ता ह्या गोष्टी आपल्यात कायम असाव्यात ह्यावर विश्वास ठेवल्याने मला आशावादी राहता येईल हे समजून बरं वाटतं.मी वरील गोष्टींचा बावू करीत नाही.पण त्यांचा विचार केल्याने मला जगायला उमेद येते.
ज्यामुळे लोक घाबरून स्पष्ट बोलण्या ऐवजी गोल गोल फिरून बोलतात त्याचा मला खूपच राग येतो.
परिस्थितीने पिचलेले,दाबून ठेवलेले,जे लोक असतात त्याना वर मान करायला होणार्‍या हालचाली बघून मला खूप समाधान होतं.
सर्व किल्मिष,जळमटां पासून मी पूर्ण अलिप्त झालो आहे, असं ढोंग करायला मला मुळीच आवडत नाही. पण ज्या ज्या वेळी मी मला ठराविक किल्मिषापासून नक्कीच दूर ठेवतो त्या त्या वेळी मला जगायला खूप उमेद येते.
सौंदर्य जरी शरिरात वास करीत असलं तरी ते आध्यात्माला धरून असावं असं मला वाटतं.देवाची स्तुतीपर गाणी ऐकून माझ्या अंतरात इतका आनंद होत नाही जितका मी छोटे छोटे पक्षी गुंजन करताना पाहून किंवा संध्याकाळची पांढर्‍या शुभ्र बगळ्यांची उडणारी आकाशातील रांग आणि त्यांच्या तोंडून येणारे ते गोड आवाज ऐकून होतो तेव्हडा. एखाद्दा मंदिरातून येणारा अगरबत्त्यांच्या सुवासापेक्षा संध्याकाळच्या हवेच्या झुळके बरोबर रात्रराणीच्या फुलांचा येणारा तो धुंद करणारा सुवास मला वेडा करतो.
सत्य कठोर असतं,आणि सर्वच सत्ये सुंदर नसतात.पण सौंदर्य हेच सत्य असते.कारण त्या सत्यात प्रेम सामावलेलं असतं.आणि प्रेमही सत्यात सामावलेलं असतं.जगातल्या उच्च कलाकृतींचं उद्दिष्ट सौंदर्य असतं.सौंदर्याचं सर्व ठिकाणी वास्तव्य असल्याने ते सर्वांना मोफत असतं.वैचारिक स्वातंत्र्यात आणि सौंदर्यात सत्य आणि चांगुलपणा सामावलेला पाहून माझाआत्मा आणि मन बळकट होतं.आणखी काय सांगू?”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
कवी बोरकरांची ती कविता
“मी पण यांचे सरले हो!
जीवन ह्यांना कळले हो!”
असं ह्याचं अजून झालेलं दिसत नाही.होईल एक दिवस.
नुसतं कसं काय चाललं आहे? एव्हडंच विचारल्यावर हे त्यांच्या तोंडून केव्हडं ऐकावं लागलं,खरंच रे बाबा! आम्ही तुला”मी,माझं,मला”म्हणतो ते बरोबर आहे.”
“चला निघूया”
असं म्हणून मी पुढच्या कामाला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 21, 2008

बाग बहरूनी गंध देते फुलांचा

बाग बहरूनी गंध देते फुलांचा
सागर उफाळूनी बूंद देई वर्षाचा
त्याचे म्हणावे जीवन जो
दुसर्‍या देई आनंद जीवनाचा

नसशी जरी सूर्य तळप तू होऊनी दिपक
फुल मिळो वा कांटे सत्याची तू आस पकड
मिळते प्रीति मनाला नयनी पूर येई अश्रुंचा
त्याचे म्हणावे जीवन जो
दुसर्‍या देई आनंद जीवनाचा
बाग बहरूनी गंध देते फुलांचा
सागर उफाळूनी बूंद देतो वर्षाचा

लहरूनी फिरे वारा श्वासांचा होई कोंडमारा
त्यजिले जीवन इतरानी प्रीति उमले मनी
त्याचे म्हणावे मन जे
दुसर्‍या देई धडधड अंतरातून
बाग बहरूनी गंध देते फुलांचा
सागर उफाळूनी बूंद देतो वर्षाचा
त्याचे म्हणावे जीवन जो
दुसर्‍या देई आनंद जीवनाचा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 19, 2008

मागून येणार्‍याला मी दरवाजा उघडा धरून ठेवते.

“मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.”

