Saturday, July 4, 2009

मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा.

“मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही”

आज प्रो.देसाई माझ्या घरी प्रि.वैद्यांना घेऊन आले आणि तळ्यावर फिरायला जाऊंया म्हणाले. अलीकडे काळोख लवकर होत असल्याने मी त्यांना म्हणालो आपण आज आमच्या फ्रंटयार्डमधे बसून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारूया.माझी सुचना दोघानांही आवडली.बाहेर गार वारा वहात होता.गप्पा मारायला मजा येईल असं वाटलं.

गप्पांना सुरवात करताना,मीच प्रि.वैद्यांना विचारलं,
“प्रेमाचा शोध कशासाठी?कुटूंबाचा आरंभ का करावा? चांगलं होण्यासाठी धडपड का करावी? जर का क्षणार्धात तुमचं अस्तित्वच समाप्त होणार आहे तर मग हे खटाटोप कशाला?”

माझं हे ऐकून आणि वैद्य थोडावेळ विचार करीत आहेत असं पाहून प्रो.देसाई म्हणाले,
“मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा. अखेर जर काहीच शिल्लक राहाणार नसेल तर ह्या धरतीवर आपलं अख्खं प्राकृतिक जीवन केवळ समृद्ध होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी का समर्पित करावं?”
हे ऐकून प्रि.वैद्य म्हणाले,
“भाऊसाहेब,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
पश्चात काही उरत नसेल तर जीवन व्यर्थ्य आहे. जीवनाच्या पश्चात जीवन असावं ह्या इराद्याने कदाचीत ह्या धरतीवर कुणी जीवंत असण्याची जरूरी असावी. कुणी का बरं असं म्हणावं, की शरिरातला अत्यंत महत्वाचा स्नायु -म्हणजेच हृदय-झिजून गेल्याने आणि बंद पडल्याने आपलं अस्तित्व संपतं.?
मला वाटतं, आत्मा शाश्वत असल्याने त्याला हृदयासारख्या पंपाची जरूरी नाही.जे लोक आपले जवळचे हरवून बसतात ते आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या हृदयात घर करून असतात.”

आपल्याच आयुष्यातला प्रसंग सांगण्यासाठी वैद्य म्हणाले,
“माझे जेव्हा वडील दिवंगत झाले तेव्हा मी संपूर्ण घाबरा घुबरा झालो होतो.मला महित आहे की प्रत्येक जण आपल्या जीवनात ह्या प्रसंगातून कधी ना कधी जात असतो. मला तर सर्व जगच माझ्यावर खाली कोसळून पडल्यासारखं झालं.ते माझ्या वडीलांचं थंड आणि ताठ शरिर बघून जणू मी मनाने किती मजबूत आहे ह्याची परिक्षा घेतली जात आहे असं मला वाटत होतं.पण मी तसा मजबूत आहे.कारण मला माहित आहे की एक दिवशी मी माझ्या वडीलांना जाऊन मिळणार आहे.कारण जीवन पुढेच जात असतं.त्यांच्या पश्चात आता मी त्यांनाच माझ्या उरलेल्या आयुष्यात बरोबर घेऊन दिवस काढणार आहे. कुणाचं अस्तित्व राहण्यासाठी, कुणाचं प्रत्यक्ष शरिराने असणं आणि अप्रत्यक्ष हजर असण्याची जरूरी असावी असं मला वाटत नाही.”
मी म्हणालो,
“प्रेमाचा तुम्हाला काही स्पर्श होत नाही.मृताला काही तुम्ही कडकडून भेटू शकत नाही.पण जो पर्यंत तुमच्या मनात त्याबद्दल श्रद्धा आहे तोपर्यंत तुमचं ध्यान आणि तुमच्या स्मृति त्यांना तुमच्या समिप ठेवतात, जीवंत ठेवतात.”
माझा हा मुद्दा वैद्याना आवडला.ते म्हणाले,
“त्यासाठी कुणी धर्मनिष्ठ असायला हवं असं काही नाही.परवर्ती जीवनाबद्दल गत समयाच्या स्मृति देणारे विचार आणि उमेद असली म्हणजे झालं.
कुणी तरी म्हटलंय ते खरं आहे की,
” मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही. जन्म घेण्यापुर्वीच्या अक्षोभाच्या स्थितीचा जो लाभ होता त्याच स्थितीकडे गेल्यासारखं होईल. कुणी जर का मृताचा शोक केला तर मग त्याने अजाताचा पण शोक करायला हवा.मृत्यु चांगला ही नाही आणि वाईट ही नाही. कारण चांगलं वाईट असायला कुणाला तरी प्रत्यक्ष विद्यमान असायला हवं.”

आता पर्यंत निमुट ऐकून घेत कॉफिचा झुरका मारीत बसलेले प्रो.देसाई कॉफिचा शेवटचा घोट घेऊन कप माझ्या हातात देत म्हणाले,
“मृत्यु नवजीवन आणतो.कुणी तरी मृत होतं आणि कुणी जन्माला येतं.मृत्यु कुणाच्या जीवनाचा अंत करीत नाही.उलट,मृत्यु उत्तम जीवन देतो की ज्यात संधी आहे आणि सुख-शांती आहे.आणि हा विचार पटण्यासारखा तेव्हा शक्य होईल जेव्हा कुणी ह्या गोष्टीवर भरवंसा ठेवील तेव्हा.कारण जरा का भरवंसाच नसेल तर विचाराचा आणि श्रद्धेचा आभाव असणं म्हणजेच कुणाच्या कसल्याही प्रकारच्या अस्तित्वाचा अंत असण्यासारखं वाटणं.
जर कुणी परिश्रम घेतले तरच त्याची दरमजल होईल.माझी श्रद्धा आहे की मृत्युच्या पश्चात जीवन आहे आणि जीवनानंतर मृत्यु आहे. आत्म्याबरोबर आणि प्राकृतीक जीवनाबरोबर जे ह्या धरतीवर स्थान घेऊन असतं, त्याच्या पलिकडलं हे जीवन-मृत्युचं कधी ही अंत न होणारं घटनाचक्र आहे. ह्या प्रयास घेणार्‍या मनुष्याच्या आत्म्याला कुणीही असफल करू शकणार नाही कारण तो सतत नवजीवनाला समृद्ध करीत असतो.”

काळोख बराच झाला होता.संध्याकाळच्या वेळी बारीक बारीक मुर्कूटं चावतात.त्यासाठी चर्चा इथेच थांबवून आम्ही घरात आलो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com