Wednesday, January 25, 2012

मद्यमद चोरि तप--व्यथा व्यसनीची.




"खरं सांगायचं तर व्यसन-निवृत्ति करून घ्यायला खूपच कटकटीचं असतं.मी तिच तिच चूक परत परत करतो.सबुरीने कसं घ्यावं मला समजत नाही."


मी अनेकदा बंगलोरला गेलो आहे.अर्थात माझ्या कंपनीच्या कामास्तव मी गेलो आहे.मला आठवतं असंच एकदा मी बंगलोरला असताना सकाळचा नास्ता घ्यायला मी रहात होतो त्या होटेल जवळच्या एका रेस्टॉरंटमधे इडली सांभार खायला गेलो होतो.मी जिथे बसलो होतो त्या टेबलाजवळच्या  खडकीतून मी सहज बाहेर पाहिलं ते जरा संभ्रमात टाकण्यासारखं होतं. लाकडाच्या फ्रेमवर चटया ठोकून उभारलेल्या एका शेडमधे लोक येत जात होते.त्या शेडच्या आत काळोख असल्याने आत काय चालंय ते मला स्पष्ट दिसत नव्हतं.पण बाकडे आणि टेबलं मांडलेल्या जागी लोकं ग्लासभरून पेयं घेऊन यायचे.आणि गप्पा मारीत पीत बसायचे. काही लोक बाकड्यावर न बसताच गट्टकन ग्लासतलं पेयं पिऊन बाहेर पडायचे.


काही वेळानं मला कळायला कठीण झालं नाही की हे सर्व लोक आत मिळणारी दारू पिऊन यायचे. टॅक्सीवाले,रिक्षावाले,डोक्यावर ओझं वहाणारे, अधुनमधून पांढरपेशे दिसणारे काही लोकही त्यात होते. एव्हड्या सकाळी हे घेण्यासाठी हे लोक तत्परतेने यायचे म्हणजे सहाजिकच ते व्यसनी-ऍडिक्ट-झालेले लोक असणार असा मी कयास केला.


मुंबईला ज्यावेळी मी परत आलो तेव्हा हा सिन माझ्या मनात सतत घोळत होता.माझा एक मित्र एकनाथ करंडे हा मनोवैज्ञानिक असल्याने त्याच्याकडे ह्या विषयावर बोलावं म्हणून एकदा त्याची मी भेट घेतली. त्याला मी पाहिलेला प्रकार सवित्सर वर्णन करून सांगीतला आणि विचारलं,

जेव्हा हे व्यसनी लोक तुझ्याकडे उपाय करण्यासाठी म्हणून येतात तेव्हा तू ह्या लोकाना कसा हाताळतोस.?
मला एकनाथ म्हणाला,
मी तुला एका अशाच व्यक्तीची माझ्याशी पहिली मुलाखात झाली ती सांगतो.त्यावरून तुला थोडी फार कल्पना येईल की ह्या लोकांच्या मनात काय चाललेलं असतं."
असं सांगून एकनाथ मला त्या पेशंटचे विचार सांगू लागला,
"मी व्यसनी असणं हेचमुळी माझ्या जीवनाचा आधारस्तंभ झाला आहे असं मला वाटतं.व्यसनाशिवाय मी जगूच शकत नाही.प्रेमीयुगूलं येतात आणि जातात,युद्ध जिंकली जातात आणि हरली जातात.शोकान्त आणि विजयोल्लास सारख्याच फरकाने घोडदौड करीत येतात.पाऊस पडत असतो,बर्फ पडत असतं,तारे आकाशातून निखळून पडतात.ह्या सर्वांमधून माझं व्यसन माझ्याबरोबर असतंच.त्याचा वापर मी करो न करो ते माझ्या सोबत असतंच."


मी हे त्याचं तत्वज्ञान निमूटपणे ऐकून घेत होतो.तो पेशंट पुढे मला म्हणाला,
"आम्ही व्यसनी लोक जमून घोळका करून बसतो आणि एकमेकाच्या कहाण्या ऐकतो. आम्ही,संवेदना,स्वीकार,सत्यनिष्ठा,नम्रता आणि हारमानणं ह्या गोष्टी कार्यरत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.मी स्वतः मात्र ह्या सर्व गोष्टी कार्यरत ठेवण्यात कुचकामीच आहे.


व्यसनाधीन म्हणून,माझं जीवन मी कठोर रहाण्यात,उद्धट असण्यात आणि ताबा मिळवण्य़ात विशेषज्ञता प्राप्त करण्यात वापरलं आहे.चलाखी करण्यात मी चांगलाच कसबी आहे.भयानक सहजतेने मी खोटं बोलतो. मला प्रामाणीक रहाण्याची इच्छाच नाही.कुणीतरी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि मला समजून घ्यावं ह्याची मला जरूरीच भासत नाही.माझ्या व्यसानाला मी बढावा देत रहावं असं मला वाटतं.बरेचवेळा हे काय जे मी म्हणतो तेच मला हवंसं वाटतं."


