Monday, March 30, 2009

ऋण काढून सण

प्रोफेसर देसाई आज जरा खुषीत दिसले.मला म्हणाले,
“सामंत, तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चं “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटतं बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात. दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ करण्याचं काही झालं तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत? त्यांची “एकॉनॉमीच” म्हणे तशीच आहे.क्रेडीट कार्डावर कर्ज घ्या. फेडायचा विचार सध्या करूं नका.कमीत कमी हाप्ता फेडत चला.पुढचं पुढे.त्यामुळे जो तो आपला पैसा खर्च करतो.गिफ्ट द्दा, गिफ्ट घ्या पण खरेदी करा.

अहो,प्रे.बुशने तर ९/११ झाल्यावर चक्क सांगितलं,
“खर्च करा,घरी बसू नका.हिंडा फिरा.”
शेवटी पैशासाठी हवरटपणा एव्हडा वाढला की कुणाची पैसे परत फेडायची लायकी असो वा नसो “कर्ज काढा, घरं घ्या” असा संदेश देत कर्ज देणारे मागे लागले.आणि शेवटी काय झालं सर्व एकॉनॉमी कोसळली. आणि आता पुढचं रामायण सर्वश्रूत आहे.आता सगळे “बचत करा बचत करा” म्हणून सांगायला लागलेत.
अहो आपले संस्कार म्हणजे काटकसर करा.अंथरूण बघून पाय पसरा.पैशाचा अपव्यय करूं नका.बचत केलीत तर कधी पुढे अडीअडचणीत तिचा उपयोग होईल.ऋण काढून सण करूं नका.सर्वच दिवस सारखे नसतात…..वगैरे वगैरे एक ना दोन सांगणी असतात.
ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.”

असं म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.

अमेरिकन फन

पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शहेन्शहा शहांजहा म्हणे
ऐष- आरामात रहात असे
करातून आलेल्या मिळकतीतून
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल बांधायला
त्याला कसलीच अडचण नसे
आपले बुजुर्ग सांगत आले
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 28, 2009

ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?

”अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो,
“काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?”
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं.

लागलीच ती मला म्हणाली,
मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे. एखाद्दा शहरी मोठ्या शाळेतल्या मुलांच्या ज्ञानाच्या जरूरी एव्हड्या ह्या शाळेतल्या मुलांच्या आवश्यक्यता असतात.त्यांच्या पूर्वपीठिका आणि त्यांच्या गरजा आव्ह्यानात्मक असतात आणि वास्तविक असतात.त्यामुळे त्याचे परिणाम त्यांचं आचरण एक ना एक प्रकारे असुकर करतात.

मी तिला म्हणालो,
“मागे एकदा तू मला तुझ्या वर्गातल्या एका मुली बद्दल सांगितलं होतंस.आता ती बरीच मोठी तरूणी झाली असेल.”
ह्याची आठवण दिल्यावर अलका म्हणाली,
“त्या विद्दार्थीनीने माझ्या मनात कायमची छाप ठेवली आहे.दहा वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही ह्या शाळेचं उध्घाठन केलं त्यावेळच्या त्या लहानश्या वर्गापासून ती होती.
एक दिवशी तिने मला तिला घरी वागणूक कशी मिळते त्याचं वर्णन करून सांगितलं होतं त्याची आठवण येऊन आता ही माझ्या अंगावर कांटा येतो.आम्ही तिच्या त्या वातावरणात बदल घडवून आणला तरी त्याची झालेली क्षती दूरगामी आणि कायम स्वरूपाची होती. मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?

माझ्या वर्गातल्या खूर्चीच्यामागे एका फळीवर माझ्या पसंतीची एक उक्ति लिहिलेली होती.
“आपण मोठमोठाल्या गोष्टी करूं शकणार नसूं पण फक्त लहान लहान गोष्टी विशेष प्रेमाने करूं शकतो.”
असे बरेच दिवस यायचे की मी निराश व्हायची पण जेव्हा त्या फळीवरच्या “प्रेमाने” ह्या शब्दावर नजर जायची तेव्हा त्याने माझ्या स्मृती जागृत व्हायच्या आणि त्या शब्दाचं प्रभूत्व मनावर बिंबायचं.”

मी अलकाला म्हणालो,
“पण सगळेच काही प्रेम करून घेण्याच्या लायकीचे नसतात.असं मला वाटतं.”
त्यावर ती म्हणते कशी,
“मला वाटतं,जे प्रेम करून घ्यायला कठीण आहेत अशांवर प्रेम करणं म्हणजे महाकठिण आणि फार खास काम असतं.तो दिवस संपून गेल्यावर वाटायचं की निदान मी प्रयत्न तरी केला. मी आराधाना करायचे की निदान मी प्रयत्न करण्याची पराकाष्टा तरी केली असं माझ्या विद्दार्थ्यानां वाटावं आणि अनेक वेळां न झाल्यास मला त्यांनी माफ करावं.”

“तुम्हा शिक्षाकांचं एक बरं असतं,हे सर्व विद्दार्थी आणि विद्दार्थिनी मोठी झाल्यावर तुम्हाला माहित नसेल त्यापेक्षा तुमच्याशी उपकृत असतात.”सारांश “सिनेमातला तो मंत्री आणि मुलाच्या अस्थी परदेशातून आल्यावर वेळेवर मिळत नाहित म्हणून बेजार झालेले ते त्याचे वडील पण त्या मंत्र्याचे गुरूजी,ह्यातला संवाद आठवला की “धन्य तो शिक्षकी पेशा असं मला वाटायचं.”
माझं हे उदाहरण ऐकून काही तरी तिचा अनुभव तिला सांगावासा वाटला.

