Monday, June 22, 2009

लहान लहान विचार.

लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे,गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं.
आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत.
पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.त्यांना मुंबईला येऊन मजा करायची असते. हल्ली कोकणात पैशाचे व्यवहार वाढल्याने आणि धंदापाणी करण्याचं महत्व कळल्याने लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आहे.पूर्वीची कोकणातली गरिबी आता तेव्हडी राहिलेली नाही.
कोकणातून ह्या सुट्टीत माझा मावसभाऊ रमाकांत खूप दिवसानी माझ्या जवळ राहायला आला होता.सहाजीक एक दिवस गप्पा मारताना मी त्याला प्रश्न केला,
“काय रे,कोकणातली खेडी आता खेडी राहिली नाहीत.कसं काय परिवर्तन झालं आहे मला जरा कुतूहल वाटतं म्हणून तुला विचारतो.”
रमाकांत म्हणाला,
अलीकडे आमच्या गांवातल्या शाळेत संध्याकाळी स्पेशल क्लासिस भरतात.निरनीराळ्या विषयावर चर्चा होते.एकदा चर्चेचा विषय होता,
“काहीतरी मोठ्ठ करावं”
मोठ्या गोष्टीवर विचार करायची संवय असावी. मोठी स्वप्नं बाळगावीत,मोठमोठाल्या कल्पना असाव्यात.

मी असल्या विषयाच्या मिटींग मधे कधीच समरस झालो नाही.मला वाटतं लहान स्वप्न बाळगली,लहान कल्पना असल्या,आणि लहानसंच काहीतरी केल्यावर आपल्यावर जादा परिणाम होतो.लहान लहान गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात अशी माझी धारणा आहे.
उदाहरण म्हणून मी सांगतो,आमच्या गांवतल्या हॉटेलात जमलो की बरेच वेळा आम्ही लहान गोष्टींचाच विचार करीत असतो.गांवातले पेपर्स लहानश्याच छापखान्यात छापले जातात.त्यात बातम्यापण लहान लहान असतात.
आज गांवातल्या वर्तमानपत्रात काय वाचलं?
आज अमक्या अमक्यांच्या मुलीचं लग्न थाटात झालं.
आपल्या शाळेतल्या क्रिकेट टिमने शेजारच्या गांवच्या टिमला पाच विकेट्स राखून हरवलं.
गांवतल्या मुलांची संगीताच्या चढाओढीचा कार्यक्रम होऊन पाटलांच्या मुलीला पहिलं बक्षीस मिळालं.
अमुक अमुक गृहस्थ वयाच्या पंचाणाव्या वर्षी वारले.”

मी म्हणालो,
“आता कोकणात कंप्युटर्सपण आले असतील.”
“हो,आमच्या लहानश्या गांवात आता कंप्युटर्स आले आहेत.बर्‍याच लोकांचं आता “फेस-बूक” खातं आहे.त्यावरून ते एकमेकाला टिपण्या पाठवतात,चित्र पाठवतात,किंवा लहान लहान कोडी पाठवून चर्चा करतात.उदाहरणार्थ,
“कोणती बॉलीवूडची नटी तुला आवडते?”
आणि नंतर कंप्युटरवरून “गमन” केल्यावर परत त्या गप्पा-टप्पा करण्याच्या चहाच्या टेबलावर येऊन बसतात.समोरा-समोरची चर्चा त्यांना हवी असते.एकमेकाला जवळ बसवून घेत,डोळ्यात डोळे घालून,कानात सूर-परिवर्तन करून,त्यांना ज्या गोष्टींची चिंता असते त्या गोष्टीवर चर्चा होते.”
मी रमाकांतला विचारलं,
“लोकल समस्येवर बरेच वेळा अशा हॉटेलातच चर्चा पूर्वी पण व्हायच्या.आतापण होत असतील नाही?”

“असल्या लहानश्या हॉटेलात ह्यावेळी मान्सून कसा आहे आणि आपल्या गांवतल्या शेतीवर काय परिणाम होणार आहे ते गांवातल्या हवामान तज्ञाने कसं भाकित केलं आहे इथपर्यंत बोललं जातं.
आमच्या ह्या लहानश्या गांवातल्या लोकांना गांवातली शाळा आवडते,कुस्तीचा आखाडा आवडतो.मॅट्रीकच्या परिक्षेत ह्यावेळी गांवातून पहिल्या आलेल्या मुलीचं सत्कार करून कौतूक करायला आवडतं.
“तो अमुक अमुक माझ्या माहितीतला आहे.”
असं कुणीतरी म्हणतं,
“तो हुशार आहेच पण तो जास्त माणूस आहे.”
असंही म्हणून कुणी मोकळे होतात.ह्या सर्व गोष्टी जरी लहान लहान असल्या आणि जास्त महत्वाच्या नसल्या तरी त्यांना माहित असतं की ही गांवातली वहिवाट आहे.आणि वर येणार्‍या पिढीवरत्याचे नकळत परिणाम होत असतात.”
मी म्हणालो,
“आता जग लहान झालं आहे.आणि कोकण काय जगाच्या बाहेर नाही.तेव्हा जगाच्या “गजाली” पण होत असतील.”
हंसत हंसत रमाकात सांगू लागला,
“चहाचा दुसरा कप मागवून किंवा आणखी एखादी भज्याची प्लेट मागवून हे लोक गांवाच्या बाहेरच्या जगाच्या पण चौकशीत असतात.
सरकारने नवा कायदा काढून काय मिळवलं.?
देशातलं उष्णतामान खूपच वाढलं आहे.
पर्यावरणाचा परिणाम देशावर कितपत आघात करणार आहे.?वगैरे.

परंतु,ह्यातले प्रत्येक जण उद्या सकाळी जेव्हा अंथरूणातून उठतील तेव्हा त्यांच्या नव्या दिवसाची सुरवात त्यांच्या समोर आलेल्या त्या क्षणांच्या कामाची पुर्ती कशी करायची ह्याची विवंचना करण्यात जाते.ही लहानशीच गोष्ट असते.आणि त्यांच्या आवाक्यातली असते. तसंच त्या गोष्टीवर त्यांचं सर्वांत जास्त ध्यान असतं.ह्या लहान लहान गोष्टींनांच मतलब असतो आणि दिवसाच्या शेवटी ह्या लहान गोष्टीचीच कायम स्वरूपी छाप पडते असं मला वाटतं.”
मी रमाकांतला म्हणालो,
“खरं आहे तूझं.मोठ्या मोठ्या गप्पा मारायला मोठी शहरं आणि त्यांचे मोठे प्रश्न कारणीभूत असतात. आणि तसे मोठे राजकरणी लोकपण असावे लागतात.कुणाची कुणाला माहिती नसते.इकडे गांवात पिढ्यांन पिढ्याची माहिती एकमेकाला एकमेकाची असते,तेव्हा राजकारण सुद्धा जपूनच करावं लागतं.”
रमाकांत फक्त एकच वाक्य बोलून उठला,
“जसा व्याप तसा संताप.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com