Friday, June 29, 2012

आई! थोर तुझे उपकार.





एकदा श्रीधर पानसरे आपल्या आईच्या वर्ष-श्राद्धासाठी अमेरिकेहून आला होता. मला आठवतं ज्यावेळी श्रीधर तरूण होता, त्या दिवसात अमेरिकेत जाण्याची तरूण मुलांत खूपच चूरस लागली होती.श्रीधरचे चुलत भाऊ बहिणी अमेरिकेत स्थाईक झाल्या होत्या.चार्टर्ड अंकौन्टची परिक्षा देऊन झाल्यावर अमेरिकेत जाऊन वॉलस्ट्रीटवर चांगला जॉब करण्याची श्रीधरची तीव्र इच्छा होती.कधी माझ्या घरी गप्पा मारायला आल्यावर बरेच वेळा मला हे तो बोलून दाखवायचा.मी म्हणायचो,
"जाशील रे तू कधी तरी.होप्स मात्र सोडू नकोस."
मला श्रीधर म्हणायचा,
"माझ्या बाबांचा मला अमेरिकेत जायला विरोध आहे.पण आई मात्र मला प्रोत्साहन देते.तिने आपले  सगळे दागिने विकून मला मदत करायचं एकदा बोलूनपण दाखवलं होतं."



श्रीधरच्या आईचं आणि बाबांचं कधी पटत नव्हतं.तसं पाहिलंत तर त्यांचा त्यावेळच्या युगातला प्रेमविवाह होता.
श्रीधर हा त्यांचा एकूलता मुलगा.त्याच्या जन्मानंतर त्यांचा संबंध विकोपाला गेला.श्रीधर आपल्या आजी-आजोबांकडे वाढला.तो वयात आल्यावर आपल्या आईवडीलांमधले बखेडे त्याला उघड दिसायचे.कंटाळला होता.अधुनमधून मला भेटल्यावर त्यांच्या कंपलेन्ट्स करायचा.



मी एकदा श्रीधरच्या आईकडे विषय काढला होता.तिचं श्रीधरवर खूपच प्रेम होतं.कुणा आईचं आपल्या मुलावर प्रेम नसणार?तिला वाटायचं इकडच्या कटकटीतून सुटून तो परदेशी गेल्यावर सुखी होईल.मला एकदा म्हणाली,
"श्रीधरसाठी मी खूप खस्ता काढला आहे.श्रीधरचं संगोपन नीट व्हावं म्हणून मला खूप दुःखं सोसावी लागली.मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूतीतून त्याची सुटका व्हावी म्हणून मी त्याच्याबद्दल नेहमीच विचारात असायची."



त्या भेटीनंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.श्रीधर अमेरिकेत स्थाईक झाला.एका श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटूंबातल्या मुलीशी त्याचं लग्न होऊन एक मुलगीपण झाली होती.त्याची सासू त्याच्या आईची मैत्रीण होती. श्रीधर एकदा आईला अमेरिकेत घेऊनही गेला होता.जास्त दिवस ती राहिली नाही. 

श्रीधरच्या बाबांच्या आजाराची बातमी ऐकून ती परत आली होती.काही दिवस सोडल्यानंतर श्रीधरचे आणि त्याच्या आईचे संबंध कमी झाले होते.
अधुनमधून तो आपल्या आईला फोन करायचा.बाबांशी त्याचा संवाद तुटला होता.नंतर बाबा गेल्याच्या वार्तेनंतर एकदा तो आपल्या आईला भेटून गेला होता.त्याच्या आईची आर्थीक परिस्थिती बरी होती.तिला पेन्शन मिळायची आणि त्यात तिचं भागायचं.



नंतर तिची प्रक्रुती बरीच खालावली.मी तिला कधीतरी घरी भेटून यायचो.मला म्हणाली होती,
"श्रीधरने माझ्यासाठी एक बाई ठेवली आहे.घरीच रहा म्हणून सांगतो.वृद्धाश्रमात जाऊ नये असं त्याला वाटतं.आठवड्यातून एकदा फोन करून माझी जाग घेतो."



मी कधीही तिला भेटायला गेलो की श्रीधरच्या लहानपणापासूनच्या गोष्टी रंगवून मला सांगायची.श्रीधरची आई एका विख्यात शिक्षण तज्ञाची मुलगी. आणि स्वतः एका शाळेतून व्हाईस प्रिन्सिपल होऊन निवृत्त झाली.तिचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ असल्याने ती गोष्टी वर्णनकरून सांगायची ते ऐकायला मला मजा यायची.मी घरी गेल्यावर तिने सांगीतलेलं सर्व काही एका वहित लिहून ठेवायचो.हे संदर्भ वापरून एखादी कविता लिहायला मजा येईल असं वाटून मी हे करायचो.कविता लिहिण्याचा प्रयत्नही करायचो.



ती गेली त्यानंतर मी ती सर्व कडवी त्याच वहित एकत्र करून लिहिली.आणि तशीच ती वही माझ्या पुस्तकाच्या संग्रहात मी ठेवून दिली होती.आई गेल्यानंतर बरीच वर्ष श्रीधर काही इकडे आला नाही.अलीकडेच तो आपल्या मुलीला आणि पत्नीला घेऊन परत थोड्या दिवसाठी आला होता.श्रीधरची मुलगी आता सोळा वर्षाची झाली होती.मला तरी ती तिच्या आजीसारखी झालेली वाटली.



परत जाण्यापू्र्वी श्रीधर मला भेटायला आला होता.त्याच्या आईच्या आठवणी निघाल्या होत्या.चटकन मला त्या वहीची आठवण आली.मी ती वही श्रीधरकडे वाचायला म्हणून दिली.घरी गेल्यावर वाचीन असं सांगून ती वही श्रीधर घरी घेऊन गेला.
कविता अशी होती.


पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

मातेने व्यथा कौतुके सांगीतली
ऐकून ती मी कविता लिहिली


तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी


वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी


शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी


गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले


शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला


मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला


शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी


सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने


म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”


नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी


एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली


परत जाण्यापूर्वी श्रीधर ती वही आपण घेऊन जाऊ का? म्हणून विचारायला आला होता.मी त्याला ती वही दिली.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com