Friday, January 11, 2008

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत


" बंबई, बॉम्बे " ज्याला म्हणत होते,त्याला आता " मुंबई " किंवा स्टाईलमधे काही लोक हल्ली " मुंबाय " म्हणतात त्या मुंबापुरीला मुळ मुंबादेवी ह्या देवीच्या नांवावरून बहुतेक मुंबई असे नांव आले असावे.माझा मोठा भाऊ ह्या नामकरणाला कसा कारणीभूत झाला ही एक गंमतीदार गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे.खरं म्हणजे त्याचं नांव महाराष्ट्र सरकारच्या गॅझेट मधे ठळक अक्षरात लिहीलं गेलं आहे.

मधुकर लक्षमण सामंत आता बॅण्ण्व वर्षाचा असेल. मला आठवतं आमच्या लहानपणी आम्हाला हा कम्युनीस्टांच तत्वज्ञान सांगत असे.आमच्या ते डोक्यावरून जात असे.तरूण वयात कम्युनीस्ट असणं हे त्या दिवसात फॅशन समजली जात होती.रशियात पाऊस पडला की ईकडचे कम्युनीस्ट छत्री उघडतात असं गमतीने म्हणंत.

मधुभाऊ जसा वयाने मोठा होत गेला,तसं त्याचं कम्युनीस्ट तत्वज्ञानाचं वेड कमी कमी होत गेलं.मुळचा राजकारणी असल्याने कम्युनीस्ट प्रणालीला साजेशी, आणि त्याच्या मनाच्या ठेवणीशी जुळणारी, त्यावेळी जरा प्रसिद्धीला येवू घातलेली, महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत, स्थापन झालेली शिवसेना त्याला जॉईन करायला सोपं वाटलं.आणि त्या पार्टीत तो दिलचस्पी घेवू लागला.त्याच वेळी बॉम्बेचं मुंबई नामकरण करण्याचे आंदोलन जोरात चालू होतं.मधुभाऊ BALLB होता.आणि या विषयावर कायदेशीर लढाई पण देणे आवश्यक आहे हे शिवसेनेच्या पुढाऱ्याना समजावून सांगण्याचा त्याचा प्रयत्न सफल झाला.

त्याने स्वतःच्या नावाने मुंबई हायकोट्रात केस सादर केली.शिवसेनेने त्याला आर्थीक मद्त देण्याचं कबूल केलं, आणि त्याने पण नावाजलेली आणखी वकील मंडळी जमा केली.बरेच दिवस ही केस चालली. मधुभाऊने ऐतिहासीक कागदपत्रे जमा करून त्याचा कायदेशीर अभ्यास केला.पद्धतशीरपणे त्यांची मांडणी मांडून कोर्टाला पटवून दिलं.आणि शेवटी बॉम्बेचं मुंबई असं नामांतर करण्याचा कायदा झाला.
मधुभाऊचा शिवसेनेने जाहीत सत्कार केला.

अलिकडे मी मधुभाऊना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.ह्या वयातही त्यांची स्मरणशक्ति शाबूत आहे. मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला.कारण त्यावेळच्या आठवणी त्याच्या कडून ऐकून घ्यायला, आता कुणीही उरलं नव्ह्तं.सर्व जुन्या आठवणींची उजळणी करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची
समाधानी बघून मला पण जरा बरं वाटलं.जाता,जाता मी त्याला म्हणालो, "मधुभाऊ, आता सर्व जगात बॉम्बेला मुंबई म्हणू लागले आहेत,हे पाहून मला खूप बरं वाटतं एक म्हणजे मुंबई ह्या नावाला बदलून बॉम्बे काय बंबई काय कोणी काहीही नावाने आपल्या मराठी शहराला संबोधीत होतं,ते आता नीट नावाने संबोधू लागले आणि दुसरं म्हणजे बॉम्बेचं मुंबई म्हणायला माझा मोठा भाऊ कारणीभूत झाला हे लक्षात येवून खूप बरं वाटतं."

वार्धक्याने त्याच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर आणखी सुरकुत्या पडल्या त्या त्याच्या आनंदाने हंसण्याच्या होत्या हे फक्त मीच जाणू शकलो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: