Thursday, July 23, 2009

“बट-शेवंतीची फुलझाडं.”

दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे, आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची.
मी कर्णिकांना म्हणालो,
“हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?”
मला दादा कर्णिक म्हणाले,
“गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-realityला- तोंड देताना मन कुठच्याही विचारापासून मुक्त ठेवायचो. मी बेदरकारपणे रोजच्या आव्हांनांबद्दल,तसंच जीवनात स्थित्यंतरं आणणार्‍या घटनां घडण्याच्या संभवाबद्दल अपेक्षीत राहून, आलेल्या परिस्थितीला काबूत पण आणायचो.
अशा तर्‍हेने वागण्याची माझी ही पद्धत ज्याला मी माझी वयक्तिक विचारधारा असं समजू लागलो ती माझ्या पूर्ण जीवनकालात उदयाला आली. तिने मला प्रत्येक नव्या अनुभवाची त्याच्या विशेषताप्रमाणे अनुभवण्याला उद्युक्त केलं.
मात्र ह्या मार्गाचा माझ्या आयुष्यात मी अवलंब केला फक्त चांगल्या आणि वाईट परिस्थितीत सहारा घेण्यासाठीच.”
मी दादानां म्हणालो,
“हे असले विचार अगदी लहानपणापासून तयार झाले असतील नाही काय?”
“खरं सांगायचं तर मी कॉलेजमधे असताना माझे महत्वपूर्वक अंतरदृष्टीपूर्ण विचार तयार झाले.काही शिक्षक कडं प्रेम करायचे. विज्ञान शिकवणारे शिक्षक नेहमी फक्त प्रायोगीक कौशल्याचाच प्रयोगशाळेत तकादा लावित नव्हते तर निर्दोष इंग्रजीमधे लिहिण्याच्या सरावावर भर देत असत.त्यामुळे जे उचित असेल त्याला आपोआप ईनाम मिळणार हे शिकवलं गेलं.
गणिताच्या शिक्षकानी मला एका परिक्षेत अनुत्तीर्ण केलं.आणि त्यामुळे दृढतेची किंमत मला कळली.”

मी दादांना पुढला प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,
“हे झालं शिक्षण घेण्याच्या वंयात.पण नंतर मला पुस्तक वाचनांचा भरपूर नाद लागला.
पुस्तकात लिहिलेल्या शब्दातून बोलणार्‍या पुस्तकाच्या लेखकानी माझ्या वयक्तिक विचारधारेला सुक्ष्म रूपाने सुधरवण्याचा प्रयास केला. अनेक लेखकांनी, विचार-तत्वज्ञान, धर्म,कायदे-कानू,राजकारण आणि अर्थशास्त्र वगैरे विषय पुस्तकात स्पष्ट करून सांगितले असले जरी तरी नीट विचारकरून पाहिल्यास त्यांच्याशी खरा संपर्क सीमितच राहतो. कारण खर्‍या वास्तविकतेशी त्यांचे ते विषय तुलना करू शकत नव्हते. म्हणून शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणार्‍या पद्धतींचा मी आदर करायला शिकलो.कारण ही पद्धत नेहमीच सुंदर स्पष्टीकरण करते. उगाच मनात गोंधळ करून देत नाही. जी क्षेत्रं वास्तविकतेला-reality ला- शोधण्याच्या प्रयत्नात असतात त्यावर मन केंद्रित करायला मी शिकलो होतो.”

“मला आठवतं,कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही थोडे दिवस आजारी होता.मी एकदा तुम्हाला भेटायला आलो होतो, त्यावेळी होमसिकनेस आल्याने मी थोडे दिवस गांवला जातो असं सांगून बरेच दिवस तिथेच होता.नंतर तुमचं लग्नाचं आमंत्रण मला मिळालं आणि आपली पुन्हा भेट झाली.”
अशी मी दादांना आठवण करून दिल्यावर मला म्हणाले,
”कॉलेज सोडल्यानंतर एक महत्वपूर्ण अंतरदृष्टी मला मिळाली. माझी मनस्थिती अगदी खालच्या थराला आली होती.माझ्या मनातली उदासिनता वृद्धिंगत होत गेली.
माझ्या आईवडीलांपासून आणि इतर जवळच्या नातेवाईकांपासून दूर राहिल्याने आत्मदयेत मला मी लोटून दिलं होतं.मला मिळालेल्या दुर्भाग्याचं दुषण मी माझ्या आईवडीलांवर टाकलं होतं.असंच एक दिवशी दुपारी विचार करता करता माझ्या डोक्यात आलं की माझ्या प्रेमळ आईवडीलांनी मला प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवलं होतं.आणि त्यांच्या कठीण परिस्थितही जे त्यांना जमलं ते त्यानी केलं.आणि मग त्या क्षणांनंतर माझ्या वयक्तिक विचार-धारेत अचानक फरक झाला आणि मी त्यानंतर माझ्या नशिबाचा स्वामी मीच आहे अशी मनात धारणा ठेवली.आणि कुणालाही माझ्या अपयशाबद्दल दोष देण्याचं सोडून दिलं. आणि लग्न करायचं ठरवलं.”
मी म्हणालो,
“लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट असतो. तुम्हाला ही तसाच अनुभव आला असेल.”

“माझं लग्न झाल्यावर मी पूर्णतया एक नवा धडा शिकलो.खरी वचनबद्धता,विनम्रता आणि समझोता असल्यावर जीवनातलं असं हे सर्वांत महत्वपूर्ण नातं सफल होत असतं अशी माझी खात्री झाली.
एका सडाफटींग ब्रम्हचार्‍याचा एकाएकी सदगृहस्थ झाल्याचं माझ्यातलं परिवर्तन पाहून मला अचंबाच वाटला.आता माझ्या ह्या वयक्तिक विचारधारेची रोजचीच कसोटी पाहिली जायची आणि ती सुद्धा वास्तविकेतून.ह्या माझ्या विचारधारेत कालपरत्वे बदलाव होत गेला. बहुतांशी मी शिकलो की एकमेकाचा आदर केल्यामुळे आणि स्वतः कष्ट केल्यामुळे आपल्याला त्याचा मोबदला मिळतोच मिळतो.

दुर्दैवाने माझ्या पत्नीला अकाली आजार झाला.माझं आणि माझ्या मुलांचं जीवन खोल दरीत पडल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या वयक्तिक विचारधारेकडून सुरवातीला काही ही समर्थन मिळालं नाही.फक्त समय जात गेला तशी जखम भरत गेली. वेदनांच रुपांतर चांगल्या आठवणींच्या यादीत झालं.आणि ह्या आठवणीच नंतर नंतर कठीण प्रसंगात माझ्याशी संवाद करू लागल्या.”
हे ऐकून मी दादाना म्हणालो,
“परंतु,तुम्ही तुमच्या विचारधारेचा पाठपूरावा काही सोडला नाही.आता निवृत्त झाला,ऑडीटरचं काम बंद झाल्याने तुमचा वेळ आता कसा जातो?”

“हळू हळू ह्या जीवनाच्या घाईगर्दीच्या पद्धतितून मी निवृत्त झालो आहे.लहान लहान गोष्टीतून आता मला समाधान मिळत जातंय. जोपर्यंत मी हयात आहे तो पर्यंत मला काम करावं लागणार आहे हे मला ठाऊक आहे.पण ह्यामुळे निराळ्याच प्रकारची मुक्ति मला मिळाली आहे. आता माझं मन खंबीर झालं आहे, तात्पर्य एव्हडंच की इतक्या वर्षाच्या विकसित झालेल्या माझ्या वयक्तिक विचारधारेने मला संकट पार करून जायला तयार केलं आहे. बरंय.”
असं म्हणून दादा कर्णिक माझा निरोप घेता घेता मला म्हणाले,
” आनुवंशिकता आणि नशिब ह्यांचा माझ्या जीवनात हिस्सा होताच होता. बट-शेवंतीच्या फुलझाडांकडे पहात मला फावला वेळ घालवायला मजा येते. “



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com