Thursday, March 6, 2008

गोव्याची ज्यूली आणि तिची श्रद्धा

" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्याचा आतला गर जास्त आणि त्याची बिज्याला कोकणात कोयरी म्हणतात ती खूप लहान असते,आणि बाहेरची साल अतिशय पातळ असते.हापूस आंब्याचा स्वाद काय विचारता!,कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो.

पण माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी ह्या पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल. ह्या मांडकूर आंब्यासाठी, बांगड्या माशासाठी आणि नागचाफ्याच्या सुगंधाची आठवण येवून मी नेहमी गोव्याला जायला उत्सुक्त असायचो.

माझ्या वहिनीचं माहेरचं घर चिरेबंदी आणि मंगळोरी कौलांच आणि टुमदार होतं.शेजारी एक प्रशस्त चर्च होतं.तसं गोवं सुंदर सुंदर चर्चच्या इमारती बाबत खूप प्रसिद्ध आहे.त्यावेऴच्या पोर्तुगीझ राज्यकर्त्यानी खूप अशी चर्चं बांधली होती.वहिनीच्या शेजारी प्रशस्त झोपडीवजा एक घर होतं.पावलू फर्नांडीस आणि त्याचं कुटूंब त्या घरात राहायचं.पावलूं त्याची बायको मेरीयम,पावलूचे वडील फास्कू,आणि पावलूची दोन मुलं पास्कल आणि ज्युली असं छोटसं हे कुटूंब होतं.कोंबड्याची खूराडं आणि डूक्करांची पिलावळ त्यांच्या आवारात असायची.

आम्ही वहिनी बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की हे सर्व कुटूंब आमच्या सहवासात असायचं.अलिकडे मी खूप दिवसानी गोव्याला गेलो होतो.फास्कू तर केव्हांच निर्वतला होता. पावलू आणि मेरियम बरीच थकली होती. पास्कल गोवा सोडून गेला तो इंग्लंडला स्थाईक झाला होता.ज्युली मात्र लग्न न करताच घरातच होती.ती आता "नन" झाली होती.
मला भेटल्यावर मी तिला सहज विचारलं,
"जुली तू एकदम नन व्हायचं का ठरवलंस?"
मला म्हणाली,
"बाजूच्या चर्चात मी आईवडिलांबरोबर नेहमीच जायची, पास्कल निघून गेल्यावर त्याचं परत येण्याचं चिन्हं काही दिसेना. आईवडिलांकडे कोण बघणार?"
मी ज्युलीला म्हणालो,
"तू लग्न वगैरे काही केलंस का नाही?"
ज्युली जरा हंसतच मला म्हणाली,
"लहानपणी तुला आठवतच असेल,तुम्ही सर्व इथे यायचा,त्यावेळी तू पण आमच्या बरोबर रविवारी चर्चातही यायचास.""मी हिंदू असलो तरी तुमच्या बरोबर चर्चात येवू शकतो का? म्हणून पावलूला विचारलं होतंस.आणि पावलू तुला म्हणाला होता की येशूला सर्व धर्म सारखेच वाटतात. आपण सगळी त्याचीच मुलं.हे ऐकून तुला किती आनंद झाला होता.चर्चात आल्यावर येशूच्या मुर्तीकडे बघून तू किती भावनावश झाला होतास. मला म्हणालास ""ज्युली तू नन का होत नाहीस? ""मला पण नंतर नन व्हावंस वाटलं."

