Wednesday, February 23, 2011

कुस्ती.


ठाण्याला मुकुंदराव सामंत एका शाळेत हेडमास्तर होते.माझ्या पत्नीकडून त्यांचं माझ्याशी नातं होतं.मुकुंदरावांच्या सहवासात आल्यावर मला एक समजलं की त्यांना शरीर-सौष्टव असणं आणि कुस्तीच्या खेळाबाबत विशेष वाटायचं.ते स्वतः उठून रोज सकाळी व्यायाम शाळेत जाऊन नियमीत व्यायाम करून यायचे.

त्या व्यायाम शाळेतच त्यांचा एक विद्यार्थी येत असायाचा.
मला वाटतं त्याच्याकडूनच मुकुंदरावाना कुस्तीबद्दल विशेष वाटायला कारण झालं असावं.कारण हा त्यांचा विद्यार्थी-माणीकराव-कुस्तीच्या फडात त्यांना घेऊन जायचा.
मला एकदा मुकुंदरावानी फोन केला आणि ठाण्यात नौपाड्यात जंगी कुस्तीचे खेळ होणार आहेत ते बघण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.
मला जरी कुस्तीबद्दल एव्हडं आकर्षंण नसलं तरी मुकुंदरावांचा शब्द मोडवत नव्हता.आणि मुकुंदराव पण कसे ह्याकडे आकर्षित झाले हे पण एक कुतूहल मला होतं.

आता हा मुकुंदरावांचा विद्यार्थी, माणिकराव, बेळगावात एक मोठी कुस्तीची शाळा काढून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे असं कळलं.तसंच कर्नाटकात चुरशीच्या कुस्तीचे मेळावे भरवून मोठा व्यवसाय चालवीत आहे असंही कळलं.

अलीकडे मी बेळगावला गेलो होतो.बेळगावला माझ्या पत्नीचं माहेर आहे.माणिकरावाबद्दल मी माझ्या मेव्हण्याकडे चौकशी केली.त्याने त्याच्याशी माझी गाठ घालून द्यायचं ठरवलं.
हा माणिकराव बेळगावच्या कॅम्प-एरीयात छोटसं घर बांधून रहात आहे असं मला माझ्या मेव्हण्याने सांगीतलं.

त्याच्या घरी गेल्यावर मला त्याने ओळखलं.पण मी मात्र त्याचा विद्यार्थी वयातला चेहरा डोक्यात ठेवल्याने त्याला ओळखूं शकलो नाही.
उंच भरदार छातीचा,अंगात मलमलचा झब्बा घातलेला,खाली सफेद लुंगी घातलेला काळा वड्डर दिसणारा माणिकराव माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या मांडीवर जोरात थाप मारून हंसला.

“मुकुंदराव हेडमास्तर आता खूपच थकले आहेत.अलीकडेच मी त्यांना ठाण्याला भेटून आलो”

असं मला म्हणाला.
“तुम्हाला आवडणार नाही अशा गोष्टी लोकं कधीकधी करायला सांगतात.असं झाल्यावर त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका.तुमच्या जे काही डोक्यात येतं त्याकडे लक्ष केंद्रीत करा.तुमच्या भविष्यात वापरायला त्या कल्पनांचा उपयोग करा.”
असं सामंतसर म्हणायचे,ह्याची मी त्याला आठवण करून दिली.

“मी त्यांचा हा उपदेश पक्का लक्षात ठेवून माझ्या आयुष्याची आंखणी केली”
असं सांगून मला माणिकराव म्हणाला,
“मला वाटतं,तुमच्या अंतःकरणात जे काही आहे त्याचाच मागोवा घ्यावा.ते शाश्वत असे तोपर्यंत त्याचा जीवनात उपयोग करून घेऊन त्यात आनंद मानावा.तुम्हाला जे भावतं त्यासाठी जावं.शिवाय ज्यात तुम्ही प्रवीण आहात आणि जे करून तुम्हाला आनंद मिळतो तेच करण्यासाठी तुमच्या जीवनातला उद्देश असूं द्यावा कारण जीवन एकदाच मिळतं. लोक कदाचीत म्हणतील की,तुम्ही करता ते मुर्खपणाचं आहे,पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावं,तुमच्या मनाला लावून घेऊ नये.मगच तुमचा उद्देश साध्य होऊन तुम्हाला जिंकल्याचं सामाधान मिळेल.

“ज्या गोष्टी करण्यात तुम्ही निपूण आहात आणि त्या गोष्टी तुमच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी होत असतील तर जरूर करा.”
असं ही सामंतसर म्हणायचे.
असं सांगून माणिकराव मला म्हणाला,
“मी त्यांच्याकडूनच शिकलो की,ज्या गोष्टींची तुम्ही उपेक्षा करता,ज्या गोष्टी करायला नको होत्या असं ज्यावेळी तुम्हाला वाटत असतं,त्या न केल्याने तुमचं जीवन नक्कीच सुखकर होईल,रोमांचक होईल.
एखादी न आवडणारी गोष्ट करणं भाग आहे असं असेल तर गोष्ट निराळी.दुसरे लोक आनंदी होतील ह्यापेक्षा तुम्ही आनंदी व्हाल असंच करा.उलट केलंत तर पस्तावायला होईल.
पहिली योजना जमली नाही तर पर्यायी योजना असावी.”

“तुझ्या कुस्तीच्या व्यवसायावरून ते उघडंच आहे”
मी म्हणालो.

मला माणिकराव म्हणाला,
“असा विचार मी माझ्या मनात विकसीत करण्याचं कारण मला शरीर-सौष्टव ठेवण्याबद्दल लहानपणापासून आवडायचं. त्यासाठी शाळा संपल्यावर मी व्यायाम शाळेत जायचो.सामंतसर मला तिथेच भेटायचे.मला त्यांच्या घरी बोलवायचे. आणि उपदेश द्यायचे.शाळेनंतरचं ते माझं दुसरं जीवन झालं होतं.पुढे जमलं तर कुस्त्या खेळण्याचा माझा मानस होता. आणि पुढे जमलं तर त्यातून करीअर करायचाही विचार होता.शाळेचा अभ्यासक्रम संपल्यावर कॉलेजमधे पण मी तो नाद चालू ठेवला म्हणजे जवळ जवळ सात आठ वर्षं तरी मी कुस्त्या खेळत राहिलो.रोजच मी माझ्यात सुधारणा करीत होतो.माझा उद्देश असा होता की मला कुणीतरी प्रायोजित करून माझा तो व्यवसाय व्हावा आणि माझ्याच मजेसाठी म्हणून त्याचा मी उपयोग करावा.कुस्तीचा प्रकार ह्यातलाच आहे इकडे तर मजा इकडे तर व्यवसाय.काही लोक हे मानत् नाहीत.त्यातून व्यवसाय करता येईल हे ही मानत नाहीत पण देशभर हा व्यवसाय झाला आहे.सकारात्मक विचार ठेवल्यावर सरतेशेवटी त्याचं फलस्वरूप दिसून येतं.
अनेक गोष्टीत मला भरवसा आहे त्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे.
सामंतसर मला नेहमीच सांगायचे,
“तुम्ही करत रहा लोक तुम्हाला समर्थन देतील.तुमचा उद्देश साध्य व्हायला कष्ट घ्या,त्या उद्देशाच्या मागे लागा जणू तो तुमच्या जीवनात काही मिळवून देण्यासाठी आहे असं समजून वागा.”
मला अगदी तंतोतंत त्यांचं म्हणणं पटतं.”

“सामंतसर काही आता बेळगावला प्रकृति कारणाने,येऊ शकणार नाहीत.पण मी त्यांना भेटल्यावर तुझा हा व्यवसाय आणि तुझी ही प्रगती,मी त्यांना वर्णन करून सांगेन.त्यांना नक्कीच आनंद होईल.”
असं मी माणिकरावाला सांगून उठता उठता त्याने सामंतसरांसाठी भेट म्हणून माझ्याजवळ लाकडातून कोरलेली एका मल्लाची प्रतिकृती देण्यासाठी म्हणून दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com