Thursday, January 24, 2008

" लाख चूका असतील केल्या "

"लाख चूका असतील केल्या"

हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे.
आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं,पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस,आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या. विहीरीतून भरपून पाणी मिळत असल्याने ह्या ढोणीत पाणी घालून एकावेळी खूप कपडे धुता येतात.
अशा ह्या घरात पुढच्या भागात भाऊंची पेढी (ऑफीस) सजवली होती.दोन तीन कारकून असल्याने त्यावेळी प्रचारात असलेली ठरावीक पद्धतची पेढीची सजावट असायची.बैठक मारून खाली गादीवर बसायचं,त्यावर सफेद रंगाचं कव्हर,मागे टेकण्यासाठी लोड म्हणून सिलींडरच्या आकाराची गादी आणि त्याच्यावर तसेच सफेद कपड्याचं कव्हर आणि समोर लिहायाला सुखकर होईल असे चार पायाचे स्टूल (टेबल), त्याचा टॉप उघडल्यावर आत व्यवहाराची पुस्तके (चोपड्या),लाल आणि निळ्या शाईच्या बाटल्या (दौती), लिहीण्यासाठी टाक (पेन) आणि कागदावर लिहून झाल्यावर शाई वाळण्यासाठी वाळू. ही वाळू हाताच्या चिमटीत घेवून ओल्या अक्षरावर पिंजरल्यावर काही वेळाने ती कागदावरून झटूकन टाकल्यावर
शाई पसरत नसायची. ही झाली पेढीची सजावट.

भाऊंची स्वतःची बैठक वेगळी असायची.त्या जागी ते स्वतः क्वचितच बसायचे.बॅंकेतून पैसे आणून ते आपल्या ह्या बैठकीच्या त्यांच्या पेटीत ठेवायचे.त्याला कुलूप लावून त्याची चावी एका रिंगमधे ओवून त्याची सांखळी एका बोटांत गरगर गरगर फिरवत सगळीकडे फिरत रहायची त्यांचीच एक स्टाईल होती. वामनमूर्ती भाऊ अंगात झूळ्झूळीत मलमलची पैरण खाली मसराईजचे सफेद शुभ्र धोतर,गळ्यात दोन पदरी सोन्याची चेन,छातीवरचे दाट केस दिसतील अश्यातऱ्हेने पैरणीची बटणे उघडी ठेवायचे,तोंड पान खावून पुरं लाल झालेलं, डोक्यावर विरळ असे केस आणि एका हातात तपकरीची चांदीची डबी,पायात कोल्हापूरी चप्पल,आणि नाकातून बोलल्या सारख्या आवाजाने गडी नोकराकडून सर्व कामं करून घ्यायचे.

बेळगांव,कोल्ह्यापूर,गोवा,मुंबईवरून गांवात लागणारा माल भाऊ, घावूक मागवायचे.गावातले लोक फूटकळ घेवून विकायचे.भाऊंचा धंदा चांगल्यापैकी चालायचा.भाऊची घरातली मंडळीत एक मुलगी,बायको आणि म्हातारी आई.भाऊंची बायको घाटावरच्या एका श्रीमंत गृहस्थाची मुलगी होती.तिला गावातली मालवणी भाषा येत नसे,म्हणून भाऊ तिच्याशी शुद्ध मराठीत बोलत असत.बाकीच्याशी व्यवहार मालवणीतून चालायचा.भाऊंच्या धंद्दयात त्यांच्या बायकोच्या माहेरहून आर्थिक मदत झाली होती.

सकाळची आंघोळ पांघोळ पुज्या आरच्या झाल्यावर भाऊंची एक खेप मार्केट मधे जाण्यात जात असे.बाकी तोच ड्रेस फक्त डोक्यावर सफेद गांधी टोपी चढवली झालं.हातात नोटांच पुडकं घेवून जायचे.दुपारच्या जेवणाला लागणारा भाजी बाजार, आवडेल ती वस्तु घेण्यात आणि त्याची दरखोरी न करता,विकत घेण्यात त्याना विशेष वाटायचं. बाजारात बरोबर नेलेल्या गड्याबरोबर भाऊ भाजीची पिशवी पाठवून द्दयायचे आणि आजुबजुच्या ईतर व्यापाऱ्याबरोबर थोडावेळ गप्पागोष्टी मारून परत पेढीवर येवून बसायचे.
भाऊंचा धंदा चांगलाच दम बसलेला असल्याने त्याना गिऱ्हाईकाची वाट बघत बसायची जरुरी भासत नव्हती. आलेली कॅश आपल्या पेटीत जमा करून दुपारच्या बारा वाजण्यापुर्वी कॅनरा बॅंकेत जावून स्वतः जमा करायचे. ह्या बाबतीत त्यांचा नोकरावर विश्वास नव्हता.आणि दुसरे म्हणजे तिथून ते तडक मासळी बाजाराची वाट धरायचे. भाऊंना जेवताना मासे नसतील तर घांस तोंडात जात नसे.

मासळी बाजारात भाऊ मासे विकणाऱ्या कोळणीत चांगलेच प्रसिद्ध होते.त्याचं कारण असं की कोळीण सांगेल ते दाम देवून भाऊ मासे विकत घ्यायचे.भाऊंना कोळणी पण बाजारभावापक्षा पाच दहा रुपये जास्त भाव सांगत असत. त्यामुळे भाऊ बाजारात दिसताच कोळणींचा हा आरडाओरड व्हायचा."रे भाऊ, हयसर ये मरे,बघ तुझ्यासाठी ताजो सरंगो ठेवलसंय,बर्फातलो नाय " असं म्हणून आपला तेव्हडा सरंगा ताजा दुसऱ्यांकडे जावू नकोस असं भाऊंवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न होत असे.पण भाऊ करायचं तेच करायचे.सरंगा आणि बांगडे गड्याबरोबर घरी पाठवून द्दयायचेआणि साधारण दोन वाजायच्या दरम्यान घरी जेवायला यायचे.
सरंग्याची आमटी,बांगड्याचं तिरफळं घालून केलेलं तिखलं, तळलेले सरंग्याची कापं आणि जिरेसाळ भात असलं जेवणाचं सागरसंगीत झाल्यावर झोप कुणाला येणार नाही?संध्याकाळचा चहा आणि बेकरीतली ताजी "भिस्कुटं" खावून झाल्यावर समोरच्या कल्पना मेडिकल स्टोव्हरच्या मालकाबरोबर गोष्टी रंगायच्या,त्यावेळी तिथे नियमाने, साफळे फौजदार,वैनतेयचे संपादक बापट,डॉक्टर वसंत पंडीत, निष्णात वकील निळकंठराव पुनाळेकर वगैरे बडीमोठी मंडळी संध्याकाळच्या अड्ड्यावर येवून जगातल्या सर्व विषयावर चर्चा व्हायची. संध्याकाळ लोटल्यावर पेढीचे व्यवहार जरा मंद व्हायचे. भाऊंच्या पेढीत पेट्रोमॅक्सची बत्ती पेटली की समजावं रात्र झाली.नऊ वाजता पेढी बंद झाल्यावर भाऊ रात्री थोडसंच खाऊन झोपायचे.

नंतर बरोबर रात्री दोन वाजायच्या सुमारास भाऊ उठायचे. रात्रीचे जोरजोरात खाकरून तोंड धुण्याचा आवाज झाल्यावर भाऊ उठल्याचे समजायचे.एक ग्लास पाणी पिऊन झाल्यावरनेहमीचेच कपडे करून डोक्यावर गांधी टोपी चढवून कंदील पेटवून सायकलला टांगायचे आणि कुत्रे मागे लागू नयेत म्हणून
एक छोटीसी काठी जवळ ठेवून सरळ तुळस गांवाच्या दिशेने कूच करायचे.बायजा नांवाची भाऊंची ठेवलेली बाई एका लहानश्या घरात राहायची.तिला एक छोटी मुलगी पण होती.भाऊ बायजाकडे पहाटे पर्यंत वेळ घालवायचे.हा त्यांचा आज कित्यक वर्षाचा रिवाज असायचा.उजाडल्यावर भाऊ आपल्या घरी परत यायचे.भाऊंच्या बायकोला हा त्यांचा संबंध माहित होता.पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती,फक्त हल्ली म्हणे तिने त्यांचाशी संबंध सोडला होता.जगाच्या लाजे करीता ती मान खाली घालून जीवन जगत होती.

आतापावेतो पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.भाऊंच्या एकच एक मुलीचं लग्न झालं,भाऊनी बायजाच्या मुलीचं पण लग्न लावून दिलं होतं.बायजा पण आता थकली होती. भाउंचा पण पुर्वीचा दम खचला होता.अलिकडे ते बायजाकडे जायचे पण बंद झाले होते.तुळस गांवाला रात्री दोनला उठून सायकलेने जायला त्याना जमत नव्ह्तं. भाऊंची म्हातारी आई अलिकडेच निर्वतली होती.पेढीचे व्यवहार आता त्यांचा जांवई पाहत होता.बाजाराचे सर्व व्यवहार आता गडी नोकर पहात होते.
भाऊना हात धरून घरातून पेढीवर आणून बसवावं लागत होतं.मधून मधून भाऊ आपल्या जीवनाचा आढावा घेण्यात वेळ घालवीत.आपल्या आप्पल-पोट्या जीवना पलिकडे त्यानी दुसरं काही पाहिलं नव्हतं, त्याचा त्यांना खंत होत होता.एक दिवस भाऊना पऱ्यालिसीसचा ऍटॅक आला. सर्व कारभार संपला असं
त्यांच्या लक्षात आलं.शेवटी बायजा उपयोगी पडली नाही.त्यांच्या बायकोनेच त्यांची सेवा केली.ते त्यांच्या लक्षात पण आलं असणार.

"लाख चुका असतील केल्या
केली पण प्रीती"
हे गाणं त्याना किती लागू होतं देव जाणे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: