Sunday, June 29, 2008

ठाम मताचे आमचे बंडूतात्या.

तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.

वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा गंधही नसलेले बंडूतात्या हातात नेहमी टाईम्स ऑफ इंडिया घेवून फिरत.
एकदा अशीच गम्मत झाली.ह्या तळ्यावरच्या घोळक्याला बंडूतात्या म्हणाले,
"आज टाईम्सने जळजळीत अग्रलेख लिहिला आहे"
दाजीकाकाना हे तात्या सांगतात ह्याचा राग आला.ते त्याना म्हणाले,
"अर,तात्या तुला इंग्रजीचा गंध नाही.ए बी सी अक्षराची " ** " वर का खाली ते तुला माहित नाही.आणि तो अग्रलेख
जळजळीत लिहिला आहे असं म्हणतोस कुणावर इंप्रेशन मारतोस रे?
वकिलाचा कोट घातलास म्हणून काय वकिल झाला नाहिस.ते मारतात त्या गप्पा ऐकतोस आणि आम्हाला येवून सांगतोस. आम्ही का टाईम्स वाचत नाही असं तुला वाटतं का?"
हे दाजीकाकाचे उद्गार ऐकून बंडूतात्याने पळच काढला.

वर म्हटल्या प्रमाणे बंडूतात्याची खाशियत म्हणजे
"ह्या विषयात मला गंध नाही"
असे म्हणून सुद्धा त्या विषयावर आपल्या टिकेने कुणालाही डिवचणं सोडत नाहीत.
साहित्यात टिका मग ती कविता असो की लेख असो.
संगीतात टिका मग ती चालीवर असो की गाण्यावर असो.

अलीकडे एक गम्मतच झाली.गावात कुस्तीचे फड होते.बाहेरून किंगकॉंग नावाचा एक मल्ल आला होता.
कीडकीडीत असून सुद्धा तात्या त्याच्या बरोबर कुस्ती करणार म्हणून हट्टाला पेटले.
एक फटक्यात किंगकॉंगने तात्यांची पाठलावून चित केलं.
हार न मानता ते किंगकॉगला म्हणाले,
"पाठ लावलीस पोट कुठे लावलेस.?"
किंगकॉगने दुसऱ्या क्षणी, फटक्यात पोट लावलं.
हार न मानता परत ते किंगकॉंगला म्हणाले
"पोट लावलंस पाठ कुठे लावलीस?"
किंगकॉंगने हवं तेच केलं
पण कीडकीडीत पेहलवान-बंडूतात्या- हार मानायला तयार नसल्याने काय करणार?
कारण एकाच वेळी पोट आणि पाठ लावल्याशिवाय मी हार मानणार नाही असं त्यांच ठाम मत होतं.
एकाच वेळी पाठ आणि पोट लावणं शक्य नाही त्यापेक्षा तुच जिंकलास असं समजून
किंगकॉंगने ही त्याची अट ऐकून कुस्ती खेळायलाच माघार घेतली.
सारांश,
आमच्या ठाम मत असलेल्या बंडूतात्यांचं हे असंच आहे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: