Thursday, February 17, 2011

माझ्या आजीची ती वही

"फ्लाईट टू न्युयॉर्क इज रेडी फॉर बोर्डींग"
अशी घोषणा झाली.आणि सुलभा गेटकडे जायला निघाली.


अमेरिकेला परत जाताना सुलभाला मी नेहमीच एअरपोर्टवर पोहोचवायला जायचो.ते दिवस निराळे होते. व्हिझीटरला अगदी चेक-इन काऊंटर पर्यंत जायला मुभा होती.भारतात आल्यावर मुंबईत तिचं वास्तव्य असायचं.पण कोकणात एक आठवडा तरी जाऊन सुलभा आपल्या लाडक्या आजीच्या सहवासात रहायची.

ह्यवेळची तिची भेट धावती होती.तिच्या आजीला भेटायला म्हेणून ती लगबगीने आली होती.पण तिची तिच्या आजीशी भेट काही झाली नाही.ह्यावेळी ती परत जाताना आम्ही एअर पोर्टवर गेलो तेव्हा तिची फ्लाईट दोन तास लेट होती असं कळलं.मला सुलभा घरी परत जायला सांगत होती.पण आपण गप्पा मारूया वेळ निघून जाईल असं मी तिला म्हणालो.
बघतो तर ती बरीच चुळबूळ करायला लागली.
मी तिला म्हणालो,
"तू तुझं तिकीट घरी विसरून आलीस का? का तुझा पासपोर्ट तुझ्या बरोबर नाही.?"
मला म्हणाली,
"दोन्ही गोष्टी माझ्या जवळ आहेत.पण एक अतिशय महत्वाची गोष्ट मी घरी विसरून आले.पासपोर्ट आणि तिकीटापेक्षाही ती मला जास्त महत्वाची आहे.ती न घेता मी जाऊच शकत नाही.तुम्हाला थोडी तसदी देते.आपल्या टीव्हीवर एक पिशवी मी विसरून आली आहे.शेवटच्या क्षणी मी माझ्याजवळ घ्यायला विसरले.मला सामानाच्या बॅगेत ती पिशवी ठेवायची नव्हती.
जाऊन येऊन तुम्हाला अर्धा तास लागेल.माझ्यासाठी प्लीज."

मी लागलीच उठत म्हणालो,
"अग,त्यात प्लीज कसलं.तुला एव्हडं महत्व त्या पिशवीचं असेल तर मी घेऊन येतोच."
असं म्हणून मी गेलो.आणि परत येऊन ती पिशवी तिच्या हातात दिली.पिशवीत असं काय आहे ह्याचं मला कुतूहल होतं.
पिशवी उघडून तिने त्यातून एक वही काढली.आणि माझ्याकडे बघत तिने आपले डोळे पाणावले.

आजीच्या जुन्या वहीबद्दल सुलभा मला पूर्वी बोलली होती.
पहिल्या वेळी अमेरिकेला जाताना ही वही तिने आजीकडे मागतली होती.पण आजीने तिला दिली नव्हती.आणि का देत नाही हे तिने सुलभाला समजावून सांगीतलं होतं. हेही मला सुलभाने एकदा सांगीतलं होतं.
त्या वहीला पिशवीतून काढताना आणि माझ्याकडे पाहाताना तिला आजीची आठवण येऊन तिने डोळे पाणावले असावेत हे मी तेव्हाच ताडलं.

मला सुलभा म्हणाली,
"माझी आजी मला किती आवडायची ते तुम्हाला ठाऊक आहेच.ह्या वहीबद्दल मी तुम्हाला विस्ताराने सांगते. फ्लाईटची वेळ होई पर्यंत आपला वेळ जाईल."

माझं त्या वहीबद्दलचं कुतूहल स्पष्ट व्हायला संधी आहे असं पाहून मी तिला म्हणालो,
"तुझी कल्पना छान आहे.सांग"

मला म्हणाली,
"सुरवातील ती एक जुन्या पद्धतीची पण एकदम नवी वही होती.आणि आता त्याच वहीचं रूपांतर एक जाडजूड पुस्तकात झालं आहे.आणि त्याचं एकच कारण त्यात आता बर्‍याच पदार्थ करण्याच्या पद्धतीचं वर्णन लिहून ठेवलं गेलं आहे.
पातळ आणि नवं कसं दिसणारं त्या वहीचं रूप पार बदलून गेलं आहे.काही पानं फाटली आहेत.काही लिखाण पुस्सट झालं आहे.आणि काही पानं निसटून पडणार आहेत अशा स्थितीत आहेत.
माझी आजी पानांना गोंद लावून लावून चिकटवून ठेवण्यात भारी काळजी घेत असायची,आणि त्यात सुद्धा ती क्रमवार राहातील ह्याचीही काळजी घेत असायची.
दिवसेनदिवस वहीची जाडी वाढत होती आणि जास्त जुनी दिसायला लागली होती.

ह्या जुन्यापुराण्या वहीतून वाचत रहायला मला आवडतं.त्याचा अर्थ मी काही मोठी जेवण करणारी आहे अशातला प्रकार नाही,पण एका मागून एक पानं परतल्यावर माझ्या आजीच्या कार्यपद्धतीचा मला शोध लावता येतो.दोन पानं चिकटून ठेवायला माझी आजी खूपच गोंद वापरायची.तो चिकटवलेला कागद जसा सुकून जायचा तसा तो आवाज करायचा,कुरकुरा बनायचा.

जेव्हा मी ते पान परतायची तेव्हा तो आवाज शांतीचा भंग करून,माझ्या आजीने ह्या पदार्थाची पद्धत जेव्हा लिहून ठेवली होती, त्याकडे माझं ध्यान ओढून न्यायचा.त्या पानाला एक प्रकारचा खास तेलकट वास यायचा.माझ्या आजीने स्वयंपाक करताना वापरल्या गेलेल्या तेलाचा तो वास असायचा.
बर्‍याचश्या पानावर एखाद्या जागी तेल पडून त्या जागेपूरती पारदर्शकता आलेली असायची.माझ्या आजीच्या हाताला लागलेल्या तेलाचा तो परिणाम असावा.

त्यावेळी मी आणि माझी आजी ही वही वाचायचो पण माझ्या आजीचे मात्र आपल्या बोटांचे ठसे त्यावर राहून जायचे.आजी आपलं प्रेम प्रत्येक पदार्थात ओतायची.जेव्हा मी ही वही वाचायची तेव्हा आतल्या पदार्थाच्या पद्धती पेक्षा मी आजीच्या बोटांच्या ठशांकडे माझं लक्ष केंद्रीत करायची.
माझ्या आजीच्या परिश्रमाची आणि प्रेमाची मला आठवण यायची.

त्या वहीत ती लिहायची,
"लोलीला जास्त मसालेदार आवडतं."
"सुलूला-म्हणजे माझ्या आईला-वाटतं ह्यात जास्त मीठ आहे."
असे कुठच्या कुठच्या पानावर कडेला तिचे शेरे असायचे.
"असं का लिहायचीस?"
असं मी माझ्या आजीला एकदा विचारलं.मला म्हणाली,
"आता तुझ्या लक्षात आलं असेल तुम्हा मुलांचे खाण्याचे चोचले संभाळायला किती श्रम पडायचे ते. खरं ना?"
मी हसले.कारण माझी आजी कधीही आणि कशाचीही तक्रार करत नसायची.

माझ्या ध्यानात यायचं की तेच तेच पदार्थ ती बनवायची,ते उतोरोत्तर चांगले चवदार लागायचे,आणि त्याचं कारण ह्या तिच्या पानाच्या कडेवर लिहिलेल्या टिपा कारणीभूत असायच्या.

प्रत्येक पदार्थ नव्याने केल्यावर चांगला का व्हायचा ह्याबद्दल माझी आजी कधीच वाच्यता करायची नाही आणि माझीही क्वचीतच ह्याबद्दल तिच्याकडे पृच्छा व्हायची. कारण ती तिची गोपनीय कार्यपद्धती होती.आम्हाला काय आवडायचं हे तिला माहित होतं आणि ती ते आचरणात आणायची.

मी ही वही अमेरिकेत घेऊन जाऊ काय म्हणजे मला वरचेवर त्या वहीतून वाचता येईल म्हणून मी तिला एकदा विचारलं.
त्यावर माझी आजी हसली.आणि म्हणाली,
"वेडी मुलगी! तिकडे तर तू जेवणच करत नाहीस.तुझ्या आजीकडे वही राहू दे.मला आणखी काही त्यात लिहिता येईल.आणि तू परत आल्यावर तुझ्यासाठी परत एखादा पदार्थ शिजवता येईल."

खरंतर मला माहित होतं, माझ्यासाठी ती अगदी जूना पदार्थ बनवण्याचा विचार करणार.
"तुरीच्या डाळीची आंमटी,उकड्या तांदळाचा भात आणि तोंडी लावायला सुका बांगडा चुलीवर भाजलेला आणि त्यावर थोडं खोबर्‍याचं तेल."

हे तिच्या वहीत तिसर्‍या पानावर लिहिलेलं आहे.त्या पानावर जास्तीत जास्त तेल लागलेलं आहे आणि तिच्या बोटाच्या खूणा आहेत.
"एव्हडीच तुरडाळ,एव्हडीच सुकी मिरची फोडणीला,एव्हडंच मीठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेगडीच्या खाली एव्हडाच जाळ ठेवायचा म्हणजे डाळ मंद प्रमाणात शिजली जाते.सुका बांगडा,त्याचं खारेपण जाणार नाही अशा पद्धतीने, नीट धुऊन तो चुलीवर भाजायचा.आणि मग त्याचे लहान तुकडे करून एका थाळीत ठेऊन खोबर्‍याचं तेल त्या तुकड्यावर टाकायचं उलटून पालटून ते तुकडे टाकलेल्या खोबर्‍याच्या तेलात भिजवायचे. उकड्या तांदळाचा भात बेठा करायचा नाही.जरूर तेव्हडं पाणी घालून तांदूळ शिजवायचा. शिजवलेला भात चांगला शिजला के नाही हे थोडा भात हातात घेऊन मुरडून पहायचा.उकडा तांदूळ पचायला कठीण असतो म्हणून चांगला शिजवायची नीट काळजी घ्यायची "
आणि वहीतल्या पानाच्या कडेवर,
"लोलीची आवडती डाळ,उकड्या तांदळाचा भात आणि सुका बांगडा."
असा शेरा असायचा.

मला आजी नेहमी म्हणायची,
"कुठच्याही शिजवल्या जाणार्‍या पदार्थात,किती मीठ घालायचं,किती साखर घालायची,नव्हेतर त्या पदार्थातले असतील तेव्हडे घटक किती प्रमाणात घालायचे ते आपल्या हातात असतं.पण नंतर शिजवताना खाली योग्य जाळ नसेल तर काहीही उपयोग नाही.दुर्लक्ष केल्यास एकतर पदार्थ कच्चा शिजवला जातो नाहीतर करपवला जातो.पण जर का योग्य जाळाकडे लक्ष देऊन,शिजवण्याच्या वेळेकडे लक्ष देऊन तो पदार्थ शिजवल्यास अवश्य
चवदार होतो."

अलीकडेच आजीला सोडून अमेरिकेत जातानाचं ते शेवटचं जेवण मला आठवतं.मी भकाभका जेवत होते.का कुणास ठाऊक परत अमेरिकेहून आल्यावर माझी आजी मला हे जेवण करून घालण्याच्या परिस्थितीत असेल का असा मला उगाचच संभ्रम झाला होता.

तिने केलेला उकड्या तांदळाचा भात,तुरीच्या डाळीची आमटी आणि सुका बांगडा चुलीवर भाजलेला.आणि त्यावर थोडं खोबर्‍याचं तेल.हे माझं पक्वान्न मी जेवत होते.
माझी आजी मी जेवताना माझ्या समोर टेबलावर बसली होती.मी तिच्याकडे बघत् होते आणि ती माझ्याकडे हसून बघत होती.माझ्या मनात आलेले दुष्ट विचार मी द्डवण्याच्या प्रयत्नात होते ते तिला बिचारीला काय ठाऊक?

ते विचार मनातून काढण्यासाठी मी माझ्या आजीला म्हणाले,
"उकड्या तांदळाचा भात,डाळीची आमटी मला तिकडे अमेरिकेत करता येईल.पण सुका बांगडा तिकडे मिळेल का माहित नाही आणि मिळाला तरी तो चुलीवर भाजता येणार नाही.कारण घरात धूर झाला तर फायर-अलार्म होणार.आणि तिन मिनटात फायर-ब्रिगेड घरासमोर येणार.तोपर्यंत खोबर्‍याचं तेल बांगड्यावर टाकायला वेळ कुठचा मिळतो."
हे माझं ऐकून माझी आजी मोठमोठ्याने हसली.तिचं ते हसणं अजून माझ्या डोळ्यासमोर आहे.बिचारीचं ते शेवटचंच हसणं ठरलं.

त्यानंतर मला अमेरिकेत येऊन दोन महिने झाले असतील नसतील.आणि माझ्या मनात आलं होतं तसंच झालं.मला फोन आला,
"आजीचं काही खरं नाही.तू तिला भेटून गेलेली बरी."
मी निघाले पण माझी आणि आजीची काही भेट झाली नाही.परत येताना मात्र मी तिची ती वही माझ्याजवळ घ्यायची असं ठरवलं."
असं म्हणून सुलभा पुन्हा डोळे पुसायला लागली.

मी सुलभाचा हात हातात घेत तिला समजूत घालताना म्हणालो,
"तुझी आजी ह्यापुढे वहीच्या रूपाने तरी तुझ्या सानिध्यात असणार हे काय कमी झालं?"
तेव्हड्यात,
"फ्लाईट टू न्युयॉर्क इज रेडी फॉर बोर्डींग"
अशी घोषणा झाली.आणि सुलभा गेटकडे जायला निघाली.पण ह्यावेळी डोळे पुसत जात होती त्याचं कारण मी तिला दुरावत होतो म्हणून.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com