Monday, August 11, 2008

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.”

कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही.
तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्यादारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता.
ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत बसून त्या संततधारा बघत होते.मनात ना ना तर्‍हेचे विचार येत होते.

माझ्या घराच्या समोर नुसतं तळं झालं होतं रस्ता दिसत नव्हता.अशा परिस्थितीत दोन गृहस्थ खोरी फावडी घेऊन माझ्या घरासमोर माझ्यासाठी वाट करून देत होते.मी घरात जाऊन खिडकीतून त्याना न्याहाळत होते.माझी मलाच लाज वाटत होती.
माझ्या मनात पहिला विचार आला की मी यांची परत फेड कशी करूं? माझे केस मला फणी घेऊन विंचरायला त्राण नव्हता.माझ्या पतिच्या निर्वतण्यापुर्वीच्या आयुष्यात मी कधीही कुणाकडून मदत किंवा सहाय्य मागितलं नव्हतं.आणि त्याबद्दल मला विशेष वाटायचं.माझं स्वातंत्र्य आणि माझ्या क्षमतेवर मी मला बांधून घेतलं होतं.आता नुसती घरात बसूनपडणार्‍या पावसाकडे बघण्यात मी स्वतःला काय समजू?

आता माझ्यासाठी येणारी मदत आणि प्रेम मला स्विकारायला सोपं नव्हतं.मला शेजारी जेवण आणून द्दायचे.मला त्यांच स्वागत करायला ही त्राण नव्हता.पतिच्या एकाकी जाण्याने मी अगदीच हतबल झाली होती.पूर्वी मी अशी आळशी नव्हती.मी ओक्साबोक्शी रडत होती.शेवटी माझी शेजारीण मंदा मला म्हणाली,
“तुला जेवण आणून देणं हे तुझ्यासाठी विशेष काम मला पडतं असं मी समजत नाही.उलट मला असं करायला बरंवाटतं.तुला काही तरी माझ्या कडून मदत होते ह्याचा मला खूप आनंद होतो.”
त्या माझ्या अशा प्रसंगाच्या वेळी मदत करणार्‍या सगळ्यांकडून मी असेच उद्गार ऐकत होते.तिथल्याच एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.” आता मी पूर्वीची राहिले नाही.आता माझ्यात खूपच बदल झाला.माझ्या जीवनाचं लक्तर आतां उपकृततेने आणि विनयशिलतेने विणलं गेलं होतं.मी आश्चर्य चकित होऊन पाहू लागले की अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.मला आता वाटायला लागलं की
विनम्र होण्यात अंगात एक क्षमता येते.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: