Friday, April 20, 2012

सिनेस्थेसीया नावाची व्याधी


"फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे."


विश्राम मेढेकर माझा जूना शाळकरी मित्र.मला आठवतं तो लहानपणापासून छान कविता लिहायचा.त्याला शाळेत कवी विश्राम म्हणूनच संभोदायचे.
अलीकडेच मी त्याला दादर स्टेशनवर भेटलो होतो.गर्दीतच त्याने मला हाक मारली.तो चर्चगेटवरून येणार्‍या गाडीतून उतरला होता.मला म्हणाला,
"चल आपण बरेच दिवसानी भेटलो आहो, मामा काण्यांचा बटाटावडा खायला जाऊया.खूप दिवसानी भेटलास जरा लहानपणाच्या गप्पा मारायला मुड आला आहे."

मला कुणी आग्रह केला तर त्याचं मन मला मोडवत नाही.आम्ही एक एक कप गरम चहा आणि बटाटावडा मागवला. बटाट्यावड्याबरोबर लालबूंद सुकी चटणी मिळते ती मला खूप आवडते.मामा काण्यांचा मोठा मुलगा बापूसाहेब काणे माझ्या परिचयाचे आहेत.माझे tifr मधले सहकारी होते.बापूसाहेब सॉफ्टवेअर इंजीनीयर होते आणि मी हार्डवेअर इंजीनीयर होतो.

मी एकदा बापूसाहेब काण्यांना म्हणालो,
"बटाट्यावड्याबरोबर तुम्ही जी सुकी लाल रंगाची चटणी देता ती मला एकदम चटकदार वाटते.बरं,कधीही ती चटणी खाल्ली की तिची टेस्ट तीच असते.ह्याच गुपीत काय आहे.?"
मला बापूसाहेब म्हणाले,

"ते एक सिक्रेट आहे,कोका कोलाचा जसा फार्म्युला सिक्रेट आहे अगदी तसाच.पण तुम्हाला ते सिक्रेट उलगडून सांगतो.तुम्ही काही मला परकी नाही."
माझी गम्मत करीत ते म्हणाले.
बापूसाहेब पुढे म्हणाले,
"कांद्याची भजी देऊन संपल्यावर भांड्यात तळाला भज्याच्या खूप चूर रहातो.तो चूर एकत्र करून त्यात थोडी मिरचीपूड घालून, चवीला थोडं मिठ घालून झाल्यावर मग तो चूर एकजीव करून त्याचा सुकी चटणी म्हणून वापर केला जातो."
काहीही फुटक जाऊ न देण्याच्या आणि युक्त्या करून काटकसरीत धंदा करण्याच्या मराठी माणसाच्या वृत्तीचं कौतूक करावं असं वाटतं.

चहा घेता घेता मी विश्रामला विचारलं,
"अरे,तू लहानपणापासून छान कविता लिहायचास.सध्या त्या़ची हालत काय आहे.?"
मला विश्राम म्हणाला,
"हालत कसली सध्या हालच आहेत."
शाळेत असताना विश्राम आमच्या मराठी गुरूजीना फारच आवडायचा.त्यांना कवितेची एक दोन कडवी लिहून दाखवायचा.एखादी कविता त्यांना आवडली की ते वर्गात त्याला वाचून दाखवायला सांगायचे.आणि बक्षीस म्हणून त्याला नवी करकरीत लायन पेन्सिल द्यायचे.ह्या सर्व जून्या गोष्टींची विश्रामला मी आठवण करून दिली.
त्यावर तो मला म्हणाला,
"आम्हाला शाळेत मराठीचा विषय शिकवायला जे शिक्षक होते ते स्वतः कवी होते.त्यांनी आपला कविता-संग्रह छापला होता. त्यांना नेहमीच वाटायचं की आपल्या विद्यार्थ्यापैकी काहीनी तरी कविता लिहाव्यात.

हाय स्कूलमधे शिकत असताना मराठीच्या विषयाचे शिक्षक कविता कशी लिहावी ह्याची माहिती देत असताना बरीच मुलं ते शिकायला कंटाळा करायची.त्याचं मुख्य कारण असं की प्रचारात नसलेले आणि दुर्बोध असलेले शब्द आणि भाषेचं अवैध व्याक्रण वापरल्याने शब्दांच्या अर्थाला म्यानात टाकून ठेवल्यासारखं झाल्याने आणि त्या शब्दांचा कवितेत वापर करायला जोर आणला गेल्याने अलीकडच्या प्रचारात असलेल्या भाषेत समजायला ती कविता कठीण व्हायची.
कवितेमधे आनंद घेणार्‍या मला, कुसुमाग्रज सर्वांसाठी नाहीत, हे समजू शकतं.पण बर्‍याच लोकांचं मन कविता ह्या शब्दानेच पूर्वग्रहदुषित होत असतं.

परंतु आमच्या ह्या कवी-शिक्षकाचं तसं नव्हतं.ते स्वतःच कवी असल्याने आणि त्यांच्या कविता खूपच लोकप्रिय असल्याने त्यांची, कविता लिहायला शिकवण्याची तर्‍हा, मला इतकी आवडायची की कविता लिहायला आवड नसलेल्यांना स्फुर्ती यायची हे पण मी पाहिलेलं आहे."

विश्रामचं हे ऐकून मी त्याला म्हणालो,
""पाठ्य पुस्तकाच्या पानात छापली जाऊन बंदिस्त रहाण्यात कवितेचं अस्तित्व नसतं.मला वाटतं,कविता ही एखाद्या तुफानातून निर्माण झालेली असंबद्ध लय असते.आणि दुसर्‍या दिवशी पडणार्‍या पहाटेच्या दवबिंदूंच्या सुगंधाने दरवळलेल्या ओल्या झालेल्या माती सारखी असते.अशी ही माती आपल्या अवतिभोवती असते,फक्त आपल्याला ती उकरून पहायला हवी."

माझं म्हणणं विश्रामला पटलं.
मला म्हणाला,
"मला आठवतं मी लहान असताना संगीतातल्या मौजेचा आनंद कधीच घेतला नाही.त्या ऐवजी मी माझ्या आजोळी आमच्या घराच्या मागे असलेल्या रानात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली बसून ती जादूभरी पानांची सळसळ आणि सरसराहट,पिंपळाच्या फोफावलेल्या फांद्यावर वार्‍याने डुलणारी पानं बघून उत्तेजीत व्ह्यायचो.मला रेडिओवरची गाणी कधीच आवडली नाहीत.का ते माहित नाही.हे मी मोठा होई तोपर्यंत कळलं नाही.त्याचं कारण शोधून काढायला मी जास्तीत जास्त प्रयत्न करीत असायचो.पण कविता मात्र लिहीत राहायचो."

"मग त्यात खंड कसा आला.मघाशी तू मला म्हणालास हालत कसली हाल आहेत त्याचं काय कारण?"
मी विश्रामला विचारलं.
मला म्हणाला,
"त्याचं असं झालं की,त्यानंतर माझे आजीआजोबा निर्वतेले.आणि मला माहित झालं की माझ्याकडून एक मुक करार लिहिला गेला असावा.त्या रानातला तो मंत्रमुग्ध करणारा आवाज माझ्याकडून कधीच ऐकला गेला जाणार नव्हता.

एकदा मला आठवतं,त्या रानातल्या संगीतासारखा आवाज माझ्या कानावर आला.इतराना तो आवाज एखादी बाजापेटी वाजवल्यासारखा वाटला असावा.पण माझ्या करीता तो आवाज विस्फोटीत होऊन जीवन आणि चैतन्य उफाळून आल्यासारखं वाटलं.त्यापूर्वी मला वाटत असायचं ते जीवन आणि चैतन्य माझ्या दैवाला मी समर्पीत केलं असावं.

ही काही डामडौल दाखवणारी उपमा नव्हती.खरंच मी माझे डोळे झाकल्यावर,मला सर्वतर्‍हेचे रंग माझ्या नजरेला विनम्रपणे लयीत नाचताना दिसायचे.हे असं काय होतंय ते मला कळेना.

मला सांगण्यात आलं की, सिनेस्थेसीया नावाची व्याधी मला झाली आहे.नसविद्या शास्त्रानुसार,मेंदूतल्या,उत्तेजीत करणार्‍या मार्गात आणि प्रतिसाद देणार्‍या, मार्गात होणारा संभ्रम,असं त्याचं विश्लेषण आहे. पण ज्या कुणाला हा माझ्या सारखा व्याधी झाला असेल त्यांना माहित असावं की संभ्रम मुळीच नसावा.संभ्रम सोडून दुसरं काही तरी असावं.मी ह्या गोष्टीवर माझं ध्यान देत राहिल्यावर मला दिसून आलं की हे काहीतरी दूसरच असावं.

काही आकडे रंगीबेरंगी दिसायचे.विशेषकरून दोन हा आकडा एखाद्या बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चौकानात असून हा आकडा नीळा नीळा दिसायच. काही शब्द लालबूंद किंवा रानातल्या हिरव्यागार वनस्पतीच्या रंगा सारखे दिसायचे.
हे सर्व माझ्या विचाराचे संकेत व्हायचे आणि माझ्या आश्चर्याची भाषा व्हायची.त्यामुळे ह्याचा अर्थ समजून घ्यायला माझ्या जीवनातली ही एक पराकाष्टा समजायला हरकत नाही.

माझ्या वडीलांचा बदलीचा जॉब असल्याने आम्ही निरनीराळ्या शहरात जाऊन रहायचो. मित्रमंडळी,शाळा आणि आजुबाजूचा समाज माझ्यासाठी,जसे एखाद्या गाडीचे गिअर्स एकातून दुसर्‍यात बदलावेत तसं माझं घरचं जीवन आणि माझं वयक्तीक जीवन हेलकावत असायाचं. माझे हे विचार टप्याटप्यानेसुद्धा एकत्र येऊन स्पष्टीकरण देत नव्हते.पण ज्यावेळी माझ्या सभोवतालचं क्षणभंगूर जग आपला आकार घालवून बसायचं तेव्हा काही निश्चीत गोष्टींचं मला आकलन व्हायला लागलं.

दोनचा आकडा नेहमीच नीळा रंगाचा वाटायचा.आणि पांढरा,लालसर आणि करडा रंग वार्‍याची झोत आल्यावरखडबडीत दिसायचे.अगदी माझ्या आजोबांच्या घराच्या मागच्या रानात जसं मला व्ह्यायचं अगदी तसं व्हायचं.
त्यानंतर मी कविता लिहायचं सोडूनच दिलं.माझा सगळा वेळ व्यथेत आणि त्याच्यावर डॉक्टरी उपाय करण्यात जायला लागला.त्यामुळे कविता करण्याच्या मनस्थितीतच मी राहिलो नाही.नाही म्हटल्यास कधी कधी चार ओळी उस्फुर्त सुचायच्या. दिसेल त्या कागदाच्या चिटोर्‍यावर त्या ओळी लिहून ठेवायचो.
खिशातून एक कागदाचं चिटोरं काढून मला म्हणाला,
"आत्ताच बघ,गाडीत बसलो होतो अगदी खिडकीच्या जवळ.
थंडगार हवेच्या झोतीने माझं मन उल्हासित झालं आणि कवितेचं एक कडवं मला सुचलं.दादर येण्यापूर्वा मी कागदावर लिहित राहिलो.तुला वाचून दाखवतो."

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

विश्रामची ही कविता ऐकून माझं मन खूपच गहिवरलं.कवितेतून हा हे कुणाला उद्देशून बोलत आहे हे मला कळेना.आणि तसं त्याला विचारणं मला धजेना.एक मात्र खरं कुणालाही एक लेख लिहून समजवता येणार नाही ते एखादा कवी एकाद्या कडव्यातून सुचवू शकतो हे निश्चीत.
मी मामा काण्यांचं बिल दिलं.आणि विश्रामचा निरोप घेताना त्याला म्हणालो,
"ह्या कवितेवरून तुझी ती सिनेस्थेसीया नावाची व्याधी नक्कीच लुप्त झाली आहे.ह्या कवितेवरून तरी मला तसं वाटतं.तू एक काम कर हे एकच कडवं मला तू वाचून दाखवलंस.पण संपूर्ण कविता लिहिल्यावर मला ती तू इमेलने पाठवून दे."
माझा इमेल ऍड्रेस मी त्याला दिला आणि विश्रामचा निरोप घेतला.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com