Monday, June 25, 2012

प्रीति कशी करावी एकमेकावरी




"स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ति
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली"


आज मस्तच हवा पडली आहे.मस्त म्हणण्य़ाचं कारण काल तोबा उकडत होतं.ह्या दिवसातलं हे हवेचं लहरी वागणं माझ्यासारख्यालाही लहरी बनवतं.बाहेर फिरायला जाण्याची मलाही लहर आली.आणि ती माझी लहर फायद्याची ठरली.


त्याचं असं झालं,मी नेहमीप्रमाणे तळ्यावर फिरायला जायचं सोडून द्राक्षाच्या मळ्यात हिंडावं असं ठरवून तिकडे जाण्यासाठी गाडी काढली.आमच्या घरापासून मळा तसा बराच लांब आहे.पण ह्या दिवसात द्राक्षांच्या वेलीवरून सुटून लोंबत रहाणारे द्राक्षाचे घोस बघायला मजा येते.तरी अजून चार ते पाच महिने लागतील ज्यावेळी द्राक्षं पूर्ण पिकून मळेवाले ते घोस खुडायला देतील आणि जमवू तेव्हडे द्राक्षाचे घोस अगदी कमी किंमतीत घरी घेऊन जायला मिळतील.


वाटेत मात्र माझा विचार बदलला.मळा येण्यापूर्वी एका गडद रानातून रस्ता जातो.अजून संध्याकाळ व्हायला वेळ होता.ह्या दिवसात सूर्य जरा वेळानेच अस्ताला जातो. पण पक्षांना मात्र संध्याकाळ होत येत आहे हे कळतं.
रानात एका मोठ्या निलगीरीच्या झाडाखाली मी माझी गाडी पार्क करून पक्षांचा होत असलेला किलीबीलाट ऐकत होतो.मधून एखादा पक्षी आपल्या प्रेयसीला साद घालतोय असं त्याच्या गाण्यावरून वाटायचं.निरनीराळ्या पक्षांची गाणी ऐकायला मजा येत होती.


गम्मत पहा,कवी गीत लिहितो मग संगीतकार त्यावर चाल लावतो आणि त्यानंतर एखादी गायिका किंवा एखादा गायक ते गाणं आपल्या गोड आवाजातून गातात.किती कष्ट पडत असतील हे सर्व करायला?.


कवन,म्हणजे सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना आणि काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे.


कोकीळेसारखा एखादा पक्षी गुंजन  - कर्णमधुर आवाज करण्याची क्रिया- करीत असतो.त्यालाही किती कष्ट होत असतील असं हे गुंजन करायला?

आणि आता तर हे अनेक पक्षी आपआपल्या लहरीनुसार गुंजन करीत आहेत. हा काय चत्मकार आहे?ही समस्या माझ्या मनात सदैव येत असते. आणि गम्मत म्हणजे त्या पक्षांचं शब्दावीना निर्मीलेलं गीत कोण लिहीत असेल बरं.?असाही एक विचार मनात आला.मला कविता सुचली आणि तिथेच गाडीच्या मागच्या ट्रंकवर बसून ती कागदावर लिहून काढावी असं वाटू लागलं.मी काही पंक्ति लिहिण्याचा प्रयत्न केला.नंतर द्राक्षाच्या मळ्याला भेट देऊन घरी आलो.जेवण वगैरे झाल्यावर बिछान्यावर पहूडलो.आणि गीताच्या शेवटच्या पंक्ति झोपण्यापूर्वी आठवल्या त्या तशाच लिहून काढल्या.




गुंजन करण्या कष्ट का विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण असे विहंगाचा कवी
सूर जुळवूनी कोण त्या गाण्या लावी
अपुले कवन सहजपणे विहंग गाई


प्रीति कशी करावी एकमेकावरी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजपणे व्हावी
हीच कल्पना कवनातूनी मिळावी



विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे निघालो होतो द्राक्षाच्या मळयात जायला आणि वेळ घालवला रानात.का तर त्या चार ओळीच्या कवितेची निर्मिती माझ्याकडून व्हायची होती.
एकदा मला प्रो.देसाई म्हणाल्याचं आठवतं.
"कविता लिहावी म्हणून लिहिली जात नाही.कविता होते"
आता पुन्हा तळ्यावर भेटलो की भाऊसाहेबांना ही कविता वाचून दाखवणार.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com