Monday, May 21, 2012

सरतेशेवटी




सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी


सरतेशेवटी माझी पत्नी सुधार सेंटरवरून गेल्या आठवड्यात घरी परत आली.घरातल्या सर्व कुटूंबियाना,मित्र मंडळीना खूप आनंद झाला.
तिच्या पायाची सूज कमी होण्याची औषधं देऊन,सर्वांगाला,विशेषतः पायाना योगय तो भरपूर व्यायाम देऊन तिला वॉकरवर चालण्याईतपत  तयारीकरून डिसचार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर यापुढे दोन महिने एका केअरटेकर कंपनीचे ओ.टी(ऑक्युपेशन थेरपी),पी.टी.(फिझीकल थेरपी)ची मंडळी आमच्या घरी येऊन तिला जमेल तेव्हढी इंडीपेन्डट करण्याचा प्रयत्न करणार.हा त्यांचा पुढील दोन महिन्याचा प्रोग्राम राहिल.तिच्या वयोमानाकडे लक्ष देऊन,तिच्या शरीराच्या बळाकडे लक्ष देऊन हे सर्व केलं जाणार.
आमच्या मुलांनी(मुलगी,मुलगा,जावई,सून आणि नातवंडं)ह्यांनी घेतलेले परीश्रम आणि इतर मित्र मंडळी आणि नातेवाईकानी दिलेल्या शुभेच्छा ह्यामुळेच हे असं घडू शकलं ह्यात संदेह नाही.

माझी पत्नी घरी आल्याच्या दुसर्‍या दिवशीच्या सकाळी, माझ्या मुलीने घरामागच्या बागेत जाऊन गुलाबाच्या झाडावरचं नुकतच फुललेलं सुगंधीत तांबडं फूल आणून आपल्या आ़ईच्या हातात देऊन तिचं स्वागत केलं.

माझी पत्नी घरी नसताना मला पहाटे पहाटे,आशेची निराशेची,स्वप्न पडायची.माझ्या पत्नीच्या हातातलं तिच्या मुलीने दिलेलं ते गुलाबाचं फूल पाहून माझं एक स्वप्न मला आठवलं आणि त्याबरोबर एक कविता सुचली.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍या मला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com