Sunday, March 17, 2013

सुर्व्या आला, तळपून गेला




"मी नेहमी सूर्याच्या बाजूने असतो.माझी बहीण मात्र देवाची बाजू घेते.पण देवाच्या अस्तित्वाची मला काही खात्री नाही."
प्रो.देसायांचा नातू त्यांना समजावून सांगत होता.
"फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे, सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे."
प्रो.देसायानीं आपला स्वतःचा विचार माझ्या समोर मांडला.
मी प्रो.देसायाना म्हणालो,
"भाऊसाहेब,हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळे
ही मुलं,
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल"
असं म्हणायला कचरत नाहीत.पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणार्‍यांना मूर्ख समजलं गेलं.कारण आकाशात पाहिल्यावर आपल्या जागेवरून सूर्याचं स्थान हललेलं दिसतं. प्रत्यक्ष परिस्थिती सायन्समुळेच सिद्ध करता आली.आणि ते समजून घ्यायला बराच अवधी जावा लागला.आता सायन्स समजून घ्यायला फार वेळ लागत नाही.नव्हेतर ते समजून न घेता आपलंच खरं आहे आणि तसं नसेल तर ते खोटं आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा असा अट्टाहास करणार्‍यांचा हट्ट पुरवायला ह्या फेसबूक-गुगल वापरणार्‍यांना
वेळही नाही आणि गरजही भासत नाही.
तुमच्या नातवाच्या म्हणण्यात मला जास्त स्वारस्य वाटतं.सांगा तर पुढे तो काय म्हणाला."

प्रो.देसाई आपल्या नातवांचा विचार सांगू लागले
 "माझा नातू म्हणतो,सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे. माझी एक खात्री आहे की,उद्या सूर्य उगवणार आहे आणि ह्या धरतीवर आपल्या उन्हाची धग,आणि प्रकाश देणार आहे जो ते तो गेली अब्जानी वर्ष करीत आला आहे.
आपल्या अस्तित्वाचं श्रेय माझी बहीण मात्र देवाला देते.एखादी अदभूत बुद्धिमान शक्ती ह्या पृथ्वीतलावर असून तीच काही करून माझ्या अस्तित्वाला जबाबदार आहे हे तीचं म्हणणं मला काही पटत नाही.एक मात्र मला सहजच दिसून येतं की,माझं सर्वकाही, खाणं-पिणं श्वास घेणं ह्याला सूर्य जबाबदार आहे.

ह्या जगात मला ज्या ज्या गोष्टींची जरूरी आहे त्या सर्व तापमान,प्रकाश आणि उर्जा ह्या मधून सूर्याकडून पुरवल्या जातात.दुसर्‍या दिवशी पहाटे उठल्यावर,खात्रीने पूर्वेला उगवणार्‍या सूर्याचं दर्शन मला होणार ह्या कल्पनेने मी भारावून जातो.उद्याच्या माझ्या आशा-आकांक्षा आणि ह्या धरतीचं भवितव्य ह्याला सूर्यच कारण आहे हे मी जाणून असतो.ज्या पृथ्वीतलावर मी उभा आहे त्याचं श्रेय मी सहजा़सहजी सूर्याला देत नसलो तरी भूगर्भशास्त्र सारख्या गोष्टी सूर्यामुळेच आहेत हे अगदी उघड आहे.पृथ्वीच्या भूगर्भामधला, ज्वालामुखी नैसर्गीक प्रक्रियेमुळे व्युत्पन्न होत असला तरी पृथ्वीच्या बाह्यांगावर जे डोंगर-कडे आहेत ते पृथ्वीवर होणार्‍या,हवामान,पाऊस आणि तापमान ह्यांच्या कालचक्रामुळेच झीजून गेले आहेत.
पृथ्वीतलावरची जमीन,वनस्पति आणि प्राणी ह्यांचं अस्तित्व,वाढ आणि प्रकाश-संश्लेषण
व्ह्यायला सूर्यच कारण आहे.तसंच त्यांचं जनन,मरण ही प्रकियापण सूर्यामुळेच आहे हे निश्चित आहे.

माणसाला मृत्युनंतर पुनर्जीवन मिळतं ह्या सारखे दिलासा देणारे शब्द, शेकडो वर्षापासून अफवांचा अविरत बनाव करून त्याची पुनरावृत्ति करून वापरात आणले गेले आहेत.ह्या घटनेचं अगदी प्राथमीक स्पष्टीकरण अगदी अधुरं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय असा चमत्कार इतिहासात घडलेला आहे ह्या बद्दलचा उत्तम आणि खास असा पुरावा आढळत नाही.

मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुःख आणि वेदना सोसत असतानाही नवीन दिवस उजाडणार हे नक्की आहे आणि हे सदैव होत रहाणार आहे.एखाद्या दिवसाचा प्रसंग कितीही कठीण असला तरी तो आपल्याला धैर्याने सोसला पाहिजे.सूर्य रोज उगवून आपल्याला धग,प्रकाश आणि जीवन देतो.रोज गाडीत टाकलेले पेट्रोल जे आपण जाळतो ते सुद्धा हजारो वर्षापासून असलेल्या सूर्याच्या उन्हाने वनस्पती उगवून, मरून,कुजून तेलाचं इंधन करायला उपयोगात आलं आहे.

घर तयार करायला लागणारं लाकूड,अंगावर वापरायला लागणारे कपडे, निर्माण करायला सूर्यच कारणीभूत आहे.जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे अन्न,पाणी आणि आश्रय शेवटी सूर्यामुळेच पुरवल्या जातात.मी सूर्याची पूजा करतो अशातला प्रकार नाही मात्र मी त्याची कदर करतो.प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मला त्याचा फायदा होतो कारण सूर्याकडूनच पृथ्वीवर प्रभाव होतो. माझ्या दृष्टीने देवाचं अस्तित्व हे परिस्तितिजन्य असायला आणि जाणीव व्हायला इतकं सोपं नाही.आणि म्हणूनच मी शक्की आहे.

ह्या सर्वांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हा असा आहे.काही कारणाने शोध घेऊन जर का आपण सिद्ध करू शकलो की देवाचं अस्तित्वच नाही तरी त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात कोणता फरक पडणार आहे?.खास फरक पडणार नाही.पण समजा सूर्याचं अस्तित्वच एकाएकी लोप पावलं, तर मात्र जीवनासकट सगळंच संपलं.माझ्यासाठी देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाची निर्णायक समिती अजून विचार करीत राहिल.पण सूर्याच्या अस्तित्वाची मला खात्री आहे.तो नेहमी दिसणार ह्याची मला खात्री आहे.सूर्य मला जीवन देतो आणि भविष्य देतो आणि म्हणून मी सूर्याला मानतो."

एव्हडं सांगून झाल्यावर देसाई माझ्याकडे बघून माझी प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घ्यायच्या प्रयत्नात होते.ते मी ओळखून त्यांना एव्हडंच म्हणालो.
"मानलं,बुवा"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com