Thursday, December 20, 2007

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं


नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता.मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता.आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला.
म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?.
बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले. प्रकृती अस्वाथ्यामुळे त्याच्या आईला अगोदर पासून झटपट हालचालीची मुभा कमी होती.तशातही तिने आपल्या दोन मुलांना अगदी कष्ट काढून वर आणलं. आणि दोन्ही मुलांना चांगलं शिकवून त्यांची लग्नं करून देवून नुकतेच कुठं स्वतःच्या असहकार्य करणाऱ्या प्रकृतीला, उतार वयांत दोन हात करून राहाण्याचं आयुष्य हंसतमुखाने जगत होती.
म्हणतात ना "दुःख पर्वता एव्हडे,सुख जवा पाडे" तेच खरं.
"१५७ क्यांप बेळगांव" ह्या याहूच्या ग्रुपईमेलवर जसा तो होता तसा मी पण सभासद होतो.त्या एकट्याने हा ग्रुप जीवंत ठेवला होता.मला त्याची बरेच वेळा ईमेल यायची.अनेकदां "सूर्य,चंद्र,तारे आणी चांदण्या" वर त्याच्या ईमेल असायच्या.मग ती एखादी कविता असेल किंवा एखादी सनसनाटी बातमी असेल.वाचून खूप आनंद व्हायचा.तसंच कधीतरी त्याची ईमेल बरेच दिवस आली नाही तर मी त्याला आठवण करण्यासाठी लिहीत असे अन त्या ईमेलच्या sub मधे मुद्दाम "सागरा प्राण तळमळला" असे लिहायचो,लगेचच तो कळवायचा "काका सॉरी, मी थोडा बिझी होतो" आणि पुढच्या वाक्यात "I know you will write to me next time 'that's ok' " .मनात येतं एव्हडे त्याला सूर्य,चंद्र, तारे आवडत होते म्हणून का त्यांच्यात सामील व्हायला एव्हडी घाई करून गेला.अन मग मान उचलून आकाशाकडे पहायला मन होत नाही.खरंच तो जर दिसला तर ओरडून जरी त्याला सांगितल "सागरा प्राण तळमळला" तर त्याला कळायचं कसं?.
कधी कधी वाटतं,आपल्या जवळच्याला थोडीशी पैशाची जरूरी आहे हे पाहून आपण खिशात हात घालून असतील तेव्हडे पैसे त्याच्या हातात ठेवतो, तसंच खिशात हात घालून आपल्याकडचं आयुष्य देता आलं असतं तर? हे "हिरवं पान " गळून पडूं न देता,आमच्या सारखं " पिकलं पान " गळून पडलं असतं तर काय हरकत असती?"
ईश्वर ईच्छा बली असे" हेच खरं
"ईश्वर आत्म्याला शांती देवो" असं मला त्याला म्हणायची पाळी यावी हे माझं केवढं दुर्भाग्य?

श्रीक्रृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: