Saturday, March 15, 2008

प्रति(मा)भा उरी धरूनी,तू काव्य करीत रहावे!

“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”

काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो,
“अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती.”
हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करूनमला म्हणाला,
“अलिकडेच मी लिहीलेली कविता तू वाचलीस का?”
मी म्हणालो,
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
मला शरद म्हणाला,
“तुला वेळ आहे का मी तुला माझी हकीकत सांगतो.चल आपण त्या सुक्या झालेल्या वाळूच्या ढिगावर बसुया.”
मी म्हणालो,
“खूप वेळ नाही ना लागणार? घरी माझी पत्नी वाट बघत असणार आम्ही दोघं तिच्या एका मैत्रीणीच्या घरी जेवायला जाणार आहो. इकडे तिकडे जरा उशीर झाला म्हणून हरकत नाही म्हणा.तुला हा प्रश्न मी कधी ना कधी विचारणारच होतो,मनात माझ्या कुतुहल होतं.होवून जावूदे. कळेल काय ते तुझ्या कडून एकदाचं”
शरद सांगू लागला,
” मला वाटतं,कवितेच्या माध्यमामधून मनातल्या भावनांचा झालेला विचका,दैविक विचाराचा गोंधळ,आणि जीवनात आलेल्या गंभीर दुर्घटना सहन करीत असताना येत असणारे अनुभव प्रदर्शीत करण्याचं कविता हे एक साधन आहे.नव्हेतर तेच माझ्या जीवनातलं एक साध्य झालं आहे.

मी ज्यावेळी बारा वर्षाचा होतो,त्यावेळी मी माझ्या सख्या लहान भावाच्या अपघाती म्रृत्युला कारण झालो होतो.
त्याचं असं झालं,आम्ही सर्व मित्रमंडळी एकदारेडीला जाताना वाटेत एक छोटेशी घाटी लागते.ती चढून जात असताना घाटीच्या माथ्यावर आल्यावर खाली रेडी नदी दिसते डोंगरच्याकडेवर जावून नदीचं पात्र अगदी विलोभीनीय दिसतं.ते पहाण्यासाठी आम्ही सर्व एकदम गर्दी केली आणि असं करताना माझा धक्का लागून तोल गेल्यामुळे माझा धाकटा भाऊ सरळ खाली घरंगळत गेला.खूप खरचटून मार लागला त्याला.आणि हॉस्पीटलमधे जाईपर्यंत त्याचा अंत झाला.
एका क्षणात माझं जग कायमचं बदलं. दुःख,जीवघेणी भिती,शरम आणि हताश होण्याची माझी जी मनःस्थिती झाली त्याची कल्पनासुद्धा मी कघी केली नव्हती.त्यानंतरच्या काळात छिन्नविछीन्न मनःस्थिती झालेल्या माझ्या कुटुंबातलं कुणीही माझ्या भावाच्या मरणाचा विषय माझ्याशी काढू शकलं नाही.ह्या स्मशानशांततेने मी माझ्या दुःखदायी भावना बरोबर घेवून एकाकी पडलो.आणखी भयानक गोष्ट म्हणजे,आयुष्य सहजगतीने जगण्याच्या माझ्या समजुतीला एकाएकी एक तडा आली,एकाएकी सर्व काही शब्दशः रसातळाला गेलं “

हे सर्व ऐकून त्या सकाळच्या प्रहरी मी पण खूप मायूस झालो.
मी त्याला म्हणालो,
“खरंच, मी तुला तुझ्या दुःख्खी कविता लिहीण्या विषयी विचारायला नको होतं.मी उगाचच तुला तुझ्या जुन्या आठवणी काढायला लावून दुःखी केलं”
हे ऐकून शरद मला म्हणाला,
“तसं तू तुझ्या मनाला मुळीच लावून घेवूं नकोस. तुझ्या सारखा अश्या आस्थेने विचारणारा मला कित्येक दिवसात कोण भेटला नाही.मला थोडा “स्टीम आउट”होवू दे.बरं वाटेल मला.
एकदांच तुझ्या प्रश्नाचं पुरं उत्तर मला देवू दे.वाटलं तर तू वहिनीनां मोबाईल वरून सांग की तुला थोडासा उशिर होईल म्हणून.”
मला त्याची खरंच किंव आली.माझ्या पत्नीला मी फोन केला त्यावेळी तिच मला म्हणाली की,
“तुम्ही लवकर नाही आलात तरी चालेल.माझ्या मैत्रीणीच्या नवऱ्याला काही अर्जंट काम आल्याने तिनेच मला फोन करून सांगितलं की परत कधी तरी आपण भेटूं”हे ऐकून मलापण जरा बरं वाटलं निदान शरदला आता सगळं काही सांगता येईल आणि माझा ही प्रश्न सुटेल.

