Sunday, January 15, 2012

सौन्दर्याची निवड.




"सौन्दर्य आपल्या अवतीभोवती असतं आपण निवड करून ते शोधलं पाहिजे."


माधव आपल्या आईवडीलांबरोबर लहानपणी पार्ल्याला रहायचा.नंतर काही वर्षानी ती जाग सोडून ते शहरात रहायला आले.आमचे शेजारी झाले.
जुन्या आठवणी येऊन माधव आपल्या पार्ल्याच्या घराबद्दल त्या दिवशी सांगत होता.
मला म्हणाला,
"सौन्दर्याचं संभाव्य आपल्या अवतीभोवती जसं असतं तसंच संभावनात असलेलं सौन्दर्यही आपल्या अवतीभोवती असतं.ह्या तथ्यात खरंच सत्य असतं.कारण मी त्याचा अनुभव घेतला आहे.


खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे.त्यावेळी आम्ही पार्ल्याला रहायचो.त्यावेळी गिरगावातून पार्ल्याला येणं म्हणजे शहरातून खेड्यात गेल्यासारखं वाटायचं. पार्ल्यात तेव्हा  खूप नारळाची झाडं होती.आणि कौलारू घरं होती. लांबच्यालांब बैठी घरं म्हणजे त्यावेळच्या त्या चाळी असायच्या.पार्ल्यात त्यावेळी डास-मच्छराचं थैमान असायचं.गिरगावातला माणूस सुट्टीत पार्ल्याला राहिला आणि परत तो गिरगावात गेल्यावर डास-मच्छर चावल्याने आजारी पडायचा.


अशाच एका वाडीत आम्ही एका जुन्या घरात रहायला होतो.घराच्या समोरून मुख्य रस्ता जात होता.त्यावेळी पार्ल्यात गटारं उघडी असल्याने ह्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचं रेन-वॉटर-ड्रेन असं संबोधून गटारं उघडीच असायची.पाणी तुंबल्याने त्यात पावसात खूप डास व्ह्यायचे.शिवाय येता जाता लोक कचराही टाकायचे. आमच्या घरासमोर स्वच्छता दिसावी म्हणून आम्ही घराच्या समोर सुंदर फुलझाडांची छोटीशी बाग केली होती.अतिशय घाणेरड्या परिसरात आमच्या घरासमोरची बाग उठून दिसायची.येणारा जाणारा सुंदर रंगीबेरंगी फुलं पाहून आनंदायचा.काही शेजारचे, देवाच्या पुजेसाठी म्हणून जासवंदीची किंवा सदाफुलीची फुलं खुडून घेऊन जायचे.


पण ही बाग तयार करायला आम्हाला सुरवातीला खूप कष्ट पडले होते.घर इतकं जुनं होतं की ते बांधताना भिंतीना लागणार्‍या सिमेन्टचा रबल जमीनीत इतस्तः फेकला गेल्याने अनेक पावसाळ्यातून तो रबल जमीनीत गच्च बसून राहिला होता.रबल काढून मग आम्ही त्या जागी चांगली माती आणून त्यात खत घालून फुलझाडांसाठी ती जमीन पोषक व्हावी म्हणून चांगलाच खर्च केला होता.दुसर्‍या पावसाळ्यात आम्ही तिथे फुलझाडं लावली.
रस्त्या्वरून येणारे-जाणारे आम्हाला सावध करून सांगायचे की आमची मेहनत फुकट जाणार.मन विचलित न करता जिद्दीने आम्ही मेहनत घेत होतो. तिसर्‍या वर्षी आमच्या बागेला थोडं स्वरूप आलं.आमच्या मेहनतीला फुलं आली.


आमचं हे जूनं घर पाडून आमचा घरमालक नवीन घर बांधण्याच्या विचारात होता.एक दोनदा त्याने आम्हाला तसे संकेतही दिले होते.
एक दिवशी विकेंडला आम्ही गिरगावात आमच्या एका नातेवाईकाकडे भेटीला गेलो होतो.दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या घराला आग लागली आहे आणि आम्ही ताबडतोब घरी यावं.
आम्ही जाई तोपर्यंत घर पूर्ण जळून गेलं होतं. आमचं घर आगीने धुमसत होतं.नेत्र शल्य झालं होतं.पण आम्ही उभारलेल्या बागेला जरासुद्धा आगीची झळ लागली नव्हती.


आम्ही सर्व घराबाहेर उभे राहून जळतं घर बघत होतो.आणि पाठ फिरवून बागेकडे अचंबीत होऊन पाहात होतो.इतक्यात एक वयस्कर गृहस्थ माझ्या वडीलांकडे येऊन म्हणाले,
"मला थोडी ती लालबूंद दिसणार्‍या फुलांची रोपटी मिळतील काय?"
त्याचा प्रश्न ऐकून माझे वडील चक्रावले गेले.कुणी एखादा एव्हडा असंवेदनाशील होऊन एव्हड्या दुर्दैवी घटनेकडे डोळे झाक करून नगण्य़ अशा लालबूंद फुलांच्या रोपासाठी विचारपूस करील.?


नंतर माझ्या लक्षात आलं की,त्या जळून गेलेल्या घराकडे त्याचं लक्ष नसावं.त्या कोसळून पडलेल्या गजाच्या खिडक्या त्याने पाहिल्याच नसाव्यात, आगीच्या धगाने निर्माण झालेला तो जुनाट घराचा उग्र वास त्याच्या नाकात गेलाच नसावा.त्याचं ध्यान फक्त आमच्या बागेमधल्या सुंदर लालबूंद फुलांकडेच होतं.
माझ्या वडीलांनी आणि मी काही रोपटी जमीनीतून उपटून त्याला दिली.त्या अनोळख्याने नकळत त्या लालरंगाच्या फुलांची निवड आणि लाल भडकदार आगीने भस्मसात झालेलं घर यामधली सर्वमान्य विचारधारा सुचित करण्याचा जणू प्रयत्न केला होता. ती रोपटी हातात पडल्यावर तो अनोळखी, जमलेल्या गर्दीतून वाट काढत कुठे दिसेनासा झाला.आपल्या सर्वांचंपण असंच होतं.रोजच्या कामाच्या घाईगर्दीत एखादं महत्वाचं काम असंच दुर्लक्षीत होतं.


त्या सुंदर लालबूंद फुलांचं मुळ वंश कुठचा ते माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात मी नेहमीच असतो.परंतु,मला माहित आहे की त्याचं मुळ आणखी कुठच्याही बागेत सापडण्यासारखं नाही.त्याचे परिणाम मात्र माझ्याच खोल अंतरात आहेत.
म्हणूनच मला नेहमी वाटतं,सौन्दर्य आपल्या अवतीभोवती असतं आपण निवड करून ते शोधलं पाहिजे."

माधवचं हे म्हणणं मला एकदम पटलं.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com