Thursday, September 10, 2009

अंगात चांगूलपणा सहजासहजी येत नसतो.

“मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते.”

कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं.
माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं,
“काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला,
“अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गोखले रोडवर ती राहाते. गेल्याच रविवारी आम्ही सर्व तिच्या घरी जमलो होतो.तिच्या नातवाची मुंज होती.तुला तिला भेटायचं असेल तर आपण पुढल्या रविवारी जाऊं पाहिजे तर. कमल दादरच्या गर्ल्स हायस्कूल मधे मराठी विषय शिकवायची,निवृत्त झाल्यावर ती तिच्या मुलीकडे गोखले रोडवर राहते.तिला मराठीत लेखन करायला लहानपणापासून आवडायचं.आता तर ती फावल्यावेळात लेख,कविता लिहीत असते.”
“माझ्या अगदी मनातलं बोललास.नक्कीच आपण पुढल्या रविवारी जाऊया”
मी असं लगेचच त्याला म्हणालो.

माझी नानाने तिच्याशी ओळख करून दिल्यावर मला कमला म्हणाली,
“मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं हे विषय अंतर्भूत करते.”
मी म्हणालो,
“मी नेहमीच तुमचे मासिकात लेख वाचतो.मला वाटतं प्रत्येकाने आपल्याला वाटतं ते लिहावं.कारण मनात जे विचार येतात ते कागदावर उतरल्यावर ती एक विचारांची निर्मिती होते.अगदी तसंच दुसरा लिहिल असं नाही.मला आठवतं लहानपणी शाळेत आमचे शिक्षक एक विषय द्यायचे.आणि आमच्याकडून त्यावर निबंध लिहून घ्यायचे.जेव्हडे वर्गातले विद्यार्थी तेव्हडे निबंधाचे निरनीराळे विषय लिहिले जायचे.ते गाणं आठवतं,
“एका बिजापोटी
तरू कोटी
जन्म घेती
सुमने फळे.”
तसंच काहीसं आहे.आपल्या मनात येणारे विचार ही एक निसर्गाची देणगी आहे. आणि तिला कुणी दाबून ठेवूं नये.तुला कसं वाटतं?”
कमला म्हणाली,
“माझा व्यक्तीस्वातंत्र्यावर दृढविश्वास आहे.स्वातंत्र्याची जरुरी असण्याचं कारण अख्या जगाच्या स्वास्थ्याला त्याचा उपयोग आहे.कारण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या ताकदीत असलं तरच, त्याला त्याच्या मनाप्रमाणे करायला आणि सांगायला मुभा मिळते.प्रत्येक व्यक्तिला त्याच्या दृष्टीने आपल्या जीवनाबद्दल विशिष्ट योगदान करायचं असतं-आणि हे उघडच आहे की प्रत्येक व्यक्ति ही विशिष्टच असते,त्या व्यक्तिची शारिरीक आणि मानसिक ठेवणही विशिष्ट असते,तशीच त्या व्यक्तिची परिस्थिती पण विशिष्ट असते- त्यामुळे प्रत्येक व्यक्ति जे काही सांगेल ते आणखीन दुसर्‍या कुणा व्यक्तिकडून ऐकायला मिळेलच असं नाही.”
मी कमलाला म्हणालो,
“एखाद्या व्यक्तिला हवं तसं बोलायला दिलं आणि करायला दिलं,तर कधीतरी अशी एक वेळ येते की त्याचं हे बोलणं आणि करणं दुसर्‍या एखाद्याला वाटेल ते बोलायला आणि करायाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आड येऊ शकतं.परंतु,हे ही खरं आहे की केवळ बुद्धि आहे म्हणून एखाद्याने वाटेल ते बोलण्याचं स्वातंत्र्य घ्यावं किंवा कसं?.”
“तुमचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे” असं सांगून कमला म्हणाली,
“मनात म्हणते की मी हे जेव्हा राजकारणाविषयी लिहित असेन अशाच वेळी फक्त ह्या गोष्टीवर-स्वातंत्र्यावर- विश्वास ठेवला पाहिजे.पण खरं पाहिलं तर कुटूंब आणि मित्रमंडळी असलेली एक स्त्री म्हणूनही मी अशा गोष्टीवर विश्वास ठेवते. मला खात्री नाही की ह्या विचारसरणीमुळे माझं जीवन सुखकर होईल किंवा कसं.
असं मी कां म्हणते कारण मला असंही दिसून यायला लागलं की प्रतिस्पर्धात्मक स्वातंत्र्याला तोलामोलाने पहाण्याच्या माझ्या प्रयत्नामुळे मी माझ्या आयुष्यात नवीन प्रश्न निर्माण करायला कारणीभूत होते की काय?
आणि त्यामुळे एका मागून एक येणार्‍या नाजुक गोष्टींची गणना करण्यासाठी मी मला त्यात अंतर्भूत करून घ्यायला लागले.मात्र असं केल्यामुळे मला त्यातुन अवसर मिळणं कठीण होत गेलं.”