त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातूनबाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे चालू ठेवित बोलत होतो.दरवाजा उघडा करून धरून ठवलेलं मी तिला यापूर्वीच एक दोनदा पाहिलं होतं म्हाणून ह्यावेळेला जरा कुतुहल म्हणून मी तिला विचारलं तेव्हा मला ललिता म्हणाली,

“हा विषय मी जरा माझ्या दृष्टीने मनाला लाऊन घेतल्यासारखा करते.काही लोक दरवाजा थोडासा तुमच्यासाठी उघडून धरतात असा की दरवाजा तुमच्यावर आपटणार नाही,पण कदाचीत तुमच्या मनगटाला इजा व्हायची संभव आहे.काही लोक तर दरवाजा सरळ सोडून देतात आणि तुमच्या तोंडावर जरी तो आपटला तरी ते मागे वळून पण पहात नाहीत आणि सॉरी पण म्हणत नाहीत.
आणि काही एकदम अनोळखे असून ते तुम्हाला एखादा छोटासा धडा शिकवून जातात.जणू सांगतात,
“तुम्ही लोकांसाठी दरवाजा उघडा करून धरून ठेवा.”
हे मी एका अनोळख्या कडून शिकले.
एकदा मी अशीच शुक्रवारचा रात्रीचा एका रेस्टॉरंटमधे तट्ट जेवून वेटरला टेबलावर टीप ठेऊन एका मैत्रिणी बरोबर दरवाज्यातून बाहेर पडत होते. दुसर्‍या एका गृहस्थाने आपल्या येणार्‍या मित्रासाठी दरवाजा उघडा ठेऊन धरून ठेवला होता.तो दुसरा गृहस्थ अर्धा दरवाजातून बाहेर पडत असताना पहिल्याने त्याला कोपराने खूणावलं,त्या दुसर्‍याने त्याला रागाने खूणावून-तसच कोपर्‍याने खूणावून- विचारलं” तुझा प्रॉबलेम काय आहे.?”
तो त्याला गंमतीत म्हणाला,
”तू स्त्रीयांसाठी नक्कीच दरवाजा उघडून धरून ठेवतोस बाकी”

मला अजून त्या प्रसंगाची आठवण येते ज्यावेळी त्याने माझ्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता.आणि त्या प्रसंगाचा माझ्या मनावर निराळाच परिणाम झाला होता.जरी मी स्त्री असले आणि रीतरीवाजाने दरवाजा धरून जरी ठेवला नाही तरी मी तसा धरून ठेवते. कारण इतरानाही माझ्या सारखं वाटत असावं.

काही आठवड्या पूर्वी मी एका सेमिनारला गेली असताना माझी एक मैत्रिण आणि तिची आई दरवाजातून बाहेर येत असताना मी त्यांच्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता एव्हडच नाही तर त्यांच्या मागून एक घोळका येत होता त्यांच्यासाठी पण मी दरवाजा धरून ठवला होता.मला मिळालेला त्या गृहस्थाकडचा धडा मला दुसर्‍याना पास-ऑन करायचा होता.
काय करतेस म्हणून माझ्या मैत्रिणिने मला विचारलं.आणि माझ्या बाजूला ती पण उभी राहिली.
“जे मी माझ्या मला वचन देऊन बसले होते ते मी करणार आहे.”
ती माझ्याकडे जणू मी विचित्र आहे असंच बघत होती.
प्रत्येक जण त्या दरवाजातून जात होता त्या प्रत्येकाने माझ्याकडे बघून स्मित दिलं आणि आभार म्हणाले.आणि ते त्यांचे उद्गार मनापासूनचे होते असावे.
माझी मैत्रीण मला म्हणाली,
“आपल्या वयाचे लोक असं काही करीत नाहित.”
तोपर्यंत शेवटचा माणूस दरवाजातून बाहेर पडला होता.आणि मग मी त्याच्या मागे दरवाजा सोडून दिला.
“तू पण असं कधीतरी करावंस”
असं मी तिला म्हणाले.सर्वच गोष्टी काही आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून मित्रांकडून किंवा शाळेतून शिकायच्या नसतात काही.एखाद्दा एकदम अनोळखी माणसाकडून पण काही गोष्टी शिकायच्या असतात त्याचा मोठा परिणाम ही आपल्या जीवनावर होतो.मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.
हे ऐकून मी मनात म्हणालो,
“लोकं बारिक बारिक गोष्टी पण किती मनाला लावून घेतात.कौतूक करण्यासारखं आहे”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 17, 2008

पन्नास टक्के थेअरी

“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”

नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांनाभेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
“मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात.
वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे.
मी “पन्नास टक्के थेअरी” मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळात्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे. सर्वसाधारण गोष्ट कळायला वेळ जावा लागतो आणिअनुभव मिळवावा लागतो.आणि त्यानेच मला भविष्यातल्या येवू घातलेल्या आश्चर्यांचं आकलन होतं.
आपण जर का एक यादी केली तर असं दिसून येईल.
मला मरण येणार आहे.माझ्या आजीआजोबांच्या,जवळच्या मित्राच्या,प्रेमळ बॉसच्या,आणि माझ्या प्रेमळ कुत्र्याच्या निर्वतण्याच्या प्रसंगाला, मी तोंड दिलं आहे.ह्यातले कांही प्रसंग खूपच धक्कादायक होते.आणि काही रेंगाळलेले आणि दुःखदायी होते.ह्या सर्व वाईट गोष्टी एकदम खालच्या पातळीवर ठेवता येतात.
दुसरे वरच्या पातळीवर ठेवता येतील असे मुद्दे म्हणजे,आपल्याला आवडेल त्या व्यक्तिशी लग्न होणं.मुल होणं आणि त्या मुलाचा बाबा म्हणून त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी. उदा.त्याच्या बरोबर बॅट-बॉलने खेळणं,त्याच्या बरोबर पोहायला जाणं,कीड-मुंगीकडे पण दयाळू अंतःकरणाने पहाण्याचीत्याची वृत्ति पाहून त्याच कौतूक करणं.पत्याचे बंगले बनविण्याची त्याची कल्पनाशक्ति आणि अंगातली कला पाहून आनंदी होणं.
पण मधल्या वेळात जीवनाचं विखुरलेल असंही कुरण असतं जिथे वाईट आणि चांगल्या गोष्टी आलटून पालटून कसरत करीत असतात.ती माझी “पन्नास टक्के थेअरी” इथे माझ्या उपयोगी येते.
आता हेच बघा माझा एक मित्र कोकणात शेती करतो.पावसाचा अंदाज घेऊन त्याने एकदा भाताची पेरणी थोडी अगोदरच केली.त्या वर्षी पाऊस थोडा उशिरा आला.आणि त्याला परत पेरणी करावी लागली.त्याची मेहनत फुकट गेल्याबद्दल त्याला जरा वाईट वाटलं.पण त्यावेळेला मोठा दुष्काळ आला होता.त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता.पण त्याची खात्री होती की असे दुष्काळ नेहमीच येत नाहीत.माझ्या त्या “पन्नास टक्केच्या थेअरीची” मदत झाली.दुसर्‍या पावसाळ्यात त्या दुष्काळाची कसर निघाली.त्या वर्षी भरपूर भाताचं पिक आलं.आणि दिवस तसेच राहत नाहीत हे सिद्ध झालं.”
हे सर्व ऐकून मी त्याला म्हणालो,
“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 16, 2008

दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

असेल जर तुझ्या मनात यायचे
दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

ठरविले मी हरक्षणी तुजसम रहायचे
घे घे रे! सजणा आधार माझ्या हाताचे

साथ देई मोर मोरणीला अन घन वर्षाला
साथ देई नाव नदीला अन पवन ऋतूला
असेल जर तुझ्या मनात यायचे
दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

हंसरा तुझा चेहरा खुलवी गुच्छ फुलांचे
केशभारातून गंध येई फुलांच्या ताटव्यांचे
गोड गोड तुझ्या शब्दानी जाई मी भुलूनी
नको छेडू रे भ्रमरा पुढे मागे गुणगुणूनी
वारा आहे जोरात उडू न देशी तुझा पदर
हळूच धरूनी हात तुझा तुटू न जाई कंगण

तुझ्या स्वप्नांचे घुंघूर छमकती गोर्‍या पायात
उशीर करूनी विसावलो पापणीच्या छायेत
श्वासांच्या हिंदोळ्यावर नाव तुझी गं! डुलते
तुझी नी माझी प्रीत सजणे संध्याकाळी फुलते
दूर त्या वाड्यामधे जाई कुणा नारीची डोली
आशेची फुलपांखरे घालू लागती रंगीत रांगोळी
असेल जर तुझ्या मनात यायचे
दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 14, 2008

विचाराच्या पलिकडले.

प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळखा झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही.
मी त्यांना सहजच म्हणालो,
“कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा”
थोडासाचा विचार करून ते म्हणाले,
“मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो.
एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं.

माझा कॉलेज मधे विषय फिलॉसॉफीचा होता.पण नैसर्गीक सौंदर्याच्या कविता अन लघू कथा वाचून झाल्यावर काही तरी खरंखुर-म्हणजे जगातलं हाडं,रक्त आणि मांसा- सारख्या विषयावर काही अभ्यास करण्याची जरूरी भासू लागली.

ह्या विषयावर क्लास घेणारे प्रोफेसर, कोर्सवर्क म्हणून शवविच्छेदन करण्याच्या लॅबमधे आम्हाला घेवून गेले.त्यामुळे आम्हाला आखोदेखा हाल पहाताना टेक्स्टची पुस्तकं आणि बोर्डावरच्या ड्रॉईंगच्या पलिकडे जावून काही तरी शिकायला मिळत होतं.

शवाग्रहात शिरताक्षणी आमचे सर्वांचे आवाज कुजबुजण्याच्या पातळीवर आले.आमचे सगळ्यांचे डोळे मनुष्याच्या अवयवाचे निरनीराळे भाग भिंतीला लागून ठेवलेल्या आणि संरक्षीत रहाण्यासाठी नीट केमिकल्स मधे ठेवलेल्या जारच्या-म्हणजे बाटल्याच्या-दिशेने वळले.
शवविच्छेदनाच्या खोलीत एका स्टेनलेसस्टीलच्या टेबलावर एका माणसाचं शरिर ठेवलं होतं.त्या शरिराची कातडी पिवळ्या मेणासारखी दिसणारी थलथलीत झालेली अगदी प्लास्टीक सारखी झालेली दिसत होती.
त्याचं तोंड उघडं होतं आणि भकास दिसत होतं.
ती एक आत्महत्तेची केस होती.
डॉक्टरने त्या शरिरावर एक रक्तहीन चीर काढली.एक दोन विद्दार्थी भोवळ येवून पडले.मी त्यामानाने स्थिर होतो.त्या शरिराच्या आत जसं आम्हाला शिकवलं होतं तसं, एक हृदय आणि त्याच्या पासून निघणाऱ्या अनेक रक्तवाहिन्या,पोटाला अजून यीस्ट सारखा वास येत होता,हाडाचा सांगाडा,आणि आंतड्याची वेष्टनं होती.
काही कारणास्तव माझ्या लक्षात आलं की ते सर्व शरिराचे अवयव बघून भयभिती,हवंस,प्रेम किंवा कसली
लालसा मला आली नाही.
त्या मृत शरिराच्या कुठच्याच अवयवातून मला भास होईल असं आणि शोधून काढिन असं दया आणणारा अवयव,इच्छाशक्ती दाखवणारा अवयव किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव असं काही शोधता आलं नाही.
नंतर डॉक्टरने कवटीचा भाग उलटाकरून विजेच्या करवतीने काळजीपुर्वक कापून मेदुचा गोळा बाहेर काढला.पापुद्र्यात गुंडाळलेल्या त्या मेंदुच्या गोळ्यावर स्मरणशक्तिच्या आणि अनुभवाच्या सुरकुत्या दिसल्या.त्या राखाडी रंगाच्या शिरांचं जाळं बघून त्याग करणं,माफ करणं,किंवा आत्महत्या करणं ह्या गोष्टी बद्दल माझी असलेली समजूत आणि माणसाचं आयुष्य म्हणजे एक जीवशासत्र आहे ह्या बद्दलची माझी कल्पना ह्याची सांगड घालणं मला जमलं नाही. माझी स्वतःची खात्री होती की ईच्छाशक्ति,कल्पनाशक्ति,आणि विचार ह्याचं रुपांतर एखाद्या केमिकल रियाक्षन किंवा वीजेच्या लहरीत होईल.पण तसं काही दिसलं नाही.

माझ्या अपेक्षेच्या पलिकडे माझ्या क्लासने आणि जास्त करुन शवविच्छदनाचा अनुभवाने मला खोल विचारात नेऊन सोडलं. माझा ह्या बाबतीचा अभ्यास मुख्यत्वेकरून मनुष्याचं शरिराचं अस्तित्व सबळपणे जाणण्यासाठी होता.या उलट मी जास्त खोलात जावून शोधून काढलं की मनुष्याचं शरिर हे तात्पुरतं आणि क्षणभंगूर असून, त्याच्या विरूद्ध आत्मा हा जास्त कायम स्वरूपाचा असावा.
अखेर एक अदृश्य पण पवित्र मुलभूत शक्ति माझ्या कानात माझ्या देव जाणण्याच्या आणि त्या बद्दल आनंद मानण्याच्या क्षमतेची आठवण देऊन कुजबुजत करीत होती असा मला त्यावेळी भास झाला.”
हे सगळं त्यांच संभाषण ऐकून मी क्षणभर अचंबीत़च झालो.मनूष्य आपल्या विचारशक्तिच्या जोरावर काय काय मनात आणू शकतो,आणि कुठल्या कुठल्या कनक्लुजनला येवू शकतो हे सुद्धा विचारच्या पलिकडचंच आहे असं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 12, 2008