मी त्याला म्हणालो,
” तू आता निवांत सांगू शकतोस.आम्ही बाहेर जाण्याचं रहीत केलं.”हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर हुरूप दिसला.
मला म्हणाला,
“अशा गंभीर दुर्घटनापासून एक स्थित्यंतर येतं की,ह्या दुर्घटनेला बळी पडणारे इतरापासून विलग होतात. इतर लोकांपासून दुरावल्यामुळे,त्यांच्या जीवनातल्या भावनांशी सुद्धा विलग व्हायला होतं,ते इतकी की अगदी आयुष्य सुन्न होतं,आणि जगण्याच्या क्रियेत जणू अर्ध जीवन जगल्यासारखं भासतं.त्यावेळी मी तरूण असल्याने ही जीवनातली विलगता,आणि सुन्नपणा ओलांडून कविता लिहायला प्रारंभ केला.”
मी म्हणालो,
“शरद,पण तुला कविता लिहीण्याची प्रतिभा कशी उत्पन्न झाली?”
शरद म्हणाला,
“मी जेंव्हा कविता लिहीतो तेंव्हा, मी माझ्या अनुभवाचा आढावा घेतो,मी माझ्या अंतर मनात डोकावून पहातो,कच्च्या संभ्रमाच्या मेंदुत राहीलेल्या आठवणी जागृत करतो.त्याचं मग शब्दांत रुपांतर करतो आणि शेवटी ते शब्द यमकात येतील असे मांडतो.ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते.
पुर्वी मला मी माझ्या मनातल्या गोंधळाने शक्तिहीन आणि अचपल वाटून घ्यायचो.पण आता मी चपळता आणली.आणि माझ्या अनुभवाला एक प्रकारचा स्फुर्ती आलेला आकार देवून त्याचं रुपांतर सहजगत्या कुणाला कळेल अशा अर्थामधे आणतो.”
मी त्याला म्हणालो,
“म्हणजे तुझ्या मनातलं दुःख तू कवितेच्या रुपात प्रदर्शीत करतोस.”
मला म्हणाला,
“अगदी बरोबर.कविता म्हणजे भावनेचा अन्वार्थ. अगदी दुःखी कविता लिहून मी जणू मला पण जगायचं आहे हे सिद्ध करतो. आणि म्हणून कविता जीवनातील गुंतागुंती आणि विरोधाभास याच्या सत्यतेचं प्रतिनीधीत्व करते. शिवाय माझ्या काव्याचा आणखी चमत्कार म्हणजे माझ्या कविता आणि माझे वाचक या दोघांमधे मी सहभागी होतो.त्यामुळे माणसा माणसातल्या विलगतेवर विजय होतो.”
हे शरदचं कवितेवरंच चिंतन ऐकून मला खूप गम्म्त वाटली.
मी म्हणालो,
” आणखी तुझे कवितेवरचे विचार काय आहेत ते सांगून टाक बाबा” मलाही आता घरी जायला उशीर होत होता.

शरद म्हणाला,
“एव्हडं सागून झाल्यावर आपण निघूया.उन पण खूप लागायला सुरवात झाली आहे. मी कुणाचीही कविता वाचली की मला उचंबळून येतं.मला माहित आहे की जगात मी एकटाच कविता लिहीत नाही.ज्या व्यक्तिची कविता मी वाचतो,ती व्यक्ति जणू माझ्याशी संबंध जोडते असं मला वाटतं.
मला असा भास होतो की ही व्यक्ति आणि मी एकाच बोटीतून प्रवास करत आहोत.त्यांच्या कविता मला धीर देतात.त्यांची कविता एकप्रकारची मला दिलेली गिफ्ट वाटते,आणि मला हे जीवन जगावंसं वाटतं.”

हे शरद्चे उद्गार ऐकून मी बराच सदद्बीत झालो.उठता उठता त्याला म्हणालो,
“शरद हे तुझं सगळं ऐकून मला एका कवितेच्या दोन ओळी आठवतात.त्यात थोडा फरक करून म्हणावसं वाटतं,

“प्रति(मा)भा उरी धरूनी
तू काव्य करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार तू करावे”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: