Saturday, April 28, 2012

ग्वाही




त्या दिवशी सेंट्रल रेल्वेचा संध्याकाळच्या वेळी काहीतरी घोटाळा झाला होता.प्रथम गाड्या अर्धातास लेट चालत आहेत अशी अनौन्समेंट झाली आणि नंतर काही अनौन्समेंटच होईना.सीएसटी-व्हीटी-स्टेशनात शिरतानाच मी आत गर्दी पाहून अंदाज केला होता की काहीतरी गडबड आहे.


मला माझ्या मेहुणीच्या घरी ठाण्याला जायचं होतं.थोडा वेळ विचार केला आणि जरा जवळच्या बाकावर बसावं म्हणून बसायला गेलो तर माझ्या शेजारी ललित बसला होता हे मी चटकन ओळखलं.त्यानेही मला ओळखलं.


त्याने चटकन उठून मला अलिंगन दिलं.आणि म्हणाला,
"आजचं गाड्यांचं काही खरं नाही.आपण थोडावेळ बाहेर जाऊया आणि गप्पा मारूया."
मी चटकन होकार दिला.आणि समोरच्या केळकरांच्या हॉटेलमधे शिरलो.दोन कप चहा मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या.


ललित त्याच्या लहानपणी आमच्या समोरच्या बिल्डिंगमधे रहायचा.बरेच वेळा तो त्याच्या घरात सापडण्या ऐवजी त्यांच्या शेजारच्या घरात दिसायचा.चंद्रकात आणि शारदा मांढरे हे त्यांचे शेजारी होते.त्यांना एक मुलगी होती नाव मोगरा.तिला ललित मोगराअक्का म्हणायचा.

बर्‍याचश्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.गप्पांच्या ओघात मी त्याला विचारलं,
"तुझे ते मांढरे शेजारी कसे आहेत?"
इतका वेळ मजेत गप्पा मारणारा ललित जरा गप्प झालेला मला दिसला
ललितने मला पटकन उत्तर दिलं नाही.त्याला उत्तर देणं कठीण होत होतं असं मला दिसलं.


पण थोडावेळ थांबून मला म्हणाला,
"मला जे वाटत आहे ते मी ह्या क्षणी सांगत आहे.माझा आशेवर विश्वास आहे.आशा हे एक प्रकारचं इंजीन आहे जे जीवनाची गाडी गतीत ठेवीत असते.ती शरीरातली ज्योत आहे जी माणसाला कार्यरत ठेवीत असते.मला माहित आहे की हे मी माझ्यासाठी सांगत आहे.माझी कहाणी ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी का असं म्हणतो."
ललितची ही प्रस्तावना ऐकून मी जरा संभ्रमात पडलो.मी त्याला म्हणालो,
"माझ्या प्रश्नाने तुला उत्तर द्यायला त्रास होत असेल तर नको सांगू"


"नाही, नाही तसं काही नाही.उलट तुम्ही प्रश्न केला ते बरंच झालं.मला जरा तुमच्याकडे ओघ घालवायला बरं वाटेल."
असं म्हणून पुढे सांगू लागला.


"माझ्या लहानपणी दोन व्यक्ती माझ्या जीवनात आल्या होत्या ज्यांनी मला सदैव प्रेरित केलं.त्याचवेळी मी ताडलं होतं की हे माझे जीवनभरचे मित्र रहातील.चंद्रकांत हे खरे पुरूष होते.ते विमानाचा पायलट होते.घरच्या कंप्युटरवर ते मला बरोबर घेऊन फ्लाईट सीम्युलेशनचे धडे घ्यायचे.त्यांची पत्नी,शारदा ही चांगली वकील होती.त्याशिवाय तिला बागेत काम करून निरनीराळी फुलं लावायचा छंद होता.माझे आईवडील कामात असताना हे माझं शेजारी युगूल मला नेहमी कामात व्यस्त ठेवायचं.


त्यावेळच्या माझ्या त्या जीवनात मला मस्त मजा यायची.पण एकेदिवशी मला मरण काय असतं ते कळलं.
त्याचं असं झालं की,तो शनिवारचा दिवस होता.मी आणि माझे बाबा टीव्हीवर एक चित्रपट पहात होतो.आणि आमच्या दारावरची घंटी वाजली.


दार उघडल्यावर आमच्या समोर एक माणूस उभा राहिलेला दिसला.तो एका वर्तमान पत्राचा रिपोर्टर होता.त्याच्याकडून कळलं की माझे हे शेजारी त्यांच्या एका मित्राबरोबर प्रवासात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात ही दोघं कालवश झाली.ती माझी बालपणातली मजेची आणि आनंदाची वर्षं आता माझ्या जवळ स्मृती म्हणून राहिली आहेत.


पण जसा काळ पुढे जात होता तशी नवी आशा निर्माण होत होती.चंद्रकांत आणि शारदेला एक मुलगी होती, मोगरा.अलीकडेच तिचं लग्न झाल्याचं मला कुणीतरी सांगीतलं.ती जरी दिल्लीला रहात असली तरी आपल्या आईवडीलांच्या दुःखद निधनानंतरही ती आम्हाला भेटायला यायची.अलीकडेच त्यांना एक मुलपण झालं आहे.तिचं नाव त्यांनी कमळ असं ठेवलं होतं.दिसायला खूपच गोड आणि दुडूदुडू धावणार्‍या कमळला बघून खूप मजा यायची.कमळ जसजशी मोठी होत गेली तशी ती एका नव्या पिढीची आशा ठरत होती.


मला एक जुनं गाणं आठवतं.त्याचं शिर्षक होतं "ग्वाही"
आशेचं तो एक रुपकालंकार होता.

ऐकता नवजाताचे रुदन
अथवा
पिंपळ पानाचे स्पंदन
अथवा
विशाल नीळे गगन
नकळत मिळे ग्वाही
अन
समृध्द होई जीवन

जीवनाचं सार ह्यातूनच प्रस्तुत व्हायचं.
माझ्या शेजारांची झालेली दुर्घटना ज्यावेळी माझ्या आठवणीत यायची त्यावेळी,कमळाकडून मला भविष्यातल्या आशेची आठवण करून दिली जायची.
दिवाळीतल्या गोड जिन्नसातल्या करंजीतल्या गोड सारणा सारखी ही कमळ मला वाटायची.


मोगराअक्काने आता आणखी एका बाळाला जन्म दिला आहे.
छोटीशी मुलगी झाली.तिचं नाव तिने आशा ठेवलं आहे.
काय हा जीवनातला जोश म्हणावा.
सूर्य उगवून नव्या दिवसाला जन्म देतो.मला वाटतं जग सुंदर आहे."
असं म्हणून ललित थोडावेळ गप्प राहिला.माझ्या प्रश्नाने त्याला मी जुन्या आठवणीचा उजाळा दिला असं मला वाटलं.कारण तो बराच भावनावश  झालेला मला दिसला.


मी म्हणालो,
"मला माहित आहे तू मांढरे कुटूंबियाना किती मानायचास ते.त्यांची अशी ट्रॅजडी ऐकून त्यावेळी तुला काय दुःख झालं असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.एव्हडे तुझे त्यांचे संबंध होते.पण तू फारच सकारात्मक विचार करून तुझ्या आठवणीना विसर पाडत असावास.सॉरी हं.मी तुला डिस्टर्ब केलं."

"तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.माझा ओघ मी घालवला.अमंळ हलकं वाटतं."
मला ललित म्हणाला.आणखी हातावरच्या घड्याळाकडे पाहू लागला.


तेव्हड्यात हॉटेलात कुणीतरी बोलताना ऐकलं की गाड्या चालू झाल्या.आम्ही लगेचच उठलो आणि स्टेशेनकडे वळलो.मी मात्र ठाण्याला माझ्या मेव्हुणीकडे जाण्याच्या विचार बदला.अगोदरच उशीर झाला होता.मी दादर स्टेशनवर उतरलो आणि वेस्टर्न रेल्वे घेऊन अंधेरीला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com