ती तर पर्‍याहूनी ही देखणी

दूर दूर दरीतून येई
पाउलांची छमछ्म
ह्या वार्‍याच्या झूळकेतून येई
कंगणाची खणखण
एक चेहरा जो स्वप्नी येई
येता जाता मन माझे खुलवी
कोर्‍या कागदावरी लिहाया शिकवी
हळू हळू मला ती शायर बनवी

ती तर पहाटेची पहिली किरण
नव्हे तर पाणवट्यातील जणू कमळ
तिला पाहूनी मी राहिन गात
ती तर माझी जीवन गझल
धडधड करूनी हृदया हलवी
येता जाता मन माझे खुलवी

ती तर सुरांचा वाहता वारा
नव्हे तर माझा जीवन सहारा
ओठी माझ्या तिचीच कहाणी
ती तर पर्‍याहूनी ही देखणी
येता जाता मन माझे खुलवी
हळू हळू मला ती शायर बनवी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 10, 2008

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी!

खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्‍याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची सोय करून ठेवली होती.त्यामुळे बारमास शेतीला पाणी मिळायचं.त्याच कारणाने हा सर्व परिसर गर्द झाडीने भरलेला असून नारळ, पोफळ,सुपारी,पानवेली आणि इतर रानटी झाडांच्या डोंगरा वरच्या आणि उतारावरच्या जमिनीवर विखूरलेल्या झाडीने भर उन्हात सुद्धा संध्याकाळ निर्माण करण्याचं वेगळंच वातावारण निर्माण झालं होतं. तशात ते सपाटी वरचे भातशेतीचे हिरवे गार कुणगे-चौकोनी आकाराच्या जमिनी-गालिच्या सारख्या वाटतात.डोंगरच्या एका जास्त खोलगट जागेत धामापुरचं प्रसिद्ध तळं निर्माण झालं होतं.आणि त्याच तळ्याच्या आजूबाजूला लोकांची कौलारू घरं होती. मधेच एक देवीचं सुंदर मंदिर होतं.
अश्या ह्या रम्य परिसरांवर चित्रपट काढणार्‍यांचं लक्ष गेलं नाही तर नवल म्हणावं लागेल. चिं.त्र्य.खानोलकरांच्या चानी ह्या कादंबरी वरून “चानी” -खारीला-स्किवरल- मालवणीत चानी म्हणतात-ह्या चित्रपटाचं बाह्य चित्रीकरण इकडेच झालं असं म्हणतात.
माझी मामेबहिण वासंती उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन रहायची.त्यानंतर ती पुढे लग्न झाल्यावर आपल्या नवर्‍याबरोबर थोडी वर्षं इंग्लंडला जावून राहिली होती.नंतर उतार वयात ती आपल्या नवर्‍याबरोबर धामापुरला आपल्य वडलांच्या घरात स्थाईक झाली.मामाची एकुलती एक मुलगी असल्याने तिला ते सर्व घरदार मिळालं होतं.लहानपणापासून धामापुरातच वाढल्याने ह्या परिसराची तिला ओढ असणं स्वाभाविक होतं.तिची मुलं नातवंडं पण मुंबईला स्थाईक झाली होती.
वासंतीच्या लहानपणीचच तिच्या समोर वाढीला लागलेल्या एका पिंपळाच्या झाडावर तिचा खूप जीव होता.ते मोठं झाल्यावर त्या झाडाच्या बुंध्याखाली बसून अभ्यास करायची.मी आणि ती ह्या झाडाखाली गप्पा मारायचो.
ह्यावेळेला तिची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा बोलता बोलता ह्या झाडाचा विषय निघाला.आता ते झाडपण बरंच उंच झालं होतं.आता वासंतीचे विचार जरा फिलॉसॉफीकल झाले होते.
मला ती म्हणाली, काही लोकांना त्या पिंपळाच्या झाडाच्या आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्याला जास्त महत्व द्दावसं वाटतं पण माझा ह्यावर विश्वास नाही. मला तसं वाटत नाही.
आमच्या घराच्या पडवीत बसून तांदूळ निवडताना माझी ती मानलेली बहिण माझ्या इतकीच वृद्ध झालेली
पिंपळाचं झाड माझी करमणूक करते.
ते झाड खूप उंच आहे.जवळ जवळ चाळीस फूट उंच.आणि जवळ जवळ माझ्या इतकंच वयाने असेल.ते आता थोडं वाकलं आहे,मी पण तशीच वाकली आहे.
ते झाड अनेक पक्षांची काळजी घेतं.ते सर्व बघायला मला पण खूप आनंद होतो.त्यावर राहणारे पक्षी प्रेम करतात,भांडतात पण.आणि त्या झाडाच्या फांद्दांवर घरटी पण बांधतात.सणावारी काही देवभोळ्या बायका ह्या झाडाच्या बुंध्याची पुजा करतात.
ते झाड अजून हिरवं गार आहे.आणि बर्‍याच फांद्दा जुन्या आणि पिंगट रंगाच्या झाल्या आहेत.जणू माझे केस अधून मधून पांढरे असून त्यावर काळ्या केसांच मधूनच वेष्टन आहे तसंच.
आम्ही दोघी उन्हात करपतो आणि हवेत गारठतो आणि सुखाने जगण्याची धडपड करतो.एकना- एक दिवस ते पडणार आणि मातीशी एक रूप होणार. जमिनीला खत मिळणार.जसं माझं पण तसंच होणार.माझा मनाला धीर देणारा हा विचार असावा. आपली मुलं आणि नातवंड त्यांच्या आणि आपल्याच आयुष्याची साखळी करून पुढे सरसावतात.एक अदभूत शक्ति मझ्यात आणि त्या पिंपळाच्या झाडात आहे हाच विचार मला जास्तीत जास्त त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ नेतो.
