Wednesday, April 4, 2012

अंतरातल्या नाना कळा...१०



"सांजवेळी आली आठव सजणीची
हिच खरी समस्या असे जीवनाची"


१४ मार्च २०१२.
आज सुधार सेंटरवर येऊन एक आठवडा संपला. आज दुसर्‍या आठवड्याचा गुरवारचा दिवस.काल बुधवारी मी पत्नीकडे गेलो नव्हतो.माझी मुलं माझीही काळजी करायला लागली होती.दगदग होऊन मलाच जर का काही झालं तर त्यांची आणखी जबाबदारी वाढायची.फुर्ती,स्पुर्ती जरी माझ्या अंगात ह्या वयावर असली तरी वय साथ देईल असं नाही.म्हणून मलाही त्यांनी विश्रांती घ्यायला लावली.आणि मी ज्या दिवशी सुधार सेंटर जात नसायचो त्या दिवशी मुलं आळीपाळीने आपल्या आईला भेटून यायची.आणि मला संपर्कात ठेवायची.मला अजून चालायला काठी वगैरे लागत नाही.पण काठी हे झालं शरीराच्या गरजेचं.पण मनालाही काठीचा आधार लागत असावा. मला न समजणारी मनाला लागणारी काठीच जणू माझ्या मुलांनी मला द्यायला सुरवात केली.
हे लक्षात येऊन माझ्या एका कवितेतल्या ओळी मला आठ्वल्या,


थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे


एक दिवसाची सुट्टी घेऊन मी ज्यावेळी माझ्या पत्नीला भेटायला जातो आणि तिला सांगतो आज सबंध दिवसभर मी तुला संगत देणार ते ऐकून ती खूपच खूश असते.मला ते जाणवतं.माझ्या पत्नीची दुसर्‍या कुणाकडूनही सेवा करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.हा आजार येण्यापूर्वी गेली कित्येक वर्षं मी तिच्या बरोबर सावली सारखा राहिलो आहे.जिने आपल्याला ह्या जगात गेली त्रेपन्न वर्षं सहवास दिला,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना मला जीवनात दुसरी कसलीही मजा आनंद देऊ शकणार नाही.


जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.


खरं म्हणजे ह्या सुधार सेंटरवर माझ्याकडून तिची कसलीच शारीरिक सेवा होत नाही.सर्वच्या सर्व सेंटरवरच्या नर्सिस आणि इतर लोक करीत असतात.पण का कुणास ठाउक  मी तिच्या सहवासात राहिल्याने नकळत तिच्या मनाला माझ्याकडून धीर दिला जातो हा पण सेवेतला एक प्रकार आहे असं माझ्या मनात येऊन मला बरं वाटतं.


आज  मी तिच्या नकळत फि.थे.लॅबमधे जाऊन तिच्या व्यायामाचं निरक्षण करीत होतो.आज तिच्या पॅर्ललबारवरच्या चालीची प्रगती मला चांगली दिसली.तिचा व्यायाम घेणारेही आशापूर्ण होते.व्हिलचेअरवर तिला बसवून स्वतः तीने चेअर कशी चालवायची ह्याबद्दल मी तिला मदत करीत होतो.तिला उमेदही येत होती.


ज्या खडतर परिस्थितीतून माझी पत्नी जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात केले जाणारे उपाय उपयुक्त होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार.जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भारदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुर्भाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.


येत्या सोमवारी म्हणजे १९ मार्चला सुधार सेंटरच्या लोकांशी आम्हा जवळच्या कुटूंबियाबरोबर माझ्या पत्नीच्या प्रगतिचा आढावा घेण्यासाठी मिटिंग आहे.पुढल्या आठवड्यात तिला वॉकर देऊन चालायची सवय करणार आहेत.


आज विकएन्ड असल्याने मी,माझे जावई आणि माझी मुलगी संध्याकाळी सुधार सेंटरवर पत्नीला आमची कंपनी देणार आहो.माझा मुलगा आणि माझी सुन सकाळपासूनच तिच्या जवळ आहे्त.तिला घराची आठवण येते आणि सेंटरवर अधुनमधून कंटाळा येतो.पण काय करणार? अंधारी रात्र संपल्यावरच दिवसाचा उजेड दिसणार.


दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे

झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे


क्रमशः



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com