Wednesday, June 11, 2008

आमची पन्नासावी लग्नगांठ

“एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.”

“गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो” असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
पन्नास वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.पन्नास वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.
इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
”मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून.”
परंतु पक्व प्रेम म्हणतं,”
मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो.”
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं. किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
काय हा विपर्यास!

“माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का”

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की पन्नास वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी “माझा होशिल का” हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने पन्नास वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

“आला खुषीत समिंदर
त्याला नाही धीर
होडीला बघतो ग धरू
ग!सजणी होडीला देई ना ठरू”

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.
प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.
ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.
” भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी “

बिचारी गेली सतरा वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
“मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?”
असं ती मला म्हणते.
“पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने “आशा” नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया”
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.

हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
“उद्दया कसं होणार?”
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
“उद्दया कसं होणार?”

तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
“आता कशाला उद्दयाची बात
बघ उडून चालली रात
आता कशाला कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात
आता कशाला उद्दयाची बात”
तेव्हां सर्वांच्या शुभेच्छावर आता आमचा उद्या आहे.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

No comments: