Tuesday, September 1, 2009

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पॅसिफिक ओशन- निसर्गाचा एअरकंडिशनर- फुल-स्विंग मधे चालत होता.मिशन हिलच्या शिखरावर हायकिंग करीत जाऊन शिखरावरच्या ट्रान्समिशन लाईनच्या टॉवरावरच्या सिमेन्टच्या चौथुर्‍यावर बसून निसर्गाचा आनंद घ्यायची सकाळीच माझ्या मनात हुक्की आली होती.नेहमी प्रमाणे आयपॉड घेऊन कानाला इयरबड्स लावून मराठी गाण्यांची मेजवानी घेत घेत मजल दरमजल करीत डोंगर चढून जात होतो.
शेवटी एकदाचं शिखर गांठलं.३३हजार व्होल्टसच्या इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईनच्या चौथुर्‍यावर बसतो न बसतो तोपर्यंत बाबुजींच्या आवाजात खेबुडकरांचं ते "आम्ही जातो आमुच्या गांवा" मधलं देवाची पुज्या करतानाचं खूपच प्रसिद्ध झालेलं,
"देहाची तिजोरी,भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा"
हे गाणं ऐकून मन खूपच प्रसन्न झालं.एकदा ऐकलं,दोनदा ऐकलं असं आणखी एक दोनदां ऐकण्यासाठी आयपॉडला रिपिट-मोड मधे टाकलं.
आणि का कुणास ठाऊक त्या ट्रान्समिशन लाईन्सच्या खाली मॅगनॅटिक फिल्ड्च्या प्रभावामुळे, की त्या सभोवतालच्या कुंद वातावरणामुळे माझ्या कवीमनाचा किडा चाळवला गेला.

देवाच्या भक्तिरसाच्या गाण्याच्या माहोल मधून माझं मन प्रीतिरसाच्या माहोल मधे केव्हा गेलं ते माझं मलाच कळलं नाही. मग ह्या गाण्याचं विडंबन म्हणा किंवा आणखी काही म्हणा करावंसं वाटलं.खिशातून एच.पी.चा पामपॅड काढून तिथेच कविता लिहायला सुरवात केली,

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

येते डोळे उघडूनी, जात माणसाची
मनी द्वेषट्याना का गं भिती प्रेमाची
सरावल्या लोकानाही विचंबा का वाटावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

उजेडात होते भेट,अंधारात प्रेम
ज्याचे त्याचे हाती आहे सुरळीत काम
दुष्ट दुर्जानांचा कैसा वाढे हेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

तुझ्या हातून सखये बातमी फुटावी
शांतपणे युक्ति तुझी तुच संभाळावी
मार्ग तुझा सुटण्याचा मला तो कळावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

साधेपणासाठी कुणी मुर्खपणा केला
बंधनात असुनी जगी बभरा झाला
आपुल्या सौख्यात घेऊ जरा विसावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com