Sunday, September 28, 2008

आमचे अविवाहित स्नेही श्रीयुत अंत्या अंतरकर

मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू.
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता.
आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून आपला वारसा कायम ठेवला असता.दुसर्‍याने आपला व्यवसायाचा अभ्यास करून आपल्याला हातभार लावला असता.
मुलीने आपल्या सुंदर गळ्याचा वारसा घेऊन प्रख्यात गायीका झाली असती.
आपण अमक्या अमक्याची मुलं का?असं विचारणार्‍याला त्या मुलानी होय! म्हणून छाती फुगवून सांगितलं असतं.
आपण पण होय मी त्यांचा पिता आणि मला त्यांच्या बद्दल अभिमान आणि समाधान आहे.असं म्हटलं असतं.
एव्हड्या संस्कारीत कुटुंबात एकमेकानी एकमेकाची काळजी घेतली असती.
आणि इतरानी आपल्या वृद्धापकाळात आपल्याकडे बोट दाखवून
“वृद्धत्व हे वरदान कसं हे ह्यानाच विचारा”
असं सांगितलं असतं.
मी हे सर्व सांगत असताना आमचे स्नेही ऐकण्यात तल्लीन झाले होते.मला म्हणाले,
“अरे हो खरंच! मी असा कधीच विचार केला नाही.जगात आणि आजूबाजूला काय चालंय,वृद्धत्व आल्यावर त्यांचे कसे हाल होतात हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.आणि मी लग्नच केलं नाही हे मला बरं वाटत होतं.”
मी म्हणालो,
“काही हरकत नाही.झालं ते होऊन गेलं.आपण समजू कदाचीत ते विधीलिखीत होतं.पण लग्नच न करण्याचं जाणून बुजून जर प्रत्येकाने केलं तर हे जग पुढे कसं जाणार?निर्मिती कशी होणार?एका पिढीतून दुसर्‍या पिढीत वारसा कसा जाणार? ज्ञानाचा फैलाव कसा होणार?
श्री.पेठकरजी काय म्हणतात बघा,त्यानी तर खूपच लिहिलंय पण थोडक्यात असं,ते म्हणतात,
“वृद्धापकाळातील सुख दुःखाची मुळं तारुण्यात असतात.भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी.तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा. भावनिक पातळीवर, ‘प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते’ .
दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती ‘दुसर्‍यांची’ मुलं आहेत हे विसरू नये. ‘
मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये.दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ‘शब्द’ हे शस्त्र आहे. सांभाळून वापरावे.
अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.”
मी माझ्या स्नेह्यांना म्हणालो,
“माझं पण आपल्याला एक सांगणं आहे.
प्रेम आणि त्याग ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि समजूतदारपणाच्या धातूने ते बनले आहे.आणि ते नक्कीच खणखणून वाजते.ह्या तिन्ही गोष्टीत जरा सुद्धा कमतरता आली की ते नाणं खणखणून वाजणार नाही.अशी सर्व खणखणीत नाणी कुटुंबात असली तर त्या कुटुंबाचा खजिना खणखणत्या नाण्यानी भरलेला असणार.एव्हडी परफेक्ट टांकसाळ असल्यावर काय बिशाद लागली आहे,
“वृद्धत्वाला शाप ठरायला?”
माझ्या स्नेह्यांच्या लक्षात आलं आणि ते त्यांच्या आवडत्या शैलित मला म्हणाले,
“च्याआयला! प्रत्येक वादाला दोन बाजू असतात हे माझ्या लक्षातच आलं नाही.घोड्याचा चष्मा लाऊन मी एकाच बाजूला बघत होतो.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: