Thursday, June 18, 2009

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

“जेणूं काम तेणूंच थाय
बीजा करे तो गोता खाय”

(मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.)
मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो.
त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा.म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं. माझ्यात आणि माझ्या थोरल्या भावात दहा वर्षांचा फरक होता.”फरक होता” म्हणायचं कारण माझा भाऊ आता हयात नाही.
माझ्या आईवडिलानी मला इंग्रजी शाळेत घातलं ते दादरच्या हिंदूकॉलनीतल्या “किंग जॉर्ज हायस्कूल” मधे.आता त्याला राजा शिवाजी विद्यायलय म्हणतात.
त्यावेळी इंग्रजी चित्रपट फक्त धोबीतलावरच्या मेट्रो थिएटरात दाखवले जात.काही वर्षांनंतर वांद्र्याच्या “बॅन्ड्रा टॉकीज” मधे दाखवले जायला लागले.इंग्रजी सिनेमाचं थिएटर असल्यानें “वांद्रा टॉकीज” न म्हणता “बॅन्ड्रा टॉकीज” असं म्हणणं जास्त समर्पक असावं.
हे संगळं सांगण्याचं कारण असं की मी इंग्रजी शिकायला लागलो मग इंग्रजी चित्रपट मला बघायाला मुभा मिळाली.
“झोरो अगेन इन टाऊन”
हा तो मी पाहिलेला पहिला चित्रपट होता. तो पाहायला माझा मोठाभाऊ आपल्याबरोबर मलाही घेऊन गेला.
“हॅन्डस अप”
हा इंग्रजी उच्चार मला तेव्हडा समजला. बाकी थिएटरातले लोक हंसायचे,आणि माझा थोरलाभाऊ हंसायचा म्हणून मी हंसायचो.नाहीपेक्षा मला काही तो सिनेमा कळला नाही.
जेव्हा आमच्या वाडीतल्या माझ्या मित्रमंडळीने मला विचारालं की,
”कसा होता चित्रपट?”
त्यावर उगाचच आव आणून मला सांगावं लागलं,
“झोरोचे डायलॉग ऐकण्यासारखे होते.”

जे मला कळत नसायचं ते कळतं, असं दाखवून भाव मारायची मला संवय झाली होती.
प्रोफेसरांच्या लेखाबाबत त्यांच्या लेखाला प्रतिसाद देताना माझं असंच होणार की काय असं मला वाटूं लागलं. त्यांच्या लेखावरच्या इतरानी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून पाहिल्यावर मला कळलं की,काही वाचकांनी चक्क,
“लेख अप्रतीम आहे.”
“लेखन फारच सुंदर झालं आहे”
अशा प्रतिक्रिया दिल्या.लेख समजण्याइतकी क्षमता त्यांचात असायलाच हवी.त्या शिवाय ते असं कसं लिहितील.? असं मला खात्रीपूर्वक वाटलं.
प्रोफेसरांच्या लेखातलं काही लेखन हाय लाईट करून -अर्थात मला तर ते मुळीच कळलं नव्हतं-त्याच्यावर पण काही वाचकांनी आपला प्रतिसाद दिला होता.
“हा तुमचा विचार मला खूपच आवडला.” वगैरे वगैरे.
एका वाचकाने आपल्या प्रतिक्रियेत लिहलं होतं,
“मला तुमचा लेख मुळीच कळला नाही. आपण लोकांना कळण्यासारखं लिहावं”
असा वर त्याचा उपदेशपण होता.

माझं मन प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिसाद देण्याच्या विचारात द्विधा झालं होतं.
एक-
मी प्रतिसाद द्यायलाच हवा का?
दोन-
प्रतिसाद दिलाच तर तो
“अप्रतिम लेख”
असा द्यावा,की,
तिन-
लेख आवडला नाही म्हणून द्यावा?
का लेख,
“कळला नाही म्हणून द्यावा?
असे एकामागून एक विचार यायला लागले.कारण लेख
“अप्रतिम लिहिला आहे”
असं लिहिण्याची माझी क्षमता नाही हे मला कळत होतं.लेख
“आवडला नाही”
असं स्पष्ट लिहिणं माझ्या स्वभावाला धरून नव्ह्तं.
“लेख कळला नाही”
असं लिहिणं मला जरा ऑक्वर्ड वाटत होतं.कारण मी अगदीच
“हा”
आहे असं कुणाला तरी वाटेल किंवा मी मुद्दाम उपरोधीक लिहित आहे असं इतराना वाटेलच त्याउप्पर प्रोफेसरना पण वाटेल त्याचं मला वाईट वाटत होतं.
मी दहा बारा वर्षाचा असताना मला माझ्या आईवडीलानी पंडीत नारायणराव व्यास ह्यांच्या दादर शिवाजीपार्कच्या संगीत क्लासात घातलं होतं.तसा माझा आवाज गोड होता असं इतर म्हणायचे.पण थोडं गाणं शिकल्यानंतर मी न चुकता वार्षिक सार्वजनीक गणेश उत्सवात गाण्याच्या चुरशीत भाग घ्यायचो.तसं पहिलं बक्षीस मला कधीच मिळालं नाही पण
“उत्तेजनार्थ”
बक्षीस हटकून मिळायचं.
नंतर मला एकदा माझ्या थोरल्या भावाने पं.भास्करबुवा वझ्यांच्या शास्त्रिय संगीताच्या महिफीलीत नेलं होतं.मालकंस राग सुरवातीला गाताना
“मोहे कछु नाही मालुम”
हे झप तालातले बोल होते आणि नंतर
”ज्या मै ना! गाऊंगी”
असे द्रुत तालातले बोल होते. हे अनाऊन्सरने गाणं सुरू होण्यापूर्वी असंच काहीतरी सांगीतलं होतं. ते माझ्या भावाला बाजूला बसलेल्या दुसर्‍या एका व्यक्तिने स्पष्ट करून सांगताना ऐकून मी नीट लक्षांत ठेवलं होतं.बाकी पुर्‍या मैफीलीत माझ्या भावाबरोबर आणि इतरांबरोबर,
“वहावा,बहूत अच्छे”
असं मी एक दोनदांच सूरात सूर मिळवून बोललो होतो.खरं म्हणजे हलकं फुलकं गाणं म्हणण्या व्यतिरिक्त मला संगीतातलं काहीच कळत नव्हतं.व्यासांचा संगीताचा क्लास मी केव्हाच सोडला होता.
आमच्या वाडीतल्या मित्रमंडळीनी न चुकता बुवांच्या गाण्याबद्दलचा माझा अभिप्राय विचारला होताच.
मी बुवांचं नांव घेऊन-दोन्ही कानांच्या पाळ्यांना न विसरतां हात लावून त्यांना आदर प्रदर्शित करून- म्हणाल्याचं आठवतं,
“मैफिल अप्रतिम झाली”
बुवांनी -परत माझ्या कानाला हात लावून-
“मुझे कुछ नही मालूम”
हे बोल सुंदरच आळवले.
आणि
“जा मैना गायेगी”
हा गाण्याचा उत्तरार्ध पण स्मरणात ठेवण्यासारखा गायला.”
असं ठोकून दिलं.
कळलं नाही तरी प्रतिक्रिया देण्याची ही माझी संवय लहानपणापासूनची असल्याने आणि हल्ली मी बरंचसं लेखन करीत असल्याने,
“मला तुमचा लेख कळला नाही”
असं उघड उघड प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिक्रिया द्यायला-खरं असलं तरी- कससंच वाटत होतं.

समयाची किमया म्हटली पाहिजे.माझ्या ह्या लेखापूर्वीच्या लेखाचं शिर्षक योगायोगाने -जरी विषय निराळा असला तरी-तेच सांगून जातं,
“समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.”
प्रोफेसरांच्या लेखावरच्या माझ्या प्रतिक्रियेबद्दल लिहीता लिहीता हे असं विषयांतर झालं म्हणायचं.

आणखी एक गंमत सांगतो.गाण्याच्या कलेची चव घेता घेता चित्रकलेची पण चव घेण्याची बरोबरी मी माझ्या थोरल्या भावाबरोबर केली आहे.तसं पाहिलंत तर माझा थोरला भाऊ जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचा मान्यवर पदवीधर होता.त्याची आणि माझी बरोबरी कसली?
जहांगीर आर्ट गॅलरीत त्याच्या लॅंडस्केपांची बरेच वेळा प्रदर्शनं झाली आहेत.आणि त्याला बक्षीसंही मिळाली आहेत.
असंच एकदा एका आर्ट गॅलरीत प्रदर्शन होतं.त्याने त्याच्या चित्राबरोबर मला ही एखादं चित्र काढून लावायची गळ घातली.
आणि झालं काय त्याच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंच पण मला ही नेहमी प्रमाणे “उत्तेजनार्थ ” असं बक्षीस मिळालं.
सहाजीकच आमच्या वाडीतल्या मित्रानी नेहमी प्रमाणे माझ्या आणि माझ्या थोरल्या भावाच्या बक्षीसाबद्दल पृच्छा केलीच.
पण घरी आल्यावर मी आणि माझा थोरला भाऊ बक्षीस मिळाल्याने हंस हंस हंसलो.
तुम्हाला कारण ऐकून गंमत वाटेल.
माझा थोरला भाऊ मला म्हणाला,
“मी हंसतोय त्याचं कारण मला नेहमीच बक्षीसं मिळतात,पण ह्यावेळेला मी आपल्या रामाला मला मदत म्हणून काही माझी चित्रं लटकायला सांगितली होती. त्याने एक माझं चित्र उलटं लटकवलं. आणि त्याच चित्राला मला लोकानी उत्तम चित्र म्हणून वाखाणणी केल्याने बक्षीस मिळालं.कारण माझं नाव पण लोकांच्या माहिततलं ना! म्हणून मी हंसत होतो.पण तू का हंसत होतास?”
असं त्याने मला विचारल्यावर मी म्हणालो,
“अरे,तू माझ्यावर चित्र लावण्याचं प्रेशर आणल्यावर मी आपल्या वाडीतल्या सुताराकडून लाकडाची फ्रेम करून त्यावर टाईट कॅनव्हास बसवून घाई घाईत रस्त्यावरून येत असताना त्या उघड्या कॅनव्हासवर एका उनाड मुलाने सायकलवरून जाताना एका खड्यात चाक घातलं आणि त्यातल्या चिखलाचे शिंतोडे माझ्या कॅनव्हासवर उडाले.आता परत तो उपद्व्याप करायला वेळ कुठे होता.मी ते चित्र तसंच आर्ट गॅलरीत लावलं आणि मलापण “उत्तेजनार्थ” बक्षीस मिळालं.
मग सांग मी हंसू की रडूं?”

मंडळी,ह्यातला विनोदाचा भाग सोडल्यावर मतितार्थ एव्हडाच की,जेव्हा समय येतो आणि तुमच्या भाग्यात असलं तर तुम्हाला मिळणार्‍या प्रात्पीला कुणीही काहीही करू शकत नाही.कुणी आड येऊं शकत नाही.
म्हणतात ना!
“होणारे न चूके जरी त्या ब्रम्हदेव ही आडवा.” अगदी तसं.

प्रोफेसरांच्या लेखाचं मात्र असं नाही.त्यात असलेली त्यांची मेहनत,शिक्षण,बुद्धिमत्ता आणि लेखनशैली ह्या सर्वांचा मेळ बसल्याशिवाय असा लेख लिहिला जाणार नाही.
तो लेख कुणाला कळो न कळो, कुणाला अप्रतिम वाटो न वाटो,कुणी त्याला प्रतिसाद देवो न देवो,कुणी त्याला लेख कळला नाही म्हणून म्हणो न म्हणो,
मी फक्त प्रोफेसरांच्या लेखाचा आणि प्रोफेसरांचा आदर करून एव्हडंच म्हणेन की सर,
“असा लेख दुसरा कुणीही लिहूं शकणार नाही”
म्हणूनच माझी ही प्रतिक्रिया,
“जेणूं काम तेणूंच थाय
बिजा करे तो गोता खाय”



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com