Saturday, September 11, 2010

झरोका

“घर बांधायचं झाल्यास,मोठ्ठ्या खिडक्या असूद्यात.तुमच्या दिवास्वप्नाना सीमाबद्धता नसावी.”

काल मी डॉक्टर अरविंदच्या नव्या दवाखान्याच्या बांधणीच्या उध्गाटन समारंभाला गेलो होतो.मला त्याने बांधकामाचा नकाशा दाखवला.शस्त्रक्रिया करण्याची खोली सोडल्यास बाकी खोल्याना मोठमोठ्ठ्या खिडक्या होत्या. आणि ते प्रकर्शाने जाणवत होतं.म्हणून मी डॉ.अरविदला विचारलं,
“मुद्दाम म्हणून प्रत्येक खोलीला एव्हड्या मोठ्या खिडक्या असण्याचं तुझं प्रयोजन काय आहे?”

“मायक्रोसॉफ्ट विंडो हे नाव आपल्या सॉफ्टवेअरला देताना बिल गेटला बहूतेक घरातल्या खिडक्यावरून कल्पना आली असावी.”
मला अरविंद हंसत हंसत म्हणाला.

“विंडो मधून पाहिल्यावर त्याचं मायक्रोसॉफ्टवेअर दिसायला लागतं.म्हणजेच घरातल्या खोलीतून बाहेर बघायला आपण खिडकीचा वापर करतो तसाच काहीसा आभास त्याला त्याच्या सॉफ्टवेअर विंडोमधून होऊन, त्याने प्रचंड प्रोग्राम्स लिहून घेतले असावेत.”
मी पण अरविंदला गंमतीत म्हणालो.

“मी काही मायक्रोसॉफ्ट विंडोबद्दल बोलत नाही.कारण मला त्यातली विशेष माहिती नाही.जरी मी त्यांचा प्रशंसक असलो तरी.
मला वाटतं,प्रत्येकाच्या जीवनात खिडक्या असाव्यात.
वसंत ऋतू येण्यापूर्वी-उन्हाळ्याच्या उष्म्या नंतर-सूर्याची कोवळी किरणं, खिडकीतून पाहिल्यावर, रस्यावरच्या पायवाटावरून हंसत असताना दिसतील, आणि रस्त्यावरून ,चमकणार्‍या रंगाच्या मोटारीतल्या खिडक्यातून, पाहिल्यावर डोळे मिचकावलेले दिसतील.”
अरविंद म्हणाला.नंतर म्हणाला,
“तसंच,माझे डोळे,भकास भिंतीवरून,टोले देणार्‍या घडयाळाकडे आणि नंतर खिडकीकडे वळत जातात,तेव्हा खिडकीच्या बाहेर,काही झाडांची हिरवीगार पानं,आळसावलेल्या वार्‍यामुळे हलकेच सळसळताना मला दिसतात आणि माझं ध्यान अकाशातल्या ढगांकडे जातं.हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आल्यावर मला खिडकीचं महत्व चटकन लक्षात येतं.”

मी अरविंदला म्हणालो,
खिडकीचा मुळ उद्देश घरात काळोख होऊ नये म्हणून आणि बाहेरच्या प्रकाशाला आत प्रवेश देण्यासाठी असतो. आता काय घरात फ्लोरोसंट दिवे आले आहेत.खिडक्या नसतील तर घर बांधण्याच्या खर्च थोडा कमी होत असावा कारण तेव्हडं सामान कमी लागतं हे उघडच आहे.कदाचीत संवरण भिंतीच्या अलीकडच्या फॅशनसाठी काही लोकांना खिडकीशिवाय घर बांधणीसाठी मनधरणी करायला विशेष वाटत असेल.पण अशा लोकाना माझा प्रश्न
असा आहे की बाहेरच्या मनोहरतेचं काय?”

“तुमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे तुमचे खिडकीबद्दल काय मुद्दे आहेत ते ऐकायला मला बरं वाटेल.”
मी अरविंद्ला म्हणालो.

अरविंद म्हणाला,
“खिडक्यामुळे नैसर्गीक प्रकाश येतो.तो कुणी आयता तयार करू शकत तर नाही ना?
मेडीकल सायन्सच्या म्हणण्याप्रमाणे दीर्घकालिक आजार बरे व्ह्यायला सूर्य प्रकाशाची मदत होते.शरीराशी सूर्यकिरणांचा संपर्क येऊन व्हायटॅमीन D चा पुरवठा होतो.त्यामुळे शरीरातली हाडं आणि मेंदुचा विकास होतो.त्याचं कारण शरीरात एन्डोरफीनचं उत्पादन व्हायला सूर्यकिरणाचा उपयोग होतो. हे एन्डोरफीन शरीरात खुशी आणायला तसंच वेदनांपासून मुक्ति मिळायला सहयोग करतं.नुसतं, सूर्यकिरण आत आणून शरीरात रासायनीक प्रक्रिया
करण्यापलिकडे खिडक्यांची मदत होत असते.वास्तविकता आणि अवास्तविकता दाखविण्याच्या उंबरठ्याचं काम ह्या खिडक्या करतात.एखादी पातळ कांच, आतल्या कृत्रिम प्रकारे थंड केलेल्या हवे मधला, आणि बाहेरच्या थंड नैसर्गिक हवे मधला, अंतरपाट असतो.ही खिडकी घरातल्या आतल्या जीवनाला बाहेरच्या समाजाशी संबंध ठेवायला दूवा म्हणून असते.मनन करण्याचा तो एक उंबरठा असतो.
एखादा,निःशब्द होऊन खिडकीच्या बाहेर टकमक बघत असला तर बहुतांश त्याचं ध्यान डागळलेल्या स्मृति उजळण्यासाठी नसतात,कदाचीत मनात आलेल्या एखाद्या परिस्थितिची कल्पना करण्यात किंवा एखादं पूर्वदृश्य आठवणीत आणण्यात ते ध्यान उपयोगात असावं.खिडकीतून बाहेर पहात असताना दिवास्वप्न करणार्‍यांची दिवास्वप्न प्रकट होत असतात.खरंतर,अशावेळी कुणाच्याही कल्पना-शक्तिचा आदर करायला हवा.वाटल्यास चक्र कुणी शोधून काढलं? म्हणून कुणालाही विचारून पहा.कल्पनाशक्तिचंच ते एक द्योतक आहे.”

“हे तुझं ऐकून मला काही विचार सुचले.”
असं म्हणत मी अरविंदला सांगीतलं,
“खिडकीच नसलेल्या घरातल्याना बाहेरच्या दृश्याची काय कल्पना येणार?.
वार्‍याची झुळूक कशी असते,गवताचा सुवास कसा असतो हे कसं कळायचं?जवळच्याच एखाद्या खिडकीतून आपल्यालाच आपण दिवास्वप्न पहाताना पकडलं तर आपल्याच कल्पना प्रज्वलित होतात.ह्यात वाईट काय आहे.? कल्पना हे एक विकासाचं इंधन आहे असं म्हणातात ते काही खोटं नाही.

अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की मोठ्ठी स्वप्नं पहात असावं.
आपली प्रत्येकाची व्यक्तिगत खिडकी असावी.त्यातून संधी मिळण्यासाठी,समय गाठण्यासाठी उपयोग करता आला पाहिजे.”

माझं हा विचार अरविंद्ला आवडला.आणि म्हणाला,
“शेवटी गंमतीने सांगायचं झाल्यास, विमानातून जाताना, बसमधून जाताना,आगगाडीतून जाताना आपण खिडकीसाठी का धडपडत असतो?
प्रत्येक जण ह्या खिडकीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करीत असतो.प्रत्येकाच्या विभिन्न आकांक्षेची खिडकी एक निशाणी असते.म्हणून मला खिडकीबद्दल विशेष वाटत असतं.
तुरूंग खिडकीविना असतो.खिडकीविना जीवन एकाकी आणि बुरसटलेलं असतं.तेव्हा घर बांधायचं झाल्यास,मोठ्ठ्या खिडक्या असूद्यात.तुमच्या दिवास्वप्नाना सीमाबद्धता नसावी.”
एव्हड्यात गुरूजी सांगायला आले की मुहूर्त जवळ आला आहे.आपण पुढच्या कामाला लागूया.तो पर्यंत लोकंही जमली आणि आमची चर्चा संपली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com