Tuesday, August 19, 2008

अवघे पाऊणशे वयमान.

अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली.
१४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते काढदिवस.
जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत,
कुकलं बाळ होतो.
त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत
अल्लड मुलगा होतो.
त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत
शाळकरी होतो.
त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत
कॉलेज वीर होतो.
त्यानंतर थोडी वर्ष
चाकरमानी होतो.
त्यानंतर लग्न झाल्यावर
हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो.
त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर
गृहस्थ झालो.
त्यानंतर पन्नासी उलटल्यावर
वयस्कर झालो
त्यानंतर साठी उलटल्यावर
म्हातारा झालो
त्यानंतर आता पंचाहत्तरी झाल्यावर
कदाचित थेरडा होईन
पण काय हरकत आहे असं म्हणून घ्यायला.हे कुणालाही चुकलेलं नाही.जो तो आपआपल्या अक्कले प्रमाणे बोलतो चालतो आणि वागतो.

“दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान”

असं काही नाही मंडळी.
जवळचं वाचायला “ढापणं” लागली तरी दूरचं चांगलं दिसतं.
कान शाबूत आहेत.पाल चूकचूकली तरी स्पष्ट ऐकायला येतं
दात अजूनही शाबूत आहेत,कवळी लावावी लागली नाही.
मान ताठ करून अजून चालतो.
जीना चढताना,उतरताना आधार घ्यावा लागत नाही.
हे कसं शक्य झालं असं विचाराल मंडळी तर त्याच उत्तर-
सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही.सुपारी आडकित्यात कशी कातरतात माहित नाही.
सुपारीचा बेडा कसा सोलतात माहित नाही.
“घुटूं” कधीच घेतलं नाही.वासाने उमळ येते.
“फुंकणीच्या” धुराने घुसमटायला होतं.
“बाळं” लागण्याचे दिवस आता गेले.
पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत.
पु.ल. म्हणतात,
“उतार वयात सकाळी उठल्यावर जर दोनही गुढगे दुखले नाहीत तर समजावं की आपण मेलो.”
तसं काही होत नाही.खडखडीत आहे.
हे काही माझं कौतुक म्हणून सांगत नाही मंडळी.
उद्दांच काही माहित नाही.आज आहे हे असं आहे.
एव्हडं मात्र खरं,

ते दिवस निघून गेले

मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्षमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्मृतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत

तेव्हा मंडळी आहे ते असं आहे.
माझ्या ह्या जन्मदिवशी तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या आहेत.त्यामुळे ह्याच लेखातून आपणा सर्वांचे धन्यवाद.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: