Monday, May 28, 2012

बाठा चोखून खपेल का?


रघूनाथला जाऊन आज एक वर्ष झालं.आज त्याची आठवण आली.आंब्याच्या राजाचीपण आठवण आली.हापूस आंबे बाजारात यायला लागले असतील.
रघूनाथ हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या घरी आंबे खायला आला होता.त्याला मी त्यावेळी म्हणालो होतो.


"तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत  (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com