अलका मला म्हणाली ह्याच संदर्भाने मला तुम्ही आठवण करून दिलीत तो किस्सा सांगते,
“अलिकडेच एका दिवशी लंच घेतानाची आठवण झाली.माझे बाकी शिक्षक सहकारी एका उमद्दा होतकरू क्रिकेटपटू बद्दल चर्चा करीत होते.तो माझा विद्दार्थी होता असं मी त्यांना अभिमानाने सांगत होते.आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं.
त्याच दिवशी संध्याकाळी वर उल्लेखलेली आता एक तरूणी झालेली मुलगी तिच्या मित्राला घेऊन मला भेटायला आली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी हंसली आणि ती लगेचच म्हणाली,
” ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं.”
मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले.तिच्या त्या एका वास्तविक विवरणावर मी जरी जगातले सर्व क्रिकेटपटू ओवाळून टाकले असते तरी ते स्विकृती लायक नव्हते.”

मला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला.म्हणूनच मी तिला म्हणालो,
” अलका,तुम्हा शिक्षकांच्या परंपरा असतात.आणि तुमचे विद्दार्थी आणि विद्दार्थिनी आपल्या मनात त्या जोपासून ठेवीत असतात नाही काय?”

अलका म्हणते,
“दिवसाच्या शेवटी किंवा आपल्या आयुष्याचा अखेरीस श्रेष्टतेची व्याख्या मौलिक अर्थाने भ्रामिकच असावी.मला वाटतं,जी व्यक्ति माझ्या समोर आहे त्या व्यक्तिवर मी प्रेम करण्याची आवश्यकता आहे.कदाचीत पुढे कधी तरी अशी ही प्रेम केलेली व्यक्ति येईल एक दिवशी आणि सांगेल,
”त्यामुळे फरक पडला.”
कदाचीत ती व्यक्ति तसं सांगणारही नाही.इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यासारखं काही माझं जीवन नाही.पण माझं नांव, ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्यांच्या कदाचीत हृदयात लिहिण्यासारखं राहिल. ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला? “

खरंच किती सत्य आहे अलकाच्या म्हणण्यात!





श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 26, 2009

दिवस जूने भुलायचे

आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला सुंदर दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला.नवीन कायदा पास करून हेल्थ स्कीममधे सिनियर सिटीझनना ही सवलत दिली गेली.
भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले,
“आमचे जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.आता काळजी वाचून जगायला हरकत नाही.”
उद्दा जेव्हा तळ्यावर भेटू तेव्हा एक कविता लिहून आणा जी ह्या घटनेशी समर्पक असेल.मला त्यांचे “दिवस भुलायचे,काळजीवाचून जगायचे” हे शब्द सारखे मनात घोळू लागले.आणि पाडगांवकरांच्या त्या गाण्याची याद आली.

(दिवस तुझे फुलायचे
झोपाळ्यावांचून झुलायचे)

आणि मग अशी कविता सुचली.ती ऐकून दुसर्‍या दिवशी प्रो.देसाई फारच खूष झाले.

दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे

झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे

थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे

माझ्या ह्या खूर्ची पाशी
थांब तूं गं! जराशी
पापण्या मिटून हंसायचे
काळजी वाचून जगायचे


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 24, 2009

तो होता देवाचा स्विमिंगपूल

हेमंत माहात्मे काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
“डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरिरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं.”
असं सद्गदीत होऊन हेमंत मला म्हणाला.
“रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी फाटकी पिशवी फेकून देण्यासारखी असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.”
असं तो त्याच्या आजोबांना म्हणाला.
“डॉक्टरांची चूक नाही म्हणा.संवयीचा परिणाम.”
हे सर्व हेमूकडून ऐकून त्यांच्या नातवाच्या मनातली भावना कवितेत सुचली.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरिर
अमुच्या चिमुकल्या गादिवर
पोसलीस तू आम्हा किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे

रीत आहे ही निसर्गाची
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावतो झडकर
द्दा टाकून झाला वापर
असेच म्हणती ते डॉक्टर



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 22, 2009

“अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर”

“अमेरिकेत प्रथमच येणार्‍यांनी आपले जुने संस्कार न विसरता रहावं.तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्यात सुधारणा करून घ्यावी.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच आपण पंचाईत करून घेत असतो. नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही.अहो गाईचं मांस,डुकराचं मांस मिळालं म्हणून आपण खायचं काय?ते न खाता इकडे जगतां येत नाही काय?दुसरं इकडे ऋण काढून सण करण्याची प्रथा आहे.अहो अंथरूण बघून पाय पसरायला नको काय?अलिकडे एकॉनॉमीचा बट्याबोळ झाल्यावर इकडच्या लोकांना आता जरा जरा कळायला लागलंय. निगेटिव्ह सेव्हिंग असणार्‍या लोकांनी आता पांच परसेन्ट पर्यंत सेव्हिंग केलं आहे म्हणे. अहो,ह्यां लोकात पैशाचा हावरटपणा वाढल्याने हे असं झालंय ते त्यांना कळलंय आता.क्रेडिट कार्डावर हवे तसे पैसे मिळतात म्हणून आवाक्या बाहेर कर्ज काढून आता नोकर्‍या गेल्यावर कर्जबाजारी होऊन दिवाळी काढीत राहले आहेत.ह्यात आपल्या लोकांचं प्रमाण त्या मानाने कमी जरी असलं तरी आहे.आणि वाटेल तसं फास्ट फूड खावून-स्वस्तात मिळतं म्हणून - मध्यम वर्गीय आणि गरिब लोक लठ्ठ होत राहिले आहेत.अहो, ह्या मासांत प्रोटिन्स अफलातून असतात.ते हजम करायला एक्झरसाईझ घेतला पाहिजे पण आहे कुणाला वेळ.? अनावश्यक लठ्ठपणा कसा होत आहे हे पण आता एकडच्या आरोग्य संभाळणार्‍या लोकाना कळलं आहे.”
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.मी त्याना म्हणालो,
” हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र्य आहे.मूभा आहे.संस्काराबद्दल म्हणालात तर,
“कायदा न मोडता तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा”
हेच इकडचे संस्कार आहेत.
कसले संस्कार घेऊन बसलात भाऊसाहेब?”
असं मी त्याना म्हणालो.
थोडेसे नाराज होऊन मला म्हणाले,
”सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का?
” अरे संसार संसार ” तेच शब्द् “अरे संस्कार संस्कार” अशा अर्थाने माझ्या मनांत घोळत आहेत.
बहिणाबाईने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे?तसंच काही तरी संस्कारावर लिहा.”
पुढल्या खेपेला भेटलो तेव्हा त्यांना मी ही कविता वाचून दाखवली.

अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!

अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!

अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता इथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!

अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!

अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!

अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishanas@gmail.com

Friday, March 20, 2009

अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.

”सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे.”

माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा.
त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली.
मी त्याला म्हणालो,
“सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला तुझ्या वकिली पेशात बरीच उपयोगी होत असेल.”
मला म्हणाला,
” हो मला सत्याचा पाठपुरावा केल्याशिवाय चैन पडत नाही.ती पैज हरल्याचं अजून मला लागतं.पण त्यानंतर मी अयशस्वी झालो तरी सत्याचा पाठपुरावा सोडत नाही. “

मी काही तरी दहा वर्षाचा असेन.आमच्या शेजारच्या एका मुलाला जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्याला मी विचारलं,
“वेसावं हे ठाण्याच्या पश्चिमेला जास्त आहे की बोरिवली पश्चिमेला जास्त आहे?.”
त्याचं म्हणणं बोरिवली.पण खरं उत्तर वेसावं आहे. त्याच्या उत्तराची त्याला इतकी खात्री होती की तो माझ्याशी पैज मारायला तयार झाला.
मला म्हणाला,
“लागली शंभर रूपयांची पैज”
मी घरातून नकाशा आणला.त्याकडे पाहून तो मला म्हणाला,
“हा नकाशाच चमत्कारीक आहे”
खरं तसं नव्हतं.
मी त्याला म्हणालो,
“अरबी समुद्राला उत्तर दक्षिण समांतर रेष काढलीस तर वेसावं,रेषेच्या समुद्राच्या बाजूला जास्त दिसतं.आणि समुद्र हा रेषेच्या पश्चिमेला आहे हे निश्चित.
त्याचं म्हणणं ती रेषा काही कामाची नाही.कारण ती समुद्रातून जात नाही.मी त्याला म्हणालो,
” ह्या उत्तर दक्षिण समांतर रेषा असतात त्या दोन ठिकाणामधे कोणतं ठिकाण पूर्वेला किंवा पश्चिमेला आहेत ते दाखवतात.आणि ह्या रेषा जमिनीवर आहेत की समुद्रात आहेत याचा फरक पडत नाही.”
मला एक दुस्तर अडचण होती. तो माझ्यापेक्षां गलेलठ्ठ होता.म्हणून मला चूप बसावं लागलं.
ह्या लहानशा गोष्टीतून मी बर्‍याच निष्कर्षाला आलो.
सत्य ही एक चीज आहे.परंतु,बरेच वेळां,त्याकडे आपण अबाधीत स्वारस्य ठेवून दुर्लक्ष तरी करतो किंवा सरळ सरळ त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो.दूसरं म्हणजे एखाद्दा गोष्टीवर विचार केला म्हणून ती गोष्ट खरी होत नाही.
सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे आणि सत्याला मागोवा असतो.खरंच काय झालं?.खरंच जे आहे त किती खरं आहे?.असा तो मागोवा असतो. त्याचा पाठपुरावा करावा लागतो.

पंधरा वर्षापूर्वी मी अशाच एका निरपराध व्यक्तिच्या कथेवर लडखडलो होतो.वकिली हा माझा पेशा असल्याने त्याला मरणाच्या दाढेतून ओढून काढायाला यशस्वी झालो.ते जरी माझं हार्डवर्क होतं,तरी त्यात माझं थोडं लक होतं आणि रोगविज्ञान संबंधी एक डोक्यात सणकही होती. शेवटी त्यात मी यशस्वी झालो.
मी त्या गोष्टीच्या मागे लागण्याचं कारण मला वाटायचं सर्व प्रश्नांना उत्तरं असावीत.”त्यानेच ते केलं काय?”,”तो अपराधी होता की निरपराधी?” “त्याने ते केलं नसेल तर कुणी केलं?”
अशी सर्व छान-बिन केल्यावर मला यश मिळालं.आपण छान-बिन करतो त्यात कधी यश येतं कधी येत नाही.अगोदरचं कळायला काही मार्ग नसतो.प्रश्नांना उत्तरं असणार असं मनात आणून मार्गस्थ व्हावं लागतं.उत्तर मिळेल अशा तत्वावर भरवंसा ठेवून पुढाकार घ्यावा लागतो उत्तर जरी मिळालं नाही तरी. उत्तराला पर्याय मात्र अस्वीकारणीय असतो.
मला कधीच माहित होणार नाही की त्या शेजारच्या मुलाला वेसावं,बोरीवलीच्या दिशेच्या संबंधाने माझ्या भावार्थाचं तर्कट खरं कळलं की नाही.किंवा त्याला सर्व कळलेलं होतं पण तो कबूल करायला तयार नव्हता.किंवा ते त्याला कळलं असेल पण त्याला पैजेचे पैसे द्दायचे नव्हते.मला हे कदापीही कळणार नाही.
एव्हडंच मला कळलं होतं की माझे शंभर रूपये मला मिळाले नाहीत.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, March 18, 2009

नको बागेत तू येऊस

केशभार तू असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या त्या सांवल्याना
नको लज्जीत करूस

प्रीतिच्या महतीचे गुणगान
नको तू ही बागेत गाऊस
ऐकून ते गीत भ्रमाकडून
नको हंसे करून घेऊस

प्रेमाच्या गोडव्याचे भ्रमाला
कुठून असावे ज्ञान
मी तुला काय सांगू
त्या कळ्यांना तू विचार

शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
लफंगा असे हा भूंगा
घेशील मग तू माझाच पंगा

नच शोभते रे तुला
असे भ्रमराला बोलणे
पावित्र्य त्या प्रीतिचे
असे झडकरी विटवीणे

देशील का रे तू मज
साथ तुझी हाती घेऊनी हात
जाशील जेव्हा त्या तिथे
हे क्षीतज झुकते पुर्ण जिथे

येईन मी ही तुझ्या संगती
नको होऊस वाटेत वेगळा
प्रेम अपुले कुतुहले पाही
हा जमाना सगळा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 16, 2009

“आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो.”

”मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात,
”आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो”

श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्त शिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या सारखं काही केलं नाही. त्याच्या वाडवडीलानी शेती आणि बागायती घेऊन त्यावरच उदर्निवाह केला त्यावरच तो आपलं उर्वरीत आयुष्य जगतोय.
काल त्याचा मुलगा अमेरिकेहून थोड्या दिवसासाठी गावाला आला होता.श्रीधरला मनोमन वाटतं की आपल्या मुलाने परदेश सोडून आता इकडे येऊन राहावं आणि आपली शेतीवाडी पहावी.माझ्या समोर एकदा त्याने मुलाला जवळ बोलावून त्याला मनातल्या चार गोष्टी सांगाव्या ह्या इराद्दाने विषय काढला.
तो मुलाला म्हणाला,
“आता माझं पण वंय होत आलं आहे.तू एकूलताएक आहेस.ही एव्हडी शेती,ही आंब्या,फणसांची आणि नारळांची झाडं,ही एव्हडी बागायती आपल्या वाडवडीलांनी जोपासून वाढवली आहे,ते माझ्या नंतर पुढे चालू ठेवण्यासाठी तुझी इथे राहाण्याची अत्यंत जरूरी आहे तुला नाही का वाटत?”
मुलगा आपल्या वडीलांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच मी मुलाला माझा प्रश्न केला,
“का रे,इतक्या लांब राहून तुला तुझ्या घराची आठवण तरी येते कां?.”
अगदी मी असाच काही तरी प्रश्न विचारावा अश्या अपेक्षेत असलेला तो मला अगदी मनापासून म्हणाला,
“मी जरी आता माझ्या जन्म झालेल्या राहत्या घरापासून दूर असलो तरी त्या खिडक्यांवरच्या जूनाट वेली,माझ्या पंजोबानी बांधलेला मागचा मांगर, चोहोबाजूला उंच उंच नारळाची झाडं-माड-आणि त्यावरचे नारळाचे पेड, खूप वर्षाची फणसाची झाडं आणि त्या झाडांच्या बुंध्यावर लटकणारे ते रसाळ आणि कापे फणस,समोरचं औदुंबराचं झाड आणि त्याच्या सभोवती बांधलेला चिरेबंदी कट्टा त्या कट्ट्यावर पडून विखूरलेली औदुंबराची लहान लहान फळं,त्या फळांतली साखर खायला सोकावलेल्या लालसर मुंग्या,कलमी आंब्याच्या झाडांच्या पानाला आलेले आणि भरभर पळणारे केशरी हुमले,आणि त्यांची जाळीदार घरटी,ह्या सर्व प्रतिकृत्या मी तिकडे आठवल्यावर माझ्या घरापासून मी दूर आहे हे मला भासत नाही.पण खरं सांगू का तिच तिच शेतीची, बागायतीची कामं गेल्या पिढ्यानपिढ्या तिथेच राहून वर्षानुवर्ष करण्याने डोक्यावर निष्कारण ओझं ठेवून बंधनात राहिल्या सारखं होतं.”
हे त्याचे विचार श्रीधरच्या कानावर पडल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला त्याच्या या विचाराच्या पलिकडे जाऊन काही तरी सांगावं.
माझ्याकडे नजर ठेवून पण मुलाला उद्देशून म्हणाला,
”उलट ती कामं ही एक असामान्य सांखळी माझ्या पूर्वी जन्माला आलेल्यांची होती ज्यामुळे त्यानी अविरोध वाढणार्‍या त्या वेलींची कापणी करून त्यांना सुशोभित ठेवलं, त्यानी ज्या मशागती केल्या आणि घराची डागडूजी केली,त्याच गोष्टी मी आता करीत आहे.त्या माझ्या पूर्वजानी ब्रिटीश सत्येचा दाह सोसला, ज्यांनी स्वातंत्र्याची फळ चाखली,ज्यांनी थंड पाण्याने आंघोळी केल्या,आणि येईल त्या परिस्थितीला तोंड दिलं,ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात आणून मला नेहमीच वाटलं की इथे राहून ती कामं ओझं न मानता रहावं. तरच इकडच्या समस्या, महागाई,राजकारण, आतंगवाद आणि अश्या अनेक प्रकारच्या संकटाना सामोरं जायाल कठीण होणार नाही.”
हे ऐकून,मोठं धारीष्ट करून श्रीधरचा मुलगा म्हणाला,
“जग सतत पुढे पुढे जात आहे.लोक लांब जाऊन स्थाईक होत आहेत.आणि त्यांना तिथे स्थिरता मिळाल्याने तिकडेच राहाण्यात समाधान मानीत आहेत.”
हा त्याचा विचार ऐकून श्रीधरचा चेहरा जरा पडलेला मला दिसला.
त्याला सावरण्यासाठी मला जे पटकन लक्षात आलं ते सांगावं म्हणून मी म्हणालो,
“मला वाटतं आपणां सर्वांना ह्या सतत पुढे पुढे मजल दरमजल करणार्‍या, जगात खरं उचित काय आहे ते सिद्ध करायची जरूरी आहे.काही लोक नावीन्यासाठी आपलं घर सोडून आणि कधी कधी आपला देश सोडून स्थायीत्व मिळण्यासाठी आपल्या मित्र-मंडळीचा किंवा समाजाचा टेकू घेतात.काहीना धर्म स्थिरता देतो. परंतु,आपल्याला आपण रोजच सुचित करणार्‍या पाट्या लावून त्यावर लिहिलं पाहिजे की,” घर सोडून राहाण्यात काही नाविन्य असेलही पण इकडे जे आपल्या पूर्वी येऊन गेले त्यांच्या त्यावेळी, घडत गेलेलं आणि आता घडत असणारं,काही चांगलंही नाही आणि वाईटही नाही.”
मला मधेच बोलताना थांबवून श्रीधर म्हणाला,
“माझ्यासाठी मी म्हणेन हे माझं घर,ती वृक्षवल्ली, त्या खिडकीवरच्या वेली माझं मूळ आहे. जरी ह्या जगात मी एकटा आलो आणि एकटाच जाणार असलो तरी मी काही इकडे एकटा पडलेला नाही.”
वडलांचा विचाराचा कल पाहून त्यांना थोडसं बरं वाटावं म्हणून श्रीधरचा मुलागा म्हणाला,
“मला वाटतं,आपण सगळे आपल्या अस्तित्वाच्या शृंखलेचा नैसर्गिक दूवा आहोत.आणि आपल्यापूर्वी आलेल्यानां जशी,आता काय वेळ झाली आहे?,पुढचा येणारा ऋतू काय आहे?,वारा उत्तरेकडून वाहतो की दक्षिणेकडून? आणि उद्दा पौर्णिमा आहे का? हे समजण्याची जी जरूरी होती तिच जरूरी आपल्याला आहे.”
हे त्याच्या मुलाचे विचार ऐकून श्रीधरचा चेहरा आनंदी दिसला.
मला ते पाहून बरं वाटलं मी श्रीधरला म्हणालो,
“जग सतत बदलत चाललेलं आहे पण मनुष्य स्वभाव मात्र बदलत नाही.जे काही आपलं उणंपूरं आयुष्य आहे त्यातून कसला तरी अगम्य अर्थ काढून आपलं सांत्वन करून घेतलं पाहिजे की आपले पुर्वज ह्यातून पूर्वीच निभावून गेले आहेत.”

