Thursday, February 12, 2009

भिंगरी

आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले,
“मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे”
मला म्हणाले,
“भिंगरी,भोंवरा”ज्याला इंग्रजीत “स्पायरल” म्हणतात.”
“म्हणजे,भाऊसाहेब तुम्ही गेले काही दिवस ह्याच विषयावर चिंतन करीत होता की काय?कारण त्यादिवशी लायब्ररीतून येताना मी तुमच्या हातात दोन तीन पुस्तकं बघीतली,एकावर चक्क “स्पायरल” लिहिलं होतं.मी हा काय विषय आहे म्हणून विचारणार होतो पण बोलताना दुसराच विषय निघाल्याने राहून गेलं.” असं मी म्हणालो.
त्यावर भाऊसाहेब म्हणाले,
“आता जे काय जगात चालंय,ते पूर्वी पासून जवळपास असंच होतं की काय?की जसजसा माणूस सुधारू लागला तसतसा तो आजच्या परिस्थितीला आला.ह्यावर माहिती काढण्यासाठी ही तीन पुस्तकं मी वाचली.त्या तिन्ही पुस्तकात तात्पर्य हेच होतं की हे सर्व जीवन भिंगरी सारखं आहे.आपल्याच भोवती गोल गोल फिरत आहे.”
भौतिकवादी लोक जन्माला येण्यापूर्वी मनुष्याची ईश्वरावर श्रद्धा होती. देव मानायचे. आणि आजूबाजूला देवाचंच चैतन्य आहेअसं मानित.त्यात हवा, पाणी,वनस्पती, प्राणीमात्र, धरती,आकाश आणि समुद्र ह्यांची गणना होती.आणि त्यामुळे हे सर्व पवित्र आहे अशी समज असायची.पूर्वज आजूबाजूच्या पर्यावरणाबरोबर समानता ठेवून राहायचे. आणि नंतर आपण हे सर्व विसरलो.असंतोषामुळे आणि विवादामुळे आपण कृर बनलो.कृरतेच्या भूकेला सीमा नव्हती.कितीही पोषण केलं तरी त्यांची समाधानी होत नव्हती.ही धरती दुर्लक्षीत झाल्याने एकाकी राहिली आणि उजाड झाली.वनस्पती,प्राणी आणि धरतीची ताकद नाहीशी झाली.कारण कुणीच लक्ष देईना. पूर,भीषण आगी,वादळं,आणि भूकंपामुळे जवळ जवळ सर्व नष्ट झालं.धरती हादरली. आणि ह्या र्‍हासातून नवं जग प्रकट झालं.

आता लोकाना ऐकू यायला लागलं,दिसूं लागलं आणि खरोखर आपण कोण आहोत हे लक्षात यायला लागलं.आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत सर्व मिळून, हे पण लक्षात यायला लागलं.ह्या परिस्थितीत आपण त्या सुंदर स्मृतीत टिकून राहिलो.आणि ज्याला कायमचा विश्राम दिला पाहिजे होता ते परत प्रकट झालं.मग तो तिरस्कार करणारा प्रेमी असेल,भावाभावातली भाऊबंदकी असेल,मित्रा मित्रातली ईर्ष्या असेल,किंवा एखादा लोभी शासक असेल.मनोभावातली ही एकच भिषण चिरफाड होती आणि राहिलेलो आपण त्याचं अनुकरण करीत गेलो.नाहीतरी मनुष्यप्राणी तसा कमजोर असल्याने कधी तो जंगली असतो आणि कधी प्रेमळही असतो.
त्यामुळे पुनःच्छ तिच कहाणी निर्माण झाली.गांभिर्य,व्यसनाधीनता,प्रेम आणि आवश्यकता हे सर्व त्याच सामुग्रीमधून परत निर्माण झालं.आणि पुन्हा आपण त्याच परिस्थितीत शिरलो आहो. आणि स्मृतिभ्रष्ट झाल्या सारखं करून दाखवित आहो.स्वच्छ आणि ताजं पाणी असतं हे आता फक्त आठवण म्हणून ठेवलं पाहिजे. धरतीमातेची स्तुतीसुमनं गाणारे थोडकेच रहिले आहेत.जन्म-मृत्यूच्या घटना, ज्या आयुष्यात स्थित्यंतर आणतात, ज्या आपल्याला एकमेकाच्या बंधनात जखडून ठेवतात त्यावर आता संघठित धंदेवाईकांच्या व्यवस्थेत धातू,धन आणि यंत्र यानी आपल्याला जखडून ठेवलं आहे.असा जेव्हा दूवाच तुटतो तेव्हा आपली बुद्धिमत्ता आपण हरवून बसतो.सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करायचा हेच विसरायला झालंय.हे दैत्य आता शासकांचं,पुढार्‍यांचं,दफ्तरशाहांचं,आणि ख्यातीवंतांचं वेषांतर करून जगत आहेत.लोकांना उत्पादन वाढवण्यासाठी गुलामगिरीत जखडून ठेवलं आहे.आणि ह्या दैत्यांच्या बॅन्का संपत्तिने भरल्या जात आहेत.पैशेवाल्याना सन्मान दिला जात आहे.मग त्यानी तो पैसा कुठल्याही मार्गाने कमवला असला तरी हरकत नाही.
काय म्हणावं ह्या जगाला?मला एकच वाटतं की ईश्वरावरच्या श्रद्धेच्या प्रकाशाची झोत मनुष्याच्या चुकांमधूनच त्याला मार्ग दाखवते. “
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त जवळ जवळ रात्री नऊ वाजता होतो.नऊ वाजले हे घडाळाकडे पाहिल्यावरच कळाले.
प्रो.देसायांचं चिंतन ऐकता ऐकता वेळ कसा निघून गेला हे दोघांनाही कळलं नाही.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: