Friday, July 10, 2009

” मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे.”

“मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी.”

माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या सुट्टीत ही कामं पुर्ण होतील ह्याची मला खात्री नव्ह्ती.पण एकदाचा म्युनिसिपालिटिच्या कचेरीत गेलो.चौकशी केल्यावर मला कळलं.म्युनिसिपालिटिचा निवडून आलेला सध्याचा अध्यक्ष बाबल्या हळदणकर होता.त्याच्या कॅबिनच्या बाहेर नांव वाचलं आणि बाहेर बसलेल्या पट्टेवाल्याला विचारलं,
“मला आत जावून साहेबाना भेटता येईल काय?”
” नाही” म्हटल्यावर मला सारांश सिनेमाची आठवण आली.हा बाबल्या माझा शाळकरी दोस्त नक्कीच असणार असं समजून जबरदस्तीने आत गेलो. सहाजिक इतक्या वर्षानी मला पाहून माझं त्याने स्वागत केलं.माझा घराबद्दलचा प्रॉबलेम ऐकून घेतल्यावर मला म्हणाला,
“डोन्ट वरी” तुझं काम होईल पण तू माझ्या घरी जेवायला कधी येतोस ते सांग.”
“आंधळा मागतो…” तसं माझं झालं.
मी त्याच्या घरी गेल्यावर गप्पाना सुरवात करताना पहिला प्रश्न केला,
“तूं राजकारणात केव्हा पासून पडलास?”
मला म्हणाला,
“तुला माहित आहे ना.मी शाळेत नेहमी सोशल कार्यात भाग घेण्यात दिलचस्पी घ्यायचो. तिच आवड पुढे माझ्या भावी जीवनात मी वापरली.एक साधा सदस्य म्हणून निवडून येता येता शेवटी अध्यक्ष झालो.”
मी म्हणालो,
“हे कसं काय तुला जमलं?”
बाबल्या म्हणाला,
” मला वाटतं,कुणाच्याही अभिव्यक्तिचं किंवा प्रकटनाचं स्वातंत्र्य जपून ठेवायचं असेल तर त्यांच्या दृष्टीकोनाचा आदर करून सर्वांना समानतेची उपलब्धता करून द्यायला हवी.
कुणाचंही तत्वज्ञान आणि त्याचं जीवन हे अनेक कारणानी प्रभावित झालेलं असतं.ही कारणं शब्दात प्रकट करायला मला जरा कठीण होतं.जाहिर बोलायला मला मी आवरतो कारण कदाचीत मी उपदेश देत आहे असं भासेल.”
मी म्हणालो,
“अरे मी तुझा मित्रच आहे.मला तुझं तत्वज्ञान आणि उपदेश ऐकायला आवडेल.”

“माझ्या खासगी आणि सार्वजनिक जीवनाबद्दलच्या विचारसरणीवर अनेकापैकी दोन दृढधारणानी प्रभाव टाकला आहे.”
बाबल्या स्वारस्य घेऊन सांगू लागला,
“मामूली वाटेल पण पहिलं कारण म्हणजे माझी खात्री झाली आहे की जे जीवनातून आपल्याला मिळतं ते सरळ सरळ आपण जीवनात काय घालतो त्या प्रमाणात असतं.दुसरं कारण, मी जरी कुणाशी असहमत असलो तरी त्यांच्या मतांचा मी आदर करणं आवश्यक आहे.माझ्या ह्या दीर्घ आणि काहीश्या व्यस्थ जीवनात मी पक्क ठरवलं होतं की मी जेव्हडा माझ्या जीवनाशी ऋणी आहे तेव्हडंच माझं जीवन मला ऋणी आहे.”

एव्हडं बोलून झाल्यावर माझ्या चेहर्‍याकडे बघून,पुढचं बोलूं की नको अशा नजरेने माझ्याकडे बघून हंसला.

“मी तुला एक प्रश्न विचारूं? हे सर्व सोशल कार्य तू कसं काय संभाळतोस.कारण राजकारणी लोकांना घरचं लाईफ पण असतं.”
हे ऐकून मला म्हणाला,
“ही माझी धारणा ठीक असेल-आणि ती असावी-तर ती माझ्या सर्व गतिविधिना -घर,रोजचं काम,राजकारण आणि शेवटी नातंगोतं -लागू होते.
जीवन काही एक मार्गाने जाणारं नसतं.मी जे काय आचरणात आणतो,जे बोलतो,विचार सुद्धा करतो त्याचा सरळ सरळ प्रभाव इतरांशी असलेल्या संबंधावर पडतो.”

“माझा असा समज आहे की राजकारणी लोक मैत्री करतात ती त्यांच्या राजकारणापूरतीच असते.पण माझ्या सारख्या मित्राला तुझ्या राजकारणात स्वारस्य नसतं.तर ते तू खासगीत कसं सांभाळतोस.?”
माझ्या ह्या बेरकी प्रश्नावर खूष होऊन बाबल्या मला म्हणाला,
“सांगतो,तू मला चांगला प्रश्न केलास.
ईमानदारीबद्दल,निष्कपटतेबद्दल,प्रामाणिकतेबद्दल, सौजन्यतेबद्दल आणि निष्पक्षतेबद्दल माझी प्रवृती दुसर्‍यांबरोबर खात्रीपूर्वक आहे ह्याची साक्ष देत असेल तरच मी दुसर्‍यांना त्या अवस्थेत माझ्याशी प्रवृत रहाण्याचं प्रोत्साहन दिल्या सारखं होईल.आदर आदराला जन्म देतो,संशय संशयाला जन्म देतो आणि नफरत नफरतेला जन्म देते.कुणी तरी म्हटलंय ते खरं आहे,
” मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे.”

कुठचंही नागरिक स्वतंत्रतेचं पारंपारिक वरदान स्वयं-कार्र्यान्वित नसतं.पण ते कार्यान्वित व्हायला, भातृभाव,दयाळुपणा,सहानुभूति,मानवी शालीनता, संधी मिळण्याचं स्वातंत्र्य ही सर्व जीवनातली बहुमूल्यं सदैव हजर असायला हवीत.आणि ती यथार्थ होण्यासाठी आदराची आणि सतर्कतेची अपेक्षा करायला हवी.
हे सर्व सांगितलं ते खरोखर माझ्या श्रद्धेचं सार आहे.”

मी बाबल्याला म्हणालो,
“मघाशी तू म्हणालास,
“मी जरी कुणाशी असहमत असलो तरी त्यांच्या मतांचा मी आदर करणं आवश्यक आहे.”
हे तुझं म्हणणं मला पटतं,कारण कुणाच्याही दृष्टीकोनाकडे ध्यान दिलं की तुला ही अशा परिस्थितित कुणाकडूनही आणखी ज्ञान मिळू शकतं.”
माझा हा विचार बाबल्याला आवडला.मला म्हणाला,
“कुणाही देशाला किंवा एका व्यक्तिला बुद्धिमत्तेची अथवा प्रतिभेची एकाधिकारी नसते. अशावेळी एखादा देश किंवा व्यक्ति आत्मसंतुष्ठ असेल तर मला वाटतं चिंतित राहायला हवं. जो कुणी दुसर्‍याच्या दृष्टीकोनाकडे कान बंद करून राहतो,तो अशावेळी स्वतःच्या दृष्ठीकोनाकडे सत्यनिष्ठेने पहात नसावा. सर्व क्षेत्रातली समान आर्थिक संधी, संतोषजनक जीवनाची प्राप्ति, मुलांच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासाचं समुचित प्रावधान आणि सर्वांबरोबर मुक्त साहचर्य हे स्वाभाविक हक्क मिळण्यासाठी कायदा असल्यानंतर कसलाच प्रश्न उद्भवत नाही.
ज्यावेळी लोक मुक्तपणे विचार करतात आणि बोलतात त्यावेळी हे हक्क आपोआप सुरक्षित असतात.
मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादी राहायला काहीच हरकत नसावी.”

मी हे सर्व बाबल्या हळदणकराचं बोलणं ऐकून खूपच प्रभावित झालो.माझ्या आईच्या घराची दुरूस्ती बिनबोभाट होणार ह्याची मला बाबल्यासारखे गावातल्या म्युनिसिपालिटिचे अध्यक्ष असल्यानंतर कसलीच काळजी करण्याचं कारण नाही असं वाटलं. बाबल्या माझा जुना मित्र म्हणूनच नव्हे तर असे चारही बाजूने विचार करणारे राजकारणी असले तर काम करता जरी आलं नाही तरी त्याचं योग्य कारण निर्भिडपणे देतील ह्याची खात्री झाली.

निघता निघता मी बाबल्याला म्हणालो,
“माझी खात्री आहे एक दिवस तू आपल्या गावातून विधान सभेवर नक्की निवडून येशील.”
मनात म्हणालो,
“मी जरी कमी सुट्टी घेऊन आलो तरी बाबल्या हळदणकर माझं काम मी इकडे हजर नसतानाही पूरं करील”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com