माझ्या विचाराची री ओढीत श्रीधर अप्रत्यक्षपणे मुलाला म्हणाला,
“कदाचीत तुम्हाला हे भूतकाळ आठवून वर्तमानात राहाण्याची क्रिया मोठी दखल घेणारी वाटेल. पण मला ती अत्यानंद देणारी वाटते.
मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात. त्या आपल्याला आश्वासन देतात,
”आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 14, 2009

छ्न छ्न घुंगरू वाजवीत पायी

कोण बरे आले माझ्या मनी
छ्न छ्न घुंगरू वाजवीत पायी

नयन न जाणे,अंतरंगा ओळखणे
मुद्राच तिची जर का अशी
स्मृतीत आणून येई ना कशी
वेडे मन माझे चिंतनात डुबले
स्वपना मागे स्वप्न घेऊनी
कोण बरे आले माझ्या मनी

पळभर करिता चिंतन मनी
ही आशा रूप बदलून येई
दुसर्‍या क्षणी भासे मजला
असेल का तिचीच परछाई
एक विलक्षण प्रीति घेऊनी
अनोळख्याच्या दारी येऊनी
कोण बरे आले माझ्या मनी
छ्न छ्न घुंगरू वाजवीत पायी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 12, 2009

तात्यांची व्यथा

तात्यांच्या वेबसाईटवर अलिकडे खूपच सभासदत्व वाढलं आहे.इतकं म्हणाल तर तोबा तोबा.
तात्यानी रोपटं लावलं आणि त्याचा प्रचंड वटवृक्ष झाला.आता वटवृक्ष झाल्यावर मैना,साळूंकी कोकिळे बरोबर गिधाडं आनि घुबडं पण त्या वटवृक्षावर येऊन बसायला लागली.
तात्यांची व्यथा होती की ह्या गिधाडांना आणि घुबडांना मज्जाव कसा करायचा.
तात्या म्हणाले,
"ओळख द्दा आणि सभासद व्हा" असा नियम करावा असा विचार येतो.
नेहमी प्रमाणे लागलीच तात्यांच्या विचारावर आपला विचार वाचक देऊं लागले.
कुणी म्हणालं,
"विचार आवडला"
कुणी म्हणालं,
"आम्ही ओळख दिली आणि मग आम्हीच लफड्यात्त आलो तर?"
तर कुणी म्हणालं,
"बंदी घाला"
तर आणखी कुणी म्हणालं,
"लोकशाहीत बंदी घालणं योग्य नाही.येऊ देत त्यांना"

कुणी असं करा म्हणालं तर कुणी तसं करा म्हणालं.
मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे तात्यांना कवितेतून माझा विचार दिला.
कवितेचं शिर्षक होतं.

तात्यांची व्यथा

लाविले तात्यानी एक रोपटे
वटवृक्ष कधी झाला न कळे
किलबिल करती अनेक पक्षी
संख्या सभासदांची आहे साक्षी

गिधाडे,घुबडे अन कावळे
कोकिळा, साळूंकी अन बगळे
विश्राम करीती मिळून सगळे

बोलले तात्या त्या वडाला
पाहूनी तुला झालास मोठाला
करू का मज्जाव यापुढे गिधाडाला
दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला

स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला

कवितावाचून तात्या म्हणाले,
"सामंतकाकांची कविता लै भारी!"



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 10, 2009

“न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते”

आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली.
प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले,
“न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल.
माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद्राच्या किनार्‍यावर सोनेरी वाळूत बसून ओहटीच्यावेळी पाणी किना‍र्‍यापासून खूपच दूर गेल्याने परिसरात एक प्रकारची पोकळी येऊन शांत वातावरणात सर्व भकास वाटायचं.पण एखादी थंड वार्‍याची झुळूक आल्यावर मन प्रसन्न व्हायचं.आमच्या बरोबर आलेली बरीच मुलं आणि मुली समुद्रात पोहायला गेल्या होत्या काही मुलं आणि मुली किनार्‍यावर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत गोष्टी करीत करीतचालत फेरफटका मारीत आणि वाटेत दिसल्या तर वाळुतून रंगीबेरंगी शंख,कवड्या कुतूहल म्हणून गोळा करीत फिरत होत्या.

कमला पारसनीस,अतुल शृंगारपूरे आणि संजय साखळकर हे ह्या गर्दीत नव्हते.चौकशी केल्यावर मला कळलं की ते तिघेही गावात गेले आहेत कारण संजय साखळकरची नातेवाईक मंडळी गावात राहतात.त्यांना भेटायला म्हणून आणि कमला,अतुल यांना समुद्राचं इतकं आकर्षण वाटत नव्हतं म्हणून ती दोघंही त्याच्या बरोबर गांव धुंडायला गेली होती.
यायला बराच उशिर झाल्याने ती तिघं संजयच्या ओळखीच्या होटेलमधे राहिली.

गावात राहाणार्‍या प्रभाकर तांब्यांचा मुलगा शरद हा त्या होटेलमधे मॅनेजरची नोकरी करीत होता.उन्हाळ्याच्या सुट्टीत तो मुंबईहून दोन महिन्यांसाठी आला होता.वडलांना तेव्हडाच हातभार लागावा म्हणून त्याने होटेल मालकांच्या ओळखीने जॉब पत्करला होता.खरं तर तो मुंबईत पवईला आय.आय.टी मधे दुसर्‍या वर्षात शिकत होता.
शरद हा खूपच लाघवी स्वभावाचा होताच,आणि कुणाशीही गोड बोलून त्याला आत्मसात करण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.मला तांब्यांची माहिती असण्यांचं कारण माझी मेहूणी गणपतीपुळ्याला गेली कित्येक वर्षं राहाते.तिची तिकडे शेतीवाडी आहे.तांब्यांचा आणि माझ्या मेहुणीचा घरोबा होता.त्यामुळे मी शरदला लहानपणापासून ओळखतो.

आता मुळ मुद्दाकडे वळताना सांगायचं म्हणजे,शरदने त्या तिघाना तिन बेड असलेली एक खोली एक रात्री साठी दिली.खरं म्हणजे एका खोलीत दोन बेड्स असतात पण शरदने त्याना आणखी एक बेड देऊन त्यांची सोय केली होती.एका खोलीचाच चार्ज त्यांना लावला.
कमलाला एकटं एका खोलीत झोपायला भिती वाटत होती आणि एकट्या पुरुषाबरोबर राहायची तयारी नव्हती म्हणून ही सगळी सोय केली गेली होती. मधूनच वेटर चहापाणी आणि इतर सोयी साठी खेपा मारून गेला होताच,आणि शरद पण एक दोनदा त्यांची चौकशी करून गेला होता.कमलला त्याचा स्वभाव खूपच आवडला होता.जेवणं वगैरे झाल्यावर हातपाय मोकळे करण्यासाठी जरा बाहेर जाउन येऊया असं अतुल शृंगारपूरेने सुचवलं.आणि संजय साखळकर कबूल झाला पण रात्र बरीच झाली होती आणि नवख्या गावात जायला कमलाने नाकमुरडलं आणि दिवसभर दमल्यामुळे मी इथेच रेस्ट घेते म्हणाली.
ते निघून गेल्यावर जराशी पडते म्हणून अंग टेकलेल्या कमलाला गाढ डुलकी लागली.तिला जाग आली तेव्हा तिला कळलं कोण तरी आपल्या बेडकडे उभा राहून एक नजरेने बघत आहे.तो कसा आत आला कुणास ठाउक त्या खोलीतल्या जेमतेमच्याउजेडात तो कोण आहे हे कळण्यापूर्वीच त्याने तिच्याशी अतिप्रसंग केला.आणि नंतर पळून गेला.अतुल आणि संजय खोलीत परत आल्यावर त्या भयभयीत आणि हुमसून हुमसून रडणार्‍या कमलाला पाहून अचंबीत झाले.
झालं,पोलीस आले केस झाली,आणि ओळख परेडमधे तिने शरद तांब्याचा संशय घेतला.वेटर वयस्कर असल्याने तिला त्याचा संशय आला नाही.
ओळख परेडमधे शरद फिट येऊन पडला.तो नाटक करीत असल्याचं कमलासकट इतराना वाटलं.
केसचा निकाल लागून शरद अकरा वर्षं सहा महिन्यांच्या तुरंगात गेला.
मला तर ह्या घटने नंतर गणपतीपुळं म्हटलं की ही सर्व घटना आठवून दुःख वाटायचं.कारण तांब्यांचा शरद एव्हड्या खालच्या पातळीला जाईल असं स्वपनातही वाटत नव्हतं.
पाच वर्षानंतर डीएनए टेस्ट वरून शरद निरपराध आहे हे लक्षात आलं.आणि त्याला शिक्षा पूरी करावी लागली नाही.
तो सुटून आल्यावर मला भेटला.आणि त्यापूर्वी कमलालाही भेटला होता.मी कमलाची आणि त्याची माझ्या घरी एकदा भेट करून दिली.
शरद म्हणाला,
“आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला. दोघं मिळून आम्ही एकमेकाला सुधारत आहो.”
कमला म्हणाली,
“माझा क्षमा करण्य़ावर विश्वास आहे.ज्यामुळे क्रोध आणि द्वेष होण्यापासून मुक्त करून माणसाला मनःशांती मिळायला त्या क्षमेमधे क्षमता आहे.”
शरद म्हणाला,
“मलाही तसंच वाटतं.मी एक क्रोध घेऊन तुरंगात गेलो होतो.आणि त्यात माझ्या मला समाधान करून घेत होतो.परंतु,ह्या मनोभावनेने तुरुंगात मी माझ्या मनाला निराळ्याच तुरुंगात जखडून ठेवीत होतो.मी माझ्यातल्या द्वेषभावनेला सुटका देऊन आणि क्षमा मनात ठेवून जीवन जगायच्या प्रयत्नात होतो.
कमला म्हणाली,
“मी शरदला माझ्यावर अतिप्रसंग करणारा म्हणून निवडलं आणि आता पाच वर्षानी माझी चूक माझ्या लक्षात आली.ते मला असहनीय होतं.माझ्या मनात शरद हा एक पशू वाटत होता.पाच वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवस त्याला मृत्यु यावा म्हणून मनात प्रार्थना करायची. खरं कळल्यावर मला मी प्रचंड अपराधी समजू लागले आणि माझी मला लाज वाटू लागली.एका निरपराध्याला माझ्या चूकीमुळे तुरुंगवास भोगावा लागला.मध्यंतरी खरा अपराधी इतर स्त्रीयावर अत्याचार करीतच राहिला.हे पाहून माझ्या मला मी क्षमा करूच शकले नाही.
शरद म्हणाला,
“मला त्या ओळख परेड मधून मी तिचा अत्याचारी म्हणून निवडून काढल्यावर कमलाला मला क्षमा करायला इतराना वाटेल त्यापेक्षा खूपच कमी वेळ लागला. मला ठाऊक होतं की तिच्यावर अत्याचार झाला होता आणि त्याचं तिला भारी दुःख होत होतं.पण मला पण दुःख दिलं गेलं होतं.मी माझे नातेवाईक गमावून बसलो होतो.माझं स्वातंत्र्य गमावून बसलो होतो.पण मी कोण होतो आणि मी तो पशू नव्हतो हे मला माहित होतं.मला हा कमलावर अतिप्रसंग कुणी केला होता ते माहित होतं. तो मला तुरुंगात ठेवून गेला आणि कदाचीत त्याने स्वतः काय केलं त्या गोष्टीचा कबुली जबाब न देतां नरकातही जाण्याचं पत्करलं असेल. त्याचा द्वेष न करणं मला कठीण जात होतं.परंतु,माझ्या मनात मी मोकळा राहावा की नाही हे केवळ माझ्याच हातात होतं.
कमला म्हणाली,
“मी शरदला म्हणाले तुझ्याकडे मी क्षमेची याचना केली तर ती पूरी करशील का?
ते ऐकून, जगात उरली सुरली असलेली दया कोळून पिऊन त्याने माझा हात आपल्या हातात घेत ढळढळा अश्रूची धार आपल्या डोळ्यातून वाहू दिली.वर मला म्हणाला,
“मी तुला केव्हांच क्षमा केली होती.”
आणि त्या क्षणापासून माझ्यात सुधारणा होऊ लागली.सर्व दुःख कसं हजम करावं ते शरदने मला शिकवलं.त्या रात्री मला त्याने क्षमा केल्याने मी वेदनाहीन झाले, मी माझ्या मनावरच्या भारापासून मोकळी झाले.शरदने मला क्षमा केली नसती तर मी त्या घटनेने मला बंधनात ठेवलं असतं.आणि ते सुद्धा ते बंधन माझ्या आयुष्यभर राहिलं असतं.नंतर माझ्या हे ही लक्षात आलं की ज्याने माझ्यावर अत्याचार केल होता त्यालाही मी क्षमापात्र करू शकते-त्याच्याकडून विचारलं जाईल म्हणून नव्हे,अथवा तो तसं करून घ्यायला लायक आहे म्हणूनही नव्हे- तर मला स्वतःला द्वेषाच्या तुरुंगात जखडून ठेवावयाला इच्छा नव्हती म्हणून.
शेवटी शरद म्हणाला,
“मी आणि कमला आता मित्र झालो आहो.आणि काही लोकाना हे समजत नाही. आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला.दोघं मिळून आम्ही एकमेकाला सारख्याच अनुभवाच्या प्रक्रियेतून सुधारत आहो.मला कडवटपणा ठेवता आला असता,मला त्या तुरुंगातल्या शिपायांशी आणि त्या तुरूंग पद्धतीशी द्वेषाने राहता आलं असतं.पण त्या सर्वांना मी क्षमा करायचं ठरवलं.कारण असं केल्याने मी स्वतः मोकळा झालो आणि माझ्या उरलेल्या जीवनात माझ्या मला तुरुंगवासी म्हणून राहायचं नव्हतं.”

अगदी पीन-ड्रॉप-सायलेन्ट राहून मी भाऊसाहेबांच सगळं ऐकून घेऊन झाल्यावर कुतूहलाने विचारलं,
“पण भाऊसाहेब,शेवटी खरा गुन्हेगार कोण तो सांपडला का?”
त्यावर प्रो.देसाई म्हणाले,
“शरदने मला मोठ्या मुष्किलीने सांगतलं की तो अपराधी त्या होटेल मालकाचा एकोणीस वर्षाचा मुलगा होता.ह्या होटेलात संधी मिळताच तो असाच बायकांवर जबरद्स्ती करायचा.एका गुन्ह्यात एका बाईने त्याचे अतिप्रसंग करताना डोक्यावरचे केस ओढले.आणि साक्षीपुरावा म्हणून त्या केसाचा उपयोग डीएनए टेस्टसाठी वापरायला उपयोगात आणले.कारण ती बाई एक फोरेन्सीक एक्सपर्ट होती.शरदची अपराधी म्हणून अटक झाल्यावरही त्या होटेलमधे असेच गुन्हे होऊं लागले.पाच वर्षानंतर सबंध होटेलशी संबंधात येणार्‍या सर्वांची डीएनए टेस्ट घेतल्यावर त्या बाईने ओरबडलेल्या केसांच्या आधारावर मालकाच्या मुलाला पकडलं गेलं.आणि तशीच शरदची डीएनए टेस्ट घेतल्यावर सुटका झाली.खरं म्हणजे कमलावर झालेल्या अतिप्रसंगात शरदला ह्या मालकाच्या मुलाचा संशय होता.पण पोलिसाना सांगूनही त्यानी पैसे खाऊन त्या मुलाला ओळख परेडमधे आणलं नाही.”
हे ऐकून मी प्रो.देसायाना म्हणालो,
“आता मला कळलं खर्‍या पुराव्या आभावी न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर ती बहिरी आणि मुकी पण असते. असं तुम्ही का म्हणालात ते.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 8, 2009

एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून

मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी

नेत्रातल्या अश्रूंना पापण्यानी सावरले
रक्तातल्या शाईने चित्र तुझे रेखाटले
भेटण्या सजणा पाहिले उपाय करूनी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी

श्रावणातल्या सुरम्य रात्री करीती बेचैन
एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून
वेडी होऊन मीच मला बांधिले शृंखलानी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, March 6, 2009

वर्तमानात राहाण्याचा फायदा.

“अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं.”

किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं. मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो. गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती.गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते.
किशोर पाटलाची माझी जूनी ओळख होती.पण मुंबईतल्या झकाझकीच्या आयुष्यात कुठली भेट व्हायची.अशाच काही प्रसंगातून योगायोग आला तरच.मी त्याच्या भावाचा विषय काढला नाही.मला त्या पार्टीत त्याला निरूस करायचं नव्हतं. पण माझी आणि त्याच्या भावाची चांगलीच गट्टी होती ते किशोरला माहित होतं.म्हणूनच तो म्हणाला,
सहा वर्षापूर्वी माझा धाकटा भाऊ,जो माझा खरा मित्र होता,आणि आमच्या अगदी जवळच्या नात्यातला उरलेला सदस्य होता त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला होता. यापूर्वी कधीही मला असा अनुभव जाणवला नाही किंवा त्यानंतर सुद्धा असा अनुभव जाणवून पण माझा विश्वास बसण्यासारखा हा मला अनुभवाचा प्रचंड धक्का होता.
तोपर्यंत,जीवन नेहमी माझ्या बाजूला सरकायचं.माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं. माझं वर्तमान, भविष्यात आणि भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं.जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं.
मी माझ्याशीच प्रतिज्ञा केली की माझ्या भावाचा मृत्युचा सन्मान करायाचा झाल्यास मला माझ्या जीवनात वर्तमानातच राहावं लागणार.मला दिसून आलं की नव जग माझ्या समोर खुललं गेलं आहे.जे जीवन विस्ताराने समृद्ध होतं.ते व्यापक होतं आणि उजाडही होतं. चिंतन करण्याची, पर्वा करण्याची,दूरदर्शितेची आणि क्रियाशिलतेची माझी संभवता वाढली. जे बोलायचंतेच निशःब्द राहिलं.
वर्तमानात राहणं सोपं नाही.एखाद्दा चांगल्या दिवशी मी एक दोन टक्के जागरूत राहायचो.उरल्यावेळात मी प्रतिक्रिया द्दायचो.बहुदा त्या प्रतिक्रिया प्रत्यक्षपणे विचारपूर्ण नसायच्या.त्या केवळ प्रतिसादात्मक असायच्या.
अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं.
प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात.आणि जेव्हडं म्हणून मी असं करायला जायचो तेव्हडं मला मीच जास्त आकांक्षा करतोय असं वाटायचं.
मला दिसून यायचं की माझं स्वतःचं मनच माझी सीमा असायची.ज्या काही मनात कुठल्याही गोष्टीच्या संभवता यायच्या त्या आपल्या आवाक्याबाहेर आहेत अशी मी समजूत करून घ्यायचो.त्यांची आशा करणं शक्यतेच्या पलिकडचं आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं विक्षिप्त वाटायचं. पण जर का त्या घडवून आणण्य़ाच्या आपल्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही तर त्या कधीच घडणार नाहित हे नक्की.
माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं.
माझ्या भावाची आठवण येऊन मी नेहमीच रडत असतो.अनेक गोष्टी मधली ही एकच गोष्ट की ज्या साठी मी माझे डोळे अश्रूनी भिजवत असतो. त्याच्या बरोबर राहून मी अनेक संध्या घालवल्या कारण मी त्याच्याबरोबर वर्तमानात नव्हतो. त्या घालवलेल्या संध्या मला पुन्हा कधीच मिळणार नाहीत.एक ना एक मार्गाने तो वर्तमानात पूर्ण हजर असायचा.त्याला दुसरा कसलाच मार्ग माहित नसावा. आता मला माझं जीवन जे कमी झालं त्याहून आणखी कमी करायचं नाही. वर्तमानात राहून, जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना.”
किशोर पाटलाला मी “स्टिम-आऊट होऊं दिलं.मला माहित होतं की त्याचं जे वर्तमानात राहण्याचं मन होतं ते माझ्याकडे त्याला उघड करायचं होतं. प्रसंग जरी थोडा वेगळा असला तरी.
त्याचं सर्व सांगून झाल्यावर मीच त्याला म्हणालो,
“किशोर,खरोखरंच तुझी विचारसरणी मला आवडली.मुख्य म्हणजे तू म्हणतोस ते,
“जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं.”
सामंतसरांच्या पार्टीची मजा मिळालीच त्याउप्पर तुझ्याकडून जो संदेश मिळाला तो लाख मोलाचा ठरला.”
किशोर पाटिल खूष झालेला पाहून मला ही आनंद मिळणं उघडच होतं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, March 4, 2009

आठवतो तो क्षण अजूनी मला

नसेल भेटता आले मला
नसेल बोलाविले मी तुला
दूरी अपुल्या प्रीति मधली
मिटवू न शकली तुला मला

आठवतो तो क्षण अजूनी मला
जेव्हा भेटलो मी तुला
एक इशारा होऊन गेला
हात मिळाले शब्द दिला
पहाता पहाता दिन संपला
त्या समयाची स्मृति अजूनी
जाईन कशी मी विसरूनी

का ठाऊक होते मिळालो
आपण त्या दुराव्यासाठी
नशिब अपुले बनले होते
बिघडण्यासाठी
प्रीतिची फूलबाग बनली होती
उजाडण्यासाठी
गेली उजाडून अशी ती
पुन्हा न बनण्य़ासाठी

स्मृती राहूनी जाई समय निघून जाई
फूल फूलून राही अन मग कोमेजून जाई
सर्व निघून जाती अन वेदना चिकटून राही
कलंकीत केलेस जे तू मला
कसे विस्मराया सांगू हृदयाला
आठवतो तो क्षण अजूनी मला
जेव्हा भेटलो मी तुला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 2, 2009

उद्वेग विसरून कसं चालेल?

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?

गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?

जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?

लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग

मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?

शेवटी काय?

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com