Monday, March 11, 2013

ते निलगिरीचं झाड.







त्याचं काय झालं,काल झाड कापण्यासाठी म्हणून,मग ते झाड कितीही उंच असो वा
कापायला कठीण असो,सर्व अवजारानी आणि उपकरणानी परिपूर्ण असलेला असा एक
टुक आमच्या समोरच्या घरासमोर येऊन थांबला होता.
रस्त्याच्या पलीकडे एक ऊंच निलगिरीचं झाड आहे ते कापणार आहेत हे समजल्यावर
मला खूपच दुःख झालं.आमच्या समोरच ते झाड गेली पंधरा वर्ष मी पहात आहे.अंदाजे
शंभर वर्षापूर्वीचं ते झाड असावं असा माझा समज आहे.

मोठमोठे जुने वृक्ष जगातून भराभर नामशेष होत आहेत. जैव-विविधतेवर आणि
पर्यावरणावर ह्याचा नक्कीच दुष्परिणाम होत आहे हे निश्चित आहे.जुने वृक्ष नामशेष
झाल्याने पर्यावरणाला जबर धक्का बसणार आहे. अशा तर्‍हेचे वृक्ष, पक्षांना त्यांच्या
घरट्यांसाठी किंवा अन्य आश्रयासाठी पर्यावरणाची मौलिक भुमिका पार पाडत असतात.
शिवाय ही झाडं अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करतात,परागकण वहनाचं काम,
करतात,कार्बनचा भरपूर साठा करतात तसंच स्थानीक जलविज्ञानासाठी महत्वाची
भुमिका साकारतात.नैसर्गिकरीत्या मेलेल्या वृक्षाचा, लाकुडफाट्यासाठी, उपयोगात
आणता येतो.

हा एव्हडा मोठा निलगिरीचा वृक्ष फक्त दोन माणसानी अर्ध्या तासात तोडून भुईसपाट
केला.एव्हडंच नाही तर ह्या ट्रकाला जोडून असलेल्या एका मशीनमधे ह्या झाडाचे
तोडलेले तुकडे टाकून भुगा करून दुसर्‍या एका मोठ्या बोगीमधे जमा करून ते लोक
चालते झाले. त्या जागी एव्हडा मोठा वृक्ष होता, शेकडो वर्ष तो ह्या जागी होता असं
कुणाला सांगीतल्यास विश्वास बसणार नाही.

आता वसंत ऋतुत ह्या झाडावर येणारे,गोड गाणी म्हणणारे असंख्य पक्षी त्या झाडाच्या
शोधात असणार.निलगिरीचा सुवास देणारी,झाडाखाली पडलेली फुलं आणि पानं,
मिळणार नाहीत.झाडाखाली पडणारी सावली भोवतालचा परिसर थंड ठेवीत असे ते आता
होणार नाही.ह्या सर्व गोष्टींचा विचार मनात येऊन मन उदास झालं.पहाटे एक कविता
सुचली.

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

सावलीत झाडाच्या बसलो असता
मान उंचावून वरती पहाता
पर्णपत्री फुले आणि शाखा
आनंद देती डोळे विस्फारता

नव्या दिवशी थंड पहाटे
आठव आली वसंत ऋतूची
चाहुल लागली त्या पाहुण्यांची
दूर दूरचा प्रवास करूनी
शोधीती जागा घालण्या घरटे

उगवला दिनकर दिवस उजाडे
कळ्या उमलूनी होती फुले
मकरंद शोषण्या भ्रमर फिरे
कुठला वृक्ष अन कुठली फुले

संध्याछाया पसरू लागली
गगन होई लाल तांबडे
विहंग,भ्रमर अन फुलपाखरे
उसंत घेण्या जाती अन्य वृक्षाकडे

सावलीत झाडाच्या बसलो असता
धगी पासूनी अवसर मिळे
कसली सावली अन कसली धग
बदल जाहला त्या वातावरणे

तोडून गेले ते झाड निलगिरी
कुणीही प्रकट करेना आपुली दिलगिरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com