त्या पेशंटला मधेच थोडं थाबवीत मी त्याला प्रश्न केला,
"सिनेमा-नाटकातून व्यसन-निवृत्ति दाखवली जाते पण ती बरीच यातनादायक, प्रभावशाली पण सरतेशेवटी फलदायी असते.खरं सांगायचं तर व्यसन-निवृत्ति करून घ्यायला खूपच कटकटीचं असतं.तुझं ह्यावर काय म्हणणं आहे?


तो मला म्हणाला,
"मी तिच तिच चूक परत परत करतो.सबुरीने कसं घ्यावं मला समजत नाही.खरं सांगायचं सोडूनच द्या, खरं कसं ओळखायचं हेच मला कळत नाही.कबूल व्ह्यायला मला आवडत नाही,माझ्यावर माझा ताबाच नसतो.हे असंच जीवन जगायचं ह्याची मला कल्पनासुद्धा करवत नाही.मी कमजोर, निर्बल अनुपयुक्त आहे असं माझंच मला वाटतं."


हे ऐकून मी त्याला म्हणालो,
"एव्हडं मात्र नक्की की तुला तुझ्यात सुधारणा केली पाहिजे असं मला वाटतं.उठण्यासाठी कितीही धडपड केली आणि जमलं नाही तरी तुला उठलंहे पाहिजेच आणि हे सगळं ठुकरावून दिलं पाहिजे.तुला यात यश येईल का हे जरी माहित नाही असं जरी वाटत असलं तरी मला वाटतं तू यशस्वी होशील."


माझ्या ह्या सांगण्याने त्याला थोडा हुरूप आला मला म्हणाला,
"जीवनाच्या प्रत्येक क्षणातून जमवून घेण्याच्या मी प्रयत्नात असतो.माझ्या लक्षात आलंय की तसं मी करू शकतो.आता ह्या क्षणी मी घाबरा घुबरा झालो आहे.पण ते ह्या क्षणापूरतंच आहे.माझंच व्यसन माझ्या कानात पुटपुटतं,
"बाबारे!अगदी बरोबर मला माहित आहे की तुला बरं वाटावं म्हणून तू काय करू शकतोस ते."
पण आणखी एखाद्या क्षणात मला बरंही वाटेल.त्यामुळे त्या नंतरच्या क्षणाची मी प्रतिक्षा करीत असतो."


हे त्या पेशंटचं म्हणणं सांगून झाल्यावर,एकनाथ मला म्हणाला,
"अशावेळी पेशंटचा सकारात्मक विचाराचा धागा पुढे पुढे नेत काही तरी उत्तेजन देण्यासाठी मी त्याला म्हणालो,
"मला वाटतं अशाच तर्‍हेने तू तुझं जीवन सुखकर करू शकतोस. अगदी प्रत्येक वेळी एका एका लहान क्षणातून.
अगदी ह्या क्षणाला तू चांगली निवड करू शकतोस.ह्या क्षणाला तू सत्य सांगू शकतोस.ह्या क्षणाला जे तुझ्या जवळ आहे त्याबद्दल तू कृतज्ञ राहू शकतोस.हा क्षण असताना तू क्षमा करू शकतोस.पाच मिनीटानंतर तू वेडपटपणा करू शकतोस.पण ह्या क्षणाला तू तुझं जीवन बदलू शकतोस.
सरते शेवटी मला वाटतं,एव्हडं सर्व तुझ्या जवळ आहे.अगदी ह्या क्षणाला.जे आहे ते भरपूर आहे.फरक करून घ्यायला ते भरपूर आहे.चांगला माणूस व्ह्यायला ते भरपूर आहे.ह्या सर्वातून पार व्हायला जसा तू हवा आहेस तसा तू आहेस."
एकनाथने त्याच्या पेशंटच्या पहिल्या भेटीत त्याचं ऐकून घेऊन नंतर त्याला आपला उपदेश देऊन दुसर्‍या भेटीत त्याच्या वागणूकीत काय सुधारणा होईल ते पाहूनच पुढची स्टेप घेणार असं मला सांगीतलं.

मी उठता उठता एकनाथला म्हणालो,
"कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं संगीत विद्याहरण नाटकातलं गाणं ह्यावेळी मला आठवलं,

मद्यमद चोरि तप दाऊनि सुख नरा ।
चौर्यकरी; बलभास; शापयोग्या सुरा ॥

ही वारयोषिता दारूणा सेविता ।
भस्म करिते जना,व्याधी भयंकरा ॥"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com