Tuesday, June 5, 2012

देवबाप्पाचा चिमुकला तलाव.



"हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल"


एखादा, कोणत्या विषायवर अथवा कोणत्या गोष्टीवर भावनाप्रधान होईल हे सांगणं जरा कठीणच आहे.हेमंत माहात्म्याच्या नातवाबद्दल असंच काहिसं झालं.

त्याचं असं झालं,हेमंत माहात्मे काल मला बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
"डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरीरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते दुखः प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं."
असं सद्गदीत होऊन हेमंत आपल्या नातवाला वाटणार्‍या चिंतेबद्दल मला सांगत होता.


"रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी निकामी किंवा कुचकामी पिशवी असून ती फेकून देण्यालायक असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.अर्थात पेशंटला वाचवण्यासाठी तो निर्णय त्या डॉक्टरना घ्यावा लागतो हे उघडच आहे म्हणा.
पण ज्या माऊलीचा तो अवयव, ज्यातून तिने निसर्ग उत्पति केलेली असते त्या अवयवाबद्दलच्या तिच्या भावना तिलाच ठाऊक असणार."
असं नातू त्याच्या आजोबांना म्हणाला.


आणि नंतर आपल्या आजोबांना पुढे म्हणाला,
"मी सुद्धा आईच्या शरीराचा एक हिस्सा होतो.आईच्या उदरात नऊ महिने राहून,तिच्या कष्टाला जो मी कारण झालो,त्याबद्दल मलाही अशावेळी विशेष वाटणं स्वाभाविक आहे.पण काय करणार? निसर्गाचे नियम पाळावेच लागतात ना? एखादी गोष्ट कुचकामी झाली,निकामी झाली,हानीदायक झाली,की निसर्गच तिची विल्हेवाट लावतो.पण हे आईला समजावून कसं सांगायचं.?"
डोळ्यातून ओघळणार अश्रू पुशीत तो आपल्या आजोबांना सांगत होता.


"माझा नातू मला नेहमीच लहान वाटाणार.पण ह्या वयातही तो पोक्त विचाराचा आहे.आणि त्याच्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम आहे."
असं म्हणत,
"डॉक्टरांची चूक नाही म्हणा.त्यांच्या संवयीचा परिणाम."
असं आपलं मत देणार्‍या हेमूकडून हे ऐकून त्यांच्या नातवाच्या मनात आलेली भावना कवितेतून जास्त परिणामकारक प्रकट करता येईल असा विचार करून मला ही कविता सुचली होती.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरीर
अमुच्या चिमुकल्या गादीवर
पोषण केलेस अमुचे किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे
सांगू कसे मी तुला ते

रीत असे निसर्गाचीही
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावे तो झडकर
म्हणूनच,
द्या टाकून झाला वापर
असेच म्हणत असेल तो डॉक्टर.


माझी ही कविता मी हेमंतला त्याच्या नातवासमोर वाचून दाखवली तेव्हा दोघानीही मला मिठीत घेतलं.
"माझ्या आईची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आणि ती पुर्ण बरी झाल्यावर मी तिला ही तुमची कविता वाचून दाखवणार असं मी म्हणतो."
असं त्याने म्हटल्यावर,माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही की,पुढे येणारी प्रत्येक पिढी किती प्रगल्भ विचाराची होत असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com