Thursday, August 7, 2008

उलगता बाजार

“सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”
मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेवता येत नसल्याने,
“काय करणार? ही परिस्थिती यायला तूच कारण आहेस मग तुला ताजी टवटवीत फूलं वाढत्या भावात सकाळीच आणून तुझ्या पुजेला कशी वहायला आम्हाला परवडणार. अशी तर अशी मानून घे देवा”
असं मनातल्या मनात पूजा करताना आईच्या तोंडून हळूवार आलेले उद्गार ऐकून तिची आणि त्या देवाची मला दया यायची.

यापूर्वी साकाळीच उठून दरखोरी करून ताज्या ताज्या गोष्टी खरेदी करून आणण्याचे आमचे दिवस सध्या तरी संपले होते.
आम्ही खेडेगावात राहत असल्याने आमच्या सारख्या जेमतेम परिस्थिती असलेल्या लोकाना ह्याचा खूपच फायदा होतो.

ह्या उलगत्या बाजारात खरेदी करण्यातही काही त्रुटी दिसून येतात.अगदी कठिण गोष्ट म्हणजे इतक्या स्वस्तात विक्रिकर विकायला तयार होत असताना इच्छा असूनही तुटपुंज्या पैशात सर्व खरेदी करण्याचा हव्यास कसा पूरा करायाचा असं हळहळून मनात यायचं.
“आणखी थोडे पैसे कमी दे वाटलंतर”
किंवा,
“आता पैसे नसतील तर उद्दा दे जमलं तर”
असं म्हणून तो माल गळ्यात टाकण्याच्या उद्देशाने नव्हे तर आमच्या परिस्थितीची किंव येऊन त्याने काढलेले उद्गार काळजाला भिडून जायचे.आम्हाला नाही जमलं तर आमच्या मागे उभे असलेले आमच्या सारख्याच परिस्थितीचे लोक
“तुम्ही नसाल घेत तर सांगून टाका आम्हाला तरी घेऊ देत”
असं कदाचित मनात म्हणत असतील,किंवा तो विक्रिकर आपल्या मनात म्हणत असेल,
“तुम्हाला नसेल घ्यायचं तर बाजूल व्हा त्याना तरी घेऊं द्दा असं जणू मनात म्हणत असेल”
असं उगाचच माझ्या मनात येऊन मन कष्टी व्हायचं.
आणि त्याही पेक्षा मन कष्टी व्हायचं की जेव्हां ते आमच्या चेहर्‍याकडे बघून आमच्या निर्णयाची क्षणभर वाट बघायचे.माझी आई कदाचित तसा माझ्या सारखा विचार करितही नसेल किंवा कदाचित तसाच विचार करूनही चेहर्‍यावर दाखवतही नसावी.बिचारी आई.

“काल घेतलेल्या वस्तू अजून आहेत आमच्याकडे”
असं सांगून एकदाचा पळ काढावा इथून असं वाटायचं.
त्या संध्याकाळच्या उलगत्या बाजारात खरेदी करायला मला खरंच कसंसंच वाटायचं.
एखाद्या माझ्या वर्गातल्या सुखवस्थु मैत्रिणीने माझ्या बाजूने जाताना मला पाहिलं असेल ह्या मरणाच्या भितीने मी चूर होऊन जायची.
एकदा मी माझ्या आईला माझी ही भिती सांगितली.तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून तिच्या नाराजीला मी कारण झाले ह्याचंच दुःख मला जास्त झालं.कधीकधी सकारण सुद्धा मला तिच्या बरोबर खरेदीला जाता आलं नाही तरी माझ्यामुळे तिच्या नकळत भावना दुखावल्या जातात ह्याचा विचार येऊन मी हताश व्हायची.
आणि यासाठीच मी सामावून घेण्याच्या क्ल्पनेला घट्ट पकडून धरायला लागली. कशातही सामावून घेणं म्हणजेच आगे बढो असा संदेश माझं मन मला देऊ लागलं.
सामावून घेण्याच्या ह्या वृत्तिमुळे दुसर्‍यापेक्षा आपली परिस्थिती निराळी आहे याची मला लाज वाटण्यापासून सुटका झाली.दुसर्‍या कसल्याही प्रसंगात अशी वेळ आली की मला तो संध्याकाळचा उलगता बाजार आठवतो.
त्याचं कारण सध्या आमचे असे दिवस आले असतील पण तेही दिवस काही कायमचे नसावेत.सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”

एकदा वासंतीला मी भेटलो असतां,
“कसं चाललं आहे?”
असं विचारल्यावर मला हे सर्व तिने सांगितलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: