Sunday, June 22, 2008

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.”

बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती.
आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे. पास्क्ल,मेरी आणि त्यांची दोन मुलं टिम आणि ज्युली मिळून हा परिवार वहिनीच्या घराच्या जवळ शेजार म्हणून त्यांचा जाण्यायेण्याच्या वहिवाटीत होता.
टिम आणि ज्युली मोठी झाली आणि त्यांची लग्नं पण झाली होती.टिम इंग्लंडला कायमचा राहायला गेला होता.नोकरीच्या निमीत्ताने प्रथम तो तिकडे गेला आणि तिकडेच एका मुलीशी ओळख होवून तिच्याशी लग्न करून राहत होता.त्याला एक लहान मुल पण होतं. कधी तरी पास्क्ल आणि मेरीला त्यांच्या आईवडिलाना भेटायला म्हणून येत असायचा.हल्ली खूप वर्ष तो आला नाही म्हणून मला पास्कल ह्यावेळी भेटला त्यावेळी सांगत होता.
ज्युली प्रथम पासूनच चर्चच्या सेवेत राहून आता ती एक चांगली नन झाली होती आणि मुंबईला कुठल्याश्या चर्च मधे राहत होती.ती मात्र वरचेवर आईवडिलाना भेटायला येत असते.

ह्यावेळच्या माझ्या गोव्याच्या भेटीत पास्कलकडे एक पाच सहा वर्षाचा मुलगा मी पाहिला.
“हा कोण? “
म्हणून मी सहजच मेरीला विचारल्यावर मला म्हणाली “आमचा नातू” मला जरा नवलच वाटलं कारण त्यांच्या दोनही मुलाना मुल झालं असतं तर एव्हडं मोठ मुल नसतं.माझ्या तोंडावर आश्चर्य झाल्याचा भाव बघून मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“ती एक आमच्या आयुष्यातल्या होणाऱ्या घटनेतली एक अशीच घटना आहे.”
आणि मग ती दोघं बसून मला सांगू लागली,
“तू इकडे बरेच दिवस आला नाहिस.आम्ही लुकसला चार वर्षापुर्वी आमच्या घरी आणून ठेवला.त्यावेळी तो अर्थात दोन वर्षाचा होता.त्याचे आईवडिल सुद्धा मासे मारिचा धंदा करायचे.त्या वर्षी गोव्याला खूप पाऊस लागला होता.आणि तशांत एक मोठं वादळ येवून बऱ्याच लोकांच्या होड्या मासे मारायला गेले असताना समुद्रात बुडाल्या होत्या.त्यात लुकसची आई आणि वडिल सापडले.खूप शोध करून सुद्धा ते मिळाले नाहीत
हे लहान मुल पोरकं झालं आमच्याकडे ठेवून ते नेहमी समुद्रात जात.रोज संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्या घरी ह्याला घेवून जात.त्यानंतर ती संध्याकाळ कधी आलीच नाही.
आईवडिलांची वाट पाहून त्यादिवशी लूक खूप रडू लागला.त्यांची आठवण काढून त्याने घर डोक्यावर घेतलं.हात पाय आपटत जमिनीवर लोळायला लागला.
मेरी म्हणाली,
“मला तो सीन अजून आठवतो.मी त्याला घट्ट जवळ घेतलं त्यामुळे त्याला हातपाय आपटायची संधी दिली नाही.अर्ध्या एक तासाने तो माझ्या जवळच रडून रडून थकून झोपला.मी पास्कलला एका थाळीतून भात आणि माश्याची करी आणायला सांगितली.ज्यावेळी तो उठला त्यावेळी माझ्याकडे बघून परत हुंदके देत देत रडायला लागला.मी ती थाळी जवळ आणल्यावर लूक रडायचा थांबला आणि चमच्याने हळू हळू जेवू लागला.
पोट फुटेल एव्हडा तो जेवला.आणखी मागून मागून जेवला.
ती रात्र पौर्णिमेची होती.आम्ही दोघं त्याला घेवून समुद्रावर गेलो.चंद्राकडे बघून हातवारे करून मला दाखवू लागला.

मी म्हणाले,
“काय आहे ते? चंद्र आहे तो चंद्र”.
जणू चंद्राला हात लावायच्या प्रयत्नात असल्या सारखं हात वर करीत होता.परत त्याने रडायला सुरवात केली.हळू हळू परत आम्ही घरी आलो. त्याला आंघोळ घालताना परत रडायला लागला.मी त्याला आंघोळ घलता घालता त्याच्या बरोबर पाण्याशी खेळायला लागले.आंघोळ संपेपर्यंत खोलीत पाणीच पाणी झालं आणि तो खुदखुदून हंसत राहिला.मी त्याच्या अंगाला पावडर लावली आणि तो पर्यंत पास्कलने बाजारात जावून त्याच्यासाठी नवे कपडे आणले ते चढवले.नंतर तो आणि मी मिळून एक चित्राचं पुस्तक घेवून पहात होतो. तो त्या पुस्तकाची पानं परतायला लागला.शेवटी एका पिवळ्या वाघाकडे बघून “वाघ,वाघ”असं पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी पास्कल पोलिसाला घेवून आला आणि त्याचा रीतसर आम्हाला ताबा मिळावा यासाठी त्याचे कागद पत्र तयार करू लागला.पोलिसाना पाहून लूकस माझे हात त्याच्या कंबरेशी घट्ट गुंडाळून मला बिलगून बसला.हे पहिले दिवस असे गेले.त्यानंतर तो बापुर्डा आणि लाजवट राहू लागला.थोड्याश्या कारणावर रडायचा आणि गप्प एका कोपऱ्यात जावून बसायचा.जेवण दिल्यावर मोठ्या कष्टाने खायचा.
आईवडिल दिसत नाहित ह्या शॉकनेच जणू तो बापुर्वाणा व्हायचा.मला त्याच्या त्या परिस्थितिला बघून खूप रडू यायचं.
आता तू पहातोस त्याला तो सहावर्षाचा स्मार्ट,आनंदी पहिल्या वर्गात शिकत असलेला मुलगा दिसतो.त्याच्या चेहऱ्यावर सदाचं हंसू असतं आणि वर्गात चांगला शिस्तीत वागतो असं त्याची टिचर सांगते.अभ्यास लक्ष देवून करतो.आमच्या घरी येणारे त्याला बघून म्हणतात खूपच सुखावलेला दिसतो.
मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मनात येतं,आणि आश्चर्य वाटतं की हे असं त्यावेळचं आईविना पोरकं मुल असं कसंबदललं.त्यासाठी काही डॉक्टरी उपचार,मानसशास्त्रज्ञ किंवा काही औषोध उपचार करावे लागले नाहित.आम्हाला आशा गोष्टीवर त्याच्यासाठी काडीचा पण पैसा खर्च करावा लागला नाही.
फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती.
प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

No comments: