Friday, February 11, 2011

शरदची सायकल.

“माझी खात्री आहे की जे तुम्हाला आवडतं त्याचा तुम्हाला अभिमान असायला हवा. हे कधीतरी,काही कारणाने आणि कशाही प्रकारे तुम्हाला करायला हवं, हा मुद्दा तुम्हाला एकदातरी पटल्याशिवाय रहाणार नाही.”

शरदला त्याच्या अगदी लहानपणापासून मी ओळखतो.त्याला काही वस्तू नव्याने त्याच्या घरात आणायची झाल्यास, एकतर तो माझा सल्ला घेईल किंवा ती वस्तू खरेदी करायला मला घेऊन जाईल.
त्याच्या पंधरा वर्षाच्या मुलाला नवीन सायकल विकत घ्यायच्यावेळी मात्र शरदने माझा सल्लाही घेतला नाही किंवा मला खरेदी करताना घेऊनही गेला नाही.
ज्यावेळी मी त्याच्या घरात नवीन सायकल पाहिली,त्यावेळी मला त्याचं कुतूहल वाटलं.
“वाः छान सायकल आहे “
असं मी म्हणताच,

शरद मला म्हणाला,
“त्यादिवशी सकाळीच ऑफिसमधे जाण्यापूर्वी माझ्या मुलांने त्याच्यासाठी सायकल आणण्याचा मला गळ घातला. त्याच्या पूर्वी त्याच्या आईकडून त्याने बरेच वेळा मला सायकलबद्दल सांगितलं जाईल ह्याचा प्रयत्न करून पाहिला होता. का कुणास ठाऊक त्यादिवशी मी त्याला नवी सायकल घ्यावी असं मनात आणलं.आणि घेऊन आलो. तुम्हाला सांगायचं राहून गेलं.पण नंतर मनात म्हटलं की सायकल ह्या विषयाबद्दल मी जरा भावूक असल्याने प्रथम सायकल घेऊन टाकावी आणि मग त्यावर तुमच्याशी चर्चा करावी.”

कोकणात असताना शरद नेहमीच सायकल बरोबर घेऊन असायचा हे मला आठवलं.त्याचं सायकलवर खूप प्रेम होतं. प्रत्येक आठवड्याला रविवारी सगळी सायकल खोलून तो तिची डागडूजी करायचा.सायकलची चेन काढून ती घासलेट तेलात बुडवून ठेवून मग स्वच्छ धुवून परत बसावायचा.ब्रेक तपासायचा.सर्व फिरत्या भागात वंगण घालायचा. नवीन घंटा सायकलच्या दुकानात आली की लागलीच विकत घेऊन सायकलच्या हॅन्डलवर बसावायचा.

हे आठवून मी शरदला म्हणालो,
“सायकलीबद्दल तुझ्या भावना माझ्या चांगल्या लक्षात आहेत.तुझ्या आईनंतर तू तुझ्या सायकलवर प्रेम करायचास.
खरं ना?”
मला म्हणाला,
“अगदी खरं.
ज्यावर तुम्ही प्रेम करता,त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायाला हवा असं मला नेहमीच वाटत असतं.कारण काही गोष्टी करायला मला आवडतात.पण काही लोकाना ज्यावर प्रेम असतं त्याच्याबद्दल मुळीच अभिमान नसतो.
तसंच ज्यावर तुम्ही प्रेम करता त्याबद्दल तुम्हाला अभिमान नसेल तर तुम्ही त्यावर प्रेम करता हे कसं कळायचं.? तुम्ही सदोदित प्रेम करता हे तरी कसं कळायचं? आणि तुमच्या तुम्हाला तरी तुम्ही कसं ओळखायचं.?

मला आठवतं,माझ्या लहानपणी मी एकदा पेपरात सायकलची जाहिरात पाहिली सायकल शिकत असताना,अपघात न करता, कशी चालवायची त्याबद्दल सवित्सर माहिती दिली होती.मला ते वाचायला खूप मजा आली.त्यात लिहिलं होतं, मला आठवतं ते सांगतो.

नव्याने सायकल चालवताना पुढे बघून चालवावी.खाली मुळीच बघू नये.त्याने तोल जाण्याचा बराच संभव असतो.
सुरवातीला खूप वेगाने किंवा अगदी कमी वेगाने सायकल चालवू नये.ताबा गेल्याने सायकलवरून पडण्याचा जास्त संभव असतो.

ब्रेक लावण्याची आवश्यकता वाटल्यास नेहमी मागचा ब्रेक लावावा.नुसताच पुढचा ब्रेक लावल्यास सायकलवरून उलटून पडण्याचा संभव असतो.

सायकलच्या दोन्ही चाकात तट्ट हवा भरावी.हवा कमी भरल्यास, विशेषकरून पुढच्या चाकात,पुढचं चाक हलवताना तोल जाण्याचा संभव असतो.

सायकल नव्याने शिकताना गवताळ भागात किंवा भुसभूशीत जमीनीत सायकल चालवू नये.चालवायला खूपच कठीण होऊन शिकण्याचा उत्साह जातो.

सायकलची सीट उंचीसाठी जुळवून घेताना,सायकलवर बसल्यावर जमीनीला पाय टेकू शकतील एव्हड्या उंचीवर जुळवावी.तसंच सायकलवर बसल्यावर चालवताना दोन्ही गुढगे समोरच्या हॅन्डलला लागणार नाहीत अशा उंचीवर जुळवावी.

हे सर्व वाचून मला सायकल शिकायला हुरूप आला.
नंतर मी एकदा माझ्या बाबांना माझ्यासाठी सायकल घ्यायला गळ घातला.एक दिवशी संध्याकाळी माझे बाबा कामावरून घरी परत येताना एक सायकल घेऊन आले.
अर्थात मला किती आनंद झाला हे अवर्णनीय आहे.

मला खरंतर सायकल चालवायला मुळीच आवडत नसायचं. माझ्या मित्रांना, सायकल शिकताना पडून, ढोपरांना जखमां झालेल्या मी पाहिल्या होत्या.म्हणून मी सायकल चालवायला नापसंत करायचो.
पण काही कारणास्तव मी ती जाहिरात वाचून माझं सायकल चालवण्या विषयीचं मत बदलं.

माझ्या बाबांनी मला न पडता सायकल चालवायला शिकवलं.
माझा विश्वास बळावला.त्या दिवसात कोकणात आमच्या गावात मोटार गाड्यांची आणि ट्रक्स वगैरेंची एव्हडी वरदळ नसल्याने मला मनसोक्त सायकल चालवायला रस्ता मिळायचा.कोकणातल्या रस्त्यांना चढ-उतार फारच असल्याने उतारावरून सायकल चालवत खाली यायला मजा यायची.
आमच्या गावाच्या बाहेर एक छोटीसी घाटी होती. तिकडे जाण्याचं मी बरेच दिवस धारिष्ट केलं नव्हतं.
एकदा एक पण करून गेलो.घाटी चढून गेल्यावर एकाएकी उतार आल्याचं मला कळलंच नाही.
सायकलच्या ब्रेकचा आधार घेत मी तो उतार असा जोरात उतरलो की,थंड गार वारा माझ्या केसाना पिंजारत होता ते मी कधीच विसरणार नाही.

ह्या अनुभवावरून मी एक नक्कीच शिकलो की,न घाबरता,अंगात बळ आणून ज्यावर आपण प्रेम करतो ते करीत असताना स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा असतो.
ते करण्यापासून डगमगायचं नाही.ह्याच घटनेने मला एक शिकवलं की,ज्यावर आपण प्रेम करतो त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला हवा.

त्यानंतर मी आमच्या गावात मोकळेपणाने सायकल चालवायचो.मला माझा मोकळेपणा जाणवायचा.जोरात वहाणार्‍या वार्‍याने माझे केस पिंजून जायचे ते मला खूप आवडायचं.आणि हे सर्व करायला माझ्या मी मला थांबवलं तरच,नाहीपेक्षा कूणीही मला रोखू शकत नव्हतं.

त्यावेळी माझ्या वयाच्या बर्‍याच मुलांना माझ्या सारखंच सायकल चालवायला, मी जसा प्रेम करायचो तसं, प्रेम करायला आवडायचं.”

शरदचं सायकल-प्रेम ऐकून मला त्याला काहीतरी सांगावं असं मनात येऊन मी त्याला म्हणालो,
“थोडक्यात सांगायचं तर सायकल चालवणं तेव्हा तुझ्या हाडामासात भिनलं होतं.तुला तर शक्य नव्हतं, पण खरोखरच कुणी ज्यावर प्रेम करतो ते सोडायला कुणाला तरी शक्य आहे का? मला म्हणायचं आहे की त्यातून येणारी मजा,तो एक प्रकारचा खेळ होता हे माहित असूनही कुणालाही त्यावरचं प्रेम करणं सोडून द्यायला शक्य आहे का?. आणि तुला तर तो मजेचा खेळ होता.”

“आणि म्हणूनच माझ्या मुलाला मी, त्याने मला सांगताच, नवी सायकल घेऊन आलो.”
असं सांगून शरद मला म्हणाला,
“मला जे करायला आवडेल ते दुसर्‍याला आवडेलच असं नाही.
म्हणूनच मला जे खरंच आवडतं त्याबद्दल मला अभिमान वाटतो.
माझी खात्री आहे की जे माझ्या मुलाला आवडतं त्याचा त्याला अभिमान वाटायला हवा. पुढे कधीतरी,काही कारणाने आणि कशाही प्रकारे त्याला हा मुद्दा एकदातरी पटल्याशिवाय रहाणार नाही.”

तेव्हड्यात शरदचा मुलाग आला.मी शरदला म्हणालो,
“तुझ्या बाबांनी तुला न पडता सायकल कशी चालवायची ते शिकवलं तसंच तुझ्या मुलाला आता तू शिकव.”
हे ऐकून शरद आणि त्याचा मुलगा दोघेही एकाच वेळी मोठ्यांदा ह्सले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com