ज्युली पुढे सांगू लागली,
" विश्वास आणि श्रद्धा हे फक्त शब्दच नाहीत.मी मला ख्रिश्चन म्हणणं एक आणि त्यासाठी वाहून घेंणं दुसरी गोष्ट.नन होण्याने मला तसं जगायला मिळालं.’लव्ह दाय नेबर’ असं प्रत्यक्ष येशूने म्हटलंय आणि मी सुरवातीची नन होवून,आईवडील, शेजारी, मुलं पाहून सर्वांवर मनापासून प्रेम करू लागले.मुलान मी शिकवूं लागले.सुरवातीला हे माझं गोतावळ जरा लहान होतं.नंतर मी पेडण्याच्या नेहमीच आरडाओरड,भांडणसांडण, आणि नेहमीच उपासमारीनें पछाडलेल्या झोपडपट्टी परिसरात जणू येशूच्या मनातल्या गहिऱ्या आव्हाहनास दोनहात करण्यासाठी जात राहीले.त्या लोकांची दारूण परिस्थितीत मी पण सामील होण्याचा प्रयत्न करू लागले.रात्रीचे भांडणाचे आवाज,मुलांना हांक मारून आक्रंद करणारे ते आयांचे रडणे,तो होणारा अन्याय पाहून काही तरी करावं असं माझ्या मनात आलं."
मी म्हणालो,
" पावलू सांगत होता की आतां तू चर्चात कमी जातेस म्हणून"
"हो मी त्या चर्चातल्या, जगातल्या पिडीतांसाठी फक्त प्रार्थना करणाऱ्या नन ऐवजी, मी ती प्रार्थना सोडून देवून माझ्या हाताच्या बाह्या वर सरसावून ह्या लोकांसाठी वेळ द्दयायला लागले.आणि आता तर मडगांवच्या फांसावर जाणाऱ्या कैद्दयांच्या सेवेत वाहून घेतलं आहे."
मी म्हणालो,
"कमाल आहे ज्युली तुझी.लहानपणी आपण इकडे असताना असं कधीच विचारात आणलं नाही की कोण पुढल्या आयुष्यात काय करील.खरोखरच तुझं काम वाखाणण्या सारखं आहे."

त्यावर हंसत हंसत ज्युली म्हणाली,
"माझी श्रद्धा आणि माझा ज्यावर विश्वास आहे त्याच गोष्टीवर मी आता माझं लक्ष केंद्रीत करते आहे.येशूचं मोठ्यात मोठ्ठं आव्हान म्हणजे ’शत्रूवरपण प्रेम कर’आणि ह्या फांशीवर जाणाऱ्या कैद्दयात मला माझा शत्रू दिसायला लागला आहे.ज्यांचं पुरनवसन होणारच नाही,असं आपल्या समाजाला वाटतं,आपल्या सुप्रीमकोर्टाने सुद्धा फांशीची शिक्षेस कायद्दयाने मंजूरी दिली आहे.गेली कित्येक वर्षे मी ह्या लोकांच्या सानिध्यात असते.आणि माझ्या समोर सहा मानवाना फांशी दिली आहे.मरण्यापुर्वी मी त्यांना माझ्याकडे पहायला सांगितलं,जणू त्यांना मरणापुर्वी एक प्रेमळ चेहरा लक्षात राहावा. माझा प्रेमळ चेहरा त्यांना समजावत होता की ते आणि आम्ही सर्व केलेल्या कृत्यापेक्षा जास्त किंमतवान आहो."

मी ज्युलीला म्हणालो,
"केव्हडी तुला तू उन्नत करून घेतलीस.कुठून कुठे तू गेलीस."
ज्युली मग म्हणाली,
"पुढे आणखी ऐक,ह्या गुन्हेगारांच्या सहवासात राहून सगळं काही झालं असं नाही.मी त्यांच्या कुटुंबियानापण भेटते.आणि ज्यांचा बळी घेतला गेला त्यांच्या कुटूंबियाना पण भेटते.गुन्हा ज्यांच्यावर झाला त्यांच्या कुटूंबियाना आणि गुन्हा ज्यानी केला त्यांच्या कुटूंबियाना भेटून प्रेम करणं महा कठीण जातं,बरेच वेळा ज्यांची हानी झाली आहे त्यांच्या कुटूंबियाना माझा हा डबल रोल चुकीचा वाटतो.मला ते समजतं पण मी त्या दोघांनाही भेटण्याचा माझा हट्ट सोडला नाही.ज्यांची हानी झाली त्यांच्या कडून मी एक शिकले की त्यांना किती एकटं,एकटं वाटतं.त्यांच्या कुटूंबातल्या एकाचा काही गुन्हा नसताना खून व्हावा हे किती भयंकर आहे, त्यांच दुःख किती खोल आहे,त्यासाठी ते सर्वांपासून दूरच राहतात.परंतु त्यांना पण कुणी तरी भेटावं,त्यांच ऐकावं,त्यांच्या बद्दल काळजी दाखवावी असं सारखं वाटत असावं.एव्हडं करायला मला कसलंच काही ग्रेट केल्यासारखं वाटत नाही."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्यावर ती एव्हडंच म्हणाली,
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे त्यावर मी लक्ष ठेवते."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: