Sunday, June 14, 2009

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली.

कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी तिला म्हणालो,
” तू एक दिवस आमच्या घरी ये.मी तुला अगदी लहान पाहिली आहे.आपण सर्व बसून गप्पा मारूंया.”
“नक्कीच येईन”
असं सांगून तिने फोन ठेवला.
ज्यावेळी ती आली तिला पाहून मी खरोखरंच अचंबीत झालो.तिच्या लहानपणाची छबी जी माझ्या मनात होती तिला धक्काच बसला.
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला.तुझी तब्यत बरी आहे ना?”
असा मी प्रश्न विचारून झाल्यावर तिची चर्या पाहून मी सरळ सरळ असं विचारायला नको होतं असं मला वाटलं.
“तू सुंदर दिसायचीस.तुम्ही दोन्ही मैत्रीणी अभ्यासात ही हुषार होता आणि शाळेच्या नाटकात भाग घ्यायचा.”
तिची प्रशंसा करण्याच्या दृष्टीने आणि तिला बरं वाटावं म्हणून मी असं म्हणून माझ्या मला मी सांवरायला बघीतलं.
मला वनिता म्हणाली,
“काका,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण माझ्या आयुष्यात तसंच काही घडलं.आणि मनाला लागणारी गोष्ट घडल्यावर प्रकृतीवर नक्कीच त्याचा परिणाम होतो.मी तुम्हाला कारण सांगते”

पंधरा वर्षापूर्वी माझ्या वडलांचा निघृण खून झाला होता.मध्यरात्री ते कामावरून परत येत होते.त्या दुर्दैवी रात्री एका माथेफिरूने त्यांच्या जवळ असलेले पैसे हिसकावून घेऊन झाल्यावर त्यांचा अंत केला.लांबून पहाणारे सांगतात,त्यांनी त्या दुष्टाशी दयावया करण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्यावर गोळी झाडली गेली.

जे लोक एखाद्या निरपराध्याचा आत्मा ह्या जगातून असा हिसकावून घेऊन कधीही परत येणार नाही अशा परिस्थितीत ह्या आसमंतात भिरकावून देतात त्यांच्या मनिस्थितीचा विचार करून माझ्या मनात नेहमी पेच निर्माण होत राहतो.”

मी आणि माझी मुलगी हे ऐकून खूपच दुःखी झालो.
माझी मुलगी तिला म्हणाली,
“तुझे वडील मला खूप आवडायचे.फिरतीवरून आल्यावर ते नचूकता नेहमी आपल्यासाठी च्युइंगम घेऊन यायचे.आपला हात मागे लपवून आपल्याला म्हणायचे,
“डोळे मिटा आणि उजवा हात पूढे करा.”
हातात वस्तु ठेवल्यावर म्हणायचे,
” सांगा काय ते?”
आणि आपण दोघीही मोठ्याने ओरडायचो,
“चिंगम!”
मग ते ओरडून सांगायचे,
“अंह,च्युइंगम”
आणि आपण मुद्दाम परत म्हणायचो,
“चिंगम”
आणि नंतर आपण सगळे तिघेही हंसायचो.आणि हा शॉट आपण कॉलेजात जाई पर्यंत करायचो.”
वनिता तिच्या वडलांच्या त्या दुःखी घटने नंतर आता विचाराने पोक्त झाली होती. कधी कधी माणसाच्या आयुष्यात “टर्नींग पॉइंट” येतो म्हणतात ना तसं.हे तिच्या बोलण्यावरून कळलं.

” एकाएकी आणि संक्षीप्तात डोंगरावरच्या रंगीबेरंगी फुलांच्या बहाराची रमणीयता पाहून निसर्ग आपल्या स्वरुपाचं अविरत प्रदर्शन करीत असतो असं वाटतं.
पुरामूळे झाडं उमटली जातात,घरं उद्वस्त होतात आणि लोक पुन्हा मागे फिरून आपली वस्ती उभारतात.आकाशातून एखादं विमान जमीनीवर पडून अपघात होतो, आतल्या लोकांचं त्या धुमस्त्या आगीत अंत होतो, त्यांच्या प्रियजनावर अविचलीत आणि दुर्दम आघात होतो.”
हे वनिताचं बोलणं ऐकल्यावर मी तिला म्हणालो,
“बोल,बोल तू काय बोलतेस ते ऐकायला मला आवडतं.वेदनेतूनच निर्मिती होते.तशीच विचारांचीपण निर्मिती होते”
वनिताला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“असं झाल्यावरही असल्या विनाशकारी घटनेचा परिणाम पाहिल्यानंतर जसा समय जात रहातो तसंच एखादं बी पेरलं जातं आणि त्यातून पुढला समय काय आहे ते हळू हळू स्पष्ट होत गेल्याचं दिसून येतं.अश्या ह्या नवीन रोपं उगवणार्‍या बियाणाकडून आसमंतात परिवर्तन करण्याची निसर्गाची क्षमता स्पष्ट होते.
होवून गेलेल्या कुठल्याही घटनेचं अशा तर्‍हेने रुपांतर करण्याच्या निसर्गाच्या क्षमतेकडे पाहून नकळत माझ्या मनात विचार येतो,
“निसर्गा मी तुला मानलं.”
माझ्या मुलीने तिला मधेच थांबवीत म्हटलं,
“वेळ कसा निघून जातो नाही काय?”

“माझे वडील गेल्यानंतर माझ्या दुःखाची पंधरा वर्षं होऊन गेली आणि मी अशा एका मनस्थितीत येऊन पोहचले आहे की,त्या निरपराध्याची-म्हणजे माझ्या वडीलांची, माझ्या मित्राची-आठवण काढून त्यांची हानी झाल्याचं पाहून,आणि त्याबरोबरीने त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रियजनांच्या शोकाला पाहून मी दुःख करीत राहाणं हे स्वाभावीक आहेच, आणि एव्हडंच नाही तर,ते अतिभयंकर कृत्य करणार्‍या त्या अपराध्याच्या आत्म्याचं सुद्धा मला दुःख करायला हवं असं वाटायला लागलंय.

जशी वेळ जात राहिली आहे, तसं माझ्या लक्षात यायला लागलं आहे-आणि जे इतरांच्या पण लक्षात येतं- की मृत व्यक्ति आपल्यात कशी वास करून राहते ते.
मी माझ्या वडीलांच्या स्मृतिचे झरोके त्यांच्या रुपात, त्यांच्या भावप्रदर्शनात,किंवा एखाद्या म्हणी मधूनही पहाते आणि समाधानी करून घेते.
उदाहरण द्यायचं झाल्यास,
“भुकेलेल्या अन्नाची चव कसली?”
मी वनिताला म्हणालो,
“मुलीचं वडलांवर नेहमीच जास्त प्रेम असतं.एकतर मुलगी ही भावी आई असते आणि स्त्रीला निसर्गानेच प्रेमळतेची देणगी दिली आहे.जननी जन्मदाती असं स्त्रीला म्हणतात मी तर स्त्रीला जननी प्रेमदाती म्हणतो”
वनिताला वडलांची आठवण आली.म्हणाली,
“जो पर्यंत माझा अंत होत नाही तो पर्यंत कसलीही विनाशकारी ताकद त्यांना माझ्यातून निखळून नेऊं शकत नाही. आणि म्हणूनच काही काळ निघून गेल्यावर त्या खून्याबद्दलची दुःखद व विषादग्रस्त, सहानुभूति मला वाटायला लागली आहे.तसंच माझ्या मनांत येतं की तो भिषण प्रकार झाला नसता तर माझी विचारसरणी अशी झालीच नसती. मला वाटतं त्या घटनेला दिलासा मिळण्याचा अवधी मिळाला.

असं बघा,आता हा माझा मुलगा तिचाकी घेऊन अंगणात फिरतोय तो माझ्या ह्या मांडीवरच वाढला ना?प्रत्येक वसंत ऋतुत जीवन नव्याने येतं,आणि हा ऋतू नवीन फुलं, गवत आणि झाडं देतं.रात्री सृष्टीचे तारे उंच आकाशात घुमत असतात. असं हे आपल्याला परिचीत असलेलं जीवन वाढतं आणि पोसतं.”

माझ्या मुलीला आणि वनिताला उद्देशून मी म्हणालो,
“आपल्या जीवनात आलेल्या आंबटगोड घटनाना पण जडं असतात.पण एक मात्र खरं की त्या घटनांची निराळीच सृष्टी असते.आणि अशा ह्या विक्षीप्त आणि अपरिचीत सृष्टीतलं भूदृश्य हृदयातून पोसलं जातं, बलशाली शक्तिरूपी सूर्य प्रकाशाने उजळलं जातं आणि समयाच्या जळाने भिजवलं जातं.”
मी माझ्या ह्या विचाराने वनिताला वेगळीच ट्रिगर देण्याचा प्रयत्न केला.पण आटोपतं घेत वनिता म्हणाली,
“अलीकडे ह्या निराळ्याच जगतात माझं मी परिवर्तन करून घेतलं आहे.समयाच्या बळाने मी दुर्दम समस्येत डुबून ह्या माझ्या नव्या सृष्टीतल्या उजाड आणि पडीक जमिनीतून जबरदस्तीचं बिज उगवण्याच्या प्रयत्नात आहे.”

उठता उठता मी वनिताला सांत्वन करीत म्हणालो,
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला. तुझी तब्यत बरी आहे ना?”
हा सुरवातीला प्रश्न विचारून तुला उगीचंच त्रास दिला असं त्या क्षणी मला वाटलं होतं.पण खरं सांगू का,मी तुझ्याकडून तुझे विचार ऐकून जीवनाकडे पाहायलो शिकलो.”
वनिताच्या डोळ्यात मला तिचे वडील दिसले.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com