चाळिस वर्षापूर्वी मी आणि माझे पति ह्या धामापुराच्या परिसरात येवून राहिलो.आमची राहती जागा त्या तळ्याच्या सभोवतालच्या उंच उंच पोफळीच्या आणि सुपारीच्या झाडांच्या गराड्यात वसली आहे.घराच्या उतरंडीवरून एकदम सपाटी दिसू लागते आणि सर्व परिसर मावळत्या सूर्याच्या केशरी किरणानी उजळून निघतो.तुझे आईवडिल इकडे एकदा येवून गेले तेव्हा त्याना हा परिसर खूपच आवडला होता.मी तशी शहरी मुलगी असल्याने मला आनंद व्हावा म्हणून कदाचीत ते मला प्रोत्साहन देत असावे.
माझी आई निर्वतल्या नंतर मी एकटी झाले आणि तिची मला जरूरी होती. मी तळ्याकाठी असलेल्या सुंदर मंदिरात जाऊन मुसमुसून रडले.देवळातल्या पुजार्‍याची आणि माझी तोंड ओळख होती.पण त्याने मला पाहिलं न पाहिल्या सारखं केलं.मी देवळातून त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांकडे बघून माझी मी समजूत घातली.निदान त्या क्षणाला तरी.त्या घटने नंतर मी चिखलात खणायचे पण गांडूळाना दोष देत नव्हते.माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे ना?त्या परिसरात असल्या प्रवृती पासून मी दूरच रहात होते.नव्हे तर ती आता माझी नित्याची संवयच झाली होती.दर गुरवारी मी त्या देवळात जाऊन माझा असा वेळ घालवीत होते.
एकदा मी अशीच त्या तळ्याच्या आत जाणार्‍या पायर्‍यावर पाण्यात पाय बडवून उभी होते.बारिक बारिक मासे माझ्या पायाच्या तळव्या पासून बोटांच्या टोकांपर्यंत चावा घेत असताना करमणूक करून घेत होते.पायाला हलक्याश्या गुदगुदल्या होत होत्या.त्याची मजा घेत घेत त्या मावळत्या सूर्याच्या केशरी किरणांचा तो उजाळलेला परिसर पाहून धुंद झाली असताना अशीच एक अनोळखी व्यक्ति त्या तळ्यावर फिरायला आली असताना माझ्याकडे बघून मला म्हणाली,
“तुम्हाला मी वरचेवर ह्या तळ्यावर येवून हे सूर्य दर्शन घेताना पाहातोय आपण हे धार्मिक दृष्टीने करता की आध्यात्माच्या?”
मी म्हणाले,
“मी हे आध्यात्माच्या दृष्टीने करते”
त्याचं कारण त्याने विचारल्यावर मी त्याला माझ्या बहिणी सारख्या वाटणार्‍या त्या पिंपळाच्या झाडाबद्दल सांगून म्हणाले,
” कुणी तरी मला सांगितलंय की एखादा परिसर किती सुंदर आहे ते त्या परिसरात खूप वर्ष राहून कळतं,तशी मी वरचेवर माझ्या मुलांना आणि नातवंडाना भेटायला शहरात जावून येत असते.त्यांना भेटल्यामुळे मला निराळंच समाधान वाटतं.अजूनही मी तसंच वरचेवर करीत असते,पण ह्या परिसराला मी मुकत असते. वहिवाटीत विचार करून राहणारे चांगल्या समजणार्‍या लोकांच्या स्वर्ग-नरकात जाण्याच्या विचारांचे विषय आता पार मी विसरून गेली आहे.त्या पिंपळाच्या झाडात आणि त्याच्यावर वास करणार्‍या पक्षी-प्राण्यात मला एखादी अद्भूत शक्ति दिसायला लागली आहे.छोटे छोटे गाणी गुणगुणनारे पक्षी त्या लालपोट्या सुतार पक्षाला आपल्या घरट्याच्या खूपच जवळ झाडाच्या बुंध्याला टोच मारताना पाहून त्याच्या विरूद्ध गलगलाट करताना पाहून मी विचारात पडते.मश्गूल होवून जाते.एका विचारातून दुसर्‍या विचारात जाण्याची क्रिया पुर्ण झाल्यासारखी वाटते.
मी त्या पिंपळाच्या झाडाला देत असलेलं महत्व पाहून इतर लोक उलट मला महत्व देण्यात धन्य वाटून घेतात.पण मला ते पटत नाही. त्यांची समजूत आहे की मला स्वर्गात एक खास जागा आहे पण मला ते काही पटत नाही.माझं पिंपळाचं झाड आणि त्या झाडावर वस्ति करणारे पक्षि-प्राणी ह्याना मी मानते.आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धतही मानते.माणूस म्हणून जितकं जगावं, वागावं तेव्हडं वागण्याचाच मी प्रयत्न करते.माझं पिंपळाचं झाड आपलं कर्तव्य करून त्या अद्भुत शक्तिच्या इच्छेनुसार जसं वागतं तसंच.
वासंतीचं हे सर्व ऐकून मी तिला म्हणालो,
“जस जसं माणसाचं वय होत जातं तस तसं ते जास्त
फिलॉसॉफीकल होतं हे तुझ्याच उदाहरणावरून दिसतं”
माझं हे ऐकून वासंती गालातल्या गालात हंसली.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 8, 2008

काय समजू तू असशी कोण

बहरले जीवन माझे तुझ्यामुळे
काय समजू तू असशी कोण
मनाच्या वाळवंटी फुलला
बगिच्या तुझ्यामुळे
काय समजू तू असशी कोण

भटकत होतो मी एकटा
कुणी मित्र ही नव्हता
सांगू कुणा मी मनातले
कुणी ऐकणारा नव्हता
ठेऊ कुणावरी मी भरवंसा
कुणी लपवीणारा नव्हता

कुठले स्वप्न मी माझे समजू
कुणा माझे प्राण समजू
कुणा माझी जान समजू
घुंघट ओढूनी तुझ्या माथ्यावरी
येई संशयाचा माझ्यावरी ताण
काय समजू तू असशी कोण

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 7, 2008

मरण मला पाहून हंसले

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता

असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील

खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम

जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 6, 2008

अशी ही एक श्रद्धा

“मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्तिमाझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.”
मधूकर सामंतांच्या घरी एकदा रवीवारी त्यांना भेटायला आणि गप्पा गोष्टी करायला म्हणून गेलो असता,त्यांचा एक विद्दार्थी त्यांना भेटायला म्हणून आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर मी त्याला असंच कधी तरी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं.
देव,धर्म,श्रद्धा,आध्यात्म ह्या विषयावर त्याचा गाढा अभ्यास होता.त्याने त्याच्या डॉक्टरेटचा प्रबंध ह्याच विषयावर अभ्यासला होता.
“तुझा देवाच्या अस्थित्वार विश्वास आहे की नाही”
असा त्याला सरळ प्रश्न करून त्याचा विचार समजून घ्यायला मी थोडा उत्सुक्त होतो.

तो मला म्हणाला,
“माझा देवाच्या अस्थित्वावर विश्वास आहे.माझी आई मला लहान असताना त्या आसमंतातल्या अगाध शक्ति बद्दल-जी नेहमीच होती आणि नेहमीच असणार- असं वर्णन करून सांगायची त्या देवावर नव्हे.
मी चार वर्षाचा असताना माझे वडील रागाने घरातून निघून गेले त्यावेळी मला ज्याने आपल्या कवेत घेवून समजावूनसांगितलं त्या देवावर माझा विश्वास आहे.

घरात अन्नाचा कणही नसताना, पांघरायला गोधडी नसताना, आई चूल पेटवण्याच्या परिस्थितीत नसताना,
ज्याने चतकोर भाकरी दिली रहायला आसरा दिला आणि धीर दिला त्या देवावर माझा विश्वास आहे.

ज्यावेळी माझी आई पण खंगून खंगून मृत पावली,अशावेळी मी जेव्हा पोरका झालो त्यावेळी मला जवळ घेवून माझी समजूत घालून मला कानात सांगितलं “सर्व काही ठीक होणार.काळजी करू नको” ज्यावळी मला आदर दाखवून “बाळा” असं म्हटलं,त्या देवावर माझा विश्वास आहे.

ज्या देवाने त्याच्या अस्थित्वा बद्दल माझ्या अंतरात विश्वास निर्माण केला.थंडी वाऱ्या पासून माझं संरक्षण केलं,ज्याच्या आवाजाने माझ्या जीवनात आलेल्या घनघोर वादळात मी यकःश्चीत आहे असं सांगितलं जाताना,
” नाही,तसं नाही तू पण काहीतरी आहेस “
असं सांगून ज्याने मला दिलासा दिला,मला ज्याने जन्म दिला,ज्याचं नांव मी लावतो,तो मला सोडून गेल्यावर,
“तू माझाच आहेस”
असं म्हणून मला जगण्याचा दिलासा दिला.त्या देवाचं अस्थित्व मी मानतो.

एखाद्दाचे वडिल त्या मुलाचा हात हातात घेवून फिरायला जाताना पाहून मला त्यांचा हेवा वाटतो.त्या वडिल-मुलांमधल्या होणाऱ्या पक्षी,झाडं,फूलं फूलपाखारं ह्यांच्या चर्चे बद्दल किंवा कसलीच चर्चा न करता अगदी जवळून चालताना एकमेकाचा श्वासाचा भास होईल इतकं जवळून चालताना,एकमेकाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकं जवळून चालताना पाहून सुद्धा हेवा वाटतो.
मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो. परंतु ती कल्पना कधीच सत्यात उतरलं नाही.
मी अठरा वयाचा असताना मला आठवतं माझ्या डोळ्यात एक ही टीप न आणता अपघातात निर्वतलेल्या माझ्या वडिलांचं प्रेत पहात उभा होतो. मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते.

अनेक वर्षा नंतर मी घरात टांगलेल्या वडिलांच्या तस्विरी समोर उभा राहून गेली कित्येक वर्षे त्यांच्याशी होवू घातलेला पण न झालेला संवाद करण्यासाठी आज माझ्या डोळ्यातून घळघळा वहाणारे अश्रू न रोखता जणू सांगत होतो की मी आता एक उमदा तरूण झालो असून माझ्या आयुष्यात त्यानी असायला हवं होतं ह्याची मी किती आतुरतेने इच्छा करत होतो. पण आता मला कळून चुकलं होतं की त्यांच्या गैरहजेरीची पोकळी देवाच्या अस्थित्वाच्या मानण्याने भरून निघाली होती.”

हे सर्व ऐकून मी त्याल म्हणालो,

“खरंच एखादा देवा बद्दल असा पण विचार करू शकतो.हे तुझं ऐकून त्या देवाच्याच माणसाला विचार करू देण्याच्या देणगीचं कौतुक केलं पाहिजे”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 4, 2008

तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं

तुझ्या सारखा अन तुझ्या सारखा
हवा प्रियकर मला
तुझ्या वरती अन तुझ्या वरती
करू दे प्रीति मला
छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं

तुझेच विचार अन तुझ्याच स्मृति
असती माझ्याच त्या मिळकती
पापण्याच्या घरात अन स्वप्नाच्या दुनियेत
राहूदे सदैव मला तुझ्याच नजरेत
माझेच स्थान असे तुझ्याच हृदयात
प्रसिद्धी मी पावले तुझाच शहरात

छेडूनी तारा मन माझे डोलवूं
तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 2, 2008

पानी तेरा रंग कैसा?

“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोधलागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हापण त्यातलाच प्रकार असावा.”



मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते”
मी म्हणालो,
” आपण अवश्य ऐकू या”

“देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
“माझा देवावर विश्वास आहे” असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की “मला वाटतं देव नाही” अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.

“माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्याश्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही.”
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, “गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही.”
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मीबरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं.”
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
” हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स.”
मी त्याला म्हणालो,
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिचतर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 1, 2008

ही केशरी संध्याकाळ

ही केशरी संध्याकाळ
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार

ते दोन दोन विहंग
उडून गगनी होती धूंद
लक्षावधी गगने येवूनी
करिती माझ्या मनी आक्रंद

सप्तरंगात मी हरवली
झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार

फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा
येवूनी बिलगे माझ्या शरिरा
रंगात मिसळूनी रंग
गगनी दिसती हे पतंग
विहार करिती एकमेका संग

ही केशरी संध्याकाळ
छेडीते मनाची तार
वाटे उडून जावे
निळ्या नभाच्या पार

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com