Friday, June 1, 2012

होकाल( नवरी)




मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.
स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.
जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून उर्जितावस्था होत असते हे मानायला त्यावेळचे ते लोक तयार नसायचे.

"सावंताचो बाबलो म्हुम्हंयेक जातासा म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली.हंय़ वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसा.थंय म्हुम्ह्यंत जावून कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत दिवस काढतलो.फाट-फाआटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नकद पैसो हातात मिळता.
ह्याका अवलक्षण म्हणुचा नाय तर काय?"

अशी सावंताच्या बाबल्याबद्दल चर्चा, इतर लोक,पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या, देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथुर्‍यावर बसून, शिळोपाच्या गप्पातला विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गुल व्ह्यायचे.

त्यातलाच एक विषय म्हणून कधी कधी,
"कामतांच्या इंदूक मुंबईत दिला म्हणे.नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसा.हल्लीच तो इंदूक बघून गेलो.पसंत केल्यान.येत्या मे महिन्यात इंदू बोटीन मुंबईक जाताला."
अशीही इंदूची चर्चा व्ह्यायची.


पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
बाई गं!,पडावातून आगबोटीत चढताना जरा जपून चढ.आणि त्यानंतर तिचा बाप तिला मुंबईची तिच्या दृष्टीने लागणारी आवश्यक ती माहिती-उपदेश-द्यायचा.

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्‍हवतां शिमीटाच्या चाळीत
तेका गो कसला घोपान?
असं एक मालवणीत गीत लिहिलं गेलं.
म्हणजेच,
बाळे,पडावातून आगबोटीत बसताना जरा जपून बस.तुझा नवरा वरळीला सिमेंटच्या चाळीत रहातो.वगैरे,वगैरे..)
पण आता वीसाव्या शकताच्या उत्तरार्धात आणि एकवीसाव्या शतकात हीच होकाल मुंबईहून अमेरिकेत जायला निघते.कारण जग सुधारत चाललं आहे.बदल होत राहिला आहे.आणि तो झालाच पाहिजे.

तेव्हा मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल बोटीने प्रवास करण्याऐवजी, पडावातून आगबोटीत बसण्याऐवजी, मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर नव्या परिस्थिती काय म्हणेल,ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला "घो" पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com