Tuesday, January 3, 2012

"ते शक्य आहे आणि ते करीनच"




"हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता."


तो रविवार होता.पेपर वाचून झाल्यावर,टीव्हीवरची सकाळची न्युझ बघून झाल्यावर कंटाळा घालवण्यासाठी शेजारच्या वामनच्या घरी सहज गप्पा मारायला गेलो होतो.वामन पास टाईम म्हणून त्याच्या लॅपटॉपवर इमेल वाचत बसला होता.मला पाहून ते काम बंद करून माझ्याशी गप्पा मारायला बसला.


तेव्हड्यात त्याची मुलगी सुनंदा आली आणि त्याला म्हणाली,
"आम्ही जीवश्च-कंटश्च तीन मैत्रिणी पण आमच्या पैकी एकीला आम्हाला मिळाला त्या कॉलेजात तिला प्रवेश नाकारला.ती खूपच नर्व्हस झाली आहे.त्या कॉलेजच्या प्रिन्सिपालची आणि तुमची ओळख आहे.काही करून पहाल का?"


वामनने त्याच्या मुलीला प्रयत्न करून पहातो पण आश्वासन देत नाही.असं उत्तर दिलं.ती निघून गेल्यावर मला म्हणाला,
"नकार मिळणं,अस्वीकार होणं,नापसंती दाखवली जाणं ह्या गोष्टींचा जीवनात जो अनुभव मिळतो त्याबद्दल मला नेहमीच विशेष वाटत असतं.शाळेत असताना,शेवटचा नंबर मिळणं,अस्वीकार होणं,शाळेतल्या खेळातल्या टीममधे निवड न होणं ह्याबद्दलही मला त्यावेळेला विशेष वाटायचं.
तसंच माझ्या स्वतःच्या जीवनात किंवा माझ्या व्यावसाईक जीवनात काहीतरी अगदी आवश्यक आहे असं वाटत असताना ते मिळणं अशक्य आहे असं मला सांगीतलं जावं ह्याबद्दलही मला विशेष वाटतं.


मला मनोमनी वाटतं की,हा एकच अनुभव आहे त्यातून आपल्याला अप्रत्यक्षपणे समजतं की आपण जीवनात अग्रगति येण्यासाठी, भरपूर कष्ट घेण्याच्या प्रयत्नात आहो,जीवनात भरपूर धोका पत्करण्याच्या प्रयत्नात आहो.जर का आपल्याला नकार मिळण्याचा अनुभव मिळत नसेल तर समजावं आपण कोणताही नवा किंवा कठीण प्रयत्न करीत नाही.हे असं होणं खरोखरच जास्त यातनादायक,आणि तथ्य असलेली बाब आहे.
"जोखिम नाही तर लाभ नाही"
ह्या उक्ति पेक्षाही.


मी जेव्हा अगदी लहान होतो,किशोर वयात होतो तेव्हाही,प्रत्येक नकार मला खूप यातना देऊन जायचा.कधी कधी हा नकार स्वीकारताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं, निष्टूर आलोचना व्हायची.तसा माझा स्वभाव खूपच भावनाप्रधान आहे.मी आवडला जावा असं मला वाटायचं, तसंच इतराना खुशीत ठेवायला मला आवडायचं.


अलीकडेच माझ्या जीवनात एक घटना घडली.त्यामुळे माझ्या लहानपणी झालेल्या निष्टूर आलोचना आणि माझ्या किशोर वयात मला मिळालेल्या सर्व नकारांचा मी ऋणी झालो आहे.


हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता,पण काही कारणास्तव ह्या घटनेचा मला झालेला दंश पूर्वीच्या झालेल्या घटनांच्या दंशापेक्षा कित्येक पटीने जहरी होता.


मी एका योजनेत भाग घेण्यासाठी अर्ज केला होता.मला तेव्हा वाटलं होतं की मला जे काही आयुष्यात करीअर म्हणून मिळवायचं होतं ते साध्य व्हायला हा चांगला मोका मिळत आहे.पण जे नकारात्मक पत्र मला आलं ते विनम्र किंवा साभार परत अशा पद्धतीचं नव्हतं.परंतु,ते काहीसं हानिकारक आणि खालच्या दर्जाची प्रत्यालोचना करण्यासारखं होतं.
"तुम्ही ह्यासाठी लायक नाही आणि कधीही नसणार"
असा तो मजकूर होता.


तरीसुद्धा सुरवातीला मला मिळालेला धक्का सहन केल्यानंतर -मी अभिमानाने म्हणेन माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही.-उलट माझ्यातला पक्का इरादा वाढू पहात होता की माघार न घेता आपल्या मनातला उद्देश साध्य करायला झटावं.माझ्या मनातलं साध्य करण्याचा इरादा,नकार मिळाल्याच्या यातनाना,पार करून जात होता.ह्यातून माझ्या एक लक्षात आलं की,नकार मिळण्याच्या अनुभवातून माणूस आपली प्रगति कशी करू शकतो ते.

माझा आता भरवसा बसला आहे की,खेळपट्टीवर होणार्‍या अवमानाने आणि शाळेत होणार्‍या अशाभंगाने,तरल किंवा तितकीसे तरल नसलेले अवमान आपल्या प्रौढ वयात सहन करायाला आपण तयारीत असतो. नकार मिळाल्याने आपल्याला खरंच काय हवंय,किती हवंय आणि त्यासाठी किती
जोखिम घ्यावी हे समजायला मदत होते."


वामनचं हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला उठता उठता म्हणालो,
"मला वाटतं अवमानातून आपल्यात क्षमता येते. मला वाटतं,ते क्षण जेव्हा दुसरा कोणही तुम्हाला म्हणतो,
"तुम्हाला ते शक्य नाही आणि तुम्ही ते करू नका"
तेव्हा आपल्या अंतर मनातला आवाज सांगतो
"ते शक्य आहे आणि ते करीनच"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com