“मग असं केलं का जात नाही”मी चर्चा पुढे नेत म्हणालो,
“वयक्तिक संबंधाना ही तत्वं वाटलं तर लागू करावीत,कदाचीत सर्वांना माहित असेलही की अशावेळी संबंधावर कसलीच आडकाठी येऊ नये म्हणून प्रेमळपणाचा वापर करणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.पण प्रेमाचा वापर योथोचीत व्हायला खरंच कौशल्य लागतं. पुढे जाऊन,ह्याच तत्वाचा सामाजीक संबंधात वापर केल्यास त्याचा उत्तम उपाय म्हणजे प्रेमळपणा ऐवजी कायदाचा वापर करणं. राजनितीतले शास्त्रज्ञ त्याला “परस्परातील बंधनाची समझ” असं म्हणतात. ह्या बंधनाचा आदर केला गेला पाहिजे.आणि ही “परस्परातील बंधनाची समझ” जर का असफल होऊ लागली तर ज्यावर विश्वास ठेवावा त्या कायद्याकडून हस्तक्षेप केला गेला पाहिजे. तरच त्या बंधनावर विसंबून राहता येईल.”

प्रेमळपणा आणि कायदा याची आठवण येऊन कमला आपला अनुभव सांगताना म्हणाली,
“मी ज्यावेळी तरूण होते त्यावेळी ह्या प्रेमळपणे वागण्यातल्या अडचणी आणि कायद्याचं महत्व ह्या दोन्ही गोष्टीतली खरी मेख मला समजत नव्हती.मला वाटायचं माणसं स्वाभाविकपणे चांगली वागतात,आणि माणसांचे परस्पर संबंध नक्कीच चांगले असणार. आणि कायदा ही एक फाल्तु बाब असून ती लोकांशी फार कठोरपणे वापरली जाते आणि गरिबी संपुष्टात आली की शिक्षणाचा जास्त प्रसार होईल,आणि आपोआप लोक कायद्याचं उल्लंघन करायचं थांबणार.तसंच त्यावेळी खात्रीपूर्वक वाटायचं की मनुष्य स्वभाव लवकरच दोषहीन होणार आहे.”

“गरिबी आणि शिक्षण हे परत परस्परावर अवलंबून आहेत.म्युच्युअली इनक्लुझीव ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं.गरिबी जाण्यासाठी शिक्षण हवं आणि शिक्षण मिळण्यासाठी गरिबी जायला हवी.पण शिक्षण असलं तरी कायदा तोडणारे काही कमी नाहित पण एव्हडं खरं की शिक्षणामुळे कायदा तोडण्याचे प्रकार कमी होतील.
कमला,मला तू एखादं उदाहरण देऊन सांगशील का? कदाचीत त्यामुळे तू म्हणतेस ते जास्त स्पष्ट होईल” असं मी म्हणताच थोडा विचार करून आणि आठवून कमला मला म्हणाली,
“मला आठवतं की मी त्यावेळी बाराएक वर्षाची होती.माझ्या आईची मैत्रीण तिला रस्त्यावर उद्भवलेल्या हिंदू-मुस्लीम दंग्याची माहिती देत होती.ते मी ऐकत होती.आणि त्यावेळी माझ्या मनात वि़चार आला की ही बाब मला विसरून चालणार नाही. कारण ज्यावेळी मी अगदी वयस्कर होईन त्यावेळी पुर्वीच्या अशा गोष्टी माझ्या कडून ऐकण्यात तरूण लोक स्वारस्य घेतील,कारण तोपर्यंत असल्या घटना व्हायच्या कधीच बंद झालेल्या असतील.पण कल्पना करवत नाही, ह्या क्षणी मला एव्हडा धक्का बसायला लागला आहे की अशा गोष्टी अलीकडे रोजच्याच झाल्या आहेत, आणि त्या त्यावेळी भयंकर वाटत असल्या तरी आता होत असलेल्या लाखो लोकांच्या प्राणांची हानी झालेली बघून ते काहीच नव्हतं असं वाटायला लागलं आहे.
मला आता दिसून येतंय की ह्या धरतीवर जे चांगलं म्हणून समजलं जातं ते सहजासहजी होत नसावं.ते निर्माण करावं लागत असावं.आणि ते तसंच ठेवण्यासाठी प्रेमाचं आणि कायद्याचं बंधन पाळावं लागत असावं.पण ज्या ठिकाणी निष्ठुरतेचा एव्हडा वरचष्मा आहे त्या ठिकाणी ह्या प्रेमाचा प्रबंध कसा करायचा?.सामाजीक संस्थेत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायद्याचं सुरक्षीत पालन कसं करायचं.?”

हे कमलाचे विचार ऐकून मला खूपच बरं वाटलं.नाना पेंडसेचे आभार मानायचे राहिले होते.ह्या विदुषी बरोबर चर्चा करून झाल्यावर हिचे लेख मला का आवडू लागले आहेत ते स्पष्ट झालं. पुढल्या खेपेला आणखी कुठल्यातरी दुसर्‍या विषयावर चर्चा करायला मिळावी म्हणून मी कमलला म्हणालो,
“पुढे कधी तरी भेटल्यावर आपण ईश्वराबद्दल तुझे काय विचार आहेत त्याची चर्चा करू या.”
ते मान्य करीत ती मला म्हणाली,
“जशी मी वयस्कर होऊ लागली आहे तशी ईश्वराच्या अस्तित्वावर माझा दृढ विश्वास बसू लागला आहे.आणि धर्म पालनाने आपण ईश्वाराशी संबंध आणू शकतो असं वाटायला लागलं आहे..पण हे अवगत होणं कठीण आहे. मी आशा करते की माझ्या ह्या लेखनामधून मी सत्याचा पाठपुरावा करण्याच्या प्रयत्नात राहीन.पण मला हे ही माहित आहे की हा ईश्वराचा विचार माझ्या मनात मी प्रथम बिंबवून ठेवल्या शिवाय त्याला काही अर्थ राहणार नाही.हे काही सोपं नाही. आणि कधीकधी माझ्या मनात एक विक्षिप्त कल्पना येते की जीवन जर का इतकं सुखकर हवं असेल तर अन्य विश्वात माझा जन्म व्ह्यायला हवा होता. ह्या बद्दल मला आपल्याला खूप काही सांगायचं आहे.आणि नंतर लिहायचं पण आहे.”
“तू ह्यावर लेख लिहित जावं.तुझ्या डोक्यातून येणारे विचार हे त्या ईश्वराचीच इच्छा समजून तरी लिही.”
असं मी सांगितल्यावर कमलाच्या चेहर्‍यावरचा आनंद लपला नाही.
“असं करायला ईश्वरच तुमच्या तोंडून बोलतोय असं मी समजू का?”
असं म्हणत म्हणत आम्ही दोघानी हंसत हंसत एकमेकाचा निरोप घेतला.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com