Monday, March 11, 2013

वार्धक्य आणि पोप बेनेडिक्ट





जीवन फार सुंदर आहे.खरंच,जीवन सुंदर आहे का?

त्याचं असं झालं,इकडे वसंत ऋतु यायला अजून थोडा अवसर असला तरी,आजचा
हवामान खात्याच्या अंदाज ऐकून तळ्यावर जाऊन फेर फटका मारावा थोडावेळ तिथेच
बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघावी,इतपत हवामान आल्हादायक आहे हे निश्चीत
आहे असं समजून मी भाऊसाहेबांना सकाळीच फोन करून संध्याकाळी तळ्यावर
भेटण्याचं नक्की केलं.

सुरवातीली ते थोडे कुरकूरले.मला म्हणाले,
“माझ्यासाठी सध्या इथली हवा थोडी थंडच आहे म्हणा.
“Age became” (वय झालं)”
बोलून झाल्यावर थोडे मिष्कील हसले सुद्धा.

प्रो.देसायांचा हा जोक मला त्यांनी पूर्वी सांगीतला होता.
नानु शहा,भाऊसाहेबांचा कॉलेजमधे असतानाचा सहकारी, इंग्रजी बोलताना त्याच्या
मातृभाषेतलं,गुजराथीतलं,बोलणं इंग्रजीत भाषांतर करून बोलायचा.
तो ज्यावेळी शाळेत होता त्यावेळी सकारने सर्व शाळातून इंग्रजी शिक्षणाला “चलेजाव”
केलं होतं.त्या कमनशीबी बॅचमधे हा सापडला होता.
परंतु “बॅंक”ला “बेंक” म्हणायचं, “हॉल”ला “होल” म्हणायचं “सजेशन”ला “सजेसन”
म्हणायचं “कॉफी”ला “कोफी” आणि “स्नॅक”ला “स्नेक” म्हणायचं,हे काही इंग्रजीत
शिकण्याच्या संबंधाने नव्हतं.त्या भाषेत तशा उच्चाराचे अक्षरच नाही.
हे मला प्रो.देसायानी समाजावून सांगीतलं होतं
त्यामुळे नानु शहा,
“चला कॉफी आणि स्नॅक खायाला जाऊया हे सांगताना
“चला कोफी आणि स्नेक खायाला जाऊया” असं म्हणून हसं निर्माण करायचा.
एकदा तर एका मित्राला,
“आपली मेहुणी तरूण आहे आणि घरी रिकामीच असते काही काम वगैरे करीत
नाही.तिच्यासाठी नवरा शोध”असं सांगण्यासाठी,
“माय सिस्टर-इन-लो इज यंग ऍन्ड एमटी” असं म्हणून त्या मित्राला बुचकाळ्यात
टाकून गेला.त्याच्या मित्रानेच आम्हाला हा जोक सांगीतला असं प्रोफेसर आम्हाला
म्हणाले होते.इंग्रजीचं अज्ञान आणि मातृभाषेतले उच्चार ह्या दोन गोष्टींची गफलत
झाल्याने त्याचं असं होत होतं,असं सांगून प्रो.देसाई स्पष्टीकरण करीत असत.

मी तळ्यावर गेल्यावर बाकावर बसून प्रो.देसायांची वाट बघत असताना हे सर्व आठवून
मी माझा वेळ घालवीत होतो.एकदाचे भाऊसाहेब येताना दिसले.जवळ येऊन बाकावर
माझ्या शेजारी बसले.
प्रो.देसाई काही बोलत नाहीत हे पाहून मीच गप्पा मारण्यासाठी विषय काढला.
“जीवन सुंदर आहे असं म्हणतात.खरंतर,आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात जीवन सूंदर
असावं असं मला वाटतं.भाऊसाहेब तुम्हाला कसं वाटतं.?”

माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून प्रो.देसाई मला म्हणाले,
“तुम्ही म्हणत आहात ते मला पटतं.अगदी कुकुल्या वयात,भुक लागली की
रडायचं,कुठंतरी दुखलं-मुखलं की रडायचं,आई जवळ हवी असल्यास रडायचं,सु:सु:
झाल्यावर रडायचं असं ह्या आयुष्याच्या टप्प्यात रडूनच सर्व काही सांगीतलं जातं.हसणं
क्वचितच होतं.आयुष्याच्या ह्या टप्प्यातलं ते जीवन सुंदर आहे असं कोण म्हणेल.?
नंतर जवळ जवळ अठराएक वर्षापर्यंत वय वाढत असताना,
“अजून तू लहान आहेस”
असं सारखं मोठ्यांकडून ऐकून घेत घेत हा आयुष्याचा टप्पा निघून जातो.जीवन सूंदर
आहे का? असं वाटण्याचा प्रश्नच मनात येत नाही.”

एव्हडं बोलून भाऊसाहेब थोडे गप्प झाले.ती संधी साधून त्यांच्याच विचाराचा धागा पुढे
ओढत मी म्हणालो,
“मला वाटतं अठरा वर्षानंतर जवळ जवळ पस्तीस,छत्तीस वयापर्य़ंत,आयुष्य हिरवं गार
असतं.टवटवीत असतं.कोपर मारीन तिथे पाणी काढीन अशी अंगात जीद्द असते.करू ती
पूर्व दिशा असा समज असतो.एव्हरेस्ट चढून जाईन तो थीटा वाटतो,महासागराचा तळ
पाहिन तो उथळ वाटतो.आकाशात झेप घेईन अशी धमक असते.निळ्या आकाशात
विहंगाचं मुक्त विहार पाहून त्याचा हेवा वाटतो.प्रणयराधनेत रस घ्यावासा वाटतो,
त्यातूनच विश्वाचं रहस्य उलघडलं जातं.मागचा पुढचा विचार करायला वेळ नसतो
नव्हेतर असला विचार करायाला मनातच येत नाही.”

प्रो.देसायांचा चेहरा, माझं हे म्हणणं ऐकून,आनंदी झालेला दिसला.
मला म्हणाले,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.हा आयुष्याचा टप्पा ओलांडून पुढे
जाताना,जीवनाचा मार्ग उताराला लागतो.ह्या उताराचा कल कुणाचा जास्त असेल तर
कुणाचा कल कमी असेल.त्यामुळे मनाचं सौन्दर्य जरी टिकून राहिलं तरी शरीराचं
सौन्दर्य उतरणीला लागतं.
डोळ्यावर चाळीशी येते.केस पिकू लागतात.त्वचेतला तजेलदारपणा कमी होऊ
लागतो.दाढा दुखू लागतात.एक ना हजार गोष्टी होत रहातात.कामाधामात काही कमतरता
दिसल्यास,नानु शहा म्हणतो तसं,
“Age became”चा आधार घ्यावा लागतो.

पण एक मात्र निश्चित ह्या उताराचा कल कमी करायचा झाल्यास, किंवा दुसर्‍या शब्दात
सांगायचं झाल्यास,आयुर्मर्‍यादा वाढवायची झाल्यास,जरूर तेव्हडा नियमीत
व्यायाम,बेताचा आहार,व्यसनापासून दोन हात लांब,सकारात्मक विचार,ह्या गोष्टींचा
पाठपुरावा केल्यास म्हणजेच,पचेल ते खाणं,सुचेल ते सांगणं,रुचेल ते बोलणं,आणि
सर्वांना आवडेल असं आचारण ठेवणं,हे करावं लागतं.”

हे सांगून झाल्यावर प्रो.देसाई मी ह्यावर काहीतरी बोलणार अशी अपेक्षा करीत होते.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, अशा वागण्याने वयोमर्यादा वाढते,त्यामुळे वार्धक्य कुणालाही चुकवीता
येणार नाही.हा आयुष्यातला टप्पा खरोखरच तापदायक असतो.
वार्धक्यातल्या असहनीय वेदना औषधं घेऊनही सहन होत नाहीत.परावलंबी व्हायला
होतं.डॉक्टर नव्हेच तर कुणी मित्र किंवा तत्सम कुणी मदत करून ह्या वेदनातून
सोडवील अशी अपेक्षाही फोल ठरते.आणि शेवटी मृत्यु हाच अगदी जवळचा मित्र
वाटतो.तो निश्चितच ह्या वेदनातून सुटका करायला कारणीभूत होतो.खरं आहे ना?”

“अगदी खरं आहे.अर्थात ह्याला अपवाद हे असतातच.तुम्हाला आमचे शेजारी प्रो.
सुखटणकर मला काय म्हणाले ते मी सांगतो.

“मला निवृत्त होऊन आता दहा वर्षं झाली.ख्रि़श्चनांचा धर्मगुरू पोप बेनेडिक्ट निवृत्त
होणार म्हणून त्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच.
चाळीसाव्या वयावरची शरीर शक्ती अजून माझ्यात आहे. पण बटाट्याची पाच पौंडाची
पिशवी उचलताना माझ्या लक्षात येतं की माझ्यात काहीतरी बदल झाला आहे.अगदी
अलीकडे नातवंडांबरोबर क्रिकेट खेळायचो,आता खेळण्यासाठी माझ्यापेक्षा वयाने मोठे
असलेल्यांच्या मी शोधात असतो.
प्रोफेसर असताना कॉलेजमधे लेक्चर देताना एकाच वेळी अनेक विचार करायची
माझ्यात पात्रता होती पण हल्ली एक गोष्ट घेऊन विचार करायला आव्हान वाटतं.माझ्या
जीवनात क्षमतेला विशेष स्थान होतं,आता आयुर्वृद्धि होत असताना क्षमता लोप
पावायला लागलेली दिसते.माझं मन आणि शरीर तणाव-मुक्त व्हायला लागलं आहे.
माझ्या लक्षात यायला लागलं आहे की माझा मृत्यु दूर क्षितिजावर आहे हे खरं
नाही.उलट त्याची नियोजीत भेट होणार आहे असं वाटतं.

आपली स्वतःची ओळख ही आपण स्वतःकडे कसं पहातो यावर अवलंबून आहे.आपली
क्षमता,भूमिका,मान्यता,आवश्यकता आणि दृढविश्वास यावर हे अवलंबून आहे मग तो
धर्मगुरू पोप असो वा मी असो.जरी आम्हा दोघां मधल्या ओळखीच्या घटकात
जमीन-अस्मानाचा फरक असला तरी दोघांची द्विधा परिस्थिती सारखीच आहे.
आम्हा दोघांहीमधे जरी एकाही अर्थपूर्ण गोष्टीत बदल झाला तरी त्यामधे असलेली
झलक नक्कीच बदलते. जसं डाळीच्या आमटीमधे लागणार्‍या चीजवस्तुत विशेष बदल
झाला तर त्याचं आंबट वरण व्हायला वेळ लागणार नाही.

माझ्यात काय किंवा धर्मगुरू पोप याच्यामधे काय, दोघांच्याही अर्थपूर्ण क्षमतेमधे
कमतरता आल्यास आम्हा दोघांच्या व्यक्तीमत्वात फरक होणं उघड आहे.
“कोणत्याही व्यक्तीच्या मौलिक गुणात फरक पडणं शक्य नाही.”
असं जरी मोठ्या पंडीतानी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतलं तरी त्यात फरक पडणं
अपेक्षीत आहे.जीवन खरोखरच इतकं साधसुधं असू शकतं का?
मी म्हणेन, आपण जे असतो ते आपल्या करणीवर आणि मानण्यावर असतो.

धर्मगुरू पोप यांच्या निवृत्तीवरून मी काय शिकायचं ही अगदी साधी गोष्ट आहे.
जी व्यक्ती अतिशय शक्तिशाली स्वेच्छाचारी पदावर आरूढ असूनही केवळ वार्धक्यामुळे
त्या पदावर कार्यशील राहू शकत नाही,मग माझ्यासारख्याला एखाद्या व्यक्तीने,
आपणहून उठून मला बसायला बसमधे जागा करून दिली तर ती शालीनतापूर्वक मी
स्वीकारायला हवी.”

प्रो.सुखटणकरांकडून हे सर्व ऐकून मलाही माझ्या वयाचा विचार करणं क्रमप्राप्त झालं.
म्हणूनच मी तुम्हाला थंडी सोसवत नाही असं सकाळी फोनवर म्हणालो होतो. पण एक
मात्र नक्की,माणूस खूपच पराधीन आहे.”

एव्हडं बोलून,
झाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही उठलो.काळोखही बराच झाला होता.
बाकावरून उठताना भाऊसाहेबांनी माझ्या हाताचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला.
माझे थॅन्क्स मानुन वर पुटपुटले
“आलिया भोगासी”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com