Thursday, March 20, 2008

प्रो.देसाई म्हणतात……..

“लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?”
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.

मला म्हणाले,
” जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.

मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते. आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.

दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच “होयगावडा” होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शात असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

No comments: