Tuesday, July 22, 2008

आमचे मित्र श्रीयुत “मी,माझं,मला”

“मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचंअसावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. “
हे गृहस्थ मला खूप दिवसानी दादरच्या टिळक पूलावर अचानक भेटले.त्यांच नाव जरी चटकन लक्षात आलं नाही तरी त्यांना आम्ही आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमधे राहत असताना आमचे शेजारी म्हणून टोपण नांवाने ओळखायचो.त्याना आम्ही गंमतीत
”मी,माझं,मला”
ह्या तिन शब्दानी संबोधायचो.
आणि अशा टोपण नांवाचं कारण म्हणजे त्यांची- स्वतःचे मनातले विचार सांगत असताना- एखादं तत्वज्ञान पण सांगूनजाण्याची वृत्ति.

मी फक्त त्यांना म्हणालो,
“कसं काय चाललं आहे?”
ते ऐकून मला म्हणाले,
“चला आपण खाली मामा काणेंच्या हॉटेल मधे बसू या थोडा वेळ”
मला चला म्हणावंच लागलं.
दोन प्लेट बटाटे वडे आणि दोन कप गरम गरम चहाची ऑर्डर देउन त्यानी सुरवातच केली सांगायला,
” मी अलीकडे आध्यात्मावर बरीच पुस्तकं वाचतोय.वय होत राहिलं की विचारांचा कल अशा गोष्टीवर जास्त जातो.आणि खरं खोटं माहिती करण्यासाठी विचाराला चालना मिळते.परत परत गंध उगाळून अर्थहीन झालेल्या वहिवाटीतल्या गोष्टी बद्दल-अशा गोष्टीवर सर्वानुमते विश्वास दाखविला गेला असल्याने- त्याबद्दल आपण खूप प्रामाणिक आहो असं दाखवायला जरा मलाकठीणच होतं.
आपण ज्या गोष्टीचं महत्व मानतो त्यावर आपला विश्वास जास्त असतो.
हे अपरंपार विश्व उंच आकाशात पाहिल्यावर जे डोळ्याचं पारणं फेडतं,ते निर्माण करणार्‍या त्या नजाणत्या आणि सर्वांवरसारखीच नजर ठेवणार्‍या अघात शक्तिवर माझा विश्वास आहे.
मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. मनुष्याची उर्जितावस्था- उघड उघड प्रचारात असलेल्या गोष्टीवर सरळ सरळ गैरविश्वास दाखवून -नंतर त्याचा शोध घेण्यात वेळ खर्च केल्यावर होत असते. उच्च विचारसरणीच्या व्यक्तिं चिंतन करून,गुणगान करून,जगले आणि निर्वतले आणि असं करताना वेळोवेळी आलेल्या समाजातल्या समजूती हळू हळू पुढे ढकलत त्यांना पुर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात राहिले.माझा एव्होल्युशन वरचा विश्वास वृद्धिंगत होत गेला.जीवन जगण्याचा मतितार्थ काय ते बुद्धिपुर्रसर विचार करून पृथ्वीवर हळू हळू होणार्‍या स्थित्यंतराच्या विचारसरणीची आणि दुसरं म्हणजे, एव्होल्युशन न मानणार्‍यांच्या विचारसरणीची सांगड घालून तो माझा विश्वास तसाच वाढत गेला.
चांगुलपणा,बुद्धिमत्ता,आणि नितीमत्ता ह्या गोष्टी आपल्यात कायम असाव्यात ह्यावर विश्वास ठेवल्याने मला आशावादी राहता येईल हे समजून बरं वाटतं.मी वरील गोष्टींचा बावू करीत नाही.पण त्यांचा विचार केल्याने मला जगायला उमेद येते.
ज्यामुळे लोक घाबरून स्पष्ट बोलण्या ऐवजी गोल गोल फिरून बोलतात त्याचा मला खूपच राग येतो.
परिस्थितीने पिचलेले,दाबून ठेवलेले,जे लोक असतात त्याना वर मान करायला होणार्‍या हालचाली बघून मला खूप समाधान होतं.
सर्व किल्मिष,जळमटां पासून मी पूर्ण अलिप्त झालो आहे, असं ढोंग करायला मला मुळीच आवडत नाही. पण ज्या ज्या वेळी मी मला ठराविक किल्मिषापासून नक्कीच दूर ठेवतो त्या त्या वेळी मला जगायला खूप उमेद येते.
सौंदर्य जरी शरिरात वास करीत असलं तरी ते आध्यात्माला धरून असावं असं मला वाटतं.देवाची स्तुतीपर गाणी ऐकून माझ्या अंतरात इतका आनंद होत नाही जितका मी छोटे छोटे पक्षी गुंजन करताना पाहून किंवा संध्याकाळची पांढर्‍या शुभ्र बगळ्यांची उडणारी आकाशातील रांग आणि त्यांच्या तोंडून येणारे ते गोड आवाज ऐकून होतो तेव्हडा. एखाद्दा मंदिरातून येणारा अगरबत्त्यांच्या सुवासापेक्षा संध्याकाळच्या हवेच्या झुळके बरोबर रात्रराणीच्या फुलांचा येणारा तो धुंद करणारा सुवास मला वेडा करतो.
सत्य कठोर असतं,आणि सर्वच सत्ये सुंदर नसतात.पण सौंदर्य हेच सत्य असते.कारण त्या सत्यात प्रेम सामावलेलं असतं.आणि प्रेमही सत्यात सामावलेलं असतं.जगातल्या उच्च कलाकृतींचं उद्दिष्ट सौंदर्य असतं.सौंदर्याचं सर्व ठिकाणी वास्तव्य असल्याने ते सर्वांना मोफत असतं.वैचारिक स्वातंत्र्यात आणि सौंदर्यात सत्य आणि चांगुलपणा सामावलेला पाहून माझाआत्मा आणि मन बळकट होतं.आणखी काय सांगू?”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
कवी बोरकरांची ती कविता
“मी पण यांचे सरले हो!
जीवन ह्यांना कळले हो!”
असं ह्याचं अजून झालेलं दिसत नाही.होईल एक दिवस.
नुसतं कसं काय चाललं आहे? एव्हडंच विचारल्यावर हे त्यांच्या तोंडून केव्हडं ऐकावं लागलं,खरंच रे बाबा! आम्ही तुला”मी,माझं,मला”म्हणतो ते बरोबर आहे.”
“चला निघूया”
असं म्हणून मी पुढच्या कामाला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: