Tuesday, February 7, 2012

अजाण असण्यातली क्षमता.




"माझा तर्क असा आहे की,मी उमेदीतून निर्माण होणार्‍या जादूवर आणि चमत्कारावर विश्वास ठेवायला लागलो आहे."


श्रीपादबरोबर माझा नेहमीच संवाद चालू असतो.आम्हा दोघांना ही सवय,सकाळच्या नऊ-पाचच्या अंधेरी-चर्चगेट डबल फास्ट आणि संध्याकाळच्या सहा-पाचच्या चर्चगेट अंधेरी स्लोमधे स्त्रीयांच्या फर्स्टक्लासच्या डब्याला लागून असलेल्या चिंचोळ्या दरवाजाच्या फर्स्टक्लासच्या डब्यात बसून लागली आहे.सकाळचा विषय कधीकधी आम्ही संध्याकाळीपण चालूच ठेवतो.


"माणूस कित्येक गोष्टीबद्दल अजाण असतो.प्रत्येक बाबतीत त्याला प्रूफ मिळेलच असं नाही.तरीपण एखाद्या गोष्टीबद्दल अजाण असणं म्हणजे कोणताच कमीपणा मानण्याची गरज नाही असं मला वाटतं."
मी श्रीपादचं मत काय आहे हे समजण्यासाठी एकदा त्याला म्हणालो.


"मी ज्या गोष्टीबद्दल जाणकार नाही त्यात असलेली क्षमता काय असते त्याबद्दल मला विशेष वाटतं."
श्रीपादने आपलं मत सांगायला सुरवात केली.
पुढे मला म्हणाला,
"ज्यात ठोस पुराव्याची आणि संभवतः,विश्वाबद्दल आणि आपल्याबद्दल माहितीची प्रचुरता आहे त्या गोष्टीबद्दल मी म्हणत नाही.बरचसं माझं जीवन, प्रकाशाच्या गतीबद्दल माहिती नसूनही,सुखाने पार पडलं आहे.किंवा माझ्या,पदार्थविज्ञान शास्त्राच्या शिक्षकाकडून मी जे काही शिकलो त्याची माहिती असून-नसूनही माझं जीवन सुखाने पार पडलं आहे.मला माझ्या शाळेत मिळालेल्या गुणावरूनही सिद्ध होईल की मला कितीतरी गोष्टी माहित नाहीत.


नव्हे,नव्हे मी त्या गोष्टीबद्दल म्हणत आहे की ज्या गोष्टींची तत्वतः माणसाला जाणकारी नसावी.
अर्थात काही मोठ्या गोष्टींची अलबत अजाणता असते. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे की नाही?
आपल्या अस्तित्वातला अर्थ काय आहे?.
कष्ट-आपत्तीची भूमिका काय असावी?
ह्या असल्या गोष्टींही आपल्याला अजाण असल्याबद्दल मी  म्हणत नाही.
लहान लहान गोष्टींच्या अजाणतेबद्दल मी म्हणत आहे.


माझी खात्री आहे की, फुलपाखराच्या पंखाची फडफड आणि त्या फडफडीचा जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात त्याचे काय पडसाद होतात त्याची टिप्पणी तुमच्या वाचनात आली असेल.
ह्या असल्या अजाणतेच्या प्रकारावर मी विश्वास ठेवायला लागलो आहे.माझं मध्यवय जसजसं उडून चाललं आहे तसतसा माझा विश्वास ह्या बाबतीत बळावत आहे.


माझ्या मनातली मी तुम्हाला एक गंमत सांगतो.हल्लीच कधीतरी मी सकाळीच फार्मसीमधे औषधं आणायला गेलो होतो तेव्हा काऊंटरवर बसलेल्या त्या बाईचं आणि माझं हसणं झालं त्या हसण्य़ाने तिच्या त्या संबंध दिवसावर काय परिणाम झाला असेल कुणास ठाऊक.मला तरी वाटतं काहीतरी परिणाम झाला असावा.माझ्या मागोमाग येणार्‍या दुसर्‍या गिर्‍हाईकाकडे ते हसू तिने सुपूर्द केलं असावं.आणि ते गिर्‍हाईक दुकानाच्या बाहेर बसलेल्या गुरख्याबरोबर हसलं असावं.एका वयस्कर माणसाच्या हातातल्या पिशव्या गाडीत ठेवायला त्या गुरख्याने मदत केली असावी.गाडी चालू करून घरी जात असताना मनात विचार येऊन तो काही अगदीच एकांडा नव्हता असं वाटून घरच्या पायर्‍या चढताना तो वयस्कर गृहस्थ आपल्या शेजार्‍याशी हसला असावा.त्या शेजार्‍याने त्या वयस्कर गृहस्थाला चहाचं आमंत्रण देऊन नव्या वर्षाच्या दिवशी त्याच्याशी जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या असाव्यात आणि दोघांनीही जीवनात चार आनंदाचे क्षण समाविष्ट केले असावेत."


हे सर्व ऐकून घेतल्यावर मी श्रीपादला म्हणालो,
"ही सर्व तुझ्या कल्पनेची भरारी तर नसावी?कदाचीत तुझ्यात थोडं बळ येण्यासाठी तर नव्हे?किंवा कदाचीत तुला माहितच नाही.अजाणतेचा हा चमत्कार, रोजच तुला जो काही  माहित आहे तो तुझ्यातला चांगुलपणा तुला इतराना वाटण्याच्या प्रयत्नात ठेवीत असावा."


श्रीपाद मला म्हणाला,
"अजाणतेत असलेली क्षमता समजायला मला खूप वर्ष काढावी लागली.जीवनातली आरामदायी वर्षं,चांगलं घर,ताटात सुग्रास अन्नं,वंचित न राहिल्याची,मी कधीही भुका न राहिल्याची किंवा बेचैन न राहिल्याची ती अनेक वर्षं जी मी पार करून गेलो ती बहुदा अजाणतेच्या क्षमेतेमुळेच असावीत असं मला वाटायला लागलं आहे.


जशी वर्षं गेली तसं जीवन काय आहे ते मला कळलं.मला वाटतं अनेक वर्षं गेल्यावर सर्वांनाच जीवन काय आहे ते समजायला अनुभव मिळतो.मित्र मंडळी गेली,नातेवाईक गेले,कठीण दिवस आले आणि गेले.माझ्या प्रियजनांचं तसंच झालं.
प्रौढ वयातलं जीवन जगताना, जे काही असतील ते आनंदाचे आणि विपत्तिचे क्षण आपण सर्व अनुभवतो, तेव्हाच अजाण असण्याबाबत मी विचार करायला लागलो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मला एक मुल आहे.आणि कुणाही आईवडीलाना माहित असावं की जीव जन्माला आणणं म्हणजे सर्व गोष्टीत बदलाव करून घेणं.
मी आशावादी राहून,प्रयत्नात राहून ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे त्या माझ्या मुलासाठी हे जग चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्नात राहिलो,मला वाटतं अजाणतेच्या क्षमतेनेच माझे डोळे उघडले."


"अजाण असणं हे एव्हडं महत्वाचं नाही.जाणकारी नसतानाही,कशाही तर्‍हेने प्रयत्न करून दयाळू रहाण्यात खरी क्षमता असते."
माझ्या मनातला विचार मी श्रीपादला सांगीतला.


"माझा तर्क असा आहे की,मी उमेदीतून निर्माण होणार्‍या जादूवर आणि चमत्कारावर विश्वास ठेवायला लागलो आहे.
उमेद काय असते ह्याबद्दल मी अजाण आहे. पण ती उमेद मनात बाळगून आजच्या दिवशी तरी माझं जग थोडसं चांगलं झालं आहे. आणि प्रत्येक दिवशी,एक हसूं,एक लोभस शद्ब,एक हात वर करून केलेला सन्मानाचा भाव,ह्या सर्व गोष्टीमुळे माझं जग आणखी चांगलं व्हायला मदत होईल.आणि हे सुद्धा त्याबद्दल मी अजाण राहूनही."
मला श्रीपादने आपला विचार सांगून टाकला.


चर्चगेटला गाडी आल्यावर उतरता उतरता मी
श्रीपादला मी म्हणालो,
"हे तुझं म्हणणं ऐकून मला तुझ्याशी आणखी सहमत न होणं अशक्य आहे"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com