Monday, January 9, 2012

ती पण मुलंच आहेत.




"माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते."


कोदेवकीलांच्या घरी सर्वच वकीलीपेशात लागले होते.कोदे स्वतः,त्यांची दोन मुलगे,एक मुलगी आणि आता त्यांची मोठी सून सर्वच वकील होती.
कोद्यांची मोठी सून म्हणजेच मुणाल माझ्या परिचयाची होती.तिच्यामुळेच माझी कोदे कुटूंबाशी ओळख झाली.
मृणालचं लग्न होऊन झाली असतील पाचएक वर्षं.तिला आता दोन मुलं आहेत.लहान मुलगा असेल एक वर्षाचा.मी शहरात गेल्यावर मृणालची किंवा तिच्या नवर्‍याची आणि माझी कोर्टापाशी बरेच वेळा भेट व्हायची.कधी कधी दोघंही एकाच वेळेला भेटायची. रस्त्यावरून चालतानासुद्धा त्यांच्या कायद्याच्या गप्पा चालायच्या.
ह्यावेळेला मला मृणालचा नवरा एकटाच दिसला.चौकशी केल्यावर कळलं की मृणाल आता सबर्बनमधे जुवनाईल कोर्टात केसीस घेते.लहान मुलांवर झालेल्या आरोपातून पब्लिक डिफेन्डर म्हणून तिला काम करण्याची संधी मिळाल्याने ती फारच स्वारस्य घेऊन काम करते.


"मुणाल तुमची आठवण काढते.बरेच दिवस तुम्ही आमच्या घरी आला नाही.तेव्हा वेळ काढून कधीतरी या"
असं मृणालचा नवरा मला त्यावेळी म्हणाला होता म्हणून मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.


"तुझा नवीन जॉब कसा काय आहे? जुवनाईल कोर्टात कसं चालतं ह्याचं मला कुतूहल आहे म्हणून विचारतो."
असं मी मृणालला म्हणाल्यावर,ती मला म्हणाली,
"अगदी नव्यानेच मी हा जॉब करीत आहे.त्यामुळे रोजचं काम हा माझा ह्या विषयातला नवीन अनुभव म्हणून जमा होत आहे.
असं म्हणून,मांडीवर घेतलेला आपला मुलगा मृणालने पाळण्यात ठेवला आणि त्याच मुलाचा विषय काढून माझ्या जवळ येऊन मला म्हणाली,
"कालचीच घटना मी तुम्हाला सांगते.
काल रात्री माझा मुलगा माझ्या हाताच्या घडीवर जणू पाळण्यात झोपावं तसा झोपला होता.माझ्या खांद्यावर त्याचं ते इवलूसं डोकं,माझ्या छातीवर त्याचा इवलूसा हात आणि त्याचे दोन्ही पाय माझ्या कंबरेवरच्या निर्‍यात खोचले गेलेले अशी त्याची पोझ होती.


माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते.त्याचं झोपेतलं खिदखिदणं पाहून,एक वर्ष वयावर काय मजा येत असेल ह्याचा मी विचार करीत होते.त्याला वाटत असावं की,आईच्या सानिध्यात आपण किती सुरक्षीत आहो.त्याचं शरीर  आईच्या अंगावर आराम घेत आहे, त्याचं श्वसन हळुवार झालेलं आहे पण सावध झालेलं आहे ते मला भासत होतं.
त्याच्या सभोवतालचं वातावरण शांत असल्याचा त्याला वाटणारा भास सूदंर असावा.माझी तीन वर्षाची मुलगी बाजुच्याच कॉटवर शांत झोपली होती.
दिवसभराच्या घाईगर्दीच्या जीवनातून ती थकलेली होती.माझं तिच्याकडेही लक्ष होतं.कदाचीत ती जागी झाल्यास सर्व काही आलबेल आहे हे तिला चटकन कळावं हा माझा उद्देश होता.एव्हड्याश्या तिच्या जीवनात ती बरीचशी स्वावलंबी झाली होती.


हे माझं माझ्या घरातलं वातावरण होतं.रोज सकाळी मला माझ्या कामावर गेल्यावर जे वातावरण माझं स्वागत करतं ते ह्या माझ्या घरच्या वातावरणाशी पूर्णपणे असादृश्य आहे.पब्लिक डिफेन्डर म्हणून कोर्टात वकीली करण्याचा माझा जॉब असल्याने,मला कोर्टात मुलांचे असे नमुने दिसायचे की समाजाने त्याच्यावर "गुंड","चोर," "बलात्कारी" "छेड काढणार" असली लेबलं लावली होती.आणि ही लेबलांची यादी मोठी होती.पण ती लेबलं दूर केल्यास ती पण मुलंच होती.


ह्या मुलांच्या सानिध्यात राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यावर आणि त्यांच्याशी त्यांच्या जीवनाविषयी,त्यांच्या घराविषयी,त्यांच्या स्वप्नाविषयी चर्चा करायला मला संधी मिळते.त्यांच्या जवळ बसून डोळे पाणावतात,माझ्या मनात समाजाचा राग आणला जातो,समाजातील विषमतेचा उद्वेग येतो पण जास्त करून माझं मन दुःखीच होतं.त्या मुलांच्या मनातलं खोल दुःख त्यांच्या नजरेतून चमक देऊन जातं.
त्यांना हरवले गेल्याचं,त्यागल्याचं,यातना दिल्याचं,लेबल लावल्याचं,फेकून दिल्याचं,भिरकावून टाकल्याचं दुःख मला सलतं.
समाजातल्या विषमतेतून निर्माण झालेल्या समस्येतून,गरीबीतून, जमेल तेव्हडी जोपासना करणार्‍या कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.त्यांची अजीबात गय केली गेली नाही अशा कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.


बर्‍याच जणांचे आईबाप,पण जास्त करून आयाच,कोर्टाच्या लॉबीमधे दिवसा मागून दिवस येऊन बसलेल्या मी पाहिल्या आहेत.त्या मुलांवर कसलेही दारुण आरोप लावून,कसलीही लेबलं लावून त्यांना तिथे आणली गेली असताना,त्या निन्दनीय रस्त्यावर पोरकी झालेल्या त्या मुलांची सोडवणूक करण्यासाठी ती मंडळी आलेली असते.
काहीवेळा त्या मुलांचे असेही आईबाप मी पाहिलेले आहेत की,ते त्यांच्या मुलांचा तिकडेच कायमचा त्याग करून जाण्याच्या तयारीने आलेले असतात.दरदिवशी मी कोर्टात माझ्या कामावर गेल्यावर माझ्या आशेचा भंग झालेला पाहिला आहे.


प्रत्येक वेळेला एखाद्या मुलाची संस्थेत भरती होते,किशोर वयाच्या मुलांची बंदीखान्यात रवानगी होते,एखाद्या मुलाला प्रौढांच्या कोर्टात नेऊन निकाल मिळाल्यावर आयुष्यभर बंदीखान्यात रवानगी होते.ह्या मुलांच्या भावी स्वप्नांचा त्याग केला जातो.
मला नेहमीच वाटतं की,ही मुलं हे समाजाचं भवितव्य आहे.जरी आपल्याला हे कबूल करायचं नसेल,जरी आपल्याला ती उपद्रवी वाटत असलं तरी.


ती मुलंसुद्धा आपल्या आईच्या खांद्यावर झोपी गेलेली असतील किंवा झोपी जावं अशी त्यानी इच्छाही केली असेल,त्यांनाही स्वप्न असतील,उमेद असेल,कल्पना असतील.तीही त्यांच्या लहान वयात झोपेत खिदखीदली असतील.
पण नंतर काहीतरी घडलं असेल,काहीतरी शोकजनक,काहीतरी उदध्वस्त झालं असेल की ज्यामुळे त्यांचं तारूण्य़,त्यांच्या आशा-आकांक्षा,त्यांचा आनंद धुळीला मिळाला असेल.
माझ्या मनात नेहमी येत असतं की एकनाएक दिवस हे नष्ट झालेलं बालपण,ही त्यागलेली स्वप्नं आणि धुळीला मिळालेली जीवनं परत मार्गावर आणता येतील.


दरदिवशी जेव्हा मी घरी पोहोचते तेव्हा माझ्या मुलांना मी छातीशी कवटाळते आणि त्यांच्या कानात परत परत पुटपूटते,
" तुम्ही माझे प्राण आहात"
आणि मी जेव्हा अशी आशा करीत असते तेव्हा कामावर सोडून आलेल्या त्या मुलांचा मला विसर पडत नाही. मी दोन विश्वात वास्तव्य करते.एक वचनबद्ध विश्व आणि एक शोकांन्तिकेचं विश्व.
मी ह्या गोष्टीचा विसरही पडूं देत नाही की ही माझ्या कामावर भेटणारी मुलं,त्यांच्यावर कसलेही आरोप असोत,समाज त्यांच्या विषयी काहीही म्हणत असो,त्यांच्यावर कसलीही लेबल्स लागलेली असोत,ती मुलंच आहेत,आपलीच मुलं आहेत आणि आपलंच भवितव्य आहे.आणि मी हे पक्कं जाणलेलं आहे."

मृणालकडून हे सर्व ऐकून मला सर्रर्र झालं.ह्या जगात असंही चालतं हे पाहून माझं मन उदास झालं.मी मृणालला म्हणालो,
"तू नुसती वकीली करीत नाहीस तर एक समाजकार्य करीत आहेस असं मी म्हणेन.चांगल्या मार्गाला लागलेल्या त्या प्रत्येक मुलाकडून तुला दुवा मिळत रहाणार.अप्रत्यक्षपणे तुझ्या मुलांचं भलं होणार."
माझं हे ऐकून सहाजीकच मृणालचा चेहरा आनंदला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com