Friday, July 25, 2008

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

“हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली “मला माझा जॉब आवडतो म्हणून.”

आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं. त्यांच्या कुटुंबातली शंतनु आणि शर्मिला ही पहिल्यापासून स्मार्ट वाटायची.इकडच्या शाळेत सुद्धा त्यांचा वरचा नंबर असायचा.त्या पैकी शर्मिला जरा जास्त हुषार होती.पण कमनशिबाने तिला कॉलेज मधे त्यावर्षी चांगले मार्कस न मिळाल्याने तिचा मेडिकलला जाण्याचा चान्स हूकला.पण ती डगमगली नाही.तिला लोकांची सेवा करण्याचं प्रथम पासून वेड होतं.डॉक्टर नाही तर नाही निदान नर्स होऊन आपली इच्छा पुरी करायची तिने जिद्द ठेवली आणि कलकत्याच्या एका नावाजलेल्या नर्सिंग इनस्टीट्युट मधून चागलेमार्कस घेऊन उतीर्ण झाली.आणि नंतर खासगीत नर्सिंगचं कामं घेऊ लागली.
असाच मी एकदा ऑफिसच्या कामासाठी कलकत्याला गेलो असतां मला रस्त्यातच भेटली.मला आपल्या अपार्टमेंट मधे घेऊन गेली.जेवायचा आग्रह करीत होती पण मी काही जेवायला राहिलो नाही.पण म्हणालो चहाच्या कपावर आपण गप्पा मारूया.तुझं सेवावृत्तीचं काम कसं चाललंय असा मी तिला प्रश्न केल्यावर ती सांगू लागली,

“बर्‍याच अशा माझ्य मैत्रिणी अलिकडेच कॉलेज मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्या आहेत.कोण ना कोण तरी मला एखाद दिवशी फोन करून आपल्या नविन जॉब बद्दल कुरकुर करून बोलत असते.सांगतात की त्यांच मन कसं रमत नाही त्या जॉबवर,त्याना हवं असलेलं काम कसं मिळत नाही. किंवा हव असलेलं यश त्यांना कसं मिळू शकत नाही. त्यांच भाषण ऐकून माझ मनोरंजन होत.मला वाटतं मैत्रिणी अशा साठीच असतात.

पण ह्या मुळे मला सुद्धा माझ्या कामाचा आढावा घेता येतो.मी नर्स असल्याने दोन मतिमंद असलेल्या बायकांची सेवा करण्याचं काम करते.बोलताना त्या ओरडून बोलतात.आणि कधी कधी संतापी होऊन त्याचे परिणाम न समजण्यासारखे वागतात.
स्वतः आंघोळ करू शकत नाहित.त्याना अन्न स्वतः शिजवता येत नाही.कधी कधी त्यांची वागणूक अशी असते की त्यानाएकदम हलता येत नसल्याने जाग्यावरून आरडाओरड करतात तर कधीकधी उठून एकदम मारायाला येतात.
रोज मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या कामात मदत करीत असते.आंघोळ घालणं,त्याना कपडे घालणं, त्याच्या साठी जेवण करून त्यांना भरवणं,त्यांना साफ करणं,त्याना बाथरूम मधे नेणं सकाळी त्या उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत हीसर्व कामं करावी लागतात.कधी कधी काही कारण नसतानाही -त्यांचे मी कपडे बदलत असताना- माझे केस उपटण्याचा प्रयत्न करतात.कधी कधी समोर ठवलेलं जेवण भिरकावून देतात.कधी कधी तर काही कारण नसतानाही अंगावर थुंकतात.

पण गंमत म्हणजे मला हा जॉब आवाडतो.मला माहित आहे की मी अजून तरूण असून मला खूप काही शिकायचं आहे. पण मी माणसात असलेल्या हतबलते वर विश्वास ठेवते. त्याचाच अर्थ असा होईल की आपल्याला दुसर्‍या माणसांची आवश्यकता आहे.
मला वाटतं असं काही जरूरीचं नाही की समाजाने ज्या गोष्टीला यशस्वी म्हटलं आहे त्याच गोष्टी यशस्वी आहेत. आपल्याला खरं काय हवं असतं की आपल्या सभोवताली जे लोक आहेत त्यानी भाग घेण्यात,हतबलांची उर्जितावस्था करण्यात,ऐकून घेण्यात,लक्ष देऊन आपली वेळ आणि उदिष्टे वापरली पाहिजेत.कुणी एखाद्दा मोठ्या कंपनीचा सि.ई.ओ असो किंवा एखादी पाच मुलांची आई असो.मला त्यात काहिही फरक पडत नाही.कुणीही परिस्थितीने संपुर्ण नसतो,त्या दृष्टीने काहीसा हतबलच असतो.एकमेकासाठीही तसाच असतो.

मी ज्या बायकांची सेवा करीत असते,त्यांच एक बरं आहे की त्यांच्या गरजा त्यानी पुर्णपणे विशद केल्या आहेत.कपडे घालायला ज्या ठिकाणी पांच मिनीटे घ्यावीत त्या ठिकाणी त्याना तासन तास लागतात.पण त्यांची ही कमतरता उदाहरण म्हणून ठिक आहे.तेवढं काही ते हतबल नसतात.त्यांच्या बरोबर राहून “कपडे काढा,कपडे घाला”हा उपदव्याप जरी दिसला तरी त्यांना त्यात काय पर्याय आहे ते दिसून येण्यात फायदा होतो.
जेव्हडे म्हणून माझे माहितीतले लोक आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतं की त्याना जे काम जमत नाही ते पाहून त्यांनाच खूप लाजल्या सारखं होतं.त्याना ती एक कमतरता वाटते आणि जड अंतःकरण करून ते गोंधळलेले दिसतात. पण आमच्या ह्या पिढीत प्रचार केलेला असतो की यश संपादणं म्हणजेच तृप्ति मिळवणं आणि हे सतत आमच्या मेदूवर आघात केल्यासारखं केलेलं असतं.तसंच दुसरा आघात म्हणजे जर का तुम्ही स्वतःहून काम करू शकला नाही किंवा तुम्ही स्वतः तेव्हडे स्मार्ट नसाल किंवा तुम्ही स्वतः काम करायला समर्थ नसाल तर मग तुम्ही नालायक ठरता.
आता पर्यंत माझ्या जीवनात जे लक्षात ठेवण्यासारखे क्षण आले ते मी किती वेळां यशस्वी झालो हे नसून उलट ज्या ज्या वेळी मी माझ्याच मनात म्हणाले असेन
”मी मेले” ,”मला मदत करील का कुणी”
किंवा
“मला एखाद्दा मैत्रिणीची जरूरी आहे”
अशा प्रकारच्या क्षणाच्या वेळी मी माझीहून मला आधार घेते,मी माझ्याहून मला एक आकार आणण्याचा प्रयत्न करते, तेचक्षण जे मला मदतीची अपेक्षा करायला लावतात ते मला एक देणगी वाटू लागतात.
मला ह्या मतिमंद बायकांचे आभार मानले पाहिजेत. मदत करणं आणि मदतीची अपेक्षा पण करणं ह्यातला आनंद आम्हीशोधून काढला.मला वाटतं कधी कधी आमचा कमकुवतपणा ही पण आमची एक प्रकारची शक्तिच आहे.
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली

“मला माझा जॉब आवडतो.”

तिची रजा घेऊन मी खाली उतरलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: