Monday, September 8, 2008

बालपण देगा देवा!

“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

“त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्याइराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,
“बसा,बसा”
असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज वाटली.

संचालकाने मला एका कोपऱ्यात नेऊन प्रत्येक चेहऱ्याच्या मागे दडलेली कथा माझ्या कानी घातली.
ते ऐकून क्षणभर माझ्या मनात आलं की जर का हा वृद्धाश्रम नसता तर कदाचीत ह्यातले बरेचसे आजीआजोबा रस्त्या भिक्षेंदाही करीत असते.ही संस्था जणू एखाद्या मुलासारखी असून आजीआजोबांच्या त्या कापणाऱ्या हाताना एखाद खोल रुतलेलं मूळ प्रेमाचा आधारच असावा.

एका आजीचा नवरा हयात नव्हता आणि तिला मुलगा पण नव्हता.समवयस्क मित्र,मैत्रीणी बरोबर ती बिचारी अन्ताक्षरी खेळत होती.ती मजा करत होती.तिला जवळचे नातेवाईक पण नव्हते.
ह्या अशा संस्थेमधे तिला संगीताच्या सुरात मित्र गवसले होते.ह्या संस्थेतल्या संगीताच्या सूरानी तिला शेवटच्या श्वासापर्यंत उसंत दिली होती.पण एका वृद्ध चेहऱ्याने माझ्या मनाला एव्हडी ओढ लावली होती, की भग्न आणि सुरकुतल्यांचे जाळं असलेला तो चेहरा आठवून माझं मन विचलीत झालं.

ते संचालक म्हणाले “पंधरा दिवसापुर्वी एक उमदा, लाघवी तरूण, ह्या आजीला इथे घेऊन आला,ती त्याची अनाश्रीत शेजारीण,तिला प्रेमाचे असं कोणी नाही. तिचा नवरा निर्वतल्या नंतर ती एकाकीच झाली.
क्षुल्लक पेन्शनची ती अपेक्षित आहे,ती एकटी असल्याने , आजारी पडली तर तिची देखबाल कोण करणार?,आणि दुसरंकाही झालं तर कोण बघणार?” म्हणून ह्या सुस्वभावी उमद्या तरुणाने प्रेमाचा ओलावा ठेऊन तिला एकडे आणून सोडली.

”धन्य,धन्य”, शेजारी असून सुद्धा शेजारधर्म पाळून आणि तिच्या भविष्याची खंत ठेऊन त्याने तिला इकडे आणून सोडलीत्याचा गौरव करीत मी माझ्याशी पुटपुटलो.

संचालक पूर्ण शांत राहून म्हणाले,
” अगदी खरं,पण ह्या तरुणाचा खरा गौरव अजून बाकीच आहे.हा मदतीचा हात पुढे करणारा उमदा तरूण तिचा सख्खा मुलगा आहे.”
“काय?”
असं म्हणताना, माझ्या हातातल्या चहाच्या कपातला चहा डुचमळला,पण मी काही थरथरलो नाही.

“होय,इथे आल्यावर पहिले दहा दिवस ती कधी हसलीच नाही,की काही बोलली नाही.
एखाद्या जीवंत मुडद्या सारखी ती अबोलच राहिली. अलीकडेच थोडा भराव वाटल्यावर म्हणाली,
“माझ्या मांसाचा तो गोळा आहे,असं मूल कुणाचं असूं शकतं का?”
आणखी माहिती देण्याच्या उद्देशाने संचालक बोलून गेले.

“काय?”
ह्या माझ्या निरपराधी प्रश्नाचे उत्तर, जीवंत मुडदा म्हणून भटकत होतं.
“वृद्धाश्रम म्हणजे काय कृतघ्ज्ञ आणि भांडकुदळ मुलांनी, घाण म्हणून आईवडिलांना फेकून देण्याची गायरी आहे काय? कृतज्ञअसण्याचा गूणाचा लोप होत आहे”
संचालक तावातावाने सांगत होते.

जंगली जनावराना, शाळेत न शिकता सुद्धा नैसर्गिक ओढ असते ती ह्या सुशिक्षीत समजणाऱ्या मुलांकडे नाही.गौरवशील घराची व्याखा म्हणे फ्रिज,गाडी, टी.वी.,सेलफोन असतो ते,अशी केली जाते पण ज्या घरात आंतरीक जिव्हाळ्याचे धागेदोरेनाहीत ते घर जरी बाहेरून “ताज महाल” वाटला तरी आतून एखादी “कबर” असते.

विभागलेल्या कुटुंबात आजीआजोबाना स्थान नसतं. आईवडिलानी आपल्या मुलांना
“ते आपल्या कुटुंबाचे भाग आहेत”
हे दर्शविलं पाहिजे.एक संघ राहिलं पाहिजे.

वयोमानामुळे वृद्ध माणसे कधी कधी “सरफिरे” होतात,हट्टी बनतात.
घरी कधी कधी वाद होतात.जसे दिवस जातात तसे वाद कमी होतात,संपर्क वाढतात.
पैशाच्या आणि तारुण्याच्या प्राप्तीमुळे मुलानी कृतघ्ज्ञ होवू नये.त्यांच्या वार्धक्यामुळे आलेल्या त्यांच्या अक्षमतेवर भाष्य करण्याचा चालून आलेला आपला अधिकार आहे असे ग्राह्य धरू नये.

घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनरावृतीस प्रवृत्त होते.
हे काही शाळेत शिकवलं जात नाही,मुलं ते पाहून आणि समजून तसं करतात.

“तुम्ही काही आमच्यावर उपकार केले नाहीत, तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत”
किंवा
“आम्हाला जन्म देण्याची आम्ही तुमच्याकडे याचना केली नव्हती”
असले उदगार काढणाऱ्या काही व्यक्ती निवडून काढायला कठीण नाहीत.असे विचार किंवा अशा विचाराची मुळधारणा असल्यावर तिकडेच सर्व संपतं. नमून वागण्यात जर कमीपणा मानला तर त्या मुलाची वृद्धी कशी व्हायची?.

अलिकडे, वडिलमाणसं सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्यावर स्वतःची मंडळं स्थापून,
”आता आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे,चांगली पुस्तकं वाचायची आहेत,चांगली नाटकं पहायची आहेत, देशात आणिबाहेर जग फिरायचं आहे,घरातली कामं आणि कर्तव्यं करायची नाहीत.”
असं म्हणणारे नवीन आजीआजोबा दिसतात.
पन्नास वर्षापुर्वीचे ते आजी आजोबा आता राहिले नाहीत.

स्वतःचं स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जरी अशी वृत्ति आणली आणि मुलांवर अवलंबून न रहाण्याचे जरी मनात असलं तरी तो संपर्क तो दुवा ठेवणं आवश्यक आहे,कारण आयुष्याच्या उतरणीवर मुलांची मिळणारी प्रेमाची आस्था मुकून जाणं योग्य नाही.
ही एकमेकाची जरुरी असते.हट्टवादी राहून शेवटी एकमेकास असून नसल्यासारखे होणं ह्यातून काही साध्य होत नाही.

हजारो लोक आजुबाजुला असून सुद्धा आपल्या यशाची शिफारस अथवा पाठ थोपटण्यासाठी आपलं माणूस जवळ नसल्यास किंवा,
”जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको “
असